माणूस झालं की जाम पळता येतं... (उत्तम कांबळे)

माणूस झालं की जाम पळता येतं... (उत्तम कांबळे)

बालपण कोळपून जाणं म्हणजे काय, याची किंचित कल्पना येण्यासाठी कुठल्याही मोठ्या शहरातल्या सिग्नलच्या चौकात उभं राहावं. पाच ते दहा वयोगटातली बरीच मुलं दिसतात तिथं...तोंड रंगवून त्यातला कुणी शंकर झालेला असतो, कुणी हनुमान, तर कुणी आणखी कुठल्या तरी देवाचा ‘अवतार’ घेतलेला असतो. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक गाडीच्या खिडकीजवळ जाऊन हात पुढं करत काही किरकोळ भिकेची याचना करताना ही लहान लहान मुलं दिसतात. पुढं केलेल्या हातावर भीक क्वचित कधी टेकवली जाते; पण बहुतेक वेळा त्या रिकाम्या हातावर ठेवली जाते ती उपेक्षाच. महागड्या गाड्यांमधून ‘दौडणाऱ्या इंडिया’कडं या ‘गरीब भारता’ची दखल घ्यायला वेळ आहे कुठं?  

टेक्‍नो आणि हेल्थ कॉर्नर बनू पाहणाऱ्या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर चौकात डावीकडं वळून लॅपटॉपच्या दुकानाशेजारी आम्ही गाडी थांबवली. मुलासह लॅपटॉपच्या दुकानात गेलो. लवकरात लवकर लॅपटॉप खरेदी करून आम्हाला बाहेर पडायचं होतं. घडलंही तसंच. आम्हीच पहिले ग्राहक ठरलो. लॅपटॉप निवडत असतानाच मनात एक प्रश्‍न निर्माण झाला. गाडीचा दरवाजा बंद केला आहे की नाही? पोराला लॅपटॉपमध्ये गुंतवून मी पुन्हा गाडीजवळ आलो. दरवाजा बंद असल्याची खात्री करून घेतली. दुकानाकडं निघणार तोच झाडाखालच्या एका दृश्‍यानं माझं लक्ष वेधून घेतलं.

झाडाखाली दोन महिला, दोन पुरुष आणि तीन छोटी बच्चेकंपनी होती. भीक मागत फुटपाथवर जगण्यासाठी आलेली ही कुटुंबं असावीत असं वाटलं. अशी कुटुंबं तर पावलापावलांवर दिसतात. ‘मेरा भारत महान’, ‘इंडिया दौड रहा है अँड पीएम बॉर्डर पे जा रहा है...’ अशा घोषणा सुरू असण्याच्या काळातही ही कुटुंबं दिसतात. या साऱ्या साऱ्या घोषणांचा फुगा फोडतात. आम्ही इथं फुटपाथवर चिकटलो असताना इंडिया दौडेल कसा, असा प्रश्‍न त्यांच्या मनात असतो. ते तो कधीही व्यक्त करत नाहीत. माहितीचा अधिकार कुणाच्या दारात, झोळीत पडत असतो, हेही त्यांना ठाऊक नाहीय. मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद देण्यासाठी कोणत्या तरी बुवानं एखादी घोषणा केलेली असते. ‘जितना तेरा है उतना ही तेरा है... समय से पहले और तकदीर से जादा कुछ नहीं मिलनेवाला...’ भारी उपदेश असतो...फुटपाथवरच्या लोकांना तो उपयोगी पडतो...फुटपाथ त्यांचा...भीक त्यांची...बाकी नशिबात काही नसतं...

...तर या झाडाखालची एक सडपातळ, काळसर महिला आपल्या दोन-अडीच वर्षांच्या मुलाचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून त्याचे गाल रंगवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्याशेजारी असलेली दुसरी एक महिलेनंही आपल्या पोराचे गाल, कपाळ रंगवण्याचं काम पूर्ण करत आणलं होतं. तिच्यासमोर रंगाच्या पाच-सहा ट्यूब होत्या...एक ट्यूब घेऊन ती गालावर ठिपके काढायची...मग दुसरी ट्यूब... मग तिसरी... तिला रंगसंगती माहीत नसावी... कशात काय मिसळल्यावर कोणता रंग तयार होतो, हेही माहीत नसावं... हाताला सापडेल ती ट्यूब घेऊन पोराच्या गालावर दाबत होती...
सारं शहर दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाच्या घाईत होतं...दुकानं, घरं चकाचक केली जात होती आणि इथंही एक आई पोराचं थोबाड रंगानं भरत होती. मी आश्‍चर्य व्यक्त करत म्हणालो ः ‘‘ताई, काय करते आहेस हे?’’

महिला हसली आणि पोराच्या गालावर ट्यूब दाबतच म्हणाली ः ‘‘ह्यो माझा पोरगा हाय...ह्येला राम बनवायचा आणि तो त्या बाईचा धाकटा पोरगा हाय ना, त्याला हनुमान बनवायचा...आता लक्ष्मण राहिला शिल्लक...पण त्येला इलाज नाय...तिसरं पोरं नाय इथं...दोन पोरीच हायती...’’
हातातली ट्यूब खाली ठेवून ती उत्सुकतेनं माझ्याकडं बघू लागली. कोण कशाला चौकशी करतोय समदी, असा एक प्रश्‍न दारिद्य्रानं होरपळलेल्या तिच्या चेहऱ्यावर दिसला. तिला बोलू न देताच मी खिशातून मोबाईल काढला. कॅमेरा ऑन केला. कॅमेऱ्यावर बोट ठेवून समोरचं दृश्‍य टिपतच तिला विचारलं ः ‘‘कशासाठी बनवतेयस राम आणि हनुमान?’’

ती म्हणाली ः ‘‘काय करणार...? पोट भरायला लई लांबनं आलोय आम्ही... राम, हनुमानाचं सोंग घेऊन पोरं भीक मागायला दोन गल्ल्या फिरतील... पोटपाणी भागंल कसं तरी... काम काय गावात नाय बगा...’’
मी ः ‘‘दोन्ही पोरं सिग्नलवर थांबतील काय?’’
ती ः ‘‘नाय बा, इथंच गल्लीत अन्न मागंल.’’
मी ः ‘‘बहुरूपी आहात काय तुम्ही?’’
ती ः ‘‘नाही बा. चांगलं गावपारधी आहोत की आम्ही... हरीणपारधी, रानपारधी यातलं काय बी नाय बगा... गावपारधी आहोत.’’
मी ः ‘‘तुम्हाला गाव आहे, शेतीवाडी आहे...’’
ती ः ‘‘तर हाय की... बीड जिल्ह्यातल्या वासनवाडीचं आम्ही... माझं नाव साखराबाई, पोराचं नाव विक्रम, त्येच्या बापाचं नाव अर्जुन आणि त्यो तिथं बसलाय त्यो माझा नवरा...त्येला इचारा की जमीन किती...’’
मी तिच्या नवऱ्याकडं नजर वळवली. पायाची घडी करून तो बसला होता. माझ्या प्रश्‍नावर तो म्हणाला ः ‘‘हाय की साडेसात एकर. बाजरी पिकायची...सोयाबिन पिकायचं...’’
मी ः ‘‘पाऊसपाणी चागलं झालं नाही का यंदा?’’
तो ः ‘‘लईच भारी... म्हणजे भारीच झाला पाऊस आणि त्यामुळंच गाव सोडावं लागलं. लई दांडगा झाला पाऊस...’’
मी ः ‘‘पाऊस झाला की लोक गाव सोडत नाहीत. तू कसा काय आलास इथं कुटुंबकबिल्यासह...? एवढा चांगला पाऊस झाला तर शेती नाही का करायची?’’
तो ः ‘‘आता कसं सांगणार...? माझी जमीन एका मोठ्या ओढ्याच्या काठावर...ओढ्यात पाणी कधी साचायचं नाही... पीक निघायचं नाही...वरसावरसाला पोटापाण्यासाठी इथं नाशकात यावं लागायचं...यंदा दमदार पावसाला सुरवात झाली आणि काळीज भरून आलं. यंदा गाव नाय सोडावं लागणार, असं वाटत असतानाच हत्तीच्या पायासारखा लय दांडगा पाऊस कोसळला...ओढ्याचा भला मोठा पूर गावात घुसला. बघता बघता रान उजाड करून सगळी माती घेऊन गेला बरोबर...रान जागच्या जागी हाय; पण कणभर माती नाय त्येच्यात... पावसानं रानच नेलं सगळं...आता पेरायचं कशात...?’’
अर्जुनचं बोलणं दोन्ही महिला ऐकत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता काळ्या ढगासारखी पसरतेय आणि चिंतेचाही एक महापूर येणार असं वाटायला लागलं...

चर्चा एका गंभीर वळणावर येऊन थांबली...पुरामुळं पूल तुटावा आणि संपर्क तुटावा असं काहीतरी घडत असावं. त्यातूनही म्हणालो ः ‘‘शहरात रोजगार मिळतो का? भीकच मागावी लागती का?’’
माझ्या प्रश्‍नावर साखराबाई म्हणाली ः ‘‘मिळतो कधी कधी; पण डोकं टेकवायला जागा कुठं गावात नाय. राशनकार्डसाठी मध्ये हजार हजार रुपये देऊन बसलो...कार्ड काय हातात आलं नाय...त्येचा नाद आता सोडला...रोजगार नाय मिळाला की पोरं रंगवून त्यांना भिकंला लावायचं..सिग्नलवर उभं करायचं...आणत्यात धा-वीस रुपडे...धावणाऱ्या गाड्यांमागं पोरं लागली की घालमेल होत्ये जिवाची...पण करणार काय...?
मी विचारलं ः ‘‘गावात का राहत नाही?’’
तिचं तेच उत्तर...‘जगणार कसं?...गावाच्या आजूबाजूला भीक कोण वाढंल...?ओळखीच्या ठिकाणी भीक मागायची तरी कशी...?
तिच्या कोणत्याच प्रश्‍नांची उत्तर माझ्याकडंच काय ‘दौडणाऱ्या इंडिया’कडंही नव्हती. इंडिया राष्ट्रभक्तीत अडकला, गाईत अडकला... त्याला तर उत्तर शोधायला कुठं आलाय वेळ? बिच्चारा!
चर्चेअंती लक्षात आलं, की ही साखराबाई एकटीच नव्हे, तर बारा बिघ्याचा मालकही पोटासाठी शहरातल्या फुटपाथवर उतरलाय...तो माणसांच्या (मजुरांच्या) बाजारात उभा राहतो...तांब्याभर पाण्याची बंगल्यासमोर भीक मागतोय...कुत्रं भुंकलं की ढुंगणाला पाय लावून पळतोय... फ्रिजमध्ये काळीज आणि कॅरी बॅगमध्ये प्रश्‍न घेऊन फिरणाऱ्या शहरात सारं पाणी बिसलरीत अडकलंय... याला कोण देणार?

निरुत्तर होऊनच मी निघालो तसं आणखी एक दृश्‍य दिसलं. आई-वडील आणि मुलगा असं तिघांचं एक कुटुंब समोर प्लास्टिकची एक पिशवी ठेवून त्यातला भात तोंडात टाकत होतं. हेही कुटुंब दुरून आलं होतं... मुख्य प्रवाहात येण्यासाठी बहुतेक गुन्हेगार जातींनी आता गुन्हे करणे जवळपास बंद केलंय. हे जरी खरं असलं, तरी त्यांच्या भाकरीचा प्रश्‍नही तितकाच गंभीर बनलाय. मुख्य प्रवाह, निसर्ग, शहरातला फुटपाथ, धावणाऱ्या गाड्याही त्यांना साथ देत नाहीत...चंबळमधल्या दरोडेखोरासारखं पाऊस त्यांची जमीन घेऊन जातो आणि दारिद्य्र थेट इथं आणून सोडतं...भीक मागता यावी म्हणून पोरांना रंगवत त्यांना देव बनवण्याचा प्रयत्न करतं...

लॅपटॉपच्या दुकानात पोचलो. पोरानं लॅपटॉप निवडला होता. डेबिट कार्ड देऊन तो व्यवहार पूर्ण करत होता. पार्सल घेऊन बाहेर पडलो. पाच-दहा मिनिटांत बाहेर पडलो. कॅनडा कॉर्नरच्या चौकात सिग्नलवर नजर खिळली. मगाशी रंगाच्या जोरावर देव बनू पाहणारी ती दोन्ही पोरं वाहनांच्या मागं धावत होती. थांबलेल्या वाहनाच्या खिडकीतून आपले इवलेसे हात नेत होती. कुणी महत्प्रयासानं सुटे पैसे शोधून काढायचं...पोरांच्या तळहातावर ठेवायचं...कुणी गाडीच्या काचा वर करत ‘ही कुरूपता इथं कुठून आली,’ या भावनेनं पाहायचं...

मी माझ्या गाडीजवळ आलो. साखराबाईला विचारलं ः ‘पोरांनी चेहऱ्यावरचा रंग का काढला...? ती देव का झाली नाहीत..?
साखराबाई हसतच म्हणाली ः ‘‘पोरांचं काय सांगता येतं का? काय टकुऱ्यात घुसंल आन्‌ काय नाय, पत्ता लागत नाय... बेसपैकी त्येला देव बनवलं होतं पर बेणं विस्कटलं...चेहरा पुसून घेतला आणि म्हणतं कसं, ‘देव होऊन सिग्नलवर गाड्या पकडता येत नाहीत... अवघडल्यासारखं वाटतं...गल्लीत गेल्यावर कुत्री भुंकतात... माणूस झाल्यालं लय भारी...’
आता म्या म्हटलं, माणूस तर माणूस हो; पण जा भिकंला.’’
देव सोडून दिला आणि माणूस होऊन उडाली पोरं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com