वर्षश्राद्धात गेली कविता (उत्तम कांबळे)

मालेगाव (जि. नाशिक) ः (कै.) सुदाम रखमाजी सोनवणे यांच्या वर्षश्राद्धानिमित्त कविता सादर करताना कवी व निवेदक रवींद्र मालुंजकर. समवेत (डावीकडून) कवी राजेंद्र उगले आणि कवी अरुण इंगळे.
मालेगाव (जि. नाशिक) ः (कै.) सुदाम रखमाजी सोनवणे यांच्या वर्षश्राद्धानिमित्त कविता सादर करताना कवी व निवेदक रवींद्र मालुंजकर. समवेत (डावीकडून) कवी राजेंद्र उगले आणि कवी अरुण इंगळे.

काही कवी म्हणतात ः ‘आम्ही स्वान्तःसुखाय- म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी- लिहितो’. हे काही निवडक कवींच्या बाबतीत खरं असूही शकेल; पण ही भूमिका काही सरसकट सगळ्याच कवींना लागू पडू शकणारी नाही आणि पचू शकणारीही नाही. लिहिलेली कविता वाचक-श्रोत्यांपर्यंत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पोचावी, असंच बहुतेक कवींना वाटत असतं. मग पारंपरिक मार्गानुसार वेगवेगळ्या संस्था, मंच, गट इत्यादी स्थापन करून कविता ऐकल्या जातात- ऐकवल्या जातात. मात्र, नाशिकच्या काही कवींनी कविता लोकांपर्यंत पोचवण्याचा एक अपारंपरिक, अभिनव मार्ग शोधून काढला आहे... वर्षश्राद्धाच्या ठिकाणी कविता ऐकवण्याचा !

या लेखाचं शीर्षक वाचूनच धक्का बसण्याची शक्‍यता आहे; पण मला मात्र हा विषय ऐकून-पाहून धक्का बसलेला नाहीय. बसलाच असेल तर सुखद धक्का...गेल्या अनेक वर्षांपासून आपण मराठी कवितेची अतिशय गंभीरपणे चर्चा करत आहोत. खरंतर मराठी साहित्याचीही चिंता करत आहोत. जागतिकीकरणात मराठी साहित्याचं, त्यातही मराठी भाषेचं काय होणार हा चिंतेचा प्रामुख्यानं विषय असतो. चिंता करण्याची ठिकाणंही ठरलेली आहेत. त्यात एक मराठी साहित्य संमेलन... वर्षभर तयार झालेली चिंता संमेलनात व्यक्त होते. पुन्हा वर्षभर ती गोळा होत राहते. संमेलनाची वाट पाहत राहते. मग कायद्याकडं सरकते. ‘कायदा करून किंवा ठराव मांडून भाषा जगवता येते, ती समृद्ध करता येते’, अशा एका गोड गैरसमजात आपला भाषाव्यवहार, साहित्यव्यवहार पुढं पुढं सरकतो आहे. ‘पुढं सरकतो आहे’, असं म्हणण्याऐवजी एक पाऊल पुढं आणि तेवढंच पाऊल मागं सरकतो आहे. याचा अर्थ स्थितिशीलतेच्या एका भोवऱ्यात तो अडकला आहे. मग चर्चा होते ‘मराठी साहित्य आवर्तात अडकलं आहे का?’, या विषयावर. मग कवितेची चर्चा होते. मग तिच्या खपाची, वाचकप्रियतेची चर्चा होते. ही चर्चाही एकांगी असते. तुलनेसाठी भरभक्कम उदाहरण आपण समोर ठेवत नाही. कारण, ते अंगलट येण्याची भीती असते. चर्चेसाठी आपण एक उदाहरण घेऊ. महाराष्ट्रात १५ कोटी लोक राहतात. त्यातले १० कोटी लोक चांगले साक्षर आहेत, अशी कल्पना करू. त्यातही दोन कोटी लोकांना वाचायची सवय आहे आणि त्यातही एक कोटी लोक पुस्तक विकत घेतात, असा समज करून घेऊ. याचा अर्थ असा होईल, की चांगल्या मराठी पुस्तकाची पहिली आवृत्ती पाच-दहा हजार प्रतींची होईल; पण प्रत्यक्षात ५०० ते एक हजार प्रतींचीच आवृत्ती निघते. आघाडीचा लेखक असेल तर वर्ष-दोन वर्षात एक आवृत्ती संपते. काही चतुर लेखक खटपटी-लटपटी करून आवृत्त्यांचा विक्रम करतात. बहुतेक वेळा हे शासनात मोठ्या हुद्द्यावरचे असतात. बाकीच्या पुस्तकांची पहिली आवृत्ती संपायला पाच-१० वर्षं लागतात. अर्थात, हे गद्यलेखनाचं झालं. काव्यलेखनाचं आणखी वेगळं. मुळातच काही कवींचा अपवाद वगळता कुणी प्रकाशक कवितासंग्रह छापायला तयार नाही. छापलाच तर पैसे घेऊन छापतात. स्वतः कवीच स्वतःला किंवा आपल्या बायको-पोराला प्रकाशक बनवतात. दोन-तीनशे प्रती छापून त्या फुकट कुणाला देता येतील, याचा विचार करतात. हे सर्व का घडलं किंवा घडतं आहे, याची कारणं सगळ्यांना ठाऊक आहेत. प्रश्‍न एकच, की ती कुणी मान्य करत नाहीत.

‘लोक कवितेकडं येत नसतील तर कवितेनं लोकांकडं गेलं पाहिजे’, या विचारातून कवितेचे मग वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. एखादा गट करून काव्यवाचन करणं, हा त्यांपैकी एक मार्ग. लोकांना कवितेची गोडी लागावी म्हणून आणखीही काही मार्ग आले. चार कवींनी एकत्र येऊन कुठंही कविता वाचण्यास उभं राहावं, हा दुसरा मार्ग. नाशिकमध्ये मध्यंतरी ‘आरबाट-चरबाट’ या नावानं काहींनी हा प्रयोग केला; पण तोही संपला. चालला नाही. मग पोस्टाच्या कार्डावर कविता लिहून पाठवणं सुरू झालं. मग ब्लॉग आला, फेसबुक आलं. व्हॉट्‌सॲप आलं. एवढं करूनही कविता वाचणाऱ्यांचा, ऐकणाऱ्यांचा वर्ग वाढत नाही, असं लक्षात येऊ लागलं. कवितेचं सार्वत्रिकीकरण कसं करायचं, वाचक कसा मिळवायचा, हा एक गहन प्रश्‍न होता. या सर्व पार्श्‍वभूमीवर एक बातमी समजली. तिची खातरजमा करून घेण्यात बराच काळ गेला. ही बातमी म्हणजे ः आता वर्षश्राद्धात कविता प्रवेश करती झालेली आहे. जलदानविधीत तिनं प्रवेश केला आहे. बातमी ऐकून आनंद झाला. कवितेला चालण्या-फिरण्यासाठी एक ठिकाण मिळालं. सुरवातीला राकेश वानखेडेनं ही गोष्ट सांगितली. मग एकेक करत या कल्पनेचा सूत्रधार असलेल्या रवींद्र मालुंजकरपर्यंत पोचता आलं. रवींद्र म्हणजे एक धडपड्या आणि प्रयोगशील कवी, एक धडपड्या सूत्रसंचालक. वर्षश्राद्ध आणि कवितेचं नातं त्याच्याकडून समजून घेता आलं.

अलीकडं वर्षश्राद्धाला बुवा-बाबांचं प्रवचन ठेवणं ही एक फॅशन झाली आहे. पूर्वी धार्मिक विधीपुरतं आणि कुटुंबापुरतं हे श्राद्ध मर्यादित होतं. पुढं पुढं त्याला सार्वत्रिक रूप आलं. भजन, कीर्तन असं करत प्रवचनापर्यंत ते पोचलं. काही गबर लोक त्याचा इव्हेंट करतात... खास वर्षश्राद्धात प्रवचन देणारे काही बुवा किंवा महाराज तयार झाले. ते प्रसिद्ध पावले. पाच-पन्नास हजार रुपयांपासून लाखापर्यंत त्यांची बिदागी पोचली. पूर्वज आठवण्याचा म्हणजेच एका अर्थानं दुःखाचा हा क्षण एका इव्हेंटमध्ये रूपांतरित झाला. सगळं गाव गोळा करून खर्चाचा विचार न करता तो साजरा होऊ लागला.

चौकातल्या होर्डिंगवरही वर्षश्राद्ध उतरलं. मग कुणाच्या तरी डोक्‍यात कल्पना आली, की आईच्या वर्षश्राद्धाच्या वेळी आईवरच्या कवितांचं वाचन करण्यासाठी कवींना का बोलावू नये? मग बापाच्या वर्षश्राद्धाच्या वेळी बापावरच्या कविता सांगण्यासाठी कवींना का बोलावू नये? मग आणखी कुणाला तरी वाटलं की जलदानविधीच्या वेळीच कवींना का बोलावू नये? असं करता करता तिन्ही प्रसंगांसाठी कवींना पाचारण करण्यात येऊ लागलं. नाशिकमध्ये वर्षश्राद्ध आणि कवितेचं नातं तयार झालं आणि जिल्हाभर ते पसरलं. गेल्या दोन वर्षांत नाशिक, दिंडोरी, मालेगाव, पिंपळगाव बसवंत, नाशिक रोड, मखमलाबाद, इगतपुरी, लासलगाव, निफाड अशा अनेक गावांत वर्षश्राद्धात कविता पोचली. कवींचा कळप घेऊन पोचली. आईचं श्राद्ध असेल तर आईवरच्या कविता आणि बापाचं श्राद्ध असंल तर बापावरच्या कविता सुरू झाल्या. वर्षश्राद्धाच्या वेळी मृताचे नातेवाईक एकत्र येतात. शेजारीपाजारी येतात. गंभीर वातावरण तयार होत असतं. अशा वेळी आईच्या आणि बापाच्या कविता लोकांना खूप भावतात. हयात असलेल्या आई-वडिलांचं हृदय त्या खुलं करतात. या दोन नात्यांचं महत्त्व कवी कविता वाचून, तर कधी गाऊन व्यक्त करतात. लोक मन लावून कविता ऐकतात. सद्गदित होतात. श्रोत्यांमधले काही जण आपले हयात असलेले आई-वडील समजून घेण्याचा प्रयत्न करत ‘त्यांच्याशी नीट वागू’ असा निर्धार व्यक्त करतात. काही श्रोत्यांच्या डोळ्यांतून अश्रू ठिबकायला लागतात. आई-वडिलांचं माहात्म्य सांगणारी कविता परिणामकारक ठरते. वेदना, भाव, जिव्हाळा, चिवट नातं, त्याग, समर्पण वगैरे सगळ्या गोष्टी कवितेतून झिरपायला लागतात. विशेष म्हणजे, लक्ष देऊन कविता ऐकणारा आणि ऐकलेली कविता काळजात पसरवत नेणारा श्रोता मिळतो. कवीला आणखी काय हवं असतं?
बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर दलित समाज दहाव्याऐवजी जलदानविधी करू लागला. मरणोत्तर विधी कायम राहिला असला, तरी त्यात आशयाच्या दृष्टीनं काही बदल घडवण्यात आले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी स्वतः पुढाकार घेऊन काही बदल घडवले होते. दहाव्याचा म्हणजे नवबौद्धांच्या भाषेत जलदानविधीचा कार्यक्रम केवळ रडारडीचा, दुःखजागराचा किंवा केवळ विधीचा होऊ नये, यासाठी आपापल्या पर्यावरणात आपल्याला भेडसावणाऱ्या प्रश्‍नांवर चर्चा सुरू झाली. राजकारण, समाजकारण, शिक्षण-आंदोलन वगैरे प्रश्‍न चर्चेसाठी येऊ लागले. ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बागूल यांनी आपल्या मुलाच्या जलदानविधीच्या वेळी ‘बहुजनांचं ऐक्‍य’ या विषयावर चर्चा घडवली होती. त्यासाठी राज्यभरातून नेते बोलावण्यात आले होते. दुःखाचा कढ ओसरला की आपल्याला पुन्हा वास्तवानं भरलेल्या जगात यायचं असतं. दुःख विसरून वास्तवाला भिडायचं असतं. त्यासाठी जलदानविधी हे एक चांगलं औचित्य असतं. आता या जलदानविधीच्या वेळीही कविता प्रवेश करती झालीय.

आई-वडिलांवर कविता करून त्या गाजवणारा एक गट तयार झालाय. त्यांनी कविताही छान तयार केल्या आहेत. त्या ऐकताना माणूस सद्गदित होतो. राजेंद्र उगले (नाशिक) यांची ‘बाप सोडून जाताना माझ्या मायमाउलीचा’, तसंच अरुण इंगळे (आई नसताना), विजयकुमार मिठे (जवा आठवते आई), गौरवकुमार आठवले (दारिद्य्राचे नंदनवन करते आई), विवेक उगलमुगले (अण्णा रोज रोजनिशी लिहायचा) आदी कवींच्या या कविता वर्षश्राद्धाच्या वेळी खूपच गाजतात. दत्ता अलंगटही त्यात आहे. नाशिक आणि परिसरातले हे कवी आहेत आणि बहुतेक वेळा मालुंजकर सूत्रसंचालन करतो.

कवितेचा कमी होणारा वाचक आणि श्रोता पुन्हा मिळवण्यासाठी जे काही प्रयोग होत असतात, ज्या काही नव्या वाटा तुडवल्या जातात, त्यांपैकी ‘वर्षश्राद्धात आणि जलदानविधीत कविता’ हाही एक वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग आहे. प्रयोगासाठी नवं ठिकाण निवडण्यात आलं आहे. हे सगळं खरं असलं, तरी मुळात ‘कविता सर्वव्यापी असली पाहिजे, माणसाभिमुख असली पाहिजे’, हे टाळून कसं चालेल...?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com