भारताचे मित्र मॅकेन गेले...

vijay naik Write about John McCain after His Death
vijay naik Write about John McCain after His Death

रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकन सिनेटर जॉन मॅकेन यांचे रविवारी मेंदूच्या कॅन्सरच्या विकाराने 81 व्या वर्षी निधन झाले. दोन दिवस आधी आलेल्या बातमीनुसार, त्यांनी कॅन्सरची औषधे घेण्याचे बंद केले होते. अंत जवळ आला होता, याची त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कल्पना होती. मॅकेन हे ऍरिझोनाहून निवडून आले होते. 2008 मध्ये त्यांना पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली होती. डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बराक ओबामा यांनी त्यांचा पराभव केला. विरोधात असूनही अध्यक्ष ओबामा यांचा त्यांना आदर होता. अमेरिकेच्या संसदेतील "इंडिया कॉकस" बरोबर त्यांचे घनिष्ट संबंध होते. ""भारताबरोबर साधलेली व्यूहात्मक भागीदारी ही अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील एक महत्वाची कामगिरी आहे,"" असे मत अमेरिकेतील "कार्निगी एन्डोमेन्ट"मध्ये 2010 मध्ये केलेल्या भाषणात म्हटले होते. 

"भारत वेगाने प्रगत होणारे राष्ट्र असून, त्यादृष्टीने भारताने जागतिक जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे,"" असे ते म्हणत. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आले, तेव्हा महिन्याभरातच मोदी यांना दिल्लीत येऊन भेटणारे ते एकमेव सिनेटर होते. 

ऍरिझोनाची राजधानी फिनिक्‍स येथे त्यांचे कार्यालय भारतीयांना मदत करण्यात तत्पर असे. पुण्यातील प्रसिद्ध संगीतकार रवि दाते यांची कन्या अश्‍विनी काही वर्षांपूर्वी पती सुरजीत अहलुवालिया यांच्याबरोबर फिनिक्‍समध्ये राहात होती. अहलुवालिया इंटेल कंपनीमध्ये मोठ्या पदावर होते. त्यांच्या मातोश्री मुंबईत राहात होत्या. त्यांना सुरजित व अश्‍विनी यांना भेटायला जायचे होते. त्यांनी मुंबईतील अमेरिकन कौन्सुलेटकडे व्हिसासाठी अर्ज केला. मुलाखतीसाठी त्यांना बोलावण्यात आले, सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली होती. परंतु, व्हिसा मात्र आला नाही. तो नाकारण्यात आला होता. मातोश्री वयोवृद्ध असल्याने त्यांना वारंवार कौन्सुलेटमध्ये जाणे शक्‍य नव्हते. तसेच, तेथे रांगेत उभे राहाणे शक्‍य नव्हते. त्यांनी ही गोष्ट सुरजीतला कळविली. त्याने मॅकेन यांना पत्र लिहून मातोश्रीला झालेल्या त्रासाबाबत कळविले व कार्यालयाशी संपर्क साधला. पत्र मिळताच मॅकेन यांनी सूत्र हलविली. त्यांनी परराष्ट्र खात्याला श्रीमती अहलुवालियांच्या व्हिसाच्या दिरंगाईबाबत कळवूून ""तो देण्याची व्यवस्था करा,"" असे सांगितले. काही दिवसातच सूत्रे हालली. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीतील अमेरिकन दूतावास व मुंबईतील कौन्सुलेटच्या मुख्याधिकाऱ्याला आदेश दिले, की श्रीमती अहलुवालियांना विनाविलंब व्हिसा द्या. काही दिवसातच त्या फिनिक्‍सला रवाना झाल्या. हा अनुभव सुरजीत अहलुवालियांनी मला सांगितला. ते म्हणाले, ""माझ्यासारखे अमेरिकेत विशेषतः ऍरिझोनामध्ये राहाणारे असंख्य भारतीय आहेत. ते रिपब्लिकन पक्षाचे समर्थक तसेच मतदार आहेत. मॅकेन यांना भारतीयांबाबत आपुलकी व आदर आहे, त्यामुळे ते नेहमी मदतीला धावून येतात."" 

विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचे ते विरोधक. त्यांच्या अनेक धोरणांना मॅकेन यांनी जाहीर विरोध केला. मॅकेन हे व्हिएतनाम युद्धातील हीरो. परंतु, ट्रम्प यांना हिरो मानण्यास तयार नव्हते. तशी टिप्पणीही त्यांनी केली होती. मॅकेन हे अमेरिकेच्या नौदलातील लढाऊ विमानाचे वैमानिक. मॅकेन व लेखक जॉन सॉल्टर यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या " फेथ ऑफ माय फादर्स - ए फॅमिली मेमॉइर" या पुस्तकात "किल्ड" या प्रकरणात त्यांच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत लिहिले आहे. त्या अनुभवात भययुक्क थरार तर आहेच, परंतु अमेरिकेने व्हिएतनामवर लादलेल्या आक्रमणामुळे अमेरिकेचीच कशी हानी झाली, याचा ओझरता तपशील दिला आहे. 

30 सप्टेंबर 1967 रोजी मॅकेन ओरिस्कॅनी (विमानवाहू युद्धनौका) वर रूजू झाले. त्यावरील व्ही.ए.163 गटातील स्कायहॉक या लढाऊ विमानाच्या ए-4 आक्रमण करणाऱ्या स्क्वाड्रन ते वैमानिक होते. या स्क्वाड्रनचे नाव मात्र "सेंट" (संत) असे होते. व्हिएतनामवरील हल्ल्याच्या मोहिमेचे नाव होते, "रोलिंग थंडर." त्यांच्या स्क्वाड्रनने हायफॉंग बदरातील सर्व पूल नष्ट केले होते. तथापि,1965 मध्ये उत्तर व्हिएतनामवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात ओरिस्कॅनीवरील वैमानिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. 1968 मध्ये अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी "रोलिंग थंडर" मोहिमेला स्थगिती दिली, तोवर ओरिस्कॅनीवरील 38 वैमानिक ठार झाले, अथवा पकडले गेले होते. साठ विमाने नष्ट झाली होती. त्यात ए-4 च्या 29 विमानांचा समावेश होता. ओरिस्कॅनी युद्ध नौका आक्रमक होती. "ती यशस्वी होते," अशीही ख्याती होती. पण ती कायमची संपुष्टात आली. ओरिस्कॅनीवरील हानीमुळे तेथे निराशेचे सावट पसरले होते. तरी आपण फार शूर आहोत, असे दाखवणे सुरू राहिले. हॅनॉयमधील औष्णिक विद्युत केंद्र नष्ट करण्याचा आदेश देण्यात आला होता. कमांडर ब्रेयन क्रॉम्टन याच्या नेतृत्वाखाली मोहीम सुरू होती. विमानांना "वालेये स्मार्ट बॉंब्ज" जोडण्यात आले होते. 

अशाच एका आक्रमणात ब्रेयन क्रॉम्टन, आणखी एक वैमानिक व त्यामागे मॅकेन यांच्या विमानाने उड्डाण केले. हायफॉंग बंदरावर हल्ला करायचा होता. पण, क्रॉम्टनमागोमाग आलेल्या विमानावर खालून विमानभेदी तोफांचा जोरदार हल्ला झाला, ते विमान कोसळले. त्यातील वैमानिकाने स्वतःला वाचविले काय, हे पाहाण्यासाठी क्रॉम्टन यांनी जीव धोक्‍यात घालून आठ वेळा फेऱ्या मारल्या. परंतु, काही कळले नाही. शेवटी त्यांनी माघार घेण्याचे आदेश दिले. व्हिएतनामवर अमेरिकन वायुदल दिवसाकाठी 150 टन बॉम्बगोळ्यांचा वर्षाव करीत होते. मॅकेन म्हणतात, "" हा शुद्ध अतार्किक वेडेपणा होता."" हॅनॉय मधील विद्युत केंद्र शहराच्या मध्यभागात होते. हल्ला सुरू झाला होता. विमान 9 हजार फुटावर असताना खालून सॅम क्षेपणास्त्राचा भडीमार सुरू झाला. त्याबरोबर धुळीचे लोट उठले. मॅकेन यांचे स्कायहॉक जमीनीपासून साडेतीन हजार फुटावर आले व बॉम्ब टाकून ते झेप घेण्याचा विचार करीत असता, एक क्षेपणास्त्र त्यांच्या विमानाच्या उजव्या पंखावर येऊन आदळले. पंख जळत्या अवस्थेत दूर फेकला गेला. मॅकेन म्हणतात, "" आय वॉज किल्ड."" त्यावेळी विमानाचा वेग ताशी 550 मैल होता आणि ते त्या वेगाने जमीनीच्या दिशेने कोसळत होते. त्यांनी तत्काळ विमानावर हल्ला झाल्याचा निरोप पाठविला व खुर्ची सह विमानातून बाहेर पडण्याचे बटन दाबले. परंतु, विमानाच्या एका भागावर ते इतके जोराने आदळले, की त्यांचा डावा, उजवा हात तीन ठिकाणी मोडला व उजव्या गुडघ्याला जबरदस्त जखम झाली. इतक्‍या वेगाने ते बाहेर फेकले गेले, की त्यांची शुद्ध हरपली. त्यावेळी त्यांचे पॅरॅशूट जेमतेम उघडत होते. तशा अवस्थेत ते "ट्रक बाक" तलावाच्या उथळ भागात कोसळले. तलाव शहराच्या मध्यभागी आहे. अंगावरील सुमारे पन्नास पौंडाच्या वजनामुळे ते तळापर्यंत बुडाले. चांगल्या पायाने त्यांनी वर येण्याचा प्रयत्न केला. त्यांना हात हलवता येत नव्हते. ते वर आले, तेव्हा जमलेल्या शेकडो व्हिएतनामींनी त्यांच्याभोवती एकच गलका केला होता. रागाने ते मॅकेन यांच्याकडे पाहात होते, त्यांच्यावर ओरडत त्यांचे कपडे फाडीत होते. दोन बांबूंवर उचलून त्यातील काहींनी त्यांना बाहेर आणले. एकाने त्यांच्या खांद्यावर रायफल मारली, तर दुसरा लाथा मारू लागला. अखेर एका महिलेला त्यांची दया येऊन तिने वाचविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात आलेल्या सैनिकी ट्रकमध्ये त्यांना ठेवून त्यांची रवानगी युद्धकैदी म्हणून "मायसन सेन्ट्राले" (होआ लो) या तुरुंगात करण्यात आली. युद्धकैद्यांनी याच तुरुंगाचे नाव "हॅनॉय हिल्टन" असे ठेवले होते. 

मॅकेन यांनी तुरूंगात झालेला छळ, जबानी, काळकोठडीतील एकटेपण, शारिरिक व्याधी, त्यांना मिळालेली वागणूक आदींबाबत तपशीलाने लिहिले आहे. काही महिन्यांनी एका फ्रेन्च पत्रकाराने त्यांची मुलाखत घेतल्यानंतर ती बातमी त्यांच्या कुटुंबाला कळली. तोपर्यंत मॅकेन ठार झाल्याचाच अंदाज व्यक्त करण्यात आला. 

अखेर या युद्धातून अमेरिकेला पळ काढावा लागला. जगापुढे वृत्तांत आले, ते अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तीला नमविणाऱ्या बहादूर व्हिएतनामी सैन्याचे व व्हिएतनामच्या कणखर नेतृत्वाचे. अध्यक्ष लिंडन बी जॉन्सन यांच्या व्हिएतनामवरील आक्रमणाला नंतरही मॅकेन यांचा विरोध कायम राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com