छोट्या बाहुल्यांची मोठी स्वप्नं (उत्तम कांबळे)

छोट्या बाहुल्यांची मोठी स्वप्नं (उत्तम कांबळे)

ते नुसतंच होस्टेल किंवा नुसतंच वसतिगृह नव्हतं. ते होतं ऊर्जाकेंद्र. मुलं कशी घडवावीत, याचा आदर्श घालून देणाऱ्या ‘रयत-पॅटर्न’चं वसतिगृह. मागास असणाऱ्या ४२ मुलींच्या या वसतिगृहाला लॉजिंग-बोर्डिंगसारखं स्वरूप नाहीय. तिथं होते जीवनाची जडणघडण, होतो व्यक्तिमत्त्वाचा विकास. इथल्या मुलींच्या डोळ्यांतल्या छोट्या बाहुल्यांनी मोठी स्वप्नं तोलून धरली आहेत. ही स्वप्नं त्या फुलवताहेत, तेजस्वी बनवताहेत...या स्वप्नांचा अर्थ समजून घ्यायला हवा.

भूमिका आणि नीतिका म्हणाल्या ः ‘‘आम्ही दोघी धान्यमंत्री. धान्याच्या कोठाराचं काम आम्ही पाहतो. धान्य येतं किती, दळणासाठी जातं किती, शिल्लक राहतं किती, ते नीट आहे का आदींची माहिती रोजच्या रोज ठेवतो. धान्यकोठारही स्वच्छ ठेवतो.’’
विद्या म्हणाली ः ‘‘मी आरोग्यमंत्री आहे. होस्टेलच्या मुली आजारी पडल्या, की काही प्रथमोपचाराची औषधं मी देते. प्रत्येक औषधावर रोगाचं नाव आणि डोस किती द्यायचा, हे लिहिलं आहे. सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी यावरची ही औषधं आहेत. एखाद्या व्यक्तीला विश्रांती घ्यायची असेल, तर इथं खाट आहे. आराम करून, बरं होऊन ती जाऊ शकते.’’

नेहा आणि गौरी बिछानामंत्री आहेत. बिछाना ठेवण्यासाठी एक मोठी खोली आहे. तिथं जाजम, बेडशीट, गाद्या व्यवस्थित घडी करून ठेवल्या होत्या. बिछान्यावर मुलींची नावं होती. आपापला बिछाना न्यायचा आणि सकाळी घडी करून, गुंडाळून होता तसा ठेवायचा.
मग आमची भेट झाली ग्रंथालयमंत्र्यांशी. स्नेहल आणि शीतल या विभागाचं काम पाहतात. कपाटात पुस्तकं नीटनेटकी लावलेली होती. सर्व प्रकारचं साहित्य आणि विश्‍वकोश होते. काही पुस्तकं दान म्हणून आलेली. काही विकत घेतलेली. प्रत्येक मुलगी ग्रंथ वाचतेच. प्रसंगी वहीत टिपण काढते.
प्रणाली ही शिवण विभागाची मंत्री. इथं प्रत्येक मुलीला शिवणकाम शिकवलं जातंय. प्रयोगासाठी जुन्या साड्या आणून त्यातून नवं काहीतरी बनवलं जातंय.
वसतिगृहात १४ विभागांचं मंत्रिमंडळ आहे. केंद्रीय मंत्रिमंडळासारखं. काही खात्यांना दोन मंत्री, तर काही खात्यांना एक मंत्री आहे. खात्याचा विस्तार, महत्त्व, उपयुक्तता विचारात घेऊन मंत्रिमंडळ बनवलंय. सानिका आहे प्रधानमंत्री.

सगळी खाती फिरून झाल्यावर मुली एकत्र बसल्या. मग उत्स्फूर्तपणे कुणी कविता वाचली, कुणी गाणं म्हटलं, कुणी भाषण केलं. कुणी एखाद्या गंभीर विषयावर चिंतन केलं. अतिशय निर्मळ आणि निर्भयपणे या साऱ्या मुली बोलत होत्या.
एका मुलीनं छत्रपती शिवाजीमहाराजांवर कविता केली होती. कलुषित, प्रदूषित, भ्रष्ट आणि ढोंगी वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर ‘राजे, तुम्ही असायला पाहिजे होतं’ हे सांगत सांगतच ती वातावरण कसं आहे, यावर भाष्य करत जाते. राजकारण किती सडकं झालेलं आहे, हे तिच्या आवडत्या राजाला सांगतच ती म्हणते ः ‘राजे, आजच्या घडीला निवडणूक लढवण्यासाठी तुम्हालाही सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला असता.’ एक कटू सत्य सांगणारी ही मुलगी होती ज्ञानेश्‍वरी.

बऱ्याच मुली व्यक्त होत होत्या. एका मुलीच्या भाषणामुळं तर धक्काच बसला. होस्टेलमधल्या मंत्रिमंडळाविषयी ती बोलत होती. मंत्रिमंडळ पारदर्शक, स्वच्छ आणि परिणामकारक आहे, हे सांगताना ती म्हणाली ः ‘‘वरच्या लोकांनी म्हणजे देश आणि राज्य चालवणाऱ्या मंत्र्यांनी आमच्याकडून धडा घ्यावा. आम्हाला भ्रष्ट सरकार आणि मंत्रिमंडळ नको आहे. आम्ही आमच्या इथं जसं सरकार स्थापन केलंय तसंच आम्हाला हवं आहे.’’

अतिशय निर्भयपणे बोलणाऱ्या मुलींचं खूप कौतुक वाटलं. खरंतर उद्याच्या नागरिकांच्या मनात सरकारविषयी नेमक्‍या काय अपेक्षा आहेत, काय कल्पना आहेत, हे लक्षात येत होतं. मध्येच मला शंका आली. या सगळ्या मुलींना ही भाषणं कुणीतरी लिहून दिली असावीत. शंका दूर करायची म्हणून भाषणं करणाऱ्या प्रत्येक मुलीला विचारलं ः ‘बाळा, तुला भाषण कुणी लिहून दिलंय का?’ यावर एक वगळता अन्य सगळ्या मुलींनी ‘नाही, आम्हीच तयार केलंय,’ असं उत्तर दिलं. जिला तिच्या एका शिक्षकानं यशवंतराव चव्हाण यांच्यावर भाषण लिहून दिलं होतं, त्या भाषणात पहिल्याच वाक्‍यात चूक होती. इतर मुलींच्या भाषणात अशा चुका अपवादानंच सापडल्या. त्या त्यांच्या अज्ञानातून आल्या असाव्यात. शिक्षकानं लिहून दिलेल्या भाषणात चूक आणि मुलींनी उत्स्फूर्तपणे स्वतःच तयार केलेली भाषणं निर्दोष, असं काहीतरी घडलं होतं.

सरकारविषयीची अपेक्षा नेमकी काय असते आणि नेमकं कसलं सरकार आपल्याला लाभतं यावर प्रकाश पडला होता. छोटी मुलंही सरकारच्या विधायक आणि भ्रष्ट हालचालींवर कशी लक्ष ठेवून असतात, हेही लक्षात येत होतं. या पोरांना ‘चिल्लर पार्टी’ म्हणून दुर्लक्षित करता येत नव्हतं. मुली जे काही मांडत होत्या ते सारं प्रांजळ होतं. मेकअप केलेलं काही नव्हतं. निखळही होतं. छत्रपती शिवाजीमहाराजही निखळ होते आणि त्यांच्या जन्मतारखेविषयी वाद घालणाऱ्यांना कवितेत दणका दिलेला होता. हे सगळं सगळं त्यांनी स्वतःच्या संवेदनांमधून व्यक्त केलं होतं. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे प्रत्येक मुलीच्या डोळ्यात एका निकोप समाजाचं, सुंदर समाजाचं, सुंदर सरकारचं स्वप्न तरळताना दिसत होतं...शब्द साधे होते आणि सामर्थ्यशाली होते. शब्दांत आत्मविश्‍वास होता म्हणूनच की काय, प्राजक्ताही मोठ्या आत्मविश्‍वासानं म्हणाली ः ‘मी असं साहित्य लिहीन, की  वि. स. खांडेकर यांच्याप्रमाणे मलाही ज्ञानपीठ पुरस्कार मिळेल.’

हे सगळं घडत होतं साताऱ्यात यादोगोपाळ पेठेतल्या लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहात. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या मंगळसूत्रासह सर्व दागिने मोडणाऱ्या लक्ष्मीबाई म्हणजे ‘रयत’चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी. १९४२ मध्ये स्वतः भाऊरावांनीच या वसतिगृहाची स्थापना केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे वसतिगृह चालत राहिलं. हे वसतिगृह म्हणजे वेदनांनी भरलेलं आणि पुढं वेदना सुगंधी बनवून त्यांची फुलं करणारं...अगदी गेल्या वर्षापर्यंत इथं आई-वडील नसलेल्या मुली यायच्या. लैंगिक पिळवणुकीचा बळी ठरलेल्या यायच्या, कोर्टानं पाठवलेल्या मुली यायच्या आणि गरीब कुटुंबातल्या चांगल्या मुलीही यायच्या. समूहजीवनातून सगळ्यांनी आपलं जीवन सुंदर करून घ्यावं, अशी भाऊरावांची अपेक्षा होती. समतेला पोषक वातावरण तयार व्हावं, यासाठी प्रयत्न होते. अलीकडं मात्र निराधार मुलींचं वसतिगृह बंद झालंय. शासनाचा कोणता तरी एक नियम आला आणि एक वसतिगृह घेऊन गेला. आता मागास असणाऱ्या ४२ मुलींचं एकच वसतिगृह चालतंय. लॉजिंग-बोर्डिंगसारखं त्याला स्वरूप नाहीय, तर जीवनाची जडणघडण करणारं ते एक केंद्र बनलंय. देशात अनेक वसतिगृहं आहेत. ती अनेक मुलांना जगवतात, शिकवतात; पण इथं विश्‍वासानं जडणघडणीचं काम होतं. वेदनांची फुलं होतात आणि सरपटणाऱ्या आयुष्याच्या झेपावणाऱ्या यशोगाथा होतात. भाऊरावांच्या गुंतवणुकीचा हा सारा पराक्रम आहे. चमत्कारासारखा तो वाटतो.

आभार मानताना मीनाक्षी ही छकुली रडायला लागली. कार्यक्रम संपू नये, असं तिला वाटत होतं. हुंदका गिळण्याचा तिचा प्रयत्न सगळ्यांच्याच लक्षात आला. अगदी प्राचार्य संजय कांबळे यांच्याही. गेली अनेक वर्षं ते आपल्या लेकरांचे वाढदिवस आणि कुटुंबातले अन्य आनंदाचे क्षण याच ठिकाणी येऊन साजरे करतात. असे अनेक जण आहेत. ‘रयत’नं तयार केलेली संस्कृती या सगळ्यांना लोहचुंबकाप्रमाणे खेचून घेते. मलाही तिनं खेचलं होतं. या चुंबकस्पर्शातून अनेक विधायक उपक्रम सुरू आहेत. त्यांपैकी हा एक.

खरं म्हणजे अतिशय सुंदर वातावरणानं भरलेलं, प्रेरणादायी वाटणारं, ऊर्जाकेंद्र बनलेलं होस्टेल सोडून जावं, असं वाटत नव्हतं. होस्टेलमध्ये मुलं कशी घडवावीत, याविषयीचा एक ‘रयत-पॅटर्न’ म्हणजे हे होस्टेल होते. इथल्या मुली फक्त खालून वरच्या वर्गात जात नव्हत्या, तर आपल्या मनातला माणूस, समाज, सरकार आणि इतिहासही त्या व्यक्त करत होत्या. त्यांच्या डोळ्यांतल्या छोट्या बाहुल्यांनी किती मोठी स्वप्नं तोलून धरली होती...ही सगळी स्वप्नं त्या फुलवताहेत, तेजस्वी बनवताहेत, असं वाटायला लागलं. एक कविकल्पना मनात आली...खरंच माय-बाप सरकारनं या स्वप्नांचा अर्थ समजून घेतला तर...?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com