आतनं पॉवरफुल सपोर्ट हाय... (उत्तम कांबळे)

आतनं पॉवरफुल सपोर्ट हाय... (उत्तम कांबळे)

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. जत्रेत जसे हौशे-नवशे-गवशे असे तीन तऱ्हांचे लोक असतात, तशाच तऱ्हा या ‘राजकीय जत्रे’तही असतात...मात्र या राजकीय आखाड्यात आणखी एक ‘सराईत’ तऱ्हा असते व ती म्हणजे, ‘आत’ असलेल्यांनी आपल्या जवळच्या नातलगांना निवडणुकीच्या मैदानात उतरविणाऱ्यांची तऱ्हा...ही तऱ्हा, हा प्रकार सध्या अगदी उजळमाथ्यानं चाललेला पाहायला मिळतो...

सायंकाळी बोरगडच्या दिशेनं कुत्र्याला फिरायला नेत होतो. आम्ही दोघंच असलो, की कुत्र्याबरोबरही बोलता येतं...आपलं त्याला काही पटलं, रुचलं किंवा त्याला काही कळलं की तो शेपूट हलवतो. मान वर करतो. अर्थात, हा आपल्या बाजूचा तर्क असतो. त्याला काय वाटत असावं, हे काही मला कळलेलं नसतं. कुत्रा आपलं ऐकतो...ऐकतो म्हणण्यापेक्षा आदेश पाळतो, हाही आनंदाचा विषय असतो. झालंच तर ‘तुमचं कुणी कुत्रंही ऐकत नाही,’ असं कुणी म्हणण्याची शक्‍यता नसते! ...तर चालत चालत मी मखमलाबाद लिंक रोडजवळ आलो. माझ्या मागून म्हणजे रस्त्याच्या डाव्याच बाजूनं एका स्कूटीवरून दोन महिला वेगात येताना दिसल्या. माझ्याजवळ येताच त्यांनी जोरात ब्रेक लावून स्कूटी थांबवली. अचानक घडलेल्या या घटनेमुळं कुत्रा बावरला. भुंकायला लागला. जोरजोरात साखळी ओढायला लागला. रागावत, मोठा आवाज काढत मी त्याला शांत करत होतो. त्या महिलांनी स्कूटी स्टॅंडला लावली. स्कूटी चालवणारी प्रौढ महिला पुढं आली. मागं बसलेली हातात प्रचारपत्रकं घेऊन पुढं आली. स्कूटी चालवणारी म्हणाली ः ‘‘काका, कुत्रं जरा सांभाळा. तिकडं ओढा.’’ ती कुत्र्यालाच म्हणाली, ‘गप की जरा... आशीर्वाद घ्यायचाय सायबांचा...’

मी ः ‘‘कशासाठी..?’’
ती ः ‘‘थोडा वेळ घ्या त्याला तिकडं. भीती वाटतेय. ऐन निवडणुकीत चावलं तर ११ इंजेक्‍शनं घ्यावी लागतील. तुमचं नाही चावणार; पण घ्या बाजूला. मला पाया पडून आशीर्वाद घ्यायचे आहेत.’’
मी ः ‘‘कुणाच्या पाया पडायचंय आणि का?’’
ती ः ‘‘आता कुणाच्या म्हणजे, तुमच्याच की...कुत्र्याला कोण व्होटर करतं का...? निवडणूक आली की व्होटरच्या पाया पडायचं...त्याचा आशीर्वाद घ्यायचा.’’
मी म्हणालो ः ‘‘पाया वगैरे पडू नका. काय सांगायचंय ते सांगा.’’
ती न ऐकताच चटकन्‌ खाली वाकली. पाया पडून मोकळी झाली. उभी राहिली. चुळबूळ करणाऱ्या कुत्र्याला मी आवरत होतो, तसं दुसरी तरुणी पुढं आली. तिनं एक प्रचारपत्रक माझ्या हातावर ठेवलं.

‘‘काकूलाही घरी वाचून दाखवा,’’ असं ती म्हणाली. पाया पडणारी महिला ही बहुतेक उमेदवार असावी, हे एव्हाना लक्षात आलं होतं. आमच्या प्रभागात एकेका जागेसाठी किमान १० जण तरी उभे आहेत. एकूण ४० उमेदवार उभे असतील. या सगळ्यांची नावं-गावं-कामं लक्षात ठेवायची म्हणजे मोठं कठीण! निवडणुकीच्या काळात डोक्‍यात महासंगणक ठेवून फिरल्याशिवाय या सगळ्यांची माहिती काही कळणार नाही. कुत्रा एकसारखा साखळी ओढत होता. त्याला आवरणं कठीण होत होतं आणि ही बोलायला लागली ः ‘‘काका, या वेळी हिला पाडतेच की नाही बघा! मागच्या वेळी शे-दीडशे मतांनी मागं होते. नाहीतर तेव्हाच लोळवलं असतं तिला; पण यंदा मी सोडायची नाही. चांगली तयारी केलीय. रोज १०० व्होटरच्या पायांना हात लावून आशीर्वाद घेतेय... होर्डिंग्ज खूप लावल्याती. तिकडं टेकाडावर, समोर बसथांब्यावर... तिथं चौकात आपलीच होर्डिंग्ज आहेत. खूप लवकर जागा ॲक्वायर केली...आपल्याशिवाय भारी शिकलेलं कुणी नाही...काका, मदत करा मला...बघा कशी लोळवते तिला. निवडून आली न्‌ गायब झाली...आणि आता एका मताला पाच हजार रेट काढलाय; पण आपण कमी पडणार नाही...बघा निवडून येते की नाही...आणि हो निवडून आल्यावर याच रस्त्याला- जिथं आपण थांबलोय ना याच रस्त्याला- तुमचं नाव देणार...लेखक की कायतरी आहात म्हणतात तुम्ही... बघा, देते की नाही नाव...’’

...जणू लाखाच्या गर्दीसमोर बोलावं तसं ती बोलली. तिच्यासोबत असलेल्या तरुणीनं दोन वेळा तरी टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न केला. मी टाळ्या वाजवणार नव्हतो. एका हातात कुत्र्याची साखळी धरली होती. तो सारखा मला खेचत होता आणि म्हणतातच ना, की एका हातानं टाळी वाजत नाही! शेवटी ती म्हणाली ः ‘‘जाते काका...अजून बऱ्याच व्होटरना व्हिजिट करायचं आणि रात्री घरी जाऊन स्वयंपाकपाण्याचंही पाहायचंय.’’
ती आली तशी भुर्रकन निघून गेली. मी पुढं पुढं चाललो. खरंच तिनं सांगितल्याप्रमाणं तिची अनेक ठिकाणी होर्डिंग्ज होतीच. आता ती विद्यमान नगरसेविकेविरुद्ध लढणार होती.
मी पुढं पुढं निघालो, तसे अनेक उमेदवार गट करून, कार्यकर्ते घेऊन फिरताना दिसले. कुणी भाजी विकत घेत होतं. कुणी भाजीविक्रेत्यांसाठी शेड मारून देण्याचं, तर कुणी बसस्टॉपवर शेड मारून देण्याचं आश्‍वासन देत होतं...बोचऱ्या थंडीतही सुखावणारी आश्‍वासनं बाहेर पडत होती.
***
दोन दिवसांनी मी दौऱ्यावर निघालो. सकाळी अकरा-साडेअकराच्या सुमाराला पुण्याजवळ एका हॉटेलात नाश्‍ता करण्यासाठी थांबलो. थोड्याच वेळात एक उमेदवार-महिला आणि पुरुष हे समर्थकांबरोबर थेट हॉटेलात आले आणि काउंटरवर मालकासमोरच प्रचार करू लागले. सकाळी गर्दीची वेळ. हॉटेलमधल्या ग्राहकांना सेवा द्यायची की प्रचार ऐकायचा, असा प्रश्‍न हॉटेलमालकासमोर उभा होता. तो ग्राहकांकडं पाहायचा. काही तरी विचारावं, असं त्याला वाटत असावं; पण सगळे कार्यकर्ते स्वतःच बोलत होते...

एक जण म्हणाला ः ‘‘काही झालं तरी ताई चालवायची यंदा.’’
दुसरा ः ‘‘...तर काय, सीटिंग कार्पोरेटर कुणाला संधीच देत नाही.’’
तिसरा ः ‘‘त्याची बायको आणि आतातर भावाची बहीण...जणूकाही मतदारसंघ गहाण ठेवून घेतलाय.’’
चौथा ः ‘‘अहो, ताईसाहेबांनी बाहेर राहून एकटीच्या जोरावर किती कामं केली आहेत ते तरी पाहा...महाप्रसाद, झाडं लावा, वह्या वाटा, दिंड्या काढा... काय केलं नाही त्यांनी? आणि तेही एकटीच्या जोरावर...’’
आता मात्र हॉटेलमालकानं तोंड उघडलं. तो थेट म्हणाला ः ‘एकटीच्या जोरावर, एकटीच्या जोरावर...काय म्हणताय हे? काही कळत नाहीय...’’
चौथा ः ‘‘आता त्यात काय न कळण्यासारखं...? अहो, ताईसाहेबांचे मिस्टर जेलात आहेत. मर्डर केल्याबद्दल १२ वर्षांची कैद झालीय त्यांना...आता हे सगळं खालच्या कोर्टात...वरच्या कोर्टात अपील केलंय आम्ही...मी गॅरंटी देतो, सुटणार म्हणजे सुटणार ते...’’ ‘‘समाजासाठीच त्यांनी हे भारी काम केलंय,’’ उमेदवार-महिला लगेचच म्हणाली ः ‘‘आणि ते जेलात आहेत म्हणून लोकांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलेलं नाही... लई पुण्याई आहे त्यांची आमच्या मागं. जाईल तिथं लोक त्यांची आठवण काढत्यात...आवं, एवढं समाजकार्य करून ठेवलंय त्यांनी की काही विचारूच नका...१०-१० हजारांच्या पंक्ती उठवल्यात... वाढून वाढून माझ्या कमरेला बेंड यायचा...काही विचारूच नका तुम्ही...अहो, भारी पुण्यवान आहे माझा नवरा...आणि हे बघा, अशाच माणसाला जेल होतीय नव्हं...पण, हेही ऐका की तुरुंगात राहूनही त्यांनी आपल्याला सपोर्ट केलाय...बारीकसारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष असतंय...लय दांडगा सपोर्ट आहे त्यांचा आतनं...’’

हॉटेलवाला आश्‍चर्यचकित झाला. आता ही सगळी चर्चा थांबायला हवी, असं त्याच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. एकतर हॉटेलमधले सगळे ग्राहकही ऐकत होते. तुरुंगातून एक गुंड आपल्या पत्नीला निवडणुकीत लढवत होता, अशी एकूण स्टोरी होती. चर्चा सुरू असतानाच हॉटेलबाहेर घंटागाडी वाजली. हॉटेलचे काही कर्मचारी कचऱ्याची गाठोडी घेऊन बाहेर आले. प्रचारकही आता बाहेर पडू लागले. बाहेर पडता पडता उमेदवार-महिला म्हणाली ः‘‘सर, मला निवडून द्या. तुमच्या हॉटेलसमोर दिवसातून दोन वेळा घंटागाडी पाठवली नाहीतर जेलातल्या कारभाऱ्याचं नाव नाही सांगणार... खरंच सांगतेय, आतून त्यांचा भारी सपोर्ट आहे.’’

प्रचारक निघून गेले. घंटागाडीही निघून गेली. गाडीवर काम करणाऱ्यांचा पगार चार-पाच महिने झालेलाच नाही. तिकडं नाशिकमध्येही घंटागाडीचा ठेकेदार खोट्या नोटा छापण्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. त्याचेही काही दूरचे नातेवाईक रिंगणात आहेत. एकूण काय तर, ज्या यूपी आणि बिहारींविरुद्ध आपले काही लोक आंदोलन करतात, त्यांच्याच रांगेत आपणही हळूहळू सरकतोय की काय, असं वाटायला लागलं. तिथंही अनेक गुंड ग्रामपंचायतीपासून खासदारापर्यंत आत राहून निवडणुका जिंकतात. आत गेले की ते पॉवरफुल होऊन बाहेर पडतात. आत असं कोणतं मॅग्नेट आहे, की ते या सगळ्यांना पॉवरफुल बनवतं, हे काही कळत नाही. मोबाईल, मांजा पकडल्याच्या बातम्या येतात; पण आत गेलेल्यांना सुपरमॅन बनवणारी अशी कोणती प्रोटिनची पावडर तिथं आहे हे काही कळत नाही...हे वाक्‍य काही वेळा अतिशयोक्त आणि काही वेळा खरंच वाटायला लागतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com