स्वातंत्र्य अन्‌ जबाबदारी (विभावरी देशपांडे)

vibhawari deshpande
vibhawari deshpande

मी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या मनात ओसंडून वाहणारा राष्ट्राभिमान ही आपल्या आधीच्या पिढ्यांची पुण्याई आहे यात शंकाच नाही; पण मग आपण आज पुढच्या पिढ्यांसाठी काय निर्माण करतो आहे, याचा विचार आपण करायला नको का? अभिमान बाळगावा असा इतिहास आपल्याला आपसूकच मिळाला आहे; पण आपल्या पुढच्या पिढ्यांचे डोळेही तिरंगा बघताना भरून यावेत यासाठी आपण काय करत आहोत हा विचार करायला नको का?

प्रसंग, घटना, औचित्य काहीही असो, तिरंगा झळकताना दिसला, राष्ट्रगीत कानावर आलं, की रोमांच उभे राहतात, गळा दाटून येतो. डोळे भरून येतात. ही संवेदनशीलता, राष्ट्राभिमान आपल्या सगळ्यांच्या डीएनएमध्ये आहे यात काही शंकाच नाही. स्वातंत्र्य मिळून 71 वर्षं होत आहेत. आपल्या आधीच्या पिढ्यांनी दीडशे वर्षांची गुलामगिरी नष्ट करून आपल्याला भारत नावाचं स्वतंत्र राष्ट्र मिळवून देण्यासाठी एक प्रचंड लढा दिला. तो कसा याची माहिती आपल्याला समजायला लागल्यापासून दिली गेली आहे. त्याबद्दलची कृतज्ञता, अभिमान आपल्या सगळ्यांच्या मनात काठोकाठ भरलेला आहे आणि ती भावना अढळ आहे, याबद्दल कुणालाच शंका नाही. आपल्या इतिहासामुळं आपल्या समाजाची आणि पर्यायानं त्या राष्ट्राची एक मानसिकता तयार होते. ज्याला आपण National psyche असं म्हणतो. (मी समाजशास्त्राची, राजकारणाची किंवा खऱ्या अर्थानं कशाचीच अभ्यासक नाही. माझ्या सामान्य विचारप्रक्रियेतून निर्माण झालेल्या काही निरीक्षणांची या निमित्तानी फक्त नोंद करावीशी वाटते. त्यामुळं चूकभूल द्यावी घ्यावी.) दरवर्षी स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिन साजरा करताना एकदा सिंहावलोकन करून आज आपण कुठं आहोत, काय करत आहोत हे बघणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, असं मला मनापासून वाटतं.

मी अनेक वर्षं ग्रिप्स थिएटर, बर्लिन या जर्मन नाट्यचळवळीशी निगडित आहे. त्या निमित्तानं जर्मन रंगकर्मींसोबत काम करण्याचे खूप प्रसंग येतात. मी आणि श्रीरंग गोडबोले यांनी लुट्‌झ ह्युबनर या प्रसिद्ध जर्मन नाटककाराबरोबर एक नाटक लिहिलं होतं "ड्यू अँड मी' नावाचं. यात एक गमतीदार प्रसंग होता. एक्‍स्चेंज प्रोग्रॅमला भारतात आलेल्या एका जर्मन मुलाला त्याच्या यजमान कुटुंबातली मुलगी सिनेमाला घेऊन जाते. तिकडं राष्ट्रगीत सुरू झाल्यावर सगळे उभे राहतात. याला कळतच नाही काय चाललंय. तो टवाळक्‍या करत राहतो. आसपासचे सगळे चिडतात तेव्हा ती त्याला झापते ः ""हे आमचं राष्ट्रगीत आहे, त्याचा सन्मान करायला शिक. तुझ्या राष्ट्रगीताचा अपमान केलेला चालेल का?'' यावर तो शांतपणे म्हणतो ः ""मला आठवतसुद्धा नाही माझं राष्ट्रगीत!''

लुट्‌झबरोबर लिहिताना जेव्हा त्यानं हे वाक्‍य लिहिलं, तेव्हा आम्हाला खूप धक्का बसला. ""तुम्हाला राष्ट्राभिमान नाही का?'' असा प्रश्न आम्ही त्याला विचारला. तेव्हा तो म्हणाला ः ""तसंच नाही... पण आमच्या मनात हिटलरच्या हॉलोकॉस्टमुळं एक प्रचंड अपराधीपणाची भावना आहे. आज इतकी वर्षं झाली, तरी ती पुसली गेलेली नाही. जगात कुठंही जर्मनी म्हटलं, की कार्ल मार्क्‍स, बिथोवेन, बाख यांच्या आधी हिटलरचंच नाव येतं. अजून काही पिढ्या तरी आम्ही या "नॅशनल गिल्ट'बाहेर पडणार नाही.''

आम्ही विचारात पडलो. आपला राजकीय, सामाजिक इतिहास आपल्या विचारांवर, आपल्या मनावर कळत नकळत खूप मोठा परिणाम करत असतो. मी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या मनात ओसंडून वाहणारा राष्ट्राभिमान ही आपल्या आधीच्या पिढ्यांची पुण्याई आहे यात शंकाच नाही; पण मग आपण आज पुढच्या पिढ्यांसाठी काय निर्माण करतो आहे, याचा विचार आपण करायला नको का? स्वातंत्र्यानंतरची एक पिढी नव्यानं मिळालेल्या अस्तित्वाशी, त्या जबाबदारीशी जुळवून घेण्यात गेली. महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महर्षी कर्वे अशा अनेकांनी आपल्यासाठी केवळ स्वतंत्र नाही, तर स्थिर राष्ट्र आणि समाज देण्याचा प्रयत्न केला. शून्याचा शोध लावणारा, ताजमहाल असलेला, अजिंठा-वेरूळची लेणी आणि खजुराहो असलेला भारत यापुढं जाऊन विज्ञान, तंत्र, साहित्य, कला यांत निरनिराळी शिखरं गाठणारा भारत निर्माण झाला. पुढं मग खुली बाजारपेठ आली, इंटरनेट आलं, जग जवळ आलं आणि एका मोठ्या तरुण वर्गानं आपला मोहरा पश्‍चिमेकडं वळवला. हुशार, बुद्धिजीवी तरुण पिढी आपल्या उज्ज्वल भवितव्याच्या शोधात युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियाला जाऊन स्थायिक झाली. यात चूक की बरोबर हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे, की या प्रचंड स्थित्यंतरात एक राष्ट्र म्हणून आपला प्रवास कुठं झाला, कुठं होत आहे?

मला कुठलीही सामाजिक, धार्मिक, राजकीय शहानिशा करायची नाही. तो माझा अभ्यास नाही आणि माझा हेतू तर मुळीच नाही. आज जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा, हजारो वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या, प्रचंड अध्यात्मिक वारसा असलेल्या भारत देशाचा नागरिक म्हणून आपण स्वतःकडे कसे पाहतो हा विचार माझ्यासकट प्रत्येकानी करायला हवा इतका साधा मुद्दा आहे. माझा धर्म, माझी जात, माझी पोटजात, माझं गाव, माझी भाषा यांच्याविषयी अपार निष्ठा, प्रेम आणि अभिमान असायला हरकत नाही; पण तो अभिमान राष्ट्राभिमानाहून मोठा होऊ लागला तर? राष्ट्राच्या एकसंध स्वरूपालाच हा अभिमान धक्का देऊ लागला तर? मुद्दा कोणताही असेल. या किंवा अशा अनेक कारणांनी हरप्रसंगी सामाजिक आणि राष्ट्रीय शांतता, सुव्यवस्था, साहचर्य या सगळ्याला सुरुंग लागत असेल, तर भारतीय म्हणून आपलं अस्तित्व किती काळ टिकून राहील?

काही द्रष्ट्या माणसांची भरदिवसा हत्या होते. सिनेमा, नाटक, पत्रकारिता यांतून आपली मतं स्पष्ट मांडू पाहणाऱ्या लेखक, कलाकारांवर हल्ले होतात. एक मोठा तरुण वर्ग कष्ट करून भविष्य घडवण्याच्या काळात मोर्चे काढून रस्त्यावर उतरतो, आपलीच सोय आणि सुव्यवस्था म्हणून घालून दिलेले नियम बिनदिक्कत मोडले जातात. भर रस्त्यावर अनेक निर्भया आपली अब्रू आणि जीव गमावतात. "मेरा भारत महान' लिहिलेले हजारो ट्रक, गाड्या लेनची शिस्त आपल्यासाठी नाहीच या अढळ निष्ठेवर गाड्या चालवतात. ते रस्ते तर अलौकिकच असतात. अनेक शेतकरी आत्महत्या करतात. इतिहासाचा अभिमान बाळगताना त्यात आपण नक्की काय केलं आहे? आपण अमुक जातीचा, धर्माचा, भाषेचा अभिमान बाळगताना आपल्याला हे जन्मजात मिळालेलं आहे, यात आपलं कर्तृत्व काहीही नाही हा विचार आपण करतो का? अभिमान बाळगावा असा इतिहास आपल्याला आपसूकच मिळाला आहे; पण आपल्या पुढच्या पिढ्यांचे डोळेही तिरंगा बघताना भरून यावेत यासाठी आपण काय करत आहोत हा विचार करायला नको का? हा विचार आणि हे वर्तन नसणं याहून मोठा देशद्रोह कुठला असेल?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com