बोर्ड हॉल आणि देवा (उत्तम कांबळे)

उत्तम कांबळे uttamkamble56@gmail.com
रविवार, 2 एप्रिल 2017

‘हा गाढवासारखा घोडा कशाला विकत घेतलास रे?’ अशी हेटाळणीयुक्त विचारणा करणाऱ्यांचं मत आता बदललं आहे. दत्तूनं घोड्याची देखभालच अशा प्रकारे केली आहे, की त्याचं सगळं रूपच बदलून गेलंय. सुरवातीला एकदम हडाडलेला असणारा घोडा आता ‘आरोग्यपूर्ण’ झाला आहे. अर्थात, यामागं दत्तूची अपार मेहनत आहे. लोक लग्नात जागरण-गोंधळ घालतात. दत्तू घोड्याच्या वाढदिवसाला ते करतो. घोड्याला चांगलं आरोग्य मिळावं म्हणून घोड्याच्या वाढदिवसाआधी दोन-चार दिवस महाराष्ट्रातली खंडोबाची ठिकाणं करून येतो. हे सगळं करण्यासाठी आवश्‍यक इच्छाशक्ती, ऊर्जा आणि समर्पित भावना तो कुठून बरं आणत असेल?

‘हा गाढवासारखा घोडा कशाला विकत घेतलास रे?’ अशी हेटाळणीयुक्त विचारणा करणाऱ्यांचं मत आता बदललं आहे. दत्तूनं घोड्याची देखभालच अशा प्रकारे केली आहे, की त्याचं सगळं रूपच बदलून गेलंय. सुरवातीला एकदम हडाडलेला असणारा घोडा आता ‘आरोग्यपूर्ण’ झाला आहे. अर्थात, यामागं दत्तूची अपार मेहनत आहे. लोक लग्नात जागरण-गोंधळ घालतात. दत्तू घोड्याच्या वाढदिवसाला ते करतो. घोड्याला चांगलं आरोग्य मिळावं म्हणून घोड्याच्या वाढदिवसाआधी दोन-चार दिवस महाराष्ट्रातली खंडोबाची ठिकाणं करून येतो. हे सगळं करण्यासाठी आवश्‍यक इच्छाशक्ती, ऊर्जा आणि समर्पित भावना तो कुठून बरं आणत असेल?

काही सन्माननीय अपवाद वगळता अलीकडं नाशिकमधल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला पूर्ण वेळ कुलगुरू लाभलेला नाही. काहीतरी घडतं आणि कुलगुरूंचं पद रिकाम होतं. अगदी अलीकडंच या विद्यापीठाला डॉ. ई. वायुनंदन हे नवे कुलगुरू लाभले आहेत. डॉ. सुनीलकुमार लवटे, नागार्जुन वाडेकर (हे विद्यापीठातच प्राध्यापक आहेत) यांच्यासह त्यांची सदिच्छाभेट घेण्यासाठी त्यांच्या दालनासमोर थांबलो. बहुतेक १७ मार्चची रणरणती दुपार असावी. विद्यापीठाच्या रिजनल डायरेक्‍टरांची बैठक होती. थांबलो. जेवणाची सुटी झाल्यानं बैठक थांबली होती. डॉ. वायुनंदन यांच्या केबिनसमोर आम्ही उभे होतो. एक-दोन क्षणातच त्यांनी आमच्यासाठी राजेंद्र हिरे या सहायकाकरवी निरोप धाडला. विद्यापीठाविषयी, त्यातल्या निरंतर शिक्षणव्यवस्थेविषयी ते भरभरून बोलत होते.

बोलण्याच्या ओघात त्यांनीच एक अल्प काळातली घटना सांगितली. कुलगुरुपदी रुजू झाल्यानंतर एके सकाळी परिसरात फिरत असताना त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांतच विद्यापीठासाठी राबणारे मजूर भेटले. प्रत्येकानं त्यांच्या पायावर डोकं टेकवलं आणि आपली कैफियत सांगायला सुरवात केली. कुणी बागेतलं, कुणी रस्त्यावर, कुणी सफाईचं, तर कुणी कसलं तरी काम करत होता. एकापाठोपाठ एक सगळेच जण आपल्या प्रश्‍नांविषयी बोलू लागले. बहुतेक मजूर कंत्राटदाराचे होते. खरंतर आता यात काही नवं नाही. खासगीकरणाच्या रेट्यात कंत्राटी मजूर आता नवी संस्कृती बनले आहेत. शिक्षण, बॅंका, रेल्वे, विमान, रस्ते असं करत खासगीकरण आता तुरुंगापर्यंत पोचणार आहे. भारताबाहेर अनेक देशांनी तुरुंगाची सूत्रं खासगी क्षेत्राकडं सोपवली आहेत. आपण आता या वाटेवर आहोत.

गयावया करत आपल्या मागण्या सांगणाऱ्या कंत्राटी मजुरांना कुलगुरूंनी बोर्ड हॉलमध्ये बोलावलं. या हॉलमध्ये महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या बैठका होतात. बहुतेक वेळा विद्यापीठाच्या कारभाऱ्यासाठी हा हॉल वापरला जातो. या हॉलमध्ये आपल्याला कसं काय बोलावलं, असा एक प्रश्‍न घेऊन सगळे मजूर तिथं जमले. हॉलमधल्या बड्या माणसांच्या खुर्चीत या कंत्राटी मजुरांना कुलगुरूंनी बसायला सांगितलं. ते संकोच करू लागले; पण कुलगुरूंच्या आग्रहामुळं ते बसले. पुन्हा आपल्या प्रश्‍नांचा पाढा वाचू लागले. कंत्राटी मजूर वगळता विद्यापीठात सगळ्यांना त्यांच्या वेतनात शहरानुसार भत्ता मिळतो; पण आम्हाला गावानुसार मिळतो. (विद्यापीठ गावात आहे) असं का, हा महत्त्वाचा प्रश्‍न होता.

प्रश्‍नोत्तरं सुरू असतानाच एकजण म्हणाला ः ‘‘मागण्यांचं जाऊ द्या, बोर्ड हॉलमध्ये आयुष्यात पहिल्यांदा आम्ही बसलो. त्याचा खूप आनंद वाटतोय. खरं म्हणजे, हा हॉल आम्हीच बांधला. मेन्टेनन्स आम्हीच करतो. बड्या साहेबांसाठी स्वच्छताही आम्हीच करतो; पण इथं बसण्याची संधी पहिल्यांदा मिळाली. छान वाटतंय.’’

मजुराच्या या बोलण्यावर सगळेच चक्रावले. चर्चा सुरू राहिली. मागण्यांचं काय होईल ठाऊक नाही; पण खुर्चीत बसल्यावर मजुरांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पकडण्यासाठी कुलगुरू शब्दांची जुळवाजुळव करत असावेत, असं वाटत होतं. चहा झाल्यावर उठलो. बाहेर आलो. बोर्ड हॉलकडं नजर गेली. तिथं बसण्याची संधी मलाही मिळाली होती. मजुरांना किती आनंद झाला असेल, याचा विचार करतच बाहेर पडलो. काही कुलगुरू रुजू झाल्यानंतर कामाची सुरवात स्वतःच्या केबिनपासून करतात. म्हणजे ती रंगवून घेतात. काही जण फर्निचर करून घेतात. काही जण यज्ञ घालतात आणि हे...

हॉलमध्ये मजुरांना बसवा, असं कुणी म्हणणार नाही. तो त्यांच्यासाठी तयारच केलेला नसतो. मजुरांचीही तशी अपेक्षा असण्याचं कारण नाही. तसं असलं तर ते चुकीचं घडावं. प्रश्‍न एकच आहे आणि तो म्हणजे, ज्यांच्या श्रमातून या सगळ्या सुंदर गोष्टी घडतात, त्यांना त्या मुक्तपणे पाहण्याची तरी मुभा असावी. वास्तुशांतीच्या वेळीही असं घडत नाही. बेलदार देवाची मूर्ती घडवतो खरा; पण तो गाभाऱ्यात जाऊ शकत नाही. आपण कष्टातून वास्तू उभी करतो; पण कष्टकऱ्याला कधी समारंभात बोलावत नाही. खूप कमी लोक असतील असं करणारे.

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला होता. सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला होता. या संस्थांचे घटक होणाऱ्यांची जीवनशैली कशी असावी, याविषयी त्यांनी काही मंथन केलं होतं. उदाहरणार्थ ः वास्तुशांती कशी घालावी? ते म्हणतात ः ‘वास्तुशांतीपूर्वी राबणाऱ्या सगळ्या कष्टकऱ्यांची पगाराची बाकी चुकती करावी. वास्तू (घर) उभारताना ज्या ज्या कामगारांनी कसर न करता इमाने-इतबारे कामं केली असतील, त्या त्या सगळ्यांना आपल्या शक्तीनुसार बक्षिसं देऊन त्यांना संतुष्ट करावं. सगळ्या जातींतल्या अंध-अपंग स्त्री-पुरुषांना दानधर्म करून गृहप्रवेश करावा.’
अर्थात, अशा पद्धतीनं वास्तुशांत करणारे खूपच कमी असतील. वास्तुशांत करायची की ती साजरी करायची, हा प्रश्‍न उरतोच.

-महात्मा फुले यांच्या सांगण्याप्रमाणं, मी माझ्या घराचं केलं, तेव्हा मला ‘बरं केलं’ असं म्हणणारा कुणी भेटला नाही. शेवटी मीच मला भेटलो.
विद्यापीठातून बाहेर पडल्यावर दत्तू वरंदळ या ड्रायव्हरच्या गाडीत बसलो. तो मला घरी सोडणार होता. मूळचा सिन्नरचा. दारिद्य्र असतानाही एमएपर्यंत धडकलेला. अठरा वर्षं ट्रक चालवून शेवटी मुक्त विद्यापीठात स्थिर-स्थावर झालेला दत्तू दर वर्षी सहलीला जातोय, जग बघतोय. ड्रायव्हरची नोकरी करतच त्यानं दोन मुली - माधुरी, मोनिका आणि मुलगा आनंद- यांना पदव्युत्तर शिक्षणापर्यंत आणलंय. समाजसेवा करण्याचा नाद त्याला खूप वर्षांपासून; पण दारिद्य्रामुळं ती नीट करता येत नाही. विद्यापीठात स्थिर-स्थावर झाल्यावर तो ‘देवा’ या आपल्या राजबिंड्या घोड्याचा वाढदिवस दर चार जानेवारीला करू लागला. गावातल्या फुले विद्यालयात गरीब विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, पेन, कंपासपेट्या वाटू लागला. गेल्या वर्षी त्यानं या कामासाठी अकरा हजार रुपये दिले होते. नोकरीनंतर त्यानं विहीर खोदली आणि शेती बागायती झाली. रोजावर येणाऱ्या भिल्ल महिलांच्या पोरांनाही तो शाळेची गोडी लावू लागला. सारंगखेड्यातून आणलेल्या मरतुकड्या घोड्याचं संगोपन करून त्यानं त्याला भारी बनवलंय. वाढदिवसाला सुवासिनी घोड्याला ओवाळतात. घरात गोडधोड होतं आणि काही विद्यार्थ्यांना मदत केली जाते. कुणाकडंही तो पैसे मागत नाही. स्वतःच वर्षभर साठवतो. आता जूनमध्ये एक हजार वह्या, पाचशे पेन आणि दहा कंपासपेट्या देण्याचं त्यानं ठरवलंय.

चतुर्थ श्रेणीच्या कामगारांमध्येही सामाजिक जाणिवा किती तीव्र असतात, हे मी पाहत होतो. पुढच्या वर्षी आपल्या घोड्याच्या वाढदिवसाचं निमंत्रण त्यानं मलाही दिलंय. वाढदिवसाला गावातली सगळी बच्चेकंपनी जमा होते. एक आमदारही येऊन गेले. शेतकरी येतात. वाढदिवस हा आनंदाचा क्षण आहे; पण मुक्‍या प्राण्याचा वाढदिवस साजरा करून शिक्षणासाठी मदत करणं आणखी आनंददायी आहे, असं त्याला वाटतं. खूप समाजसेवा करायची, असं दत्तू (मो. ९४०३७७४६३८) सांगतो; पण पांघरूण अपुरं आहे. काही झालं तरी पाय बाहेर पडतात. आहे त्यात चांगलं करत राहायचं...
बोर्ड हॉलमध्ये जाऊन खुर्चीत बसून जणू काही पुनित झालेल्या श्रमिकांपैकी दत्तू एक. त्यानं स्वतःसाठी आनंदाचे विषय शोधले आहेत. घोडा, त्याचा वाढदिवस आणि शिक्षणासाठी मदत यात तो आनंद शोधतो. ‘हा गाढवासारखा घोडा कशाला आणलाय?’ असं म्हणणारे आता तरणाबांड ‘देवा’ बघून आश्‍चर्यचकित होतात. लोक लग्नात जागरण-गोंधळ घालतात. दत्तू घोड्याच्या वाढदिवसाला ते करतो. घोड्याला चांगलं आरोग्य मिळावं म्हणून घोड्याच्या वाढदिवसाआधी दोन-चार दिवस महाराष्ट्रातली खंडोबाची ठिकाणं करून येतो. हे सगळं करण्यासाठी आवश्‍यक इच्छाशक्ती, ऊर्जा आणि समर्पित भावना तो कुठून बरं आणत असेल? प्रश्‍न तर आहेच; पण ‘देवा’च्या वाढदिवसात कदाचित उत्तरही मिळेल. शेवटी उत्तरं असतात म्हणून प्रश्‍न असतात...

मला सोडण्यासाठी दत्तूनं माझ्या दारासमोर गाडी थांबवली. क्षणभर वाटलं, बोलतं करावं आत्ताच याला; पण केलं नाही. त्याची ड्यूटी सुरू होती...

Web Title: uttam kamble's article in saptarang