श्रीरामजन्मभूमीचा आँखो देखा हाल 

Ayodhya
Ayodhya

फैजाबादमध्ये शनिवारी तापमानानं 4 सेल्सियसचा नीचांक गाठला, रविवारी इतके धुके पसरले होते, की दहा फुटावरचं दिसत नव्हतं. रविवारी सकाळी (7 जानेवारी) नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू व प्रख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण विजय भटकर व एमआयटी विश्‍वशांति विद्यापीठाचे अध्यक्ष व शिक्षणतज्ञ विश्‍वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने अयोध्येला भेट देऊन वादग्रस्त स्थळ व परिसराची पाहाणी करीत रामलल्लाचे दर्शन घेतले.

6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिद पाडण्यात आली, या घटनेला 25 वर्षे उलटली. तरी, तिथं ना रामाचे मंदिर झाले, ना मशिदीसाठी पर्यायी स्थळाचा निर्णय झाला. मामला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला, तरी "दोन्ही बाजूंनी एकत्र येवून हा तिढा सोडवावा," असे मत न्यायालयाने जाहीर करूनही चर्चेचे गुऱ्हाळ चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येऊन तीन वर्षे उलटली, तरीही त्यादृष्टीने कोणतीही सकारात्मक गोष्ट घडलेली नाही. वाद फक्त 2.77 एकर जमिनीचा असून, त्याभोवतीच्या 67 एकर जमीनीवर काय हवे, याचाही निर्णय झालेला नाही. हे पाहता, कराड व भटकर यांनी या परिसरात प्रभू रामचंद्राच्या भव्य मंदिराव्यतिरिक्त उरलेल्या 67 एकर जमिनीपैकी काही एकरांवर "विश्‍वधर्मी श्री राम मानवता भवन "उभारून त्याअंतर्गत हिंदू, मुसलमान, ख्रिश्‍चन, शीख, बौद्ध, जैन, ज्यू, झोरोस्ट्रीयन धमस्थळे उभारावी," असा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांना दिला आहे. त्याचप्रमाणे एक "ज्ञानविज्ञान विद्यापीठ" उभारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यावर सुमारे 100 कोटी रू. खर्च येईल. 

भटकर यांनी फैजाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, की पुण्यातील सी-डॅक केंद्राला देशातील अनेक राज्यातून युवक भेट देत असतात. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी सी-डॅकला भेट दिली. भटकर यांना भेटून, "उत्तर प्रदेशात असे केंद्र आपण का उभारीत नाही," अशी पृच्छा केली. "ते उभारल्यास संकल्पित विद्यापीठ हे केंब्रिज, ऑक्‍सफर्ड, स्टॅन्फर्ड सारखे उत्तम विद्यापीठ होऊ शकेल" असे भटकर यांनी सांगितले. कराड यांचा विद्यापीठे स्थापन करण्याचा अनुभव व पुढाकार पाहता त्यांनी हे कार्य हाती घेण्याची ग्वाही उत्तर भारतीयांना दिली आहे. "या प्रकल्पांद्वारे अयोध्या देशाची व जगाची सांस्कृतिक राजधानी बनू शकते," असे त्यांचे म्हणणे असून, "अयोध्या सर्वधर्म समावेशक स्थळ बनल्यास स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे 21 व्या शतकात विश्‍वगुरूचे व सौहार्दाचे स्थान प्राप्त करू शकेल,"" असे त्यांना वाटते. 

फैजाबादहून अयोध्येचे अंतर साडे सहा कि.मी आहे. अयोध्या ही राम जन्मभूमी व देशाचे श्रद्धास्थान असले, तरी त्यात परकोटीचा बकालपणा आहे. गेल्या पंचवीस वर्षात उत्तर प्रदेशात आलेल्या कोणत्याही सरकारने या शहराकडे लक्ष दिलेले नाही, की त्यात उत्तम रस्ते, शुद्धपाणी, सांडपाण्याची व्यवस्था नाही, सर्वत्र घाणीचे साम्राज्य. अयोध्येला मोठ्या झोपडपट्टीचे स्वरूप आले आहे. शिष्टमंडळाबरोबर जाण्याची संधि मिळाल्याने रामलल्लाच्या मंदिराला भेट देताना मला हे पदोपदी जाणवत होते. केंद्रात मोदी व उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार येऊन अयोध्येला काही लाभ झालेला नाही. रामलल्ला गजाआड आहे. वादग्रस्त स्थळाला अंदाजे 2 हजार सशस्त्र पोलिसांचा वेढा आहे. त्याची परिक्रमा करण्यासाठी चार कि.मी चालावे लागते, ते ही सशस्त्र पोलिसांच्या साह्याने व क्षणोक्षणी अवती भोवती उड्या मारणाऱ्या वानर सेनेच्या साथीने. आत जाताना मोबाईल, किल्ली, कंगवा, पट्टा, घड्याळ आदी वस्तू नेता येत नाहीत. रामलल्लाच्या मंदिरापर्यत जाण्याआधी सहा वेळा फ्रिस्कींग होते. चालत असताना लोखंडी गजांनी तयार केलेल्या निमुळत्या बोळीतून जावे लागते. पुढे पुढे तर गजांचे जाळे इतके घट्ट होते, की त्यातून दोन बोटे देखील आपण बाहेर काढू शकत नाही. पोलिस अधिकारी वॉकी टॉकी घेऊन गस्त घालीत असतात. "उत्तर प्रदेशातील पोलिस दलाव्यतिरिक्त केंद्रीय राखीव दल, महिला पोलिस व कमांडोही आहेत," अशी माहिती देऊन मार्गदर्शन करणारे पोलिस अधिकारी जितेंद्र यादव म्हणाले, की 5 जुलै 2005 रोजी पाच अतिरेक्‍यांनी रामलल्लाच्या स्थळावर हातगोळ्यांसह हल्ला केला होता. पोलिसांशी झालेल्या चकमकीत पाचही अतिरेकी ठार झाले. तेव्हापासून येथे कडेकोट बंदोबस्त आहे. साथीने चालणाऱ्या असंख्य वानरांबाबत विचारता ते म्हणाले, की रात्रीच्या वेळी त्यांची संख्या एक हजार ते पंधराशे असते. ते काहीही पळवून नेतात. त्यामुळे फार काळजी घ्यावी लागते. 

रामलल्लाचे दर्शन झाले, ते 20 फुटावरून. उंचवट्यावर कापड व टार्पोलीनच्या झोपडीत झगझगीत प्रकाशात चार मूर्ती दिसतात. राम, सीता, हनुमान व लक्ष्मण आहेत. वरच्या भिंतीवर भले मोठे गोल घड्याळ लटकविलेले. मशिदीचा एकही घुमट दिसत नाही. छत पांढऱ्या कापडाचे आहे. गजापलिकडे बसलेला पुजारी वाजपेयी यांने थेंबभर पाणी व प्रसाद दिल्यावर सांगितले, की दिवसातून पाचवेळा रामलल्लाची आरती होते. सायंकाळी पाचवाजेनंतर परिसरात येण्यास मज्जाव असतो. पुढे जाताच सीताकुपी (बोअर वेल असावी)दिसते. सर्वत्र शांतता. देशातून रोज हजार, दोन हजार लोक दर्शनास येतात. रस्त्यातून जाताना रामनामाचा घोष करणाऱ्या आरत्या व गाणी कानी पडतात. खंत व्यक्त करीत कराड म्हणाले, "" रामलल्लाचे दर्शन भक्ताला मोकळेपणे घेता येवू नये, ही दुर्देवाची बाब होय."" शिष्टमंडळातील इटलीतील भारताचे माजी राजदूत बसंत गुप्ता म्हणाले, ""रोममधील व्हॅटिकनला जगातून दरवर्षी लाखो लोक भेट देतात. (त्यांची संख्या पन्नास ते साठ दशलक्ष आहे)ं त्यातून व्हॅटिकन व इटलीच्या अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होतो. राम मंदिराबरोबर अनेक धर्मीय मंदिरे उभारल्यास अयोध्या व उत्तर प्रदेशाला पर्यटनाचा लाभ होईल.""नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एन.एस.पठाण म्हणाले, की मक्का, मदीना व काबा ही धर्मस्थळांबरोबर पर्यटनस्थळे झाली आहेत, त्यापासून भारताला बरेच काही शिकण्यासारखे आहे."" पुण्यातील टेरपॉलिसी केंद्राचे अध्यक्ष व राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे माजी संचालक राजेंद्र शेंडे यांनीही मोलाच्या सूचना केल्या. 

प्रश्‍न आहे, तो मोदी यांचे सरकार 2019 पूर्वी मंदिर उभारणीस सुरूवात करणार काय? ते विकासाला प्राधान्य देणार , की बाबरी मशिदीचा तिढा सोडविण्यास? दरम्यान, "श्री रामजन्मभूमी न्यास" च्या कार्यशाळेतील वीटांचे खच, कोरीव खांब, दगडी तुळया व खळखळून वाहणारी अथांग शरयू नदी पाहून "रामलल्ला"प्रमाणे तेही दोन दशके प्रतिक्षेत असल्याचे जाणवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com