अलिगढ विद्यापीठात मराठीची घोडदौड आणि डॉ. ताहेर पठाण 

Dr.Taher Pathan
Dr.Taher Pathan

मराठी भाषेचा विकास होतोय, की लय यावर गेले काही वर्ष उलटसुलट चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील तरूण पिढी इंग्रजीकडे वळली असून, मराठी वाचन, लिखाण कमी होतय, असाही सूर आहे. संस्कृतला भवितव्य काय, याचप्रमाणे मराठी भाषेचे भवितव्य काय, असे प्रश्‍नही अधुनमधून उपस्थित होत असतात. साहित्य सम्मेलने असली,की त्यावर चर्चासत्रे आयोजित केली जातात.

इंग्रजी व अन्य भाषेतील साहित्य, कथा- कादंबऱ्या, कविता आदींचं भाषांतर मराठीत मोठ्या प्रमाणावर होतय. तसंच, नवनव्या मराठी साहित्याची निर्मितीही सुरू आहे. दलित साहित्याचा गवगवा आहे. नवे लेखकही पुढे येत आहेत. तथापि, काही वर्षांपूर्वी दिल्ली विद्यापिठात असलेला मराठी भाषा विभाग बंद झाला. त्यात प्रा. निशिकांत मिरजकर व श्रीमती मिरजकर शिकवित होते. काही महिन्यांपूर्वी "ऑल इंडिया रेडिओ"मधील मराठी बातम्या देणारा विभागही बंद झाला. सरकारच्या नव्या धोरणानुसार, "दिल्लीहून निरनिराळ्या भाषातून बातम्या देण्याची गरज उरलेली नाही." हा अजब युक्तिवाद होय. तसेच काही प्रमाणात मनमानीही आहे. 

दुसरीकडे मराठीचीं आवड व प्रेमही वाढतय, असं आशावादी चित्र दिसतय, ते मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशातील अलिगढ विद्यापीठात. काही दिवसांपूर्वी त्यातील मराठी विभागाचे डॉ. ताहेर पठाण यांची भेट झाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिगढ विद्यापीठात मराठी विषयात सर्टिफिकेट, डिप्लोमा, बीए.(ओपन इलेक्‍टिव), एम.ए. पीचडी सारखे अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. या अग्रगण्य मुस्लिम केंद्रीय विद्यापिठात मराठी विद्यार्थ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. 1980 ते 2015 पर्यंत विद्यार्थी संख्या दहा इतकी पण नव्हती. 5 फेब्रुवारी 2015 रोजी ते या विद्यापिठात रूजू झाले, त्यावेळी एकही विद्यार्थी नव्हता. तथापि, 2015 च्या मध्यास ती 13, 2016 मध्ये 137, तर 2017 मध्ये तब्बल 237 वर जाऊन पोहोचली आहे. काही अभ्यासक्रमांचे प्रवेश अद्याप बाकी आहेत. विद्यार्थांची संख्या वाढविण्यासाठी विविध विभागांना भेटी, शिक्षकांशी चर्चा, पत्रके, मराठी भाषेचे महत्व, विविध उपक्रम, मराठीत जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिके व उत्तर प्रदेश सरकारने मराठी भाषा अनिवार्य केल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत भर पडत आहे. अलिगढ विद्यापीठ त्यासाठी अग्रगण्य मानले जाते. 

डॉ. पठाण यांच्या मते, महाराष्ट्रात बी.ए.ला अनिवार्य भाषेमध्ये मराठी वा हिंदी या भाषांपैकी एक भाषा बंधनकारक आहे. तर अलिगढ विद्यापिठात उर्दु आणि हिंदी अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय भाषा घेणे बंधनकारक आहे. इतर भारतीय भाषांच्या तुलनेत मराठी भाषा सोपी असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविले आहे. त्याच बरोबर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मराठी सर्टिफिकेट शिक्षणक्रम पूर्ण केल्यास महाराष्ट्रात नोकऱ्याही मिळत आहेत. 

सध्या जालिंदर येवले, हे "वारकरी साहित्यातील मूल्यात्मकता, सामाजिक व समलाकीन प्रस्तुतता", बाबासाहेब जाधव हे " मराठी साहित्यातील वडार समाजाचे चित्रण" तर मदन जाधव हे " साठोत्तरी मराठी कवितेतील वैचारिकता" या विषयांवर हे तीन विद्यार्थी डॉ. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करीत असून, जालिंदर येवले हे डिसेंबर 2015 मध्ये घेण्यात आलेल्या "नेट" परिक्षेत मराठी विषयात (जेआरएफ) भारतातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्याला विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे मराठी विषयात संशोधन करण्यासाठी दरमहा 25000 रू.ची शिष्यवृत्ती दिली जात आहे. 

विद्यापिठात बी.ए. (ओपन इलेक्‍टिव) आणि (ओपन इलेक्‍टिव) मध्ये, मराठी भाषेचा उदय , विकास व वाटचाल, मध्ययुगीन कालखंडातील विविध सांप्रदाय, महानुभाव, वारकरी, संत ज्ञानेश्‍वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम तसेच आधुनिक काळातील केशवसुत, वि.स.खांडेकर, वि.वा. शिरवाडकर, बहिणाबाई चौधरी, बाबुराव बागुल आदींच्या साहित्यातील विविध प्रवाह शिकविले जातात. प्रमाणपत्र आणि पदविकामध्ये मराठी व्याकरणाचा सखोल परिचय करून दिला जातो. 

येणाऱ्या काळामध्ये अलिगढ विद्यापिठामध्ये मराठी भाषेचा स्वतंत्र विभाग तयार करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीची ओळख निर्माण करण्याचा प्रा. पठाण यांचा मानस आहे. मराठी राजभाषेच्या निमित्ताने "मराठीचा इतर भाषांशी सहसंबंध" या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. 

डॉ. पठाण यांचा जन्म जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यातील मार्डी या गावात झाला. त्यांचे वडील काही काळ पिठाच्या गिरणीत काम करीत होते. कुटुंबाची परिस्थित मोठी हालाखीची असल्याने ताहेरचे चौथीपर्यंतचे शिक्षण मामाच्या गावी विहामांडवा, ता. पैठण येथे झाले. शाळेत रोज आठ कि.मी जावे लागे, कधी पायी, तर कधी सायकलने. पाचवी ते पदवी हे शिक्षण अंबड येथे झाले. बी.ए. ला ते मत्स्योदरी महाविद्यालयात ते प्रथम आले. एम.ए. ला डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल कुलपतीचे सुवर्णपदक व कै. लक्ष्मीबाई बाबुरावजी जाधव सुवर्णपदक ताहेरला देण्यात आले. ऑक्‍टोबर 2011 मध्ये मध्ययुगीन मराठी साहित्याचे ख्यातनाम समीक्षक डॉ सतीश बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली " संत एकनाथ व संत तुकाराम यांचा अनुबंध - एक अभ्यास" या विषयावर ताहेरने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी पदवी मिळविली. नंतर हरनूरच्या विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात ते प्रभारी प्राचार्यपदी होते. बिडकीनच्या (ता.पैठण) मधील एकता शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकपदी असताना " मुस्लिम साहित्यिकांचे मराठी साहित्याला योगदान" आणि मराठी सूफी साहित्यः प्रेरणा, स्वरूप व वाटचाल" या विषयावर त्यांनी दोन राष्ट्रीय चर्चासत्रे आयोजित केली. डॉ. पठाण यांना सामाजिक कार्यातही रूची आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्रबोधन, जल साक्षरता, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संरक्षण आदी उपक्रमही त्यांनी रावबिले असून, याच शिक्षण संस्थेत प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यावर अध्यापनाबरोबर 2013-14 मध्ये 202 जोडप्यांच्या सामुहिक विवाह सोहळ्याचे समन्वयक म्हणूनही जबाबदारी पार पाडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com