पत्रकारितेच्या जागतिक पाउलखुणा केव्हा दिसणार?

पत्रकारितेच्या जागतिक पाउलखुणा केव्हा दिसणार?
पत्रकारितेच्या जागतिक पाउलखुणा केव्हा दिसणार?

भारतीय पत्रकारितेच्या जागतिक पाऊलखुणा वाढण्याची नितांत गरज आहेत. त्यामुळे भारताचा आवाज सर्वत्र पोहोचेल. अलीकडे 'इंडोएशियन न्यूज सर्व्हिस' या वृत्तसंस्थेने गौरव शर्मा यांची बीजिंगमध्ये नेमणूक केली. चीनच्या जनसंपर्क शिष्टाई संस्थेमध्ये शर्मा व लोकसत्तेचे दिल्लीतील माजी प्रतिनिधी टेकचंद सोनवणे गेली दहा महिने प्रशिक्षण घेत होते. त्यानंतर झालेल्या शर्मा यांच्या नेमणुकीने भारतीय वृत्तप्रतिनिधींची चीनमधील उपस्थिती लक्षणीय ठरणार आहे. सध्या तेथे 'पीटीआय,' 'द हिंदुस्तान टाईम्स,' 'द टाईम्स ऑफ इंडिया,' 'द हिंदू,' 'इंडिया टुडे' यांचे पूर्णवेळ प्रतिनिधी आहेत. 'पीपल्स डेली,' 'चायना रेडिओ' मध्ये काम करणाऱ्या भारतीयांची संख्या डझनभर झाली आहे. हॉंगकॉंगसह चीनी वृत्तपत्रांचेही सात प्रतिनिधी भारतात आहेत. चीन आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. भारत त्यादृष्टीने वेगवान प्रगती करीत आहे. त्यामुळे एकमेकांची विदेशनीती, राजकारण, समाजकारण, अर्थकारण व संरक्षणात्मक घटामोडींबाबत दुतर्फा विलक्षण कुतुहल असून, अनेक बातम्या रोज आपल्या व चीनमधील दैनिकातून झळकत असतात.

बातम्या व हितसंबंधांच्या दृष्टीने भारतासाठी जगातील महत्त्वाचे देश होत अमेरिका, रशिया, चीन, पाकिस्तान, जपान, संयुक्त अरब अमिरात व आफ्रिका. त्यापैकी वॉशिंग्टन येथे 'पीटीआय,' 'द टाइम्स ऑफ इंडिया,' 'द हिंदुस्तान टाईम्स' व 'द हिंदू' यांचे प्रतिनिधी तेथे आहेत. अमेरिकन पत्रकारांची बऱ्यापैकी उपस्थिती भारतात आहे, ब्रिटनमध्येमध्येही भारतीय बातमीदार आहेत. तथापि, आपल्या वृत्तपत्रीय पाऊलखुणा महत्त्वाच्या देशांत उमटलेल्या नाहीत. उदा. युरोपीय संसदेचे व आर्थिक घडामोडींचे ब्रुसेल्स (बेल्जियम) हे सर्वात महत्त्वाचे केंद्र. तेथे जगातील निरनिराळ्या वृत्तपत्रांचे सुमारे आठशे प्रतिनिधी आहेत. पण भारतीय वृत्तपत्रे, दृकश्राव्य माध्यमांचा एकही प्रतिनिधी नाही. भारत व पाकिस्तानमध्ये परस्पर देशांचा एकही बातमीदार नाही. भविष्यकाळात ते नेमले जाण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे बातम्यांसाठी एपी, रॉयटर्स, एफपी आदी बहुराष्ट्रीय वृत्तसंस्थांवर अवलंबून राहावे लागते. दोन्ही देशातील पत्रकार प्रामुख्याने त्या त्या देशातील परराष्ट्र मंत्रालयावर बातम्यांसाठी अवलंबून असतात.

गेले काही वर्ष तिसऱ्या जगातील नेत्यांचा एक सूर ऐकू येतो, की आमच्या देशातील बातम्या मोडून तोडून दिल्या जातात. प्रगतीचे चित्र दिले जात नाही. लष्करी उठाव, टोळीयुद्ध, दुष्काऴ व कुपोषण, संघर्ष यांचे अतिरंजित चित्र जगापुढे सादर केले जाते. या देशांचे हितसंबंध राखणारी एकही सामूहिक वृत्तसंस्था नाही, की ज्यातून सकारात्मक चित्र दिसेल अथवा प्रसारित केले जाईल. एकत्र येऊन एक सशक्त वृत्तवाहिनी वा वृत्तसंस्था प्रस्थापित करण्याचे मनोधैर्य तेथील एकाही नेत्याने दाखविलेले नाही. आफ्रिका खंडाची लोकसंख्या एक अब्ज व भारताची लोकसंख्या सव्वा अब्ज. वर्षभरापूर्वी आफ्रिकेतील 54 देशांचे प्रमुख दिल्लीत आले होते. त्यावेळी 'आफ्रिका व भारत मिडिया फोरम'ची बैठक झाली. चर्चेपलीकडे काही झाले नाही. परिणामतः आफ्रिकेतील वृत्तपत्रांचा एकही प्रतिनिधी ना भारतात, वा भारताचा एकही वृत्तप्रतिनिधी आफ्रिकेत नाही. तीन वर्षांपूर्वी 'द हिंदू'ने अमन सेठी यांची आदिस अबाबा येथे नेमणूक केली होती. परंतु, 'द हिंदू' चे संपादक बदलल्याने ती पोस्टही रद्द करण्यात आली. आफ्रिकेत बातमीदार जात येत होते, ते दक्षिण आफिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या 27 वर्षांच्या कारावासानंतर वंशवादाची सांगता होऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णवर्णीयांचे पहिले सरकार 1994 मध्ये आले, तेव्हा व त्याआधी वर्षभरात झालेल्या घडामोडींदरम्यान.

जपानमध्ये एकही भारतीय बातमीदार नाही. उलट जपानच्या 'आसाही शिंबुन,' 'योमोरी शिंबुन' दैनिकांचे प्रतिनिधी दिल्लीत आहेत. रशियाबाबत बोलायचे झाल्यास तो महासत्ता (यूएसएसआर) असताना देखील भारताचे केवळ अडीच पत्रकार तेथे होते. 1979 मध्ये लिओनीड ब्रेझनेव्ह अध्यक्ष असताना 'पीटीआय' वृत्तसंस्था व दिल्लीतील 'पॅट्रिअट' या दैनिकाचे पूर्णवेळ दोन व 'यूएनआय'चा अर्धवेळ, असे अडीच पत्रकार होते. त्यावेळी मास्कोतील 'इझ्वेस्तिया,' 'प्रवदा' व 'त्रुद' या दैनिकांचे व 'टास,' 'नोव्होस्ती' या वृत्तसंस्थांचे मिळून पाच प्रतिनिधी होते. आजही मॉस्कोत दोन भारतीय प्रतिनिधी तेथे आहेत. परंतु, वृत्तपत्रात त्यांच्या बातम्या दिसत नाही. देव मुरारका व दादन उपाध्याय हे 'द टाईम्स ऑफ इंडिया' व 'द इंडियन एक्‍सप्रेस'मध्ये वार्तापत्र लिहीत. त्याला अनेक वर्षे उलटून गेली. व्लादिमीर पुतिन अध्यक्षपदी आल्यापासून रशियाच्या जागतिक सत्ता संतुलनात वाढणाऱ्या महत्त्वाकडे पाहता, ''किमान मोठ्या दैनिकांनी प्रतिनिधी पाठवावे,'' अशी आशा येथील रशियन दूतावासाचे अधिकारी व्यक्त करतात.

दरम्यान, काही महिन्यापूर्वी रशियाच्या 'नोवोस्ती' वृत्तसंस्थेने 'इंडोएशियन न्यूज' संस्थेबरोबर बातम्यांच्या देवाणघेवाणीचा करार केला. या व्यतिरिक्त 'इंडिया- रशिया रिपोर्टर' हे ऑनलाईन नियतकालिक रशियन दूतावासातर्फे चालविले जाते. त्यातून दुतर्फा संबंधांविषयी जाणकारांचे लेख प्रसिद्ध होतात. काही वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेशी दुवा साधणाऱ्या 'प्रेस्ना लॅटीना' क्‍युबन वृत्तसंस्थेचे कार्यालय दिल्लीत सुरू झाले होते. पण दीड दोन वर्षात ते गुंडाळण्यात आले. समाधानाची बाब म्हणजे, रिओ द जानिरिओतील दैनिकाच्या प्रतिनिधी श्रीमती कॅरोलिना ओम्स या गेल्या आठवड्यात दिल्लीत आल्या. दक्षिण अमेरिकेच्या भारतातील एकमेव पत्रकार होत. उलट, भारताचा एकही बातमीदार दक्षिण अमेरिकेत नाही.

खंत वाटते, ती याची की, 'सीएनएन, 'बीबीसी'वर अवंलून न राहाता त्यांच्याच तोडीचे स्वतंत्रपणे कतारने सुरू केलेले 'अल जझीरा' व दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला, क्‍युबा, इक्वेडोर, निकारागुआ, उरुग्वे व बोलिव्हिया या देशांनी एकत्र निधी उभारून सुरू केलेले 'टेलेसूर' व चीनचेट 'सीसीटीव्ही' प्रमाणे भारताला एकही आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी का सुरू करणे शक्‍य नाही? आपल्या देशात सुमारे 800 दृकश्राव्य वाहिन्या असून, त्यापैकी सुमारे 300 वाहिन्यातून केवळ बातम्या प्रसारित केल्या जातात. या अनुभवाचा व तंत्रज्ञान कौशल्याचा लाभ आपण केव्हा घेणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com