कुठं गेले कावळे? (उत्तम कांबळे)

कुठं गेले कावळे? (उत्तम कांबळे)

कावळे; खासकरून पिंडाला शिवणारे कावळे गेल्या काही काळात गायब झाल्याचा, त्यांची संख्या कमी झाल्याचा साक्षात्कार त्या प्रौढ मित्राला झाला होता. पिंडाला शिवण्यासाठी कावळा बराच वेळ येत नसल्यामुळं त्याला त्या दिवशी रजा घ्यावी लागली होती. त्यामुळं ‘कावळे’ या विषयावर त्याचं चिंतन सुरू होतं. ‘कावळ्यांची संख्या वाढवण्यासाठी काहीतरी करायलाच हवं,’ असं पालुपद तो गप्पांच्या ओघात आळवत राहिला. त्याचं बोलणं ऐकून मलाही प्रश्‍न पडला ः ‘कुठं गेले कावळे?’ पूर्वी मोठ्या संख्येनं असलेल्या कावळ्यांना निसर्गबदलाचा फटकारा बसला की त्यांची संख्या घटण्यामागं आणखी काही कारणं असतील?

तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीच्या दिवशी आपल्या बाईकला एक मोठा भगवा फडकवतच तो आला. महापालिकेत नोकरीत असलेला हा प्रौढ मित्र तसा अधूनमधून येतो. त्याच्या त्याच्या वेळापत्रकानुसार येत असतो. बहुतेक वेळा खासगीकरणाचा विषय चर्चेत असतो. आरोग्य, बागा सगळ्या सगळ्याचं खासगीकरण होतंय, याचं त्याला वाईट वाटतंय. कंत्राटी पद्धत वाईट आहे, असंही त्याला वाटतंय; पण आता ते स्वीकारल्याशिवाय पर्याय काय, असा एक हताश प्रश्‍न तो स्वतःच उपस्थित करतो. पश्‍चिम महाराष्ट्रातून तो इथं आलाय. बऱ्याच वर्षांपूर्वी तिथून आलेल्या काही मंडळींनी एकत्र येऊन ‘सह्याद्री, सांकोसा’ (सांगली-कोल्हापूर-सातारा) अशी एक संस्थाही स्थापन केली होती. ...तर या वेळी पाणी पीत पीतच तो म्हणाला ः ‘‘आयला, या कावळ्यांचं काहीतरी करायला पाहिजे. सगळीकडंच ते प्रॉब्लेम करताहेत. आमच्याकडं म्हणजे गावाकडं आणि इथंही.’’

आश्‍चर्य व्यक्त करत मी म्हणालो ः ‘‘कोणत्या कावळ्यांचं? आणि अचानक हे कावळे कुठून आले?’’
तो ः ‘‘कोणत्या म्हणजे? घाटावरच्या. आयला, तीन तास लावले पिंडाला शिवायला. आज शिवजयंती; पण तिथीची असल्यानं सुटी नाही. लवकर येईन असं वाटलं होतं; पण तिथंच बारा वाजले. ऑफिसात जाऊन रजाच टाकून आलो. कावळ्यानं रजा खाऊन टाकली. बेकार काम झालं.’’
मी ः ‘‘कुणाचा पिंड आणि कुठला कावळा?’’
तो ः ‘‘आता कुणाचा काय? एका नातेवाइकाचा! पिंडाजवळ खायचे पदार्थ किती ठेवले होते म्हणून सांगू...अगदी नातवानं आजोबालाही पिझ्झा आणि बर्गर खायची सवय लावली होती, म्हणून तोही ठेवला. तांबडा-पांढरा रस्सा तर होताच. लायटरसह सिगारेटचं पाकीट होतं. पण सर, सांगू का, कावळा काय दादच देत नव्हता!’’
मी म्हणालो ः ‘‘मला कुणीतरी सांगितलंय की झाडी तुटल्यामुळं घाटावरचे कावळे कमी झाले आहेत. अगदी दोन-तीनच उरले आहेत.’’
तो ः ‘‘म्हणजे आता त्यांची ‘एकाधिकारशाही’ झालीय म्हणा की!’’
मी ः ‘‘तसं नाहीय. एवढे सगळे पिंड मांडले जातात. कंटाळा करत असतील कावळे.’’
तो ः ‘‘पंचवीस वर्षांपूर्वी मी नाशिकमध्ये आलो, तेव्हा असं काही नव्हतं. कावळे चटकन यायचे. लवकर सुटका व्हायची. आता तसं नाही राहिलं. ‘दरबा’चा कावळा करण्यावर सगळ्यांनी जोर दिलाय. दोन-दोन, तीन-तीन तास उभं राहून पाय दुखतात. टाइमटेबल कोलॅप्स होतं. आता माझंच बघा ना, सीएल टाकावी लागली. काहीतरी मार्ग काढावा लागेल.’’
मी ः ‘‘काय काढणार?’’
तो ः ‘‘निघेल म्हणा...आता नव्या दुनियेत एवढं सगळं घडतं...हार्ट बदलत्यात... टेस्टट्यूब येतेय...माणूस चंद्रावर जातोय. इथंही घडंलच काही तरी...’’
मी ः ‘‘विज्ञान आणि अध्यात्म वेगळं असतं.’’
तो ः ‘‘तसं काय नाही. पूर्वीही होतंच की विज्ञान. मला वाटतं, काही जण कावळे पाळून त्यांना ट्रेंड करतील. पिंडाला शिवायला शिकवतील. त्याचे पैसे घेतील.’’
यावर मी हसतच म्हणालो ः ‘‘तुम्ही का नाही कावळ्याचा व्यवसाय करत?’’
तो म्हणाला ः ‘‘कसा काय करणार? लोकांना अजून ओरिजिनल लागतं...म्हणजे कावळा पाळलेला नको, घाटावर फिरणाराच लागतो.’’

कावळ्याची चर्चा कधीच संपणारी नसते. पृथ्वीवर माणसाच्या जवळपास सगळ्यात प्रथम येणाऱ्या कावळ्याविषयीची चर्चा आणि त्याबाबतच्या कल्पना कधीच संपत नसतात. थोडा वेळ थांबून तो निघाला; पण पुटपुटतच...‘काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि काहीतरी मार्ग...’

चर्चा संपल्यानंतर मला अलीकडंच आलेला सनी नावाच्या एका खेड्यात राहणाऱ्या तरुणाचा ई-मेल आठवला. तो एका खेड्यात राहतोय. कविताही लिहितोय. त्याच्या चुलत्याचं निधन झालं आणि त्या वेळीही त्याला ‘काकपराक्रम’ पाहता आला. बराच वेळ कावळे येत नव्हते. नातेवाईक मयताला स्मरून आणा-भाका घेत होते; पण कावळा काही येत नव्हता. शेवटी स्मशानाच्या गंजक्‍या छतावर तीन कावळे एकदम आले, तेव्हा सनीनं मोठ्या भावाला प्रश्‍न केला ः ‘दादा, यातला आपला चुलता कोणता? कडंचा की मधला?’
दादाला हा प्रश्‍न आवडला नाही. त्यानं सनीला तोंड बंद ठेवायला सांगितलं, तरीही त्यानं एक प्रश्‍न विचारलाच ः ‘ज्या प्रदेशात कावळेच नसतील, तिथं मयत झालेले लोक कोणत्या रूपात अवतरत असतील?’
यावरही ‘तोंड बंद ठेव,’ असंच उत्तर सनीला ऐकावं लागलं.

एक खरंच, की ढासळत्या पर्यावरणामुळं कावळे कमी होऊ लागले आहेत. त्यांची निवासस्थानं संपू लागली आहेत. टीव्हीच्या अँटेनावर घरटं बांधणारे काही कावळे आहेत, हे खरंच; पण ते स्मशानात, घाटावर जात नाहीत. घाटावर फिरणारे कावळे जणू काही ‘पिंड-स्पेशालिस्ट’ असल्यासारखे जगतात.
कावळा कधी पिंडाला शिवून जाईल, पुढं काय होईल, दर्भाच्या गवतानंतर पुढं काय होईल, असे अनेक प्रश्‍न मृत्यूनंतरच्या जीवनात उभे राहतात. उत्तरं वेगवेगळी असतात. कोसळणाऱ्या पर्यावरणातूनही काही उत्तरं जन्माला येतील.
प्रसिद्ध इतिहास-संशोधक डी. डी. कोसंबी यांनी ‘भारतीय इतिहासाचा अभ्यास’(An introduction to the study of Indian History) या आपल्या ग्रंथात म्हटलं आहे ः ‘भारत असा देश आहे, की जिथं अणुयुगातील आणि ताम्रयुगातील (Chalcolithic) लोक खांद्याला खांदा भिडवून उभे आहेत.’

कोसंबींनी केलेलं वर्णन अनेक ठिकाणी दिसतं. गायत्रीमंत्र म्हणणाऱ्याच्या डोक्‍यात पिनकोड, पासवर्ड सगळं काही असतं. विवाह, जन्मकाळ आणि मृत्युसंस्काराच्या वेळी तीन-चार हजार वर्षांपूर्वी असलेल्या प्रथा आजही पाळणारे लोक आहेत. त्यात एक कावळा...तो लोकांच्या श्रद्धेतून किंवा अंधश्रद्धेतून तयार झाला. वर्षानुवर्षं घाटावर टिकून राहिला. निसर्गबदलाच्या फटकाऱ्याचा धोका त्यालाही निर्माण झाला आहे. त्यातूनच प्रश्‍न तयार होतोय, ‘कुठं गेले कावळे?’ या प्रश्‍नाचं उत्तर काहीही असू शकतं. कारण, कावळ्याकडं पाठ फिरवणारेही वाढत आहेत, जुना काळ आपल्या मुठीत पकडून जगणारेही आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com