मीठ का ओकतेय शेती? (उत्तम कांबळे)

मीठ का ओकतेय शेती? (उत्तम कांबळे)

कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक... राज्यातल्या अशा अनेक जिल्ह्यांतली हजारो हेक्‍टर जमीन मीठ ओकत आहे... म्हणजे, ती खारफुटीची, क्षारपड झाली आहे. उत्पादनक्षमता गमावून बसली आहे. रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा प्रमाणाबाहेर वापर, आवश्‍यकतेहून अधिक पाण्याचा वापर यांमुळं जमिनीचा कस खालावत जातो. ती खंगत जाते. रासायनिक खतांचा अन्नधान्यावर, भाजीपाल्यावर परिणाम होतो, तो वेगळाच. असं अन्नधान्य-भाज्या खाऊन लोकांच्याही आरोग्यावर परिणाम होतो आहे. हजारोंच्या संख्येतल्या लोकांमध्ये कर्करोगाची लक्षणं आढळून येऊ लागली आहेत. जमिनीला या संकटातून बाहेर काढायचं असेल, तर तिची साद ऐकली पाहिजे....तेवढी संवेदना कोण दाखवणार ?

कोल्हापूर जिल्ह्यातला शिरोळ तालुका गेल्या ४० वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रातला अती कठीण तालुका. आता या तालुक्‍यात फेरफटका मारला, की तो अती हरित तालुका वाटावा असं चित्र दिसेल. शासन, समाज, नेते, शेतकरी यांनी सतत चार-पाच दशकं एक दीर्घ लढाई करून पाणी अडवलं, पाणी वळवलं, पाणी जिरवलं, पाणी रानभर फिरवलं आणि ऊस, द्राक्षाचं हिरवंगार पीक तरारलं. काही गावांनी खासगीत कर्ज काढून पाणी आपल्या माळावर फिरवलं. माळ पाणी पिऊन मऊशार झाला. ऊस घेऊन मिरवू लागला. हे मिरवणं अधिक चकाकावं म्हणून सहकारी आणि खासगीत साखर कारखाने उभारले. हजारभरही लोकसंख्या नसलेल्या टाकळीवाडीत पाणी पुरवण्याच्या वीसेक योजना झाल्या. देशात सर्वाधिक योजना कोल्हापूरच्या सीमेवरच्या शिरगुप्पी गावात आहेत. शिरगुप्पी माझं गाव आणि टाकळीवाडी आजोळ.

हे सांगताना-लिहिताना आनंद झाल्याशिवाय कसा राहील! अर्थात आम्ही सगळे पिढ्यान्‌पिढ्या भूमिहीन असल्यानं या पाण्याबरोबर आपल्या मालकीच्या शेतात कधी खेळता आलं नाही. अर्थात याचं दुःखही नाही. आमदार-खासदार म्हणून बरीच वर्षं राहिलेले, महाराष्ट्रातल्या परिवर्तनवाद्यांचा आधार ठरलेले आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांनीही आपल्या भागाच्या कायापालटात महत्त्वाची भूमिका तर निभावलीच; परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली बरीच वर्षं आदर्श म्हणून सुरू असलेल्या ‘दत्त कारखान्या’चा सहभाग तर खूपच विधायक. कारखान्यानं सुरू केलेल्या विविध उपक्रमांमध्ये ‘दत्त तंत्र महाविद्यालय’ हे एक. या कॉलेजला भेट देण्याचं अनेकदा ठरवूनही कधी जमलं नव्हतं. शेवटी पाच ऑगस्टला पोचलो. कारखान्याचा परिसर वनश्रीनं नटलेला. नारळाची शेकडो, हजारो झाडं स्वागतासाठी उभी. नारळ तोडण्यासाठी यांत्रिक पाय वापरून सरसर वर चढणारी माणसं दिसतात. खाली नारळाचा ढीग दिसतो. फुलांच्या आणि फळांच्या झाडांची ही रेलचेल...कारखान्याच्या गेस्ट हाउसमध्ये कुणालाही चंगळवादी पदार्थ मिळणार नाहीत याची व्यवस्था केली आहे. कोणत्या अन्नातून रोग तयार होतात, ॲसिडिटी तयार होते याची एक यादीच तिथं लावलेली आहे.

देशभरातल्या कारखान्यांची गेस्ट हाउस चकाकतात; पण इथं आरोग्यदायी अन्न देण्यावर भर दिलेला असतो. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवाडी यांच्या कारखान्याचं गेस्ट हाउस हे तिथं कुणीही येणाऱ्या पाहुण्याला पोटभर भाकरी, आमटी-भात देण्यासाठी प्रसिद्ध आहे. ‘दत्त’च्या गेस्ट हाउसचं तसंच काहीतरी.
कॉलेजवरचा कार्यक्रम सुरू झाला. कारखान्याचे अध्यक्ष खूप अस्वस्थ आणि घाईत असल्याचं दिसत होतं. मी सहजच त्यांना विचारलं तर ते म्हणाले ः ‘‘शेतकऱ्यांचा एक मेळावा ठेवलाय. सेंद्रिय खतांविषयी प्रबोधन करायचं आहे. रासायनिक खतं, कीटकनाशकं आणि भरपेट पाणी वापरून या जिल्ह्यांत सुमारे १४ हजार हेक्‍टर शेती खारफुटी म्हणजे क्षारपड बनली आहे. रासायनिक खताचा अन्नधान्यावर, भाजीपाल्यावर परिणाम होतोय, ते खाऊन लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. १२-१५ हजार लोकांमध्ये कॅन्सरची लक्षणं दिसतात. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जेवढं काही करता येईल तेवढे प्रयत्न सुरू आहेत.’’

गणपतराव म्हणजे सा. रे. पाटलांचे पुत्र दादा खूपच अस्वस्थ होऊन बोलत होते. त्यांनी मलाही अस्वस्थ केलं. वेळेचं भान ठेवून त्यांनी समारंभात माझ्याशिवाय कुणालाच बोलू दिलं नाही. एरवी अशा कार्यक्रमात बोलण्यासाठी पुढाऱ्यांची चढाओढ लागते. कार्यक्रम संपवून बाहेर आलो. नृसिंहवाडीतून आलेल्या एका सदस्यानं पेढे आणले होते. ते त्यांनी मला व दादांना ओंजळ भरून दिले. आम्ही भोजनासाठी गेस्ट हाउसकडं निघालो. यांनी गाडी थांबवत, वाटेत दिसेल त्याला पेढे वाटण्याचा सपाटा लावला. घाई-गडबडीतच जेवण उरकून ते निघाले. मी बराच वेळ व्याधी उत्पन्न करणाऱ्या अन्नपदार्थांची यादी वाचत होतो. त्यातले एक-दोन पदार्थ आजपासून वर्ज्य करायचा निर्णय घेत मीही प्रवासासाठी निघालो.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उसानं फुललेली शेती जशी दिसायला लागली, तसं क्षारपड झालेल्या जमिनीचं चित्र दिसू लागलं. गणपतदादांनी अशा जमिनीचा सांगितलेला आकडा धक्कादायक होता. तो खोटा असावा, असं म्हणण्याचं धाडस काही होत नव्हतं. गेल्या २० वर्षांपासून अशा जमिनी मीही पाहत आलोय; पण त्यांचा विस्तार एवढ्या गतीनं होईल असं वाटलं नव्हतं. एके काळी आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या आणि आता बंद पडलेल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात खूप पूर्वी अशा क्षारपड जमिनी दिसत होत्या. ७२ च्या दुष्काळात आमच्यासारख्या अनेक गरीब विद्यार्थ्यांना कच्ची साखर देऊन जगवणाऱ्या या कारखान्याच्या कार्यक्षेत्रापाठोपाठ क्षारपडीनं वाळवा, मिरज, पलूस परिसरात आपला विस्तार करायला सुरवात केली.

नाशिकमध्ये निफाड तालुक्‍यात, साखरेचं माहेरघर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात, शेजारी सातारा, पलीकडं सीमाभाग अशा अनेक ठिकाणी जमीन ओठ पसरून मीठ ओकू लागली आहे. म्हणजे तिच्यातली सर्जनक्षमता संपून ती वांझ होत होती. निर्मितिशून्य बनून क्षारपड क्षेत्रात गणली जात होती. गेल्या चाळिसेक वर्षांत ती खूप पाणी प्यायली, रासायनिक खतांची, कीटकनाशकांची मालकीण झाली. तिलाही इजा झाली असावी. तिलाही कॅन्सरनं घेरलं असावं. तिच्या गर्भाशयाला कोणत्यातरी किडीनं त्रस्त केलं असावं. परिणामी, क्षारपड जमिनींचे पट्टेच्या पट्टे तयार होऊ लागले. सात-बारावर भरपूर जमीन; पण गर्भधारणा करणारी जमीन शून्य, अशी अनेक शेतकऱ्यांची अवस्था झाली. काहींनी रोजीरोटीसाठी गाव सोडलं. काही जण शेतमजूर झाले. काही जण पाण्यानंतर पैसा ओतून, दवा ओतून शेतीवर उपचार करू लागले. काहींना तात्पुरतं यश आलं, काहींना ते पाहताचं आलं नाही. समाज, शासन या सगळ्यांनीच याकडं दुर्लक्ष केलं होतं. कोणत्याही मोर्चाच्या आणि मोर्चातून थेट लाल दिव्याच्या गाडीत घुसलेल्या नेत्यांच्या अजेंड्यावर हा विषय नव्हता. भाव मिळाला पाहिजे, कर्ज माफ झालं पाहिजे, हे सगळं आता ठीकच म्हणावं लागतं; पण हे ज्यासाठी करायचं त्या जमिनीची मिठाची खारट उलटी थांबवण्यासाठी कुणी फारसं ठोस काही करत नाही. अधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्पर्धा होतात; पण नको तेवढं पाणी पिऊन आणि नको तेवढं रासायनिक खत खाऊन वांझोटेपण मिळवणाऱ्या या क्षारपडीविषयी कुणी बोलत नाही. शेती एकाच वेळी खासगी जशी असते तशीच ती देशाचीही संपत्ती असते. किडीच्या जबड्यात अडकून अंगावर भेगा घेऊन किंकाळ्या मारणाऱ्या या शेतीचं काय करायचं? एकाच वेळी अनेक पिकं, एका वर्षात अनेक पिकं, एकाच वेळी भरपूर उत्पादन या हव्यासातून तर हे घडलं नसावं? घरपोच येणाऱ्या नको तेवढ्या रासायनिक खतांमुळं तर हे झालं नसावं?

१०-१२ वर्षांपूर्वी आत्महत्येची लाट पटकीच्या साथीसारखी पसरली तेव्हा परदेशातली एक महिला पत्रकार ‘सकाळ’च्या कार्यालयात माहिती घेण्यासाठी आली होती. बराच प्रवास केल्यानंतर ती एका निष्कर्षाला पोचली होती. प्रचंड प्रमाणात पाणी आणि रासायनिक खतांचा वापर यामुळं मातीमध्ये पूर्वीइतकी ताकद राहिलेली नाही. जमीन क्षारपड जशी होतेय तशी तिची उत्पादनक्षमताही हळूहळू कमी होणार आहे. शेती तशी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. प्रश्‍न आहे तो रोज एक अंडं खायचं की सगळी अंडी एकाच वेळी खाण्यासाठी कोंबडीच कापून टाकायची? पत्रकाराचं म्हणणं त्या वेळी पटलं नाही; पण याच कालावधीत पाणी पिऊन क्षार ओकणाऱ्या जमिनी वाढताना पाहिल्या की मनाची चलबिचल व्हायला लागते. तिचं खरं असेलच का? मग कॅन्सरची कारणं अजून कशाकशात शोधायची? रासायनिक खतांचा उदंड वापर,पाण्याचा उदंड वापर म्हणजे प्रगत शेती की जमीन सजीव, चेतनादायी आहे असं समजून तिची विचारपूस करत चालणं म्हणजे प्रगत शेती. अनेकदा संभ्रम निर्माण होतोय. निसर्गात आणि शेतीच्या बांधाबांधावर, झाडाझाडाखाली खताच्या रूपानं निसर्ग कसा भरून पावतो, हे महात्मा फुले यांनीही सांगितलं होतं; पण उत्पादन आणि उत्पादनवाढीची महास्पर्धा सुरू असल्याच्या काळात जमिनीचं ऐकण्यासाठी कान देण्याचा, तिच्या चेतना समजून घेण्यासाठी तिला हळुवार स्पर्श करण्याचा प्रयत्नही दुष्काळाचं रूप घेऊ पाहतो आहे. रेल्वेनं पाणी नेऊन एक वेळ दुष्काळ हटवता येतो; पण हा संवेदनांचा दुष्काळ कसा हटवायचा?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com