फलकावरचे समाजरक्षक

uttam kambles writes about hording and felx on road
uttam kambles writes about hording and felx on road

‘महापुरुषांच्या जयंत्या-मयंत्या म्हणजे वेगवेगळ्या होर्डिंगचा सुळसुळाट’ हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून ठरूनच गेलेलं आहे. या होर्डिंगवर महापुरुषांचे फोटो असण्याला आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही... मात्र, फोटोबरोबरच इतरही छोट्या-मोठ्या तथाकथित कार्यकर्त्यांची ‘जत्रा’ही तिथं भरलेली असते. मात्र, नाशिकच्या रविवार कारंजाजवळ एक होर्डिंग या प्रकाराला अपवाद ठरलं आहे. त्यावर लिहिलं होतं : ‘साहेब, तुमच्या प्रतिमेसोबत आमची छबी लावण्याएवढे आम्ही मोठे झालो नाही...’ अर्थात, हे कटू सत्य आहेच; पण ते आत्मचिकित्सा म्हणून लिहिलं गेलं होतं, की स्वयंघोषित समाजरक्षक होण्यासाठी व्याकुळ झालेल्यांचा पत्ता कट करण्यासाठी लिहिलं गेलं, हे अद्याप गुलदस्तातच आहे!

बहुतेक महापुरुषांच्या जयंत्या-मयंत्या एप्रिल-मे महिन्यात येतात. दोन महिने सगळ्या शहरांचं, चौकांचं रूपडं पालटून जातं. अर्थात, ते सुंदरच असतं, असं काही नाही. बऱ्याचदा ते कुरूपही असतं. भावनांचा, श्रद्धांचा प्रश्‍न असतो म्हणून कुणी काही बोलत नाही आणि बोलायचं तरी कुणाला? असं करणारे त्या त्या एरियाचे घोषित-अघोषित, कायदेशीर-बेकायदेशीर मालक असतात. मालकांचा जसा मूड तसा चौकांचा-शहरांचा असतो. मालकांचा मूड खराब झाला, की कुठं गाड्या जळतील आणि कुठं कुठं फोडाफोड होईल, सांगता येत नाही. या काळात कुणीही कुणाच्या नावानं पावत्या फाडू शकतं. कुणाच्या नावावर कितीही आकडा टाकू शकतं. सामाजिक कार्य म्हटलं जातं या सगळ्याला...ते करणारेही अर्थातच स्वयंघोषित कार्यकर्तेच असतात. आपलं कार्यकर्तेपण आणि महापुरुषांविषयीची श्रद्धा व्यक्त करण्याचा हा काळ असतो. जो जास्त श्रद्धा व्यक्त करतो, त्याला अर्थातच जास्त वर्गणी गोळा करावी लागते. त्यासाठी वर्गणीदारांना कधी खरी खरी, तर कधी खोटी खोटी धमकी द्यावी लागते. लोकांच्या मनात श्रद्धा तयार करावी लागते. या सगळ्या गोष्टी झाल्या, की मग होर्डिंग-युद्धाला तयार व्हावं लागतं. पूर्वीसारखी हे युद्ध आता राहिलेलं नाही. महापुरुषांना मानणारे, महापुरुषांची इच्छा नसतानाही बळेबळेच त्याचे अनुयायी झालेले हे सगळे या युद्धातले खेळाडू असतात. त्यांचे त्यांचे नेते असतात. कुणाची किती वर्गणी गोळा करण्याची क्षमता असते, यावरूनही अनेकदा नेतृत्व ठरतं. जुन्या काळातल्या स्वयंवराप्रमाणे बोली लावूनही हे पद मिळवलं जातं. मग तयारी सुरू होते होर्डिंग लावण्याची. जागांचा शोध सुरू होतो. अर्थात, तेही महामानवाच्या नावानं दम देऊनच... महामानवाच्या नावात किती क्षमता आहे, याचा अंदाज घेतला जातो. बऱ्याच वेळेला शेजारी शेजारी होर्डिंग लावली जातात. मग त्यांच्यातही अघोषित युद्ध सुरू होतं; पण सामान्य माणसं या सगळ्याचा विधायक अर्थ घेतात.‘महामानवाविषयी श्रद्धा व्यक्त करण्याची चढाओढ’, असं नाव त्याला देतात.

होर्डिंगवरचे फोटो हा एक चर्चेचा विषय होतो. अर्थात, तीही मनातल्या मनात करायची असते. बहुतेक महामानवांच्या भक्तांत राजकीय, सामाजिक फूट पडली आहे. परिणामी, प्रत्येक जण होर्डिंगच्या युद्धात आपला गट-तट घेऊन सहभागी होतो. आपापल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांचे फोटो होर्डिंगवर टाकतो. ग्लोबल जगात राष्ट्रीय नेता होणं हे कधी नव्हे एवढं सोपं झालंय. आपणच आपल्या नावामागं ‘राष्ट्रीय नेता’ असं लिहायचं...झाला की नेता राष्ट्रीय...कुणाच्या परवानगीची आणि झालंच तर कार्यकर्त्यांची गरज त्याला नसते. काही नेते चळवळीतून, धडपडीतून जन्माला येतात आणि हे? हे नेते कधीही जन्माला येतात. डायरेक्‍ट होर्डिंगवर उगवतात. चमकतात. आपापली पोझ प्रसिद्ध करतात. कोणतंही होर्डिंग घ्या, त्यावर गट, ग्रुप, बॉईज, यूथ असं काहीतरी लिहिलेलं असतं. आपला समाज, आपले भक्त किती गटा-तटांत विभागलेले आहेत, याचा अंदाज या होर्डिंगवरून येतो. होर्डिंगवरचे फोटो पूर्वी फक्त महापुरुषांचे असायचे. खूप भव्य-दिव्य असायचे. आता ते छोटे छोटे होऊ लागले. महापुरुषांच्या फोटोभोवती स्वयंघोषित कार्यकर्त्यांचा इतका गराडा पडला, की महापुरुषांचा फोटो शोधावा लागतो. 

फोटोतल्या नेत्याचं सामाजिक चारित्र्य चटकन लक्षात यावं, यासाठी आता नवनवी विशेषणं जन्माला आली. धर्मरक्षक, समाजरक्षक, धर्ममर्द, सामाजिक कार्यकर्ते वगैरे वगैरे...कुणीतरी येऊन समाजाचं रक्षण करावं, इतकी वाईट स्थिती आली आहे का, असंही वाटायला लागतं; पण हे नवे धर्मरक्षक, नवे कर्मयोगी, कर्मवीर गर्दीनं आले आहेत. महामानव कशाला म्हणतात, हे ज्यांना ठाऊकच नाही, अशा चिल्ल्यापिल्ल्यांचे फोटोही झळाळू लागले आहेत. महापुरुषांच्या मांडीला चिकटतील, अशा प्रकारे फोटोंची मांडणी केलेली असते. पूर्वी महापुरुषांच्या संबंधित एखादं क्रांतिकारी वाक्‍य टाकलं जायचं. त्यानंतर शत्रुपक्षाला, उजव्या शक्तींना आव्हान देणारी वाक्‍यं येऊ लागली; पण बहुतेक नेते उजवे झाल्यानं आता अशा आव्हानावर मर्यादा आल्या. उजव्यांचा उपमर्द करण्यासाठी शेलकी वाक्‍यं शोधणारे विचारवंत, नेते आणि काही कवी उजव्या पक्षांनी तयार केलेल्या पिंजऱ्यात पेरूची फोड खात बसले म्हणूनही असं झालं. त्यानंतर मग गेल्या काही वर्षांपासून एक अतिशय आक्रमक वाक्‍य येऊ लागलं ः ‘एकच साहेब...’ आता बोला! साहेब होण्याचा कसा तरी प्रयत्न करू पाहणाऱ्यांचे पत्ते असे क्षणात काटले गेले. आता कुणी महापुरुष होणार नाही म्हणूनही टीका आणि कुणी प्रयत्न करत असल्यास त्याचीही बत्ती गुल...नवे समाजरक्षक आणि नवी नीती जन्माला आली. महापुरुषांची नवी रूपकं जन्माला आली. ती महापुरुषांना इतकी गच्च चिकटली, की रूपक कोणतं आणि महापुरुष कोणता, हा प्रश्‍न पडावा.

गेला महिनाभर मी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र फिरलो. प्रत्येक गावात असं पोस्टर-वॉर...जगण्याच्या लढाईला जणू काही त्यानं मागं टाकलेलं...महापुरुषांचे एकत्रित फोटो असणारी होर्डिंग कमी झाली आणि त्या ठिकाणी ग्रुप, गट वगैरे भेदाभेदात अडकलेल्यांचे फोटो आले. हे फोटोतले बहुसंख्य कोण आहेत, त्यांचं चरित्र आणि चारित्र्य काय, ते सारखे पोलिस ठाण्याच्या दारात का, याचा तपास कुणी करत नाही, हीसुद्धा चांगलीच गोष्ट म्हणावी लागली.

एकीकडं ही अशी होर्डिंग, तर दुसरीकडं नाशिकच्या रविवार कारंजावर (याला ‘आरके’ म्हणतात) एक होर्डिंग झळकलं. बराच काळ ते इथं चिकटलं होतं. स्फोट व्हावा असा; पण सच्च्या दिलानं, पाय जमिनीवर ठेवून तयार केलेला मजकूर त्यावर होता. एका अर्थानं मोठ्या हिमतीनं लोकभावना पकडण्याचा प्रयत्न झालेला दिसत होता. त्यावर लिहिलं होतं : ‘साहेब, तुमच्या प्रतिमेसोबत आमची छबी लावण्याएवढे आम्ही मोठे झालो नाही...’ अर्थात, हे कटू सत्य होतं; पण ते आत्मचिकित्सा म्हणून लिहिलं गेलं, की स्वयंघोषित समाजरक्षक होण्यासाठी व्याकुळ झालेल्यांचा पत्ता कट करण्यासाठी लिहिलं गेलं, हे गुलदस्त्यातच आहे. एवढं मात्र खरं, की महामानवाच्या जयंत्या-मयंत्या पकडून जन्माला येणाऱ्या होर्डिंगच्या मजकुरावरून समकालीन सामाजिक, सांस्कृतिक हालचालीही पकडता येतात...पण तसं ठरवलं तरच...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com