जेकब झुमांचा अस्त 

Jacob Zuma
Jacob Zuma

दक्षिण आफ्रिकेचे तिसरे अध्यक्ष जेकब झुमा (75) यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला, किंबहुना त्यांना तो द्यावा लागला. झुमा यांना मी प्रथम भेटलो, ते 1994 मध्ये. त्यावेळी ते आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसच्या (एएनसी) क्वाझुलू नेताळमधील शाखेचे अध्यक्ष होते. क्वाझुलू नेताळमध्ये एएनसी विरोधी "इंकाथा फ्रीडम पार्टी"चा प्रभाव होता. म्हणून झुमा यांच्यावर त्या राज्यात एएनसीचे समर्थन वाढविण्याची जबाबदारी होती.

एएनसीच्या कार्यकारिणीची बैठक जोहान्सबर्गमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार होती. त्यातील नेत्यांना व विशेषतः दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या सभापती फ्रेनी जिनवाला यांची भेट घेण्यास मी गेलो होतो. परंतु, मी पोहोचलो तेव्हा बैठक सुरू झाली होती. बैठकीला पोहोचण्यास झुमा यांना उशीर झाला होता. ते हॉटेलबाहेरच मला भेटले. मी भारतीय पत्रकार असल्याचे सांगून फ्रेनी जिनवाला यांना आल्याचं कळविण्याची विनंती मी झुमा यांना केली. त्यांनी आत जाऊन तत्काळ जिनवाला यांना मी आल्याचं कळविलं. काही वेळाने बैठक संपल्यावर जिनवाला यांनी मला सभागृहात बोलावले व आम्ही चर्चा केली. झुमाही तेथे होते. तेव्हा एएनसीचे ज्येष्ठ नेते म्हणून माझी ओळख जिनवाला यांनी त्यांच्याशी करून दिली होती. दक्षिण आफ्रिकेचे पितामह नेल्सन मंडेला यांचे सहकारी म्हणून झुमांविषयीचा माझा आदर द्विगुणीत झाला होता. तथापि, काही वर्षात ते दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष होतील, असे वाटले नव्हते. 

मंडेला 1994 ते 1999 अखेर फक्त पाच वर्षे अध्यक्ष होते. त्यांना हवे असते, तर ते जीवनाच्या अखेरपर्यंत अध्यक्ष राहू शकले असते, इतका नितांत आदर त्यांच्याविषयी जनतेत होता. तथापि, त्यांना सत्तेची हाव नव्हती. त्यामुळे अध्यक्षपदाची पाच वर्षे संपताच त्यांनी सत्तेला रामराम ठोकला. त्यांच्या इतका त्याग त्यानंतर आलेले अध्यक्ष थाबो एम्बेकी (1999- 2008) व जेकब झुमा (2009 ते14 फेब्रुवारी 2018) करण्यास तयार नव्हते. 2005 मध्ये थाबो एम्बेकी सत्तेत असताना झुमा यांनी त्यांच्याविरूद्ध एएनसीमध्ये स्वतः चा गट तयार करून एम्बेकींना सत्तेवरून खाली खेचण्याचे राजकारण केले. मंडेला हे दक्षिण आफ्रिकेमधील खोसा टोळीचे, तर झुमा हे झुलू या लढवैय्या टोळीचे. एम्बेकी हे ही खोसा टोळीचे. झुमा यांच्यानंतर एएनसीचे अध्यक्ष सिरिल रामफोसा हे दक्षिण आफ्रिकेचे नवे अध्यक्ष होतील. ते मंडेला यांचे सहकारी व ज्येष्ठ नेते आहेत. 

मंडेला सत्तेवर आले, तेव्हा त्यांच्या संमिश्र सरकारमध्ये आधीची सत्ताधारी श्‍वेतवर्णीय "नॅशनल पार्टी "व "इंकाथा फ्रीडम पार्टी "यांचा समावेश होता. प्रत्यक्षात इंकाथा पक्ष सरकारमध्ये असूनही विरोधात होता. 1994 नंतर झुमा काही काळ फारसे प्रकाशात नव्हते. परंतु, त्यांची कारकीर्द सर्वाधिक वादग्रस्त ठरली, ती सत्तेला चिकटून राहाण्याचा त्यांच्या हेकटपणामुळे. भारतात कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आला, तेव्हा त्याची प्रतिमा भ्रष्ट होण्यास बराच काळ लोटावा लागला. परंतु, आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसच्या नेत्यांची भ्रष्ट प्रतिमा जनतेपुढे आली, ती झुमा यांच्या कारकीर्दीत. मंडेला यांच्याबरोबर वसाहवाद संपुष्टात आणणारे नेते खऱ्या अर्थाने लढवैय्ये व निस्पृह होते. तरीही पत्नी विनी मंडेला हिने मंत्री असताना केलेला पदाचा गैरवापर पाहता, मंडेला यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले होते. मंडेला यांचे सरकारी मॅक महाराज, थाबो एम्बेकी, दल्ला ओमर, इसॉप पहाड, जय नायडू, ट्रेव्हर मॅन्युएल आदी नेत्यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ होती. त्यामुळे ते सरकार सर्वाधिक लोकप्रिय ठरले. त्यांचीच परंपरा एम्बेकी यांनी चालविली. पण, सत्ता हाती आल्यावर झुमा यांनी ती अधिक एकवटण्यास सुरूवात केली. त्यांचे चाळीस खोल्यांचा आलिशान बंगला, त्यासाठी लागलेले लाखो रॅन्डस्‌, सहाराणपूरचे उद्योगपती गुप्ता बंधू यांनी झुमा व त्यांच्या कुटुंबियांवर केलेली पैशाची उधळपट्टी व त्यातून त्यांना झालेला लाभ व त्यांनी केलेली सत्तेची खेळी, याच्या अनेक कहाण्या चव्हाट्यावर येवू लागल्या. 

गुप्तांनी जोहान्सबर्गमध्ये "द एज" हे इंग्रजी वर्तमानपत्र काढून झुमांची तळी उचलून धरली. निरनिराळ्या उद्योगासाठी लाखो रॅन्डस्‌ चा लाभ घेतला तो वेगळा. गुप्ता यांच्या घरात लग्न निघाले, तेव्हा उत्तर प्रदेशातून मंत्री आझम खान व अतिथींना घेऊन जाणारे चार्टर्ड विमान दक्षिण आफ्रिकेतील लष्करी विमावतळावर उतरले. तेव्हा, "विमानाला उरण्यास कुणी परवानगी दिली," असा एकच गहजब झाला. झुमा यांच्या चाळीस बायकांची (पत्नी) व त्यांनी केलेल्या बलात्काराची बातमी वर्षभर चविष्टपणे चर्चिली जात होती. तरूण नेते जुलियस मालेमा (एएनसीच्या युवक संघटनेचे अध्यक्ष) यांनी झुमा यांना जाहीर विरोध केल्याने त्यांना एएनसीमधून काढून टाकण्यात आले. त्यांनी नंतर "" इकॉनॉमिक फ्रीडम फायटर"" पक्ष स्थापन करून झुमा यांना आव्हान दिले. त्याचप्रमाणे, झुमा यांनी मूळचे भारतीय नेते व स्वच्छ प्रतिमा असलेले प्रवीण गोर्धन (अर्थमंत्री) यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करून पक्षांतर्गत रोष ओढवून घेतला. दरम्यान, झुमा हे एएनसीच्या प्रतिमेचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण असल्याची खात्री पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना पटली व त्यातूनच झुमा यांच्याविरोधातील वातावरण तापत गेले. तरीही ते सत्ता सोडण्यास तयार नव्हते. अखेर , एएनसीने अखेर त्यांना गेल्या आठवड्यात शेवटचा इशारा वजा तंबी दिली, की राजीनामा द्या अथवा संसदेत अविश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जा. त्यामुळे झुमा यांचे धाबे दणाणले व अखेर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यावर महाभियोग सुरू करावा, अशी मागणीही दक्षिण आफ्रिकेत होत आहे. परंतु, नियोजित अध्यक्ष सिरिल रामफोसा व त्यांचे ज्येष्ठ सहकारी काय निर्णय करतात, यावर झुमांचे भवितव्य अवलंबून असेल. दक्षिण आफ्रिका वसाहतवादातून मुक्त होऊन 24 वर्षे उलटली. तेथे नुकतीच कुठे लोकशाहीची पाळेमुळे रूजू लागली आहेत. परंतु, तिला धक्का लावणाऱ्या अनेक घटना गेल्या काही वर्षात घडल्या आहेत. झुमा यांच्या राजीनाम्याने एएनसीची ढासाळलेली प्रतिमा काही प्रमाणात सावरेल, एवढेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com