लोकशाही आलीय... (उत्तम कांबळे)

4dec2016-democracy
4dec2016-democracy

अधूनमधून मी पेठ रोडवर भाजी खरेदी करायला जातो. तसं गोदेच्या काठावर फिरत फिरत कधी वाहणारी, तर कधी मुडदूस झालेल्या रोग्यासारखी पडून राहिलेली गोदावरी पाहत पाहत खरेदी करणं आनंददायी असतं. पेठ रोडला असा आनंद नसतो; पण खेडेगावात, आपल्या लोकांत गेल्याची एक भावना असते. पेठ रोडवर एका ज्येष्ठ महिलेकडंच मी भाजी खरेदी करत असतो. वर्षानुवर्षं तिच्याच दुकानासमोर जातो. आता दुकान म्हणजे रस्त्यावर पसरलेला भाजीपाला. तर त्या दिवशी ती दिसली नाही आणि तिचं दुकानही दिसलं नाही. तिच्याशेजारी दुकान थाटणाऱ्या मावशीची ओळखही यापूर्वीच झाली होती. आपल्याकडं हा भाजीपाला घेत नाही म्हणून सुरवातीला ती चेहरा नाराज करून पाहायची. मग नंतर तीही मला ‘काय भाऊ, कसं चाललंय?’ असं विचारू लागली. चर्चेत तिचा नेहमीचाच एक प्रश्‍न आणि तो म्हणजे ‘बड्या लोकांनी अतिक्रमण करून घर, बंगले बांधले आहेत; ते कुणी पाडत नाही आणि आम्ही बसलो ना इथं फुटपाथवर तर म्युनिसिपालटीची गाडी मागं लागते बघ...जीव कावून जातो...वैताग येतो...किती येळा दुकान मांडायचं, किती येळा विस्कटायचं आणि किती येळा पोत्यात भरून डोईवर घ्यायचं...? लईच कटकट होते बघ...’

मावशीच्या प्रश्‍नावर माझ्याकडं मौन हे एकच उत्तर असतं. खोटं खोटं हसत मौन पाळलं, की गरिबाला आपल्या प्रश्‍नाचं उत्तर मिळाल्याचा भ्रम होतो. नाहीतरी ते भ्रमातच जगत असतात की...

‘‘मावशी, आज बेबीताई नाही दिसत...’’ असा थेट प्रश्‍न विचारत तिच्या संभाव्य आणि नेहमीच्या प्रश्‍नांना बगल देण्यात मी यशस्वी झालो. प्रश्‍नांना बगल दिली, की मध्यमवर्गीय होता येतं हा कुणीतरी सांगितलेला सिद्धान्त एव्हाना मलाही पटू लागलाय. मान वर करतच ती म्हणाली - ‘‘गेलीया देव देव करायला. जाऊ दे, आज तर तुला माझ्याकडंच भाजी घ्यावी लागंल.’’

मी तिच्याकडंच भाजी घेणार होतो. भाज्यांवर नजर फिरवतच म्हणालो - ‘‘कोणत्या देवाला?’’

ती - ‘‘गेली की बालाजीला.’’

मी - ‘‘मध्येच कसं काय?’’

ती - ‘‘मध्येच कुठं ? लोकशाही आली ना! पाच वरसात घडवती ती थोरा-मोठ्या देवाचं दर्शन.’’

मी - ‘‘कळलं नाही.’’

ती - ‘‘त्यात काय कळायचं...? म्युनिसिपालटीच्या निवडनुका लागल्या, की आमचा उमीदवार म्हाताऱ्याकोताऱ्यांना गाडीत भरून घेऊन जातो देव देव करायला. भारी बस असत्यात. खानं-पिनं, दर्शनाचं समदं त्योच बघतो. एक पै कुनाकडं मागत नाही. पाच वरसातनं एकदा ती लोकशाही आली की हा गाड्या भरतो.’’

मी - ‘‘पण कशासाठी करतो हे तो?’’

ती - ‘‘आता ते काय लपवून ठेवतं का कुनी...? आम्ही मतं देतो... त्याच्या नावाचं बटान दाबतो.’’

मी - ‘‘पण मावशी, आपल्याकडं तर लोकशाही रोजच असते की...’’

ती - ‘‘असंल बाबा तुमच्या देशात... आम्हा गरिबांकडं पाच सालात एकदाच येती बघ... ती येऊन गेली की हाय आपलं राबायचं... राबनं कुनाला चुकलं का, सांग?’’

मी - ‘‘म्हणजे मत मिळवण्यासाठी तो तीर्थयात्रा काढतो... खर्च करतो...’’

मध्येच माझा प्रश्‍न रोखत ती म्हणाली - ‘‘मेथी घेऊन जा, मी दिलीय म्हून सांग बायकोला... आन्‌ टमाटा सस्त झालाय... किलोभर घेऊन जा...’’ असं बरंच काही ती बोलायची. भाज्यांचं वजन करायची... पिशवीत टाकायची... पण हे करताना प्रश्‍न मात्र नीट ऐकायची आणि त्याचं उत्तर जमंल तसं द्यायची... थोडं थांबून तिनं वांगी हातात घेतली. खालवर करून पाहिली. ती स्वत-च पुटपुटत म्हणाली - ‘‘नाय देत तुला... सुकल्याती... उद्या ये...’’

मावशी भाजीतून बाहेर पडणार नाही आणि माझ्या प्रश्‍नावर बोलणार नाही, असं वाटायला लागलं तेव्हा मात्र मी माझा प्रश्‍न रेटला. म्हणालो - ‘‘मावशी, मी म्हणत होतो, मतासाठीच हे पुढारी पैसा खर्च करतात का?’’

ती - ‘‘नाय तर काय? या जगात फुकट काय मिळतं ते तरी सांग... पानी इकत, ही इथं बसायची जागा इकत, दवा इकत... आता तर बाटलीत वारं भरून इकनार हाय म्हनत्याती... तुला ठाऊक असंल सगळं...मी इचारते फुकट कोन कुनाला देतं का...? तो बिचारा एवढं देव देव करून देतो, तर त्येला मत द्यायला नको का...? आन्‌ रोज रोज कुठलं आलंय...? तो तरी भेटंल का आपल्याला...? लोकशाही हाय, निवडनुका हायती म्हून देव देव कराया मिळतंय गरिबाला... नाय तर बालाजी कसा दिसंल आमच्यासारख्यांना...? आमचा पुढारी भारी गुनी हाय... स्वत- आमच्या घरात येऊन ‘देव देव करता का?’ इचारतो...’’

मी - ‘‘पण हा पुढारी एवढा खर्च करण्यासाठी कुठून पैसा आणत असंल?’’

ती - ‘‘त्ये नाय बा ठाऊक... थोरा-मोठ्याचं कुनाला कधी काय गवसलं का?’’

बोलता बोलताच तिनं हिशेब केला. माझ्या नजरेला नजर भिडवत ती म्हणाली - ‘‘हो बाजूला...नाय तर माझ्या मागं येऊन उभा ऱ्हा.’’

आश्‍चर्य वाटावं, अशा प्रश्‍नावर मी ‘का?’ असा उद्‌गार काढला.

ती हसत म्हणाली - ‘‘हत्ती येतूया नव्हं देवाचा...बघ तिकडं.’’ मान वळवली. खरोखरच एक हत्ती येत होता. भाजीच्या प्रत्येक दुकानासमोर माहूत भला मोठा हत्ती थांबवायचा. कुणी त्याला बटाटा, फ्लॉवर, कोबी, काकडी, मेथी द्यायचा... हत्ती ते सोंडेत पकडून भल्या मोठ्या गोडाऊनमध्ये म्हणजे आपल्या पोटात ढकलायचा. कुणी पाच-दहा रुपये द्यायचं... कुणी एखादं नाणं टाकायचं...हत्ती इमाने-इतबारे ते माहुताकडं पोचवायचा...जसंच्या तसं...

मी मागं सरकलो. मावशीनं कोबीचा गड्डा हत्तीच्या सोंडेकडं नेला. कोबी घेऊन हत्ती पुढं सरकला. मग पुढचा दुकानदार त्याला काहीतरी द्यायच्या तयारीत राहिला.

मी मावशीला म्हणालो - ‘‘हत्ती रोज येतो का? आणि कशासाठी?’’

ती - ‘‘आता कशासाठी... म्हंजी भीक मागायसाठी. एवढं मोठं जनावर हाय. त्याला पोटबी मोठं हाय. खातं आणि जगतं बिचारं भीक मागून...हत्तीचं राहू दे...थोड्या येळानं नंदीवाला येईल, बहुरूपी येईल...पोतराज फटके मारून घेत उभा राहील...मग पिराची चादर फिरंल...मग अजून काय काय तरी घडत राहील...तुझं बरं हाय... तुम्ही लोक फिलॅटमधी ऱ्हाता...तिथं काय हत्ती येत नाय... आम्ही वस्त्यांवरची माणसं...हे सगळं करतच जगायचं... कुनाला नाय म्हनता येत नाय...पोतराजाला नाय म्हनून बघ...दातानं दंड फोडून घेतो... रगात उडतं... कधी कधी भाजीवर पडतं...’’

मावशी माझ्याशी बोलतच दुसरं गिऱ्हाईक करत होती. मी तिचे पैसे दिले. पिशवी स्कूटीला लटकवली. बटण दाबून ती स्टार्ट केली. मावशी ओरडून म्हणाली - ‘‘चार दिवसांत ये बेबीकडं...बालाजीचा परसाद दिईल ती...’’

मी हसतच म्हणालो, ‘‘मावशी निवडणूक लढवत नाहीय मी...’’

मावशी - ‘‘लढव की मग...कुनाला बी लढवता येती. ऱ्हा की हुबा आन्‌ ने मला देव देव करायला... माझं मत तुलाच दीईन...आन्‌ ह्ये बग, पाच वरसातनं एकदाच येतीया लोकशाही... माहेरवाशिनीसारखी.’’

मावशीचं बोलणं कानावर झेललं आणि गाडी पळवू लागलो. मावशीनं जणू काही लोकशाहीची नवी व्याख्या शिकवल्यासारखं वाटायला लागलं... बीए फायनल पूर्ण करण्यासाठी लोकशाहीची व्याख्या पाठ केली होती. राज्यघटनेचा निदान सांगाडा तरी लक्षात ठेवला होता; पण साला मावशी म्हणजे आक्रितच वाटायला लागली. तिनं केलेली व्याख्या मी कुठंच वाचली नव्हती. ‘लोकशाही एक जीवनशैली असते आणि ती नागरिकांच्या श्‍वासागणिक व्यक्त होत असते,’ ही म्हटलं तरी पोएटिक आणि म्हटलं तर सच्ची व्याख्या मावशीच्या आसपास दिसत नव्हती. ‘पाच सालातनं एकदाच लोकशाही येते माहेरवाशिणीसारखी...’ हे ती किती आनंदात सांगत होती... पण माहेरवास झाल्यावर ती कुठं जात असंल आणि कोणत्या खुंटीवर लटकत असंल, हे मात्र मावशीच्या शब्दांत ऐकायचं राहूनच गेलं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com