'पुढचे पाऊल'चा नवा संकल्प: ज्ञानेश्‍वर मुळे 

Dnyaneshwar Mulay
Dnyaneshwar Mulay

'कनेक्‍टिव्हिटी' संपर्कता या शब्दाला 21 व्या शतकात अनन्य साधारण महत्व आले आहे. रोजच्या जीवनातील संपर्क असो, राजकीय नेत्यांमधील संपर्क, देशादेशातील संपर्क असो, त्यातून सामंजस्य वाढते व सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होऊन समाज, समुदाय, देश व परस्पर राष्ट्रातील विकासाचा मार्ग खुला होतो. गेल्या महिन्यात दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनाच्या भव्य सभागृहात "पुढचे पाऊल" या दोन दिवसांच्या उपक्रमात महाराष्ट्राच्या साहित्य,उद्योग,कला, प्रशासन आदी विषयावरील चर्चासत्रातून महाराष्ट्राचा आवाज देश व परदेशात उंचावण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या उपक्रमाची कल्पना संयोजन व मुख्य सूत्रचालन परराष्ट्र मंत्रालयाच्या परदेशस्थ भारतीय व पासपोर्ट विभागाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांचे होते. पुढील वर्षी या उपक्रमाचे स्वरूप आणखी विस्तारीत राहाणार असून, त्याचे सम्मेलन बडोदा, इंदोर अथवा अन्य शहरातून करण्याचा विचार चालू असल्याचे मुळे यांनी सांगितले. 

"इ-सकाळ" बरोबर बोलताना मुळे म्हणाले, की महाराष्ट्राला वैश्‍विक दृष्टीची आवश्‍यकता आहे. तीत व्यूहात्मकता हवी व त्यासाठी राज्यकर्ते व बुद्धिजीवी लोकांनी काम करण्याची गरज आहे. त्यातून सकारात्मक दृष्टिकोन व कामगिरी साध्य करण्यासाठी काही वर्ष काम करावे लागेल. गेली अनेक वर्षे दिल्लीमध्ये महाराष्ट्राची लॉबी बळकट करण्याबाबत नुसतेच बोलले जाते, पण प्रत्यक्षात त्याबाबत फारशी प्रगती झालेली नाही. मुळे यांनी महाराष्ट्राचा आवाज दिल्लीतील नोकरशाही व सरकार दरबारी अधिक प्रभावी व्हावा, यासाठी दिल्लीतील वेगवेगळी मंत्रालये व क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे अडीचशे सनदी अधिकाऱ्यांची संघटना स्थापन केली असून, त्याद्वारे महाराष्ट्राचे महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हे अधिकारी प्रत्यत्नशील असतात. 

ते म्हणतात, "महाराष्ट्राने अटकेपार झेंडा लावला. अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्राबाहेर जाऊन मराठी माणसाने तेथे महाराष्ट्राची पताका फडकावित ठेवण्याचे काम केले. तथापि, महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडे जसे लक्ष द्यावयास हवे, तसे दिलेले नाही. उलट, उत्तर प्रदेशात परदेशस्थ उत्तर प्रदेशीय लोकांचे हितसंबंध राखण्यासाठी एक (एनआरआय) मंत्रालय आहे, केरळमध्ये नोर्का (नॉन रेसिडेन्ट केरळाईट्‌स अफेअर्स डिपार्टमेन्ट) हा स्वतंत्र विभाग (नोर्का रूट्‌स) असून, त्याचे अध्यक्षत्व स्वतः मुख्यमंत्री पिनरयी विजयन करीत आहेत. या खात्यात अनुभवी अकरा अधिकारी असून, केरळमधूनपरदेशात गेलेल्या तब्बल 22 लाख लोकांचे हितसंबंध जपण्याचे काम हा विभाग करीत आहे. त्यापैकी 90 टक्के आखाती देशात काम करीत आहेत. ते फार मोठ्या प्रमाणावर केरळला दर वर्षी परकीय चलन पाठवितात. काम करताना येणारे अडथळे, आखाती देशातील कायदा कानून, यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम हे खाते करीत असते. त्यामुळे, "परदेशात असलो, तरी आपली काळजी करणारे कुणीतरी आहे,"" अशी भावना सरकारबाबत त्यांच्या मनात आहे. आंध्र व तेलंगणातही परदेशस्थ लोकांसाठी वेगळे मंत्रालय आहे. महाराष्ट्राचे असे एकही मंत्रालय वा विभाग असू नये, ही खेदाची गोष्ट आहे," असे मुळे म्हणाले. 

शिवाजीचा काळ व नंतरच्या पेशावाईच्या काळात ग्वालेर, झाशी,भोपाळ, इंदूर,बडोदा, वाराणसी, दिल्ली, तंजावूर, हैद्राबाद आदी ठिकाणी गेलेले मराठी बांधव आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातही मराठी माणसं असून, ते मराठी संस्कृती राखण्याचे काम करीत आहेत. निरनिराळ्या देशात होणारी जागतिक मराठी साहित्य सम्मेलने त्याची साक्ष देतात. न्यू यॉर्क मध्ये भारतीय दूतावासाच्या कौन्सुल जनरल पदी असताना मुळे यांनी 2015 मध्ये "मुंबई मीट्‌स मॅनहॅटन" हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यास शेकडो मराठी बांधवांनी जोरदार प्रतिसाद दिला. कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्रात गुंतवणूक वाढावी, पर्यटनास चालना मिळावी, या उद्देशाने मुळे यांनी "फ्रेंड्‌स ऑफ महाराष्ट्र" ही संघटनाही स्थापन केली. ते म्हणतात, "समर्थ रामदासांच्या "मराठा तेतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा", या उक्तीप्रमाणे "महाराष्ट्र तेतुका मेळवावा," असे आमचे ब्रीदवाक्‍य असून, त्यासाठी केवळ महाराष्ट्र शासन नव्हे, तर देशात व परदेशात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी माणसाला व संस्थांना एकत्र यावे लागेल. "पुढचे पाऊल" च्या व्यासपीठावरून ते साध्य करण्याचा माझा प्रयत्न असेल."" ""परदेशात राहाणाऱ्या महाराष्ट्रीय लोकांत प्रथितयश संगणक तज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योगपती, राजकीय नेते (उदा. आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर), व्यापारी यांचा समावेश आहे. त्यांच्या बौद्धिक संपत्तीचा महाराष्ट्राला कसा लाभ होईल, याचा विचार करण्याची गरज असून, त्यासाठी "कनेक्‍टिव्हिटी" वाढवावी लागेल."

"त्यांची वर्गवारी, महाराष्ट्र, देश व परदेशातील बृष्ट्र, अशी करून कोणत्या देशात कुठे, किती मराठी लोक राहात आहेत, ते कोणकोणत्या व्यवसायात आहेत आदींची माहिती गोळा करावी लागेल. परदेशस्थ भारतीयांची संख्या अडीच कोटींपेक्षा अधिक आहे. परंतु, कोणत्या राज्याचे किती व ते कुठे आहेत, याची माहिती अद्याप उपल्ब्ध नाही. किमान मराठी लोकांबाबत ती संकलित करावी लागेल. मराठी माणूस म्हटला, की मित्र मंडळ आलेच. त्यांची यादी मिळविता येईल. त्यातून व्यक्तिविशेष उपलब्ध होऊ शकतात. महाराष्ट्र शासनाने त्यासाठी साह्य केले, तर राज्याविषयी आपलेपणाची भावना परदेशस्थ मराठी बांधवात निर्माण होईल. या संपर्कातून वैचारिक व तंत्रज्ञान पातळीवर देवाणघेवाण वाढविता येईल. महाराष्ट्राला इतिहास पुरूषांचा, लढवैय्या राण्यांचा, संतांचा, समाजसुधारकांचा, क्रांतिकारकांचा, प्रगल्भ राजकीय नेत्यांचा, मोठा वारसा आहे, तो ही नव्या पिढीला माहीत करून देण्याची गरज आहे," असे सांगून मुळे म्हणाले, की मराठी माणसाला "मार्केटींग" करणे जमत नाही. ""बाबा आमटे मराठी नसते, तर त्यांना केव्हाच नोबेल पारितोषिक मिळाले असते, इतके अफाट काम त्यांनी कुष्ठरोग निवारणासाठी केले आहे. त्यांचे कार्य मदर थेरेसा यांच्याप्रमाणेच महान व मोलाचे आहे." 

"पुढचे पाऊल" चा हा नवा संकल्प विशद करताना ज्ञानेश्‍वर मुळे यांनी पुढील उपक्रमासाठी महाराष्ट्राच्या निरनिरनिराळ्या स्तरावरील नामवंताना एकत्र आणण्याचा विश्‍वास व्यक्त केला. त्यासाठी कार्यकर्त्यांची एक टीम कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com