टोलनाका (उत्तम कांबळे)

uttam kamble
uttam kamble

टोलचं रूपांतर जिझिया करापेक्षाही दणकट गोष्टीत झालं आहे. ते कुणालाच टाळता येणार नाही. सरकार नावाच्या व्यवस्थेनं तयार केलेली रचना लोकांनी स्वीकारली आहे किंवा ती त्यांना स्वीकारावी लागली आहे. रस्त्यातून सरकारनं आपले हात-पाय काढून घेतले आणि टोलवाल्या रस्त्यावरून ‘इंडिया’ला पळवायला सुरवात केली. आता मागं वळता येणार नाही म्हणून पुढं जायचं असेल तर ही प्रक्रिया अधिक सुलभ करता येईल का, हा प्रश्‍न उरतोच.

मि  त्राच्या गाडीत बसून मुंबई-आग्रा हायवेवरून पिंपळगावच्या दिशेनं निघालो होतो. या मार्गावर भव्य असा टोलनाका आहे. तो समोर दिसताच हा मित्र एकदम निःश्‍वास सोडत म्हणाला ः ‘‘आला वाटतं नाका..!’’ पुन्हा एकदा तेच वाक्‍य उच्चारत तो पुढं काचेतून नाक्‍याकडं पाहू लागला. खरंतर हा नाका कुणाच्याही लक्षात राहावा असाच आहे. अनेकदा तो मारामाऱ्यांवरून पेपरात गाजला. पुढारी विरुद्ध कर्मचारी, वाहनचालक विरुद्ध कर्मचारी अशी वादाची कारणं होती. अलीकडं इथल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळंही तो गाजला. रोज तिजोरीभर पैसे जमा करून मालकाच्या ताब्यात देणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवस्था मात्र गुलामासारखी आहे. पुरुष लवकर आंदोलन करतात. लवकर संघटना बांधतात म्हणून की काय, बहुतेक ठिकाणी पावत्या सोडणाऱ्या संगणकासमोर आता महिलाच असतात. महिला असल्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्या कष्टाळू असतात आणि त्यांच्याशी प्रवासी फारसा वाद वाढवत नाहीत. बाईमाणूस म्हणून सोडून देतात. याशिवाय, टोल-आकारणीवरूनही हा नाका गाजत राहिला आणि विजयी होत राहिला. अर्थात हे सगळंच सगळ्यांना ठाऊक आहे. याशिवाय, आणखी काहीतरी वेगळं असायला पाहिजे, नाहीतर हा मित्र ‘आला वाटतं नाका’ असं उद्गारवाचक वाक्‍य म्हणाला नसता. मी विचारलं, ‘‘असं का म्हणालास?’’ तर तो म्हणाला ः ‘‘टोलच्या बराकीतून लवकर गाडी निघणं म्हणजे नशिबाचा खेळ झालाय. कधी आणि कोणत्या कारणावरून कॅशिअरशी कुणाचा वाद होईल सांगता येत नाहीय.’’

हा मित्र बोलत असतानाच वाद सुरू झाला. रांग लांब व्हायला लागली. हॉर्न वाजवण्याची स्पर्धाही सुरू झाली. आमची गाडी कॅशिअर-विंडोपासून तिसऱ्या नंबरवर होती. मी एकाच वेळेला तिथं सुरू असलेला वाद आणि मित्राचं म्हणणं ऐकत होतो. एका वाहनचालकानं कॅशिअरला दोन हजारांची नोट दिली होती. कॅशिअर ती एकसारखी खाली-वर करून पाहत होता. विंडोबाहेर नोट काढत तो म्हणाला ः ‘‘दुसरी नोट द्या.’’ वाहनचालक भडकला. म्हणाला ः ‘‘का द्यायची दुसरी नोट? ही काय बोगस आहे काय? तीच घ्या आणि पावती फाडा.’’ कॅशिअर अतिशय शांतपणे बसला होता. नोट धरलेला त्याचा हात बाहेर होता. वाहनचालकच पुन्हा बोलायला लागला ः ‘‘अहो, थोड्या वेळ्या पूर्वीच एटीएममधून ती बाहेर काढली. खोटी कशी असंल? खराब कशी असंल?’’
कॅशिअर शांतच...
हॉर्न पुन्हा वाजू लागले.
मग कुणीतरी वाहनचालकाला म्हणालं ः ‘‘अहो, द्या दुसरी नोट आणि व्हा मोकळं.’’
वाहनचालक म्हणाला ः ‘‘दुसरी नोट नाहीय.’’

मग मागं बसलेल्या प्रवाशानं आपल्याकडचे पैसे त्या वाहनचालकाला दिले. वाहनचालकानं ते कॅशिअरला दिले. त्यानं पावती फाडली. आडवा लावलेला बांबू वर केला. वाहनचालकाचा चेहरा रागानं लालबुंद झालेला. ‘याच रस्त्यावर असतो. बघून घेतो एक दिवस,’ असं म्हणत त्यानं गाडी पुढं रेटली. हॉर्न काही बंद होत नव्हते. गाडीतल्या गाडीत कुणी कॅशिअरला, तर कुणी वाहनचालकाला शिवी घालत होतं.
टोल भरून आमची गाडी बाहेर पडली तसा हा मित्र म्हणाला ः ‘‘गेल्या आठवड्यात आम्ही एक सीरिअस पेशंट घेऊन नाशिकला निघालो होतो. टोलजवळ आलो तर विंडोशेजारी वाहनमालक आणि कॅशिअरचा वाद. वाहनमालक म्हणत होता ः ‘मी शासकीय अधिकारी आहे आणि कॅशिअर त्याबाबतचा पुरावा मागत होता. पुरावा काही याच्याकडं नव्हता. ओळखत नाहीय का? मस्ती आली का? खाली उतरू का?’ या सगळ्या त्याच्या प्रश्‍नांवर कॅशिअर एकच वाक्‍य बोलत होता ः ‘साहेब, कार्ड दाखवा आणि जा.’ वाहनमालक कार्ड दाखवायला तयार नव्हता. शेवटी व्हायचं तेच झालं. लांबलचक रांग लागली. गाडीतल्या पेशंटचं काय होणार, याची चिंता वाढू लागली. मी शक्कल लढवली. चटकन खाली उतरलो. धावतच विंडोजवळ गेलो. पाचशेची नोट काढून कॅशिअरला दिली. त्याला विनंती केली ः ‘‘भाऊ, यांच्या टोलचे पैसे घे. रस्ता मोकळा कर. आमच्या गाडीत पेशंट आहे. तुमच्या वादात मरून जाईल बिचारा.’’ पैसे तो घेणार इतक्‍यात वाहनमालकाच्या पत्नीनं म्हणजे साहेबाच्या पत्नीनं हात बाहेर काढून पैसे दिले. पैसे देता देता ती साहेबाला म्हणत होती ः ‘‘कशाला वाढवा करताय? देऊन टाका पैसे.’’

पैसे देणाऱ्या पत्नीकडं रागानं पाहत साहेब म्हणाला ः ‘‘तू कशाला देतेयस पैसे? आपल्या इज्जतीचं बघ. रोज कुणीही अडवल आणि पैसे मागल.’’ कॅशिअर हुशार निघाला. त्यानं चटकन त्या महिलेच्या हातातले पैसे घेतले. चिल्लर पैसे आणि पावती तिच्या हातात ठेवली. मी माझी गाडी दूर असतानाच तिथं पैसे भरले. नंबर सांगितला. कॅशिअर आणि मागच्या वाहनचालकांनाही, थोडं लवकर आवरा, अशी विनंती केली. गाडी एकदाची बाहेर निघाली. आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो.

हा मित्र रोज या रस्त्यावर असतो. त्याच्या मेंदूत असे अनेक प्रसंग नोंदवले गेलेले आहेत. मीही अनेक प्रसंग पाहत आलोय. दोन प्रकारचे लोक इथं भेटतात. एक म्हणजे टोल भरला की आपली प्रतिष्ठा गायब असं समजणारे आणि दुसरं म्हणजे, काहीतरी पुरावा देऊन टोलमधून सुटण्याचा प्रयत्न करणारे. दोन्ही वेळेला वाद होतो आणि प्रकरण हातघाईवर येतं. अर्थात विंडोमध्ये सगळं ठीक असतं, असं नाही. विंडोमधल्या माणसाची भाषा, त्याची बॉडीलॅंग्वेज, सुटे नसल्याचं कारण सांगत ते दडपण्याचा प्रयत्न, नोटांबरोबरचं खेळणं असं बरंच काही घडत असतं. टोल १०० रुपये असेल तर काही जण सुटे ९५ रुपये देतात. तो ते मोजत बसतो. बाकीचे पाच रुपये मागतो. हा विचारतोः ‘आम्ही प्रत्येक वेळी ९५ रुपयेच देतो.’ मग हा म्हणतो ः ‘टोल वाढलाय.’ मग हा, ‘आम्हाला कसं सांगितलं नाही?’ तो, ‘कसं सांगणार? बोर्डावर लिहिलंय.’ मग ‘बोर्ड वाचायला वेळ कुणाकडं आहे?’ मग तो, ‘साहेब, मी काय करू?’ मग रागानं पाचाची पत्ती फेकणार, मग तो विचारणार ः ‘नीट का देत नाहीय?’ हा सवाल-जबाब झडू लागला की गर्दी वाढणार, हॉर्न वाजणार. सगळ्यात मोठं ध्वनिप्रदूषण इथं होत असावं; पण लक्ष कुणाचंच नसतं. सुलभ, झटपट आणि वादातीत अशी काहीतरी व्यवस्था करता येईल का? प्रवासी अज्ञानी राहू नयेत, यासाठी काही प्रबोधन करता येईल का, याचा विचार अद्याप सुरू व्हायचा आहे.

टोलचं रूपांतर जिझिया करापेक्षा दणकट गोष्टीत झालं आहे. ते कुणालाच टाळता येणार नाही. सरकार नावाच्या व्यवस्थेनं तयार केलेली रचना लोकांनी स्वीकारली आहे किंवा त्यांना स्वीकारावी लागली आहे. रस्त्यातून सरकारनं आपले हात-पाय काढून घेतले आणि टोलवाल्या रस्त्यावरून इंडियाला पळवायला सुरवात केली. आता मागं वळता येणार नाही म्हणून पुढं जायचं असंल तर ही प्रक्रिया अधिक सुलभ करता येईल का, हा प्रश्‍न उरतोच.

ता. २३ ऑगस्टच्या सकाळी धुळ्याच्या अलीकडं जात असताना एक जुना टोल दिसला. टोलच्या आजूबाजूला ‘टोल बंद आहे’ असे अनेक फलक चिकटवलेले होते. ते वाचून सगळ्यांनाच आनंद होत होता; पण बंद पडलेल्या टोलजवळ तीन-चार टोळ्या आल्या आणि त्यांनी येणारी-जाणारी वाहनं अडवायला सुरवात केली. ट्रक वगैरे मोठी वाहनं अडवून त्यांच्या पुढं राहणारी टोळी वेगळी. छोटी वाहनं अडवणारी टोळी वेगळी. प्रत्येकाच्या हातात देणगीपुस्तकं होती. कोणत्या तरी उत्सवाची. या सगळ्या टोळ्या सक्तीनं पावत्या फाडायला लावत होत्या. काही वाहनचालक नकार द्यायचे. त्यावर टोळीचं उत्तर असायचं ः ‘चाकातली हवा सोडू का? चाक पंक्‍चर केल्यावर केवढ्याला पडंल? काचेवर दगड मारू का? ओढू का बाहेर ड्रायव्हर केबिनमधून?’ बाप रे बाप! या धमक्‍या ऐकून डोकं गरगरायला लागलं. एक टोलनाका बंद पडण्याचा आनंद व्यक्त करण्यापूर्वीच हे चार-सहा मोबाईल टोलनाके तयार झाले होते. टोळीतली सगळी पोरं तरणीबांड होती. ज्या देशातली-समाजातली तरुणाई अशी जबरदस्तीनं पावती फाडून जगायचा प्रयत्न करत असेल, तर तो समाज आणि देश कुठं निघालाय, असं समजायचं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com