खिद्रापूरची उपेक्षित शिल्पसंस्कृती (उत्तम कांबळे)

उत्तम कांबळे uttamkamble56@gmail.com
रविवार, 20 ऑगस्ट 2017

महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेषेवरचं खिद्रापूर हे शेवटचं गाव. इथल्या प्राचीन शिल्पाकृतींसाठी ते देशभरात प्रसिद्ध आहे. मंदिरात आतल्या भागात अनेक ठिकाणी पडझड झाली असून, तिच्याकडं कुणाचंच लक्ष नाही. ‘मंदिराचे फोटो काढू नयेत’ एवढा एक फलक सोडला तर सुधारणांची चाहूल इथं कुठं सहसा लागलेली दिसत नाही. खरंतर आपण या शिल्पांचं माहात्म्य जगभरात पोचवायला पाहिजे. प्रश्‍न आहे तो राजकीय इच्छाशक्तीचा. जगभरातल्या अभ्यासकांना, पर्यटकांना इथं आकर्षित करून घेतल्यास खिद्रापूरचं अर्थकारण तर बदलेलच; पण प्राचीन संस्कृतीचा ठेवाही झळाळत राहणार आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेषेवरचं खिद्रापूर हे शेवटचं गाव. इथल्या प्राचीन शिल्पाकृतींसाठी ते देशभरात प्रसिद्ध आहे. मंदिरात आतल्या भागात अनेक ठिकाणी पडझड झाली असून, तिच्याकडं कुणाचंच लक्ष नाही. ‘मंदिराचे फोटो काढू नयेत’ एवढा एक फलक सोडला तर सुधारणांची चाहूल इथं कुठं सहसा लागलेली दिसत नाही. खरंतर आपण या शिल्पांचं माहात्म्य जगभरात पोचवायला पाहिजे. प्रश्‍न आहे तो राजकीय इच्छाशक्तीचा. जगभरातल्या अभ्यासकांना, पर्यटकांना इथं आकर्षित करून घेतल्यास खिद्रापूरचं अर्थकारण तर बदलेलच; पण प्राचीन संस्कृतीचा ठेवाही झळाळत राहणार आहे. प्राचीन शिल्पांना जीर्णोद्धाराचा लाभ लवकरात लवकर मिळत नाही, असं आजवरचा अनुभव सांगतो. खिद्रापूरही त्याला अपवाद नाही.

कऱ्हाडमध्ये कोयनेला, तर नृसिंहवाडीत पंचगंगेला आपल्या कुशीत घेऊन वाहणारी कृष्ण नदी खिद्रापूरमध्ये थोडी ऐसपैस होते. स्पर्धेत पहिल्या आलेल्या सुदृढ बालिकेसारखी दिसते. इथंच तिच्या आजूबाजूला उगवलेली जुगुळ, शिरगुप्पी, शहापूर, यड्राव ही छोटी छोटी गावं. अलीकडं खिद्रापूर, राजापूर ही गावं. या ठिकाणी कृष्णा म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यादरम्यान मारलेली एक ठळक रेघ. खिद्रापूर हे या रेषेवरचं शेवटचं गाव. सीमेच्या शेवटी असणाऱ्या गावाच्या वाट्याला समग्र विकास सहसा कधी पोचत नाही. पलीकडच्या हाकेवरच्या राज्याला दुसऱ्या राज्यात विकास न्यायचा नसतो आणि अलीकडच्या राज्यासाठी हे गाव दुर्लक्षित असतं. राजधानीच्या आसपास तयार होणारा विकास अशा गावांकडं जाताना सुरवातीला गतिमंद आणि नंतर मतिमंद आणि अर्थातच शेवटी नीतिमंद होतो. बॉर्डरवरच्या गावाच्या माथ्यांवर हे सगळं वर्षानुवर्षं टिकून राहतं.  

...तर प्राचीन शिल्पांसाठी देशात प्रसिद्ध असलेल्या खिद्रापूरला मी तब्बल पस्तीसेक वर्षांनी जात होतो. ‘खिद्रापूर देशभरात प्रसिद्ध आहे’, असं आम्ही म्हणतो, त्याचं एक भावनिक कारण आहे. माझं जन्मगाव शिरगुप्पी आणि आजोळ टाकळीवाडी यांच्या थोडंसं मध्ये हे खिद्रापूर आहे. कृष्णा नदीत डुंबायला येताना, दोन्ही तीरांवरच्या मळ्यातल्या काकड्या, आंबे चोरायला येताना, मासे-खेकडे पकडायला येताना खिद्रापूरच्या कोपनाथ (कोपेश्‍वर) या मंदिरात लपाछपीचा खेळ कधी केला नाही, असं कधी घडलं नाही. नदीच्या अगदीच काठावर वडाच्या झाडाखाली झोपडीत एक हॉटेल असायचं. पाच-दहा पैशांत ताटभर भडंग मिळायचं. असंच भडंग डॉ. विनोद गायकवाडांच्या मांजरीतही प्रसिद्ध होतं. पाच-दहा पैसे त्या काळात गरीब पोरांच्या हातात पडणं म्हणजे एक महालढाईच असायची. सबब, आम्ही सगळी म्हशीवर बसून येणारी बहाद्दर पोरं भडंगाचा वास मात्र भरपूर घ्यायचो. त्यासाठी पैसे लागायचे नाहीत. चार ऑगस्ट २०१७ च्या सायंकाळी कृष्णेच्या काठावरच्या हॉटेलात जुन्या आठवणी चाळवत भडंग खाल्लं तेव्हा कळलं की ते आता १५ रुपये प्लेट झालंय. महागाई किती दौडबाज असते आणि पैशाच्या थोबाडीत मारत त्याचं अवमूल्यन कसं करते हेही लक्षात आलं.

...तर हे दीड-दोन हजार वर्षांपूर्वीचं शिल्प अनेक दंतकथांत अडवलं गेलंय. कुणी म्हणतं, पांडवांनी वनवासात असताना ते उभं केलं आहे... कुणी म्हणतं, राक्षसांनी एका रात्रीत ते बांधलंय...हे एकच नव्हे तर संकेश्‍वरचा शंकनाथ, रायबागचा बंकनाथ ही मंदिरंही एकाच रात्रीत राक्षसांच्या एकाच समूहानं बांधली...शेवटचं मंदिर खिद्रापूरचं; पण दिवस उजाडायच्या आत ते पुरं करायचं होतं. दिवस उजाडल्यावर जो कुणी थांबेल त्याचा दगड होईल...एक बाळ थांबलं, त्याचा दगड झालाय...तो दर वर्षी कणाकणानं वाढत मोठा झालाय. भारतात जेवढ्या दंतकथा आहेत तेवढ्या ग्रीकवगळता अन्यत्र कुठल्या देशात नसाव्यात. दंतकथांचा जन्म कल्पनाविलासातून जसा होतो तसाच तो अज्ञान, दारिद्य्रातूनही होतो, हे अलीकडं कुणी कुणी मान्य करू लागलंय. दंतकथा काहीही असल्या तरी सुमारे १२१४ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला. तत्पूर्वी, इसवीसन ६००-७०० च्या दरम्यान मंदिर उभारलं गेलं. औरंगजेबाच्या काळात ते विद्रूप केलं गेलं. इतकं की एकही मूर्ती सुरक्षित ठेवलेली नाही. कुणाचा हात, कुणाचा पाय, कुणाचे डोळे, कुणाचं डोकं, कुणाचं धड असं काही काही तोडून विलक्षण सुंदर, अर्थगर्भ, जीवनातल्या सर्व भाव-भावनांवर भाष्य करणाऱ्या कलेची अशा प्रकारे मोडतोड करण्यात आली. जी काही शिल्लक आहे ती अजिंठा-वेरूळ इथल्या कलेशी तोडीस तोड किंवा कणभर सरसच आहे. इतिहास कात टाकण्याच्या, रांगण्याच्या काळातही आपलं कलाविश्व, भावविश्व किती समृद्ध होतं, हे पाहण्यासाठी खिद्रापूरला जरूर जायला हवं.

कलाविश्वाचा एक तेजोमय पुंज असलेल्या या प्राचीन ठेव्याकडं शासन आणि पुरातत्व विभागाचं लक्ष जाण्यास खूप मोठा कालखंड गेला. दरम्यान, विद्रूप करण्यात आलेल्या या कलाकृतीला ग्रामीण भागात कुणी कुणी ‘खिद्रापूरचं इंदरं’ (म्हणजे विद्रूप-कुरूप) असा शब्दप्रयोग वापरला. कोप्पम किंवा कोप्पद असंही खिद्रापूरचं नाव असावं, असं रामचंद्र चोथे यांच्या पुस्तिकेत नमूद केलेलं आहे. शिवछत्रपतींच्या स्वराज्यातही हे गाव नोंदवलेलं होतं. काहीही असो, शासन आणि समाजानंही हे गाव अदखलपात्र ठरवलं होतं. या गावाला जाण्यासाठी अनेक वर्षं रस्ता नव्हता. गाव दुष्काळी. आता कुठंतरी उसाचा तुरा डुलू लागल्यानं गाव विकास पावायला लागलंय. अखेर पुरातत्व विभागानं इथं गुंतवणूक करायची ठरवली; पण तीही कासवाच्या गतीनं. ‘सरकारी काम आणि चार वर्षं थांब’ या तऱ्हेनं ती सुरू आहे. मंदिरासमोर म्हणजे नदीच्या काठावर एक वस्तुसंग्रहालय उभारण्याचं ठरलं आहे. अर्थात तेही पूरक्षेत्रातच; पण इमारत तयार होऊन पाच-सात वर्षं होऊन गेली तरी वस्तुसंग्रहालय काही सुरू होत नाही.

आत मंदिरात अनेक ठिकाणी पडझड सुरू आहे. तिच्याकडं कुणाचं लक्ष नाही. ‘मंदिराचे फोटो काढू नयेत’ एवढा एक फलक सोडला तरी सुधारणांची चाहूल कुठं सहसा लागत नाही. या शिल्पांचं माहात्म्य केवळ इथंच लिहून चालणार नाही, तर जगभर त्याचा प्रसार करायला पाहिजे. जगभरातल्या अभ्यासकांना, पर्यटकांना आकर्षित करून घेतल्यास खिद्रापूरचं अर्थकारण तर बदलेलच; पण प्राचीन संस्कृतीचा ठेवाही झळाळत राहणार आहे.

एकीकडं खिद्रापूरच्या वाट्याला हे असं, तर दुसरीकडं गावोगावच्या मंदिरांच्या जीर्णोद्धाराची मोहीम. शासकीय पैशात जीर्णोद्धार होणार आणि राज्यकर्त्यांना त्याचा अधिक लाभ होणार म्हणून की काय, एका रात्रीत अनेक मंदिरं ‘प्राचीन’ झाली. जीर्णोद्धाराची ही लाट दक्षिणेकडून म्हणजे कर्नाटकात येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्या घेतल्या आली. कर्नाटकातल्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी सुरू केला. नव्या मंदिरांना चालना दिली. मग ही लाट महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी स्वीकारली. जीर्णोद्धारातून धार्मिक, आध्यात्मिक लाभ तर होणारच होता; पण राजकीय लाभही होणार होता. टाकळीत मर्गूबाई, टाकळीवाडीत यल्लूबाई व इतरत्रही अनेक मंदिरं जीर्णोद्धाराच्या यादीत आली. ती यावीत किंवा कसं, यावर वादपटू तयार होतील; पण प्राचीन शिल्पांना जीर्णोद्धाराचा लाभ लवकरात लवकर का मिळत नाही, तिथंही देव-देवता असतानासुद्धा हा लाभ का मिळत नाही, हा प्रश्‍न उरतोच. खिद्रापूर हे त्यांपैकी एक. सगळ्या जगाला खेचण्याची ताकद इथल्या शिल्पांत आहे; पण प्रश्‍न फक्त राजकीय इच्छाशक्तीचाच आहे.

खिद्रापूर ते टाकळीवाडी या भागातली सगळीच जमीन एकेकाळी पड होती. आता एक इंच जागाही तशी दिसत नाही. हिरव्यागार उसानं ती भरलीय. मानवी जीवनाच्या विकासाचा मार्ग फक्त उसातूनच जातो की काय, असं वाटायला लागतं! दुसऱ्या दिवशी जयसिंगपुरात राजेंद्र प्रधान या कलावंतानं ‘लेक वाचवा’ असा आशय घेऊन ‘खैंदूळ’ नावाचं एकपात्री नाटक तयार केलंय. त्याचे सलग ३६ तास १२ प्रयोग करून विश्‍वविक्रम करण्याचा प्रयत्न सुरू होता. जयसिंगपुरात सुरू असलेल्या या प्रयोगाला शुभेच्छा तर दिल्याच; शिवाय खिद्रापूर कधी जगभर जाणार याचं स्मरणही केलं.