माणसांच्या जगात आणखी एका बिबट्याचा मृत्यू (उत्तम कांबळे)

उत्तम कांबळे uttamkamble56@gmail.com
रविवार, 17 डिसेंबर 2017

बिबट्या मरण पावला आहे, हे समजायला वेळ लागला नाही. घाटाशेजारची दरी अंधारानं भरली होती. टेकड्यांच्या कपाळावरही दाट अंधार मुक्काम करत होता. मेलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी प्रवासी गोळा होऊ लागले. जागा दिसेल तिथं वाहनं लावून येऊ लागले. वाहतुकीची कोंडी झालीय याची चिंता कोणालाच नव्हती. प्रत्येकाला बिबट्या पाहायचा होता. त्याला हात लावायचा होता. हे करत असताना माणसाची अगाध आणि असंख्य रूपंही मृत बिबट्याजवळ अवतरू लागली...

बिबट्या मरण पावला आहे, हे समजायला वेळ लागला नाही. घाटाशेजारची दरी अंधारानं भरली होती. टेकड्यांच्या कपाळावरही दाट अंधार मुक्काम करत होता. मेलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी प्रवासी गोळा होऊ लागले. जागा दिसेल तिथं वाहनं लावून येऊ लागले. वाहतुकीची कोंडी झालीय याची चिंता कोणालाच नव्हती. प्रत्येकाला बिबट्या पाहायचा होता. त्याला हात लावायचा होता. हे करत असताना माणसाची अगाध आणि असंख्य रूपंही मृत बिबट्याजवळ अवतरू लागली...

आनंद पांडे हा चित्रपटनिर्मितीच्या मुख्य प्रवाहात रुळण्याचा, खेळण्याचा प्रयत्न करून पाहणारा अतिशय संवेदनशील आणि अभ्यासू कलाकार... म्हणजे छायाचित्रण करणारा, दिग्दर्शन करणारा...कोणत्याही कलावंताला किंवा तंत्रज्ञाला या दोन गोष्टी आवश्‍यक असतात. डिसेंबरच्या पहिल्या तारखेला हॉटेल राऊमध्ये आम्ही भोजन करत चर्चा करत बसलो होतो. सायंकाळी तो पुण्याला गणेश जाधवबरोबर निघाला होता. नाशिकमधील थंडीशी प्रेम, मैत्री कशी करायची, सिन्नरपर्यंत गर्दीचा प्रवास कसा करायचा, अशा काही टिप्स देऊन मी त्याचा निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी तो पुण्यात कसा काय प्रवास पोचला हे विचारण्यासाठी फोन केला. अर्थातच सकाळी लवकर... फोन उचलला गेला नाही. पुन्हा फोन केला. त्यानं तो उचलला. ‘‘किती वाजता पोचलास?,’’ या माझ्या पहिल्याच प्रश्‍नावर धक्कादायक वाटावं असं उत्तर त्यानं दिलं. ‘‘सकाळी सहाला.’’ मला आश्‍चर्य वाटलं. कारण तो उशिरात उशिरा बारा वाजता पोचायला हवा होता; पण हेही लक्षात आलं, की या रस्त्यावरच्या प्रवासाबाबत भाकित करता येण्यासारखी स्थिती नाही. पूर्ण न झालेल्या रस्त्यावर टोल सुरू आहे, अनेक ठिकाणी दुरुस्ती सुरू आहे. त्यात वाहनांची ही गर्दी... कोणत्या तरी एका घाटात वाहतूक तुंबून राहण्याची शक्‍यता. मुंबई-पुणे आणि नाशिक या सुवर्णत्रिकोणातील एक गंजलेला आणि गांजलेला रस्ता म्हणजे आमचा नाशिक-पुण्याचा रस्ता. ...तर आनंदला उशिराचं कारण विचारलं, तर तो खो-खो हसत म्हणाला ः ‘‘साहेब, माझ्या आयुष्यातला मोठा ऐतिहासिक, रंजक, माहितीपूर्ण आणि माणसाची विविध रूपं पाहण्यास शिकवणारा प्रवास होता.’’ कवितेसारखं उत्तर ऐकून काही कळत नव्हतं. मी त्याला म्हटलं ः ‘‘नेमकं काय झालं?’’ यावर त्यानं खरोखरच सविस्तर उत्तर दिलं. चित्रपटाच्या पडद्यावर दिसावं असं उत्तर... माणसाची विविध रूपं उलगडणारं उत्तर होतं.

...तर आनंद म्हणाला ः ‘‘आम्ही निर्विघ्नपणे प्रवास करत होतो. खरंतर अकरापर्यंत पोचलोही असतो पुण्यात; पण संगमनेर ओलांडून चंदनापुरी घाटात आलो आणि ट्रॅफिक जॅम. गाडी बाजूला लावून वाहतूक रोखून धरणाऱ्या त्या बिंदूपर्यंत आम्ही पोचू लागलो. अन्य प्रवासीही असेच करत होते. तेही लांब लांब पावलं टाकत, मोबाईलवर कॅमेरा आणत निघाले होते. पाच-पन्नास पावलं चालल्यानंतर समोर एक दृश्‍य दिसलं. बिबट्याचा एक बछडा मरून पडला होता. जवळ जाऊन त्याला हात लावला. उपचाराची काही शक्‍यता आहे का पाहिलं; पण उजव्या कपाळावर एक छोटी, पण खोलवर जखम... त्यातून बरंच रक्त वाहून गेलं होतं. बिबट्या मरण पावला आहे, हे समजायला वेळ लागला नाही. आता काय करायचं, तर डॉक्‍टर, वन खाते आणि पोलिसांना फोन करायचा. एकेक नंबर शोधू लागलो. फोन लागत होते. रिंग वाजत होती; पण उचलले जात नव्हते. रात्रीनं मध्यरात्रीचं रूप धारण केलं होतं. घाटाशेजारची दरी अंधारानं भरली होती. टेकड्यांच्या कपाळावरही दाट अंधार मुक्काम करत होता. मोबाईलमधली बॅटरी सुरू कर, कुणाच्या तरी गाडीचा लाइट घे, असं करत बिबट्याकडं पाहणं सुरू होतं. एक-दोन फोनही लागले. पोलिस आणि वन खात्यातील लोक पोचणारही होते. मेलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी प्रवासी गोळा होऊ लागले. जागा दिसेल तिथं वाहनं लावून येऊ लागले. वाहतुकीची कोंडी झालीय याची चिंता कोणालाच नव्हती. प्रत्येकाला बिबट्या पाहायचा होता. त्याला हात लावायचा होता. हे करत असताना माणसाची अगाध आणि असंख्य रूपंही मृत बिबट्याजवळ अवतरू लागली.
एक ः बहुतेक जण मृत बिबट्याजवळ बसून सेल्फी काढू लागले. गाडीतल्या सदस्यांना बोलावू लागले. स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या हातात मोबाईल देऊनही फोटो काढू लागले. स्वतः पोझ देऊ लागले. कुणाचा हात बिबट्याच्या डोक्‍यावर, कुणाचा पाठी-पोटावर, कुणाचा डोळ्यावर, कुणाचा मानेवर... कुणी कुणी तर बिबट्याशी झुंज देऊन आपणच त्याला युद्धात ठार केलं, अशी पोझ देऊन फोटो काढत होतं... कुणी कुणी तरी बिबट्यापेक्षा आपणच कसे पराक्रमी आहोत, हे दर्शवण्याचा प्रयत्न करत होते... कोणी कोणी बिचकत बिचकत बिबट्याला स्पर्श करत होतं आणि ‘घे रे लवकर फोटो,’ असं ओरडून सांगत होतं...बिबट्या जिवंत झाल्यावर काय, अशी भीती त्यांच्या मनात असावी...

आनंदचं ऐकत असताना मलाही बिबट्यांचे काही प्रसंग आठवत होते. याच घाटात पंधराएक वर्षांपूर्वी माझ्या गाडीलाही जोराची धडक देऊन बिबट्या घाटामध्ये दरीत पळाला होता. नाशिकमध्ये एका हॉटेलात, एका घरात आलेला बिबट्या पाहिला होता. मृत बिबट्याशेजारची पराक्रमी गर्दीही पाहिली होती. माणूस श्रेष्ठ आणि पराक्रमी, की बिबट्या, वाघ, याची कथाही पुनःपुन्हा आठवली होती. एकदा पिंजऱ्यात बंद केलेल्या सिंहाचं चित्र काढत एक चित्रकार पिंजऱ्याबाहेर बसला होता. आतला सिंह बारीक नजरेनं ते चित्र पाहत होता. चित्र पूर्ण झालं. एका सिंहाच्या छाताडावर एक माणूस मुठी आवळून ‘जय हो’ म्हणत उभा आहे, असं ते चित्र होतं. सिंह हसत त्या चित्रकाराला म्हणाला ः ‘‘मी पिंजऱ्यात आहे म्हणून तू असं खोटं चित्र काढलं. मला बाहेर सोडून बघ. चित्र बदलेल आणि माणसाची मान तोंडात धरून त्याला फेकणारा सिंह दिसेल.’’ तात्पर्य, चित्र कोण काढतो आणि ज्याचं चित्र तो काढतो तो कुठं आहे, हे महत्त्वाचं असतं. घाटातल्या मृत बिबट्याजवळ असेच मोबाईलवाले आणि स्वयंघोषित छायाचित्रकार व चित्रकार उभे होते. आपणच पराक्रमी आहोत, हे मृत बिबट्याजवळ राहून सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करत होते.
दोन ः काही प्रवासी बिबट्याजवळ आले आणि त्याची नखं उपटता येतात का, याचा प्रयत्न करू लागले. नखं खूप महाग असतात. खूप काळ टिकतात. शोकेसमध्ये ठेवून स्वतःच्या कथित पराक्रमावर पोवाडे लिहिता येतात.
तीन ः काही जण बिबट्याचे पाणीदार, सोनेरी, तेजस्वी डोळे काढता येतील का आणि तेही घरात शोकेसमध्ये ठेवता येतील का, यासाठी हालचाली करू लागले होते.
चार ः काही जण आपली नखं खुपसून बिबट्याचे कोवळेजार चामडे ओरबडता येईल का, याचा विचार करू लागले होते.
पाच ः काही जण बिबट्याच्या कुलवृत्तांतात शिरले.
नाना तऱ्हेची माणसं आणि त्यांची रूपं एका क्षणात व्यक्त होऊ लागली. खरंतर विकार हा शब्द अधिक समर्पकपणे वापरता येईल.

आनंदनं एक निर्णय घेतला. बिबट्याजवळ तो उभा राहिला. बसला. दुरूनच बिबट्या बघा. त्याला हात लावू नका, असा आदेश दिला. हा दाढीवाला तरुण कोण आणि आदेश का देतोय, असा प्रश्‍न कुणाला पडला नाही. गर्दी जेवढी महापराक्रमी असते तेवढीच भित्रीही असते. काही चमत्कार व्हावा त्याप्रमाणं बिबट्यानं थोडी जरी चुळबूळ केली असती, तर गर्दी ‘भागो भागो’ म्हणत आपापल्या गाड्यांत काचा वर करून बसलीही असती; पण गर्दी सध्या तरी एक इव्हेंट, एक दृश्‍य समजून मृत बिबट्याकडं पाहत होती. बऱ्याच वेळानं म्हणजे पोलिस खात्याच्या संस्कृतीनुसार सिव्हिलमधला एक कॉन्स्टेबल आला. त्यानं सर्वप्रथम गर्दी हटविण्याचा प्रयत्न केला. गर्दी दूर जात होती; पण मध्यरात्री दोनला पर्यावरणाचा विचार तिच्या ओठावर आला. कुणीतरी वन खात्याला, कुणी सरकारला, तर कुणीतरी बिबट्यालाच शिव्या देत होतं. ‘कशाला यायचं बिबट्यानं माणसाच्या जगात,’ असा प्रश्‍नही काहींच्या ओठावर आला होता. आता बिबट्याला हायवे, कार यापैकी काही माहीत नसतं. आपले निवारे कुणी उद्‌ध्वस्त केले हेही त्याला ठाऊक नसतं. कोणा व्यक्तिमत्त्वविकासाच्या शाळेत तो गेलेला नसतो. जगण्या-मरण्याचं गूढही त्याला माहीत नसतं. तो फिरत राहतो... खाद्याच्या शोधात.

रात्री एक वाजल्यानंतर बिबट्याचं पार्थिव शासकीय यंत्रणेनं ताब्यात घेतलं. वाहतूक सुरू झाली. एक जण दुसऱ्याला सांगत होता ः ‘‘माणूस किती येडछाप... मृत बिबट्या बघण्यासाठी कोणी वाहतुकीची कोंडी करतं का?’’... अर्थात सांगणारे, ऐकणारे, हसणारे, विचार करणारे, ‘जाने भी दो यारो’ म्हणणारे सारे लोकच होते. ‘माणसं’ होते...

आनंदनं ही सारी माहिती वन्यप्राण्यांवर काम करणाऱ्या त्याच्या मैत्रिणीला पाठवली. माझ्याशी चाललेला संवाद संपवता संपवता तो (मो. ९५५२००९४००) म्हणाला ः ‘‘सर, जवळच्या खेड्यातील एक आजीही तीन-चार किलोमीटर अंतर चालत आणि कडेवर नातवाला घेऊन आली होती. बिबट्याला हात लावून लावून ती नातवाला माहिती देत होती आणि गर्दीतल्या माणसांची, त्यांच्या रूपांची ओळख करून देत होती जणू काही. बाळा तुलाही माणसांच्या जगात राहायचं हाय; माणूस समजून घे... जे मेलं ना ते बिबट्याचं बाळ हाय... त्येला नाय कळला माणूस...’’

Web Title: uttam kamble write article in saptarang