निलंगा राईस (उत्तम कांबळे)

uttam kamble's article in saptarang
uttam kamble's article in saptarang

‘दाने दाने पे लिखा होता है खानेवाले का नाम’ ही उक्ती बहुतेकांना माहीत असते. मात्र, एखाद्या गावाचंही नाव एखाद्या खाद्यपदार्थाला मिळण्याची बाब तशी खासच म्हणावी लागेल आणि तेही त्या गावाचा संबंधित खाद्यपदार्थाशी तसा थेट काहीही संबंध नसताना ! ‘निलंगा राईस’ या खाद्यपदार्थाबाबत असं झालं आहे. किफायतशीर दरात मिळणारा हा राईस विकला जातो उस्मानाबादमध्ये; पण त्याला नाव मात्र मिळालं आहे ‘निलंगा राईस.’  गोरगरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत हा राईस लोकप्रिय आहे. गरिबांसाठी ‘पोटाची गरज’ म्हणून, तर श्रीमंतांसाठी ‘रुचिपालट’ म्हणून!

सात नोव्हेंबरच्या सायंकाळी उस्मानाबादेत पोचलो. लाख-दीड लाखाच्या छोटेखानी शहरात महाराष्ट्रातल्या मुख्याध्यापक संघाचं अधिवेशन सुरू होतं आणि आठ नोव्हेंबरला समारोप करून नाशिकला पोचायचं होतं... ‘तासाभराच्या भाषणासाठी हजार किलोमीटरचा प्रवास करणं, दोन-अडीच दिवस खर्च करणं, हे काही भलेपणाचं नाही,‘ असं माझे मित्र म्हणतात. त्यांचं खरंही असेल; पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, त्याप्रमाणं फिरण्याची सवय मला कधी बंद करता येईल असं वाटत नाही... खरंतर मी त्यासाठी प्रयत्नही केला नाही...‘प्रवास माणसाला शिकवतो,’ हे गुरुजींनी फळ्यावर लिहिलेलं वाक्‍य कधीतरी अजाणतेपणी वाचलं होतं...‘शहाणं व्हायचंय तर फिरत राहा’ याप्रमाणं फिरत राहिलो... शहाणपणाची वाटही बघत राहिलो. हॉटेलवर सुदेश अळाळे भेटायला आला होता. मराठवाड्यात अशी काही आडनावं आहेत, की ज्यांचा अर्थ कळत नाहीय. उच्चार करताना दात जिभेला पकडून ठेवतात, अशा या नावांची व्युत्पत्ती शोधत राहणं आनंददायी असतं. असंच एक नाव दिसलं थोरपाटील. खूप मजा आली. आबा थोरात, सुदेश आणि मी उस्मानाबादला एक वेढा मारायचा ठरवलं. कमी लोकसंख्येचं हे शहर तुकड्यातुकड्यांनी विस्तारत गेलंय. एक महत्त्वाचा रस्ता सोडला की विकास काय असतो, याचा खूप विचार करावा लागतो. बसस्टॅंडवरून फिरत फिरत ॲड. भारतीच्या घरी जेवायला जायचं होतं. फिरता फिरता सुदेश उस्मानाबादची माहिती देत होता. १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती सत्तेवर आल्यानंतर ज्या काही गावांचं नामांतर करायचं ठरवलं गेलं, त्यात एक होतं उस्मानाबाद...अनेक ठिकाणी या गावाचं नवं नाव फलकांवर, पाट्यांवर दिसत होतं...धाराशिव.... या नव्या नावाचा अर्थ नाशिकमध्ये येऊन शोधला. उस्मानाबादजवळ धाराशिव लेणी आहेत. पार्श्‍वनाथाची मूर्ती तिथं आहे.

चालत चालत बसस्थानकासमोर आलो, तेव्हा सुदेशनं हातानं खुणावून सांगितलं, की इथं ‘निलंगा राईस’ मिळतो. खूप प्रसिद्ध असतो; पण तो दुपारपर्यंतच विकला जातो. खूप गर्दी होते. दुपारनंतर मात्र विक्री बंद.
जवळपास दीड तासात उस्मानाबाद बऱ्यापैकी फिरून झालं. उरलंसुरलं सकाळी फिरायचं होतं. ठरल्याप्रमाणं सकाळी लवकर बाहेर पडलो. फिरून झाल्यावर निलंगा राईसच्या टपऱ्यांवर आलो. प्रत्येक टपरीवर ‘निलंगा राईस’ असा चमचमता बोर्ड होता. टपरीसमोर खवय्यांची ही गर्दी होती.
फिरोज बागवानच्या टपरीवर गेलो. निलंगा राईसची ऑर्डर दिली. एका डिशवर प्लास्टिकचा कागद आणि त्यावर ६०-७० किंवा ५० ग्रॅम भरेल एवढासा मसालाभात. लिंबाची एक फोड, कांद्याचा एक तुकडा...कोबीचा किस आणि फोडणी देऊन बनवलेली तूरडाळीची झणझणीत आमटी...या सर्वांचं मिश्रण एकदम सुरेख...जिभेला नाचवत तृप्त करणारं आणि काही काळासाठी का असेना पोट भरल्याचं समाधान देणारा हा निलंगा राईस..

फिरोजशी बोलता बोलता एक प्रश्‍न विचारला, ‘निलंगा काही तांदळासाठी प्रसिद्ध नाहीय. तो तर राजकारणात वडील विरुद्ध मुलगा, सासरा विरुद्ध सून अशा संघर्षासाठी प्रसिद्ध आहे. सासऱ्याचा पक्ष काँग्रेस; पण सून भाजपच्या तिकिटावर विजयी झाली आणि धमाल म्हणजे याच पक्षाच्या तिकिटावर नातवानं आजोबांचा पराभव केला. नातू मंत्री झाला. आता या सगळ्या लढती खऱ्या खऱ्या होत्या, की क्रिकेटमधल्या मॅचफिक्‍सिंगप्रमाणे होत्या, हे काही महाराष्ट्राला कळलेलं नाहीय. महाराष्ट्राच्या भूगोलागत निलंगा एखाद्या ठिपक्‍याप्रमाणे आहे. तिथलं खरं खोटं राजकारण काही इतरत्र पोचलं नाही; पण तिथं नसलेला तांदूळ जागतिकीकरणात राईस बनून उस्मानाबादच्या फुटपाथवर टपऱ्याटपऱ्यांवर पोचला... हे असं कसं झालं...?’

भल्या मोठ्या पातेल्यातला राईस डिशमध्ये टाकत फिरोज म्हणाला ः ‘‘ये तो एक मजेदार बात है...वैसे तो ये राईस निलंगे का नही है... आम्ही इथंच खरेदी करतो तांदूळ...घर में ही पकाते है... पातेले में डालकर इधर बेचने को लाते है...’’
मी ः ‘‘मग हे मध्येच ‘निलंगा’ कसं काय आलं?’
तो ः ‘‘काही वर्षांपूर्वी लातूरहून एकजण इथं हाथ पे पेट लेके आया था...सच बोलू तो ये डिश उसी ने बनाई...‘निलंगा राईस’ ये नाम भी उसी का है...बाद में कुछ हो गया...वो चला गया और हम ने निलंगा राईस शुरू किया...माझ्या भावाचा फळांचा गाडा आहे. मग मी आलो. मग आजूबाजूला अजून कुणी कुणी आलं... महापालिकेला जागेचा कर देतो... दुपारपर्यंत थांबतो...बस पेटपानी चल रहा है...’’
निलंगा राईस खाणारा ग्राहकांचा एक वर्ग तयार झालाय. सर्वप्रथम त्यात अंगमेहनतीची कामं करणारा मजूरवर्ग येतो. एक सांगायचं राहून गेलं. उस्मानाबादेतही माणसांचा म्हणजे मजुरांचा बाजार भरतो. या बाजारातले मजूर इथं येतात.

कामावर जाताना दुपारचं जेवण म्हणून इथला राईस घेऊन जातात. नगरपालिकेचे स्वच्छता कामगार पहाटेपासून कामावर आलेले असतात. काम संपलं की पोटपूजेसाठी ते इथं येतात निलंगा राईस खायला. मग खेड्यापाड्यातले विद्यार्थी...पहिल्या बसने डबा न घेता ते येतात... घरात डबा तयार होऊ शकत नाही आणि बारा-एक वाजेपर्यंत शाळेत थांबायचं असतं...ही सगळी वाढलेली आणि न वाढलेली पोरं प्रथम टपऱ्यांवर जमा होतात. राईस खाऊन शाळेला जातात. बहुतेक वेळा कॉलेजची पोरं जास्त असतात. प्राथमिक आणि माध्यमिकमध्ये कशी तरी पोटात ढकलण्यासाठी खिचडी असते. कॉलेजच्या पोरांची बस चुकली की त्यांना निलंगा राईसवरच भागवावं लागतं. मग येतात नोकरदार, मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय... नोकरीवरून जाताना ते बाईक थांबवतात...पार्सल घेऊन जातात...आपल्या शाळकरी पोरांना डबा देण्याचा कंटाळा करत १० रुपये देऊन राईसकडं पिटाळतात. मग येतात मोठमोठ्या ऑफिसमधले कर्मचारी...ते व्यक्तिगतरीत्या येतात किंवा पार्सलं मागवतात. त्यांच्यात नेहमी पार्टी होते...पार्टीसाठीही निलंगा राईसची ऑर्डर दिली जाते...मग येतात काही उच्चभ्रू... ‘टेस्ट’ म्हणून ते चारचाकीत बसून राईसवर ताव मारतात...असं करत करत निलंगा राईस उस्मानाबादचा ब्रॅंड झाला. उस्मानाबादेत काय प्रसिद्ध आहे, या प्रश्‍नावर फक्त बोकडाचं नाव येत असायचं...पण आता बोकडाच्या बरोबरीनं राईसही उतरलाय जिभेवर.

उस्मानाबादेतच काय, कुठंही जा, १० रुपयांमध्ये खाद्यपदार्थ मिळत नाही. १० रुपयांत मिळणाऱ्या वड्याचा किंवा पाच रुपयांत मिळणाऱ्या कचोरीचा आकार नारायणगावच्या दुर्बिणीतून बघण्याची वेळ येते. राईसचं तसं नाही. त्याची चव कायम आहे. सेवा कायम आहे. स्वच्छता आणि टापटीप आहे. असा आधार युतीच्या काळात झुणका-भाकर केंद्रानं दिला होता; पण पुढं झुणका आणि भाकरीला भ्रष्टाचाराची बुरशी लागली. काही केंद्रांचे गुत्ते झाले, तर काही केंद्रांचं असंच काहीतरी झालंय. डॉ. बाबा आढावांची ‘कष्टाची भाकर’ मात्र वर्षानुवर्षं आपलं मूल्य, दर्जा आणि समर्पणाची भावना टिकवून आहे. असंच एक केंद्र साताऱ्याच्या बसस्थानकात आहे. महिलांचा एक बचतगट तो चालवतो...

तर पुन्हा निलंगा राईसविषयी... या राईसनं विश्‍वास संपादन केलाय...भूक भागवण्याची तसंच गुणवत्तेची गॅरंटी-वॉरंटी दिलीय... परिणामी, एकेका गाड्यावर रोज १०-१५ किलोंचा भात खपतो...उस्मानाबादेत कपभर चहासाठी सहा-आठ रुपये मोजावे लागतात... खाद्यपदार्थ तर पंधरा-विसाच्या घरात... मग अशा वेळी निलंगा राईस हमखास मदतीला येतो...सोलापूरच्या काही चौकांत पहाटे पोहे, उपमा, शिरा विकणारे असे काही गाडे उभे राहतात. प्रतीकात्मक किंवा थोडासा नफा घेऊन हे गाडे ग्राहक गोळा करतात. टिकवतात. जिंकतात आणि आपल्या व्यवसायाचंही आयुष्य वाढवत असतात... १० रुपयांचा राईस खाण्यासाठी वाढती गर्दी हे काही चांगल्या अर्थव्यवस्थेचं लक्षण नाहीय...नोटा रद्द करून, नोटा नव्यानं काढूनही गर्दी कमी होत नाहीय...बुडत्याला काडीचा आधार तसं ‘बीपीएल’वाल्यांना निलंगा राईसचा आधार आणि फिरोजसारख्या अनेकांना ‘बीपीएल’वाल्यांचा आधार... असंही असू शकतं नवं जग... ते बघण्याचा मार्ग कदाचित राईसमधूनही जाऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com