ऐका धुळ्याची लावणी चित्त देवोनी (उत्तम कांबळे)

uttam kamble write article in saptarang
uttam kamble write article in saptarang

...तर धुळ्यावर लावणी लिहिणारे सिद्राम मुचाटे हे धुळ्यातलेच. त्या काळात धुळ्यात ‘राष्ट्रीय शाहीर मंडळ’ स्थापन झालं होतं आणि ‘शाहीर’ हे मराठीतलं अशा विषयावरचं पहिलं मासिक सुरू झालं. लहानपणापासून काव्यरचनेचा छंद असलेल्या मुचाटे यांनी खूप लवकर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. या चळवळीनंच त्यांना शाहीर म्हणून घडवलं. सन १९४५ मध्ये, म्हणजे स्वातंत्र्य पाहण्यापूर्वीच ते मरण पावले. या अनोख्या शाहिराच्या मुळाशी जातं आलं ते व्हॉट्‌सॲपमुळं!

अलीकडं यू ट्यूबचा मारा खूपच होतोय, असं म्हटलं जातंय. ज्यांना नको असंल त्यांना मारा आणि ज्यांना हवं असंल त्यांना ती पर्वणी असते. रोज एकदा तरी यू ट्यूबच्या मालिकाच्या मालिकाच अवतरतात. गाणी, भाषणं, अजून काही काही तरी बरंच असतं. ‘मोबाईलवर येणारं सारंच वाईट असतं, आम्ही ते बघतच नाही; डायरेक्‍ट डिलिट करतो...व्हॉट्‌सॲपवरचं तर डिलिट बटण दाबून सगळंच्या सगळं संपवून टाकतो. वाचावं, पाहावं असं तिथं काहीच येत नाही,’ अशी काही लोकांची तक्रार असते; पण ती काही पूर्णपणे खरी नाहीय. मोबाईलवर सगळंच वाईट येतं, या म्हणण्याला आणि मोबाईलपासून दूर पळण्याला काही अर्थ नाही. वाइटाचा मारा बऱ्यापैकी असतो हेही खरंच; पण आता वाईट म्हणजे काय, तर जे आपल्याला भावत नाही किंवा सांस्कृतिक मोजपट्ट्यांमध्ये बसत नाही ते. कुणीतरी एखादा व्हॉट्‌सॲपवरून ‘देख मेरी बॉडी देख’ म्हणून जिममधला फोटो पाठवतो. त्याच्या दृष्टीनं ते व्यक्त होणं आणि इतरांच्या दृष्टीनं वाईट, खराब वगैरे असू शकतं. काही वेळेला इतरत्र लवकर न होणाऱ्या गोष्टीही आपल्यापर्यंत व्हॉट्‌सॲपच्या माध्यमात पोचू शकतात. आपल्याजवळ काही वेगळं असंल तर ते व्यक्त करण्याची माणसाला हौस असते. त्यातून ते हे घडत राहतं; पण एक दिवस अनेक जुन्या लावण्या आणि पोवाडे मी या माध्यमाद्वारे ऐकू शकलो. भूतकाळात जाऊन अनेक लावण्यांचा शोध घेऊ शकलो. धुळ्याची, मुंबईची लावणी शोधू लागलो.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आणि नंतरही गाजलेली अण्णा भाऊंची एक लावणी आहे. ‘मुंबईची लावणी’ असं तिचं नाव आहे. ती मला ‘माझी मैना गावावर राहिली’ या लावणीइतकीच आवडते. अलीकडं ‘मुंबईची लावणी’ मूळ चालीत ऐकायला मिळणं तसं कठीण. अण्णा भाऊ गायचे तेव्हा बेभान व्हायचे. मानेवरच्या शिरा ताणल्या जायच्या. लावणी ऐकली की मुंबईत फिरून आल्यासारखं वाटायचं. लावणीत मुंबई आणि तिचे नखरेल व बकाल चेहरेही खचाखच भरले होते. त्या काळात लावणी हातात घेऊन जर कुणी मुंबईत गेलं, की लावणीतली मुंबई जशीच्या तशी दिसायची. सूक्ष्म निरीक्षणातून आणि जीवनानुभवातून ती जन्माला आली होती.

मुंबईत उंचावरी । मलबार हिल इंद्रपुरी ।
कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती ।।

किंवा
ग्रॅंट रोड, गोखले रोड। संडास रोड विन्सेंट रोड ।
असे किती रोड इथं नाही गणती ।।

किंवा
मोती बाजार, शेअर बाजार । तिथे चाले मोठा व्यापार ।
सारे सट्टेवाले तिथं सट्टा खेळती ।
फोरास रोड तीन बत्ती । गोलपिठा नाक्‍यावरती ।
शरीर विकून कितीएक पोट भरती ।।

पूर्ण लावणी वाचल्यानंतर शब्दाशब्दांत मुंबई चालत आणि रांगत असल्याचा भास होतो. ‘मुंबईची लावणी’ गाजल्यानंतर गावोगावचे शाहीर आपापल्या गावावर लावणी लिहू लागले. त्यात सातारा, नाशिक, कोल्हापूर, पुणे आदी अनेक शहरांचा उल्लेख करता येईल. याही लावण्या त्या त्या गावात प्रसिद्ध पावल्या होत्या. काहींनी गाणी, पोवाडे लिहून आपलं शहर साहित्यात, कलेत अजरामर करण्याचा प्रयत्न करून ठेवला आहे. बऱ्याच लावण्या इतकं वास्तववादी वर्णन करतात, की ती ब्रिटिशांनी लिहिलेल्या गॅझेटच्या आसपास फिरतात की काय, असं वाटायला लागतं. इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचं मूळ त्या मस्तपैकी व्यक्त करतात.

यू ट्यूब पाहून शहरावरच्या लावण्यांच्या नादाला लागलो असतानाच धुळ्यावरची प्रसिद्ध लावणी नजरेसमोर आली. बिदर जिल्ह्यातल्या भालकी इथल्या ‘हिरेमठ संस्थान’च्या ‘महाराष्ट्र बसव परिषदे’नं अलीकडेच राष्ट्रशाहीर सिद्राम बसाप्पा मुचाटे यांचं एक छोटेखानी चरित्र प्रसिद्ध केलं आहे. ‘लिंगायत समाजरत्न चरित्रमाला’ या मालिकेंतर्गत प्रसिद्ध झालेलं हे तिसरं पुस्तक डॉ. बी. एम. डोळे यांनी संपादित केलेलं आहे. डॉ. श्री. बसवलिंग पट्टद्देवरू यांच्या प्रेरणेनं बसव पंथातलं सगळं साहित्य मराठीत अनुवाद करण्याचा एक प्रकल्प सुरू आहे, हेही विशेष!
...तर धुळ्यावर लावणी लिहिणारे सिद्राम मुचाटे हे धुळ्यातलेच. त्या काळात धुळ्यात ‘राष्ट्रीय शाहीर मंडळ’ स्थापन झालं होतं आणि ‘शाहीर’ हे मराठीतलं अशा विषयावरचं पहिलं मासिक सुरू झालं.

लहानपणापासून काव्यरचनेचा छंद असलेल्या मुचाटे यांनी खूप लवकर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. या चळवळीनंच त्यांना शाहीर म्हणून घडवलं. शब्द आणि आवाज चळवळीला मिळाला. स्वतः कापडी फलक रंगवून ते भाकरी-तुकडा मिळवत. देशभक्तीची प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या पथकात किसनराव हिंगे, पद्मश्री कृष्णराव साबळे, गिरजूपंत मेळनामे, आत्माराम पाटील, श्रीपतराव लोखंडे हे सगळे समकालीन आणि काहींना मुचाटे यांनी घडवलेलं. सगळं आयुष्य शाहिरीला आणि देशप्रेमाला त्यांनी वाहिलेलं होतं. सन १९४५ मध्ये म्हणजे स्वातंत्र्य पाहण्यापूर्वीच ते मरण पावले. धुळ्यातल्या ‘राजवाडे संशोधन केंद्रा’त त्यांची काही हस्तलिखितं पाहायला मिळतात. तंट्या भिल्लावर त्यांनी लिहिलेला पोवाडा त्या काळी खूप गाजला होता. आपण ज्या शहरात जन्माला आलो, वाढलो आणि लढलो त्या धुळ्यावर लावणी लिहावी, असं त्यांना वाटलं असल्यास आश्‍चर्य नको. मालेगावचे एक तरुण संशोधक विनोद गोरवाडकर यांनी या शाहिरावर शोधनिबंध लिहून न्याय दिलाय. पन्नासहून अधिक पुरस्कारांचा मानकरी ठरलेल्या या शाहिराची धुळ्यावरची लावणी वाचण्यासारखी आहे. अर्थात, आताचं धुळे पाहून ती वाचल्यास दुःख होईल. लावणीविषयीचं नव्हे, तर धुळ्याला हे बकालपण का लागलं याविषयीचं दुःख वाटल्याशिवाय राहणार नाही. धुळ्याची अतिशय सुंदर रचना कॅप्टन ब्रिग्ज यांनी केली. धुळ्याच्या विकासात जगद्विख्यात अभियंता विश्वेश्वरय्या यांचा सहभाग राहिला; पण आजचं धुळे क्षणभर विसरून भूतकाळात रमण्यासाठी तरी ही लावणी वाचली पाहिजे, असं मला वाटत राहिलं. ‘भास्कर वाघ’मुळं धुळे कसं कुख्यात झालं हे विसरायलाही मदत होते.
तर ही लावणी अशी...

धुळ्याची लावणी

आम्ही धुळ्याचे शाहीर
आमचं नाव जगजाहीर
साऱ्या हिंदुस्थानावर कवी सिदराम
कवी गाण ज्याचं म्हणी, करी ताबडतोब गाणी
ऐका धुळ्याची लावणी चित्त देवोनी,
हां जी हां जी हां जी र ऽऽ जी ।। १।।

धुळ्याचं गं स्टेशन आलं
उतर गाडीमधून खालं
पुढे पाहुनी या चाल बहुगर्दीला
नारायण तेली टांगेवाला, रोख भाडे देऊ त्याला
हा गं मोठा भोंगा झाला बघ शेठजीचा,
हां जी हां जी हां जी र ऽऽ जी ।। २ ।।

खुनी चोर दरोड्याला
न्याय होता कोर्टाला
मान दिला कायद्याला
सजा कायद्याने होती
कैक फासावर जाती, हवा तुरुंगाची खाती
तो हाच बंगला, हां जी हां जी हां जी र ऽऽ जी ।। ३ ।।

पुढे पाचकंदिलाचं नाक
जिकडं पहावं तिकडं लोक
पहा मोठा झोक बिडी पानवाल्याचा
घे गं मसाल्याचा विडा, त्यात खुशबू घाल थोडा
तुझा रंगलेला मुखडा खुलवायला,
हां जी हां जी हां जी र ऽऽ जी ।। ४ ।।

एका पहिलवानाचे नाव
दगा मोरू याचा डाव
तुकाराम पहिलवान मोठा नामी खेळाडू
मच्छू मोरातीची जोड, नाही मेहनतीला तोड
हरि आनंदाची जोड, दिसण्यात फक्कडू हां जी,
हां जी, हां जी र ऽऽ जी ।। ५ ।।

नव्या माध्यमाच्या मदतीतून कुठंतरी एक संदर्भ सापडला आणि पुढं सिद्रामंपर्यंत पोचता आलं. सुमारे शंभरेक वर्षांपूर्वीचं धुळं पाहता आलं. त्याची जीवनशैली, कला, क्रीडा, यांत्रिक विकास, ब्रिटिश राजवट या सगळ्यापर्यंत पोचता आलं. या शोधप्रवासात चार-सहा शहरांवरच्या लावण्या वाचता आल्या. इतिहासातला एक कण जमवता आला. नाहीतरी इतिहास म्हणजे काळोखाची गुहाच असते, असं काही नाही. उजेडाचे कणही सापडतात तिथं. त्याला निमित्त व्हॉट्‌सॲप किंवा नेट झालं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com