इस्तुती श्रीलंका (उत्तम कांबळे)

उत्तम कांबळे uttamkamble56@gmail.com
रविवार, 21 मे 2017

श्रीलंका हा भारताचा जुना मित्र. आपल्या या छोट्या मित्राला भारत आजपर्यंत सर्वतोपरी मदत करत आलाय. गौतम बुद्ध आणि त्यांचं तत्त्वज्ञान हा दोन्ही देशांमधल्या मैत्रीतला एक समान धागा. परवाच्या बुद्धपौर्णिमेला तिथल्या ‘टेम्पल ऑफ टूथ’ला म्हणजेच बुद्धांचा दात असलेल्या मंदिराला आपल्या पंतप्रधानांनी भेट दिली. भारत आणि श्रीलंका यांची ही अशी मैत्री पुढंही कायम राहीलच; परंतु सध्या चीनसुद्धा श्रीलंकेला मदत करण्यासाठी पुढं सरसावला आहे. श्रीलंकेला मदत करण्यात भारताची जी भूमिका आहे, तिच्याही पुढं चीननं हनुमानउडी मारून श्रीलंकेला आपल्या बगलेत घेण्याचा प्रयत्न चालवला आहे.

श्रीलंका हा भारताचा जुना मित्र. आपल्या या छोट्या मित्राला भारत आजपर्यंत सर्वतोपरी मदत करत आलाय. गौतम बुद्ध आणि त्यांचं तत्त्वज्ञान हा दोन्ही देशांमधल्या मैत्रीतला एक समान धागा. परवाच्या बुद्धपौर्णिमेला तिथल्या ‘टेम्पल ऑफ टूथ’ला म्हणजेच बुद्धांचा दात असलेल्या मंदिराला आपल्या पंतप्रधानांनी भेट दिली. भारत आणि श्रीलंका यांची ही अशी मैत्री पुढंही कायम राहीलच; परंतु सध्या चीनसुद्धा श्रीलंकेला मदत करण्यासाठी पुढं सरसावला आहे. श्रीलंकेला मदत करण्यात भारताची जी भूमिका आहे, तिच्याही पुढं चीननं हनुमानउडी मारून श्रीलंकेला आपल्या बगलेत घेण्याचा प्रयत्न चालवला आहे.

मुंबईहून कोलम्बोला जाणारं विमान भंडारनायके विमानतळावर २५ मिनिटं अगोदर म्हणजे पहाटे पाचला पोचलं. विमानतळाबाहेर गाजन नावाचा गाईड हातात फलक आणि पावसाची रिमझिम घेऊनच उभा होता. खरंतर हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज पाऊस पडणार नव्हता. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये स्वतःच्या लहरीनुसार येणारा पाऊस कोणत्याही अंदाजाला सहसा दाद देत नाही. पूर्णपणे उजाडल्यानंतर रस्त्यावर दोन प्रकारची होर्डिंग्ज दिसली. एक म्हणजे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची. बुद्धपौर्णिमेला सायंकाळी ते श्रीलंकेत येणार होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे, ११ मे रोजी मायदेशी उड्डाण करणार होते. बुद्धांची किंवा मोदींची होर्डिंग्ज अंगावर येणारी नव्हती. एकदम साधी. सुटसुटीत. बुद्धांच्या होर्डिंग्जवर फक्त बुद्धांचा फोटो होता आणि मोदींच्या होर्डिंग्जवर त्यांच्यासह श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा फोटो होता. आपल्याकडं समारंभ कुणाचाही असो, गावगन्ना पुढाऱ्यांचे आणि त्यातही काळ्या व्यवहारातून बदनाम चेहरे धारण करणाऱ्यांचे फोटो असतात. प्रवासी-वाहनांना ताशी ६० किलोमीटरपेक्षा अधिक वेग पकडण्याची परवानगी इथं नाही. अगदी अपवादात्मक परिस्थितीतच हॉर्न ऐकू येतो. सर्वसामान्य नागरिकही वाहतुकीच्या नियमांचा आदर बाळगणारा. रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगच पकडणारा...कुठं ‘भागो, भागो’ नाही...‘पकडो, पकडो’ नाही. कारण, पकडण्यासाठी पोलिसही मुबलक नाहीत. घाईचा आणि शांततेचा प्रवासही आपला विवेक बाळगून आणि नियमांचा आदर बाळगून करायचा आहे. आपल्याकडं रस्ता प्रत्येकाचा असतो म्हणून की काय, प्रत्येक जण स्वतःच्या सोईचे नियम करून धावत असतो. मागं-पुढं अपघाताची सावली घेऊन...

मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर दोन-चार सर्वसामान्य नागरिक आणि रिक्षाचालकाला मोदींविषयी विचारलं. ‘‘तुम्हाला मोदी आवडतात का?’’ यावर मोडक्‍यातोडक्‍या इंग्लिशमध्ये ते म्हणाले ः ‘‘येस येस...ग्रेट लीडर...’’ श्रीलंकन लोकांचं उत्तर ऐकून आनंद वाटला. ‘‘मोदी का आवडतात’’ यावर ते म्हणाले ः ‘‘ते आम्हाला मदत करतील.’’ भारताची श्रीलंकेला मदत ही काही नवी गोष्ट नाही. वर्षानुवर्षं ती सुरू आहे. श्रीलंकेच्या बाजारात ८०-९० टक्के वस्तू भारतीय बनावटीच्या. त्यांची करन्सीही आपणच छापून देत असू. लिट्टे (लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलम) आणि श्रीलंका यांच्यात जवळपास २५ वर्षं चाललेल्या युद्धात श्रीलंकेला भारतानं सगळ्या प्रकारची मदत केली होती. आपला तगडा राष्ट्रीय नेता राजीव गांधीही आपण गमावला. त्यांच्या खुन्यांना सोनिया गांधी यांनी माफ केलं होतं. या सगळ्या घटना-घडामोडींनंतरही आपण मदत थांबवली नव्हती. दोन राष्ट्रांमध्ये बंद पडलेला समुद्रप्रवासही लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा श्रीलंकेत होती. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे, श्रीलंकेला मदत करण्यात भारताची जी भूमिका होती, तिच्याही पुढं चीननं हनुमानउडी मारून श्रीलंकेला आपल्या बगलेत घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. मोठमोठे प्रकल्प, त्यातही किनाऱ्याशेजारी प्रकल्प, भव्य गृहप्रकल्प, औद्योगिक प्रकल्प यात चीननं प्रवेश केला आहे. सर्व प्रकल्प गतिमान बनले आहेत. या प्रकल्पांचा श्रीलंकेला आधुनिक आणि बलवान होण्यात खूप फायदा होणार आहे. या प्रकल्पांवर काम करण्यासाठी स्वस्तात मजूर मिळावेत, यासाठी त्यांनी श्रीलंकन मजुरांचा नाद सोडला. आपले अंदाजे दोन लाख मजूर लंकेत घुसवले आहेत. ते स्वस्त दरात उपलब्ध होतात. श्रीलंकेतल्या बिगाऱ्याची मजुरी रोज हजार-पंधराशे रुपये असते. श्रीलंकेच्या चलनाचं नाव रुपये आहे. भारताच्या एका रुपयाला त्यांचे अंदाजे दोन रुपये मिळतात. चिनी मजूर लाखोत घुसत असल्यानं स्वाभाविकच स्थानिक मजुरांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. खासगीकरण आणि औद्योगिकीकरणामुळं रोजगारनिर्मिती वाढली; पण ती चिन्यांनी मिळवली. कोलम्बोत भव्य अशी चायनीज मार्केट आहेत. श्रीलंकेत ७१ टक्के बुद्धिस्ट, १२ टक्के हिंदू, ९.५ टक्के मुस्लिम आणि ख्रिस्ती साडेसात टक्‍क्‍यांच्या आसपास आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत इथं हिंदूंची लोकसंख्या अंदाजे दोन टक्‍क्‍यांनी कमी झाली, तर मुस्लिमांची तेवढ्याच टक्‍क्‍यांनी वाढली. ‘सरकार विरुद्ध लिट्टे’ या युद्धाचाही तो एक परिणाम असावा. वर्षानुवर्षे सगळ्याच क्षेत्रांत आपल्या कुशीत असणाऱ्या श्रीलंकेला मदत करण्यात भारताला आणखी पुढं जावं लागणार आहे. एकेकाळी भारताप्रमाणे श्रीलंकेतही सत्ता गाजवणारे इंग्रजसुद्धा मोठमोठे प्रकल्प घेऊन श्रीलंकेत प्रवेशकर्ते होत आहेत. एका युरोपीय उद्योजकानं श्रीलंकेत साखर कारखाना काढण्यासाठी चार-सहा हजार एकर जागेची मागणी केली. सरकारनं ती मान्य केली. त्यावरून एका विरोधी पक्षानं व्यापक जनआंदोलन उभं केलं. आपल्याकडं अशी आंदोलनं कधी उदय पावली आणि कधी लोप पावली कळलं नाही.

मोदी यांच्या दौऱ्यादरम्यानच श्रीलंकेत एक राजकीय पेचप्रसंग तयार झाला. पंतप्रधानांशी चर्चा न करता मंत्रिमंडळात बदल करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना आहे का? काठाच्या बहुमतावर सर्कस खेळणाऱ्यांना, असे प्रश्‍न खूप भेडसावतात. भारतात काठ संपून आता पाशवी बहुमताचं राजकारण सुरू आहे. टोकाचा काठ आणि पाशवी बहुमत दोन्ही गोष्टी लोकशाहीशी मैत्रीपूर्ण राहतीलच असं नाही. बलवान लोकशाहीसाठी दुबळा विरोधी पक्ष चालत नाही; पण असो. कारण, शेवटी हे सगळं लोकच घडवत असतात. सतत युद्धजन्य स्थितीत राहणाऱ्या देशाला मात्र असं टोकाचं काही परवडत नसतं. अगदी टोकाचा चीनही.

हत्ती हा श्रीलंकेचा तसा राष्ट्रीय प्राणी. देव, धर्म, संस्कृती, परंपरा, कृषिव्यवस्था यात हत्ती भरून पावला आहे. पर्यटनाच्या बाबतीतही हत्तीचा मोठ्या खुबीनं वापर करून घेण्यात आला आहे. परदेशी पर्यटकांसाठी दोन-तीन हजार रुपये तिकीट घेऊन गजदर्शन घडवलं जातं. हत्तीला अंघोळ कशी घातली जाते, छोट्या हत्तींना बाहेरून दूध देऊन त्यांचं संगोपन कसं केलं जातं, अंघोळीसाठी हत्तींचा जथा कसा मिरवणुकीनं निघतो, हत्तीला फळांचं खाद्य कसं द्यायचं वगैरे सगळ्या गोष्टी प्रदर्शनाद्वारे दाखवल्या जातात. हत्तीतून निर्माण होणारा नफा उत्पन्नाचं एक प्रमुख साधन आहे.

आपल्याप्रमाणेच चहाच्या मळ्यासाठी श्रीलंका कितीतरी वर्षांपासून प्रसिद्ध आहे. सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांच्या मदतीनं जगातलं चौथ्या क्रमांकाचं चहाचं उत्पादन इथं तयार होतं. चहा वगळता श्रीलंकेचं खास काही उत्पादन नाही. चहाचं क्षेत्र मात्र वाढत वाढत जाऊन ते एक लाख ८५ हजार हेक्‍टरच्या आसपास पोचलं आहे.
नुवारा डलिया इथं चहानिर्मितीचा एक अत्याधुनिक प्रकल्प आहे. चहाचं पान ते चहाची वेगवेगळ्या प्रकारची चहापूड इथं दाखवली जाते. सर्व निर्मितीप्रक्रिया दाखवल्या जातात. जगात सगळ्यात महाग असलेला पांढरा आणि स्वस्तातला काळा चहा इथं दाखवला जातो. चहाची चव चाखण्यासाठी आणि नंतर खरेदीसाठी झुंबड उडत असते. चहाच्या कारखान्यासमोर दगडाची एक शिळा आहे. तीवर चहामाहात्म्य लिहिलेलं आहे. इंग्लिशमध्ये लिहिलेल्या आणि जणू काही सुविचार वाटावा अशा वाक्‍यांचा मराठीत अर्थ होतो ः ‘जर माणसाच्या शरीरात चहाचा अंश नसेल, तर सत्य आणि सुंदरम्‌ समजून घेण्याच्या बाबतीत तो अक्षम ठरतो.’ डोंगराच्या माथ्यांना चाटत जाणाऱ्या नागमोडी रस्त्यावरून चहाचे मळे पाहताना, तिथून फिरताना होणारा आनंद मोठा विलक्षण असतो.

दहा तारखेला येणाऱ्या बुद्धपौर्णिमेची तयारी दोन-चार दिवस अगोदरच सुरू होती. शुभ्र रंगाचे कागदी किंवा कापडी आकाशकंदील वाटावेत असे दिवे रस्ते, घरं, उंच उंच इमारती, शासकीय कार्यालयं, सरोवरं आणि समुद्रकिनारे यांच्याभोवती झळाळत होते. या दिव्यांची विक्रीही मोठ्या प्रमाणात असते. सर्वत्र रंगरंगोटी आणि आनंदाचं वातावरण होतं. मंकच्या (भन्ते) मिरवणुका निघत होत्या. हत्तीच्या पाठीवर रोषणाईत झळकणारी वस्त्रं होती. वाद्यांचा मंगल गजर होत होता. पाहावं तिकडं या मिरवणुका होत्या. जवळपास आठवडाभर हा उत्सव चालतो. जगभरातले अनेक लोक खास बुद्धपौर्णिमेसाठी येत असतात. ४०-४५ सेल्सिअस तापमानही सुखद वाटावं असं वातावरण तयार होतं.

रस्त्यारस्त्यावर लोकांना अडवून जलदान, फलदान, गोड्या पदार्थांचं दान, शीतपेयदान असं मोठ्या प्रमाणात केलं जातं. दान घेणारा दिसला की ते करणाऱ्या तरुणाईच्या चेहऱ्यावर आनंदच आनंद दिसायचा. वाहनं थांबवून दान केलं जायचं. बसमध्ये जाऊन सुखद, आनंददायी प्रसाद दिला जायचा. दोन दिवस हे सगळं असंच चाललं होतं. सरकारी कार्यालयं आणि उद्योग-धंद्यांना सुट्या असतात. बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती, महापरिनिर्वाण मे महिन्यातच. श्रीलंकेत वशाक (वैशाख) म्हणतात.
श्रीलंकेत पर्यटकांसाठी बौद्धठिकाणं खूप आहेत. भगवान बुद्धांच्या वेगवेगळ्या रूपांतल्या अतिशय सुंदर आणि भव्य मूर्ती इथं आहेत. जगातली सगळ्यात उंच मूर्ती बनवण्याचं काम नुकतंच पूर्ण झालं आहे. अन्य ठिकाणीही गुहा आणि डोंगराच्या माथ्यावर बुद्धांच्या मूर्ती उभ्या आहेत. ध्यानग्रस्त बुद्ध, आशीर्वाद देणारे बुद्ध, स्मित करणारे बुद्ध, प्रवचन करणारे बुद्ध वगैरे मूर्ती लक्ष वेधून घेतात. कॅंडीमध्ये ‘टेम्पल ऑफ टूथ’ म्हणजे बुद्धांचा दात असलेलं भव्य मंदिर आहे. या दाताविषयी खूपच आख्यायिका आहेत. ‘बुद्धांचा दात कुणालाच नष्ट करता येत नाही...कारण, तो आकाशाएवढा मोठा होतो,’ ‘दाताची विटंबना केल्यास आपत्ती कोसळतात’ वगैरे वगैरे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याच मंदिराला भेट दिली. डाम्बुला इथं प्रचंड गुहांमध्ये बुद्धांच्या शेकडो मूर्ती आहेत. बाहेर एका गुहेचा आकार नागासारखा (कोब्रा केव्ह), तर दुसऱ्या गुहेचा आकार ‘ए’ या इंग्रजी आकारासारखा आहे. जेतवन, अभयगिरी, रॉक टेम्पल अशी कितीतरी नावं सांगता येतील. सीता जिथं राहत होती ते अशोकवन, सम्राट अशोकाच्या मुलानं भारतातून नेलेला बोधिवृक्ष वगैरे पर्यटकांना खेचून घेतात. बहुतेक सर्व बौद्धधर्मीय तीर्थस्थानांजवळ विष्णू, गणपती आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती आहेत. इतरत्र भव्य चर्च आहेत. मशिदी आहेत. बहुसांस्कृतिकवाद जपणारा श्रीलंका बुद्धजयंतीला जागतिक दिन करण्यात यावा, अशी मागणी करतोय. बुद्धांचं तत्त्वज्ञान अव्वल स्वरूपात ठेवलं ते याच देशानं. २५ हजारांहून अधिक भिक्‍खू सुमारे सहा हजारांहून धार्मिक क्षेत्रांत विखुरलेले आहेत. अलीकडं लष्कराचा जसा शासनावर परिणाम आहे, तसा तो भन्तेंचाही आहे, असं म्हणतात. केवळ पूजा-अर्चेचं कामच ते करत नाहीत, तर विचारवंत, प्राध्यापक, समाजकार्यकर्ते, शिक्षक, विपश्‍यना आदी क्षेत्रांतही ते आहेत. श्रीलंकेतला कुणीही माणूस धन्यवाद देण्यात आघाडीवर असतो. तुम्ही विमानात चढला, उतरला, तुम्ही खरेदी केली, पैसे भागवले तर श्रीलंकन नागरिक त्यांच्या भाषेत सहजच ‘इस्तुती’ किंवा ‘स्तुती’ म्हणजे धन्यवाद म्हणतात. मग आपणही म्हणतो ः ‘इस्तुती श्रीलंका’!

Web Title: uttam kamble's article in saptarang