पॉकेट बुक्‍सचं विश्व (विजय तरवडे)

विजय तरवडे vijaytarawade@gmail.com
रविवार, 27 मे 2018

इंग्लिशमध्ये पुस्तकांच्या हार्ड कव्हर आवृत्त्या असतात आणि त्या महाग असतात. प्रवासात वगैरे वाचण्यासाठी वाचक त्याच पुस्तकांच्या पेपर बॅक किंवा पॉकेट बुक्‍स आकारातल्या स्वस्त आवृत्त्या घेतात. त्यांच्यासाठी वापरलेला कागद थोडा हलका असतो. मुखपृष्ठासाठीही पातळच कागद वापरलेला असतो. मराठीत पॉकेट बुक्‍स आवृत्त्यांचे काही प्रयोग झाले होते.

इंग्लिशमध्ये पुस्तकांच्या हार्ड कव्हर आवृत्त्या असतात आणि त्या महाग असतात. प्रवासात वगैरे वाचण्यासाठी वाचक त्याच पुस्तकांच्या पेपर बॅक किंवा पॉकेट बुक्‍स आकारातल्या स्वस्त आवृत्त्या घेतात. त्यांच्यासाठी वापरलेला कागद थोडा हलका असतो. मुखपृष्ठासाठीही पातळच कागद वापरलेला असतो. मराठीत पॉकेट बुक्‍स आवृत्त्यांचे काही प्रयोग झाले होते.

एका महिन्यात एक हजार ते तीन हजार प्रती नक्की खपणाऱ्या पुस्तकांचा बाबूराव अर्नाळकरांच्या पिढीपासून सुरू झालेला प्रवास सुहास शिरवळकरांच्या पिढीपर्यंत येऊन संपला. त्यानंतर दरमहा एक आवृत्ती खपण्याचा चमत्कार संपुष्टात आला. मात्र, याच काळात पुण्यातल्या "क्षीरसागर आणि कंपनी'नं प्रकाशित केलेल्या "हातिमताई' आणि "गुलबकावली' या दोन कादंबऱ्या (पानं 100 ते 125) प्रत्येकी तीन रुपयांत मिळत. बालसाहित्यात यांची गणना होत असली तरी प्रौढांनाही दचकवणारा भलताच स्फोटक मजकूर दोन्ही पुस्तकांत होता.

पुस्तकांच्या किमती स्वस्त ठेवून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणारे अनेक प्रकाशक परवापरवापर्यंत दिसून येत होते. सन 1977 मध्ये माझ्या एका कथासंग्रहाची जुळणी सुरू असताना "हंस' मासिकाच्या कचेरीत राम कोलारकर यांची ओळख झाली. गव्हाळ वर्ण, मध्यमपेक्षा थोडी कमी उंची, कृश बांधा आणि कम्युनिस्ट नेत्यांप्रमाणे राखलेली दाढी. कोलारकर अतिशय मृदू आवाजात बोलत. ओळख झाल्यावर डेक्कन जिमखान्यावरच्या एका हॉटेलात आमच्या काही भेटी झाल्या. कोलारकरांनी आचार्य अत्रे, ना. सी. फडके वगैरे मातब्बर लेखकांची पुस्तकं पॉकेट बुक स्वरूपात प्रकाशित केली होती आणि त्यांच्या किमती प्रत्येकी फक्त एक रुपया ठेवल्या होत्या. पृष्ठसंख्येचा विचार केला तर त्या दिवसांत आठ ते दहा रुपयांना मिळणारा मजकूर ते एक रुपयात देत होते.

कोलारकरांचं कथाप्रकारावर खास प्रेम होते. दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या कथांतून ते त्यांना आवडलेल्या कथांची निवड करून "सर्वोत्कृष्ट मराठी कथा' शीर्षकाचा एकेक खंड प्रकाशित करत. ओळखीच्या वाचकांना तीन उत्कृष्ट कथांची पसंती विचारत. पुस्तकाच्या शेवटी ती पसंती प्रकाशित करत. पुस्तकवितरणाचा अनुभव पाठीशी असलेल्या भारत बुक सर्व्हिसच्या कृपाल देशपांडे यांनी गेल्या दशकात अनंत मनोहर, आशा कर्दळे, नारायण धारप, विजय देवधर, विजया वाड, डॉ. सुधीर राशिंगकर, सुहास शिरवळकर आणि माझी काही पुस्तकं अतिशय स्वस्त किमतीत देण्याचा प्रयत्न केला. सरासरी दीडशे पानांच्या पुस्तकांच्या किमती 40 ते 50 रुपये ठेवल्या होत्या. तोच प्रयत्न बहुधा शेवटचा. "पुस्तकं महाग' अशी तक्रार मराठी माणूस करतो; पण स्वस्त पुस्तकंही तो विकत घेत नाही! ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबऱ्या मात्र अनेक वाचकांच्या घरात विकत घेऊन ठेवलेल्या आढळतात.

मराठी अस्मितेचं ब्रीद सांगणाऱ्या काही नेत्यांनी वाचनसंस्कृतीप्रीत्यर्थ 2009 च्या सुमारास आणखी एक प्रयोग केला होता. त्यांनी त्यांच्या परिचयातल्या पुस्तकवितरकांच्या सल्ल्यानुसार, शे-सव्वाशे मराठी पुस्तकांच्या याद्या छापून वॉर्डमध्ये फिरवल्या. घरटी एक पुस्तक मोफत देऊ केलं. नागरिकांनी प्रचंड पृष्ठसंख्येच्या ठराविक ऐतिहासिक व पौराणिक कादंबऱ्या किंवा स्वयंपाकाची आणि आरोग्यविषयक सल्ले देणारी पुस्तकं घेतली. कविता, कथा, ललित लेख आदींची पुस्तकं कुणी घेतली नाहीत. पॉकेट बुकच्या आकारात विकत घेऊन वाचलेले दोन स्वस्त अनुवाद आठवतात. "ओमेन' या भयकथेचा अनुवाद अवघ्या तीन रुपयांत विकत मिळत असे. त्यावर अनुवादकाचं नावच नव्हतं. मात्र, काही दिवसांनी घनश्‍याम भिंगे यांनी त्याच पुस्तकाचा केलेला अनुवाद थोड्या जास्त किमतीत उपलब्ध झाला. नोबेल पुरस्कार मिळालेल्या "कागी' या कादंबरीचा माधव मनोहर यांनी केलेला अनुवादही (किल्ली) असाच अतिशय कमी किमतीत उपलब्ध होता. पॉकेट बुक्‍सचा एक किस्सा सांगतो. सन 1990 च्या सुमारास इंटरनेट फारसं प्रचलित नव्हतं. एखादी माहिती नेटवर सर्च करणं सर्वसामान्य लोकांना ठाऊक नव्हतं. त्या काळात गाजणारी एक बेस्टसेलर कादंबरी मराठीत अवतरली. अवतरली म्हणजे काय, तर दोन लेखकांनी केलेल्या आणि दोन प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या आवृत्त्यांच्या जाहिराती वर्तमानपत्रांत झळकल्या. दोन्ही अनुवादक आपापल्या वाचकवर्गात प्रसिद्ध होते. तरुण अनुवादकानं स्वतःच कादंबरी प्रकाशित केली होती. शोधपत्रकारितेत पारंगत असलेल्या एका पत्रकारानं या तरुण अनुवादक-कम-प्रकाशकाची प्रदीर्घ मुलाखत घेऊन ती प्रकाशित केली. मुलाखतीचं वर्णन तर रोमहर्षक होतं. मात्र, एकच कादंबरीचा अनुवाद करण्याची परवानगी दोघांना कशी मिळाली, या कळीच्या मुद्द्याचं वर्णन मुलाखतीच्या शेवटच्या भागात भलतंच रंगतदार शैलीत केलेलं होतं. तो प्रश्न विचारल्यावर त्यांनी टेबलच्या खणातून करारपत्र काढून माझ्या समोर ठेवलं आणि सर्व खुलासा झाला. प्रकाशन संस्थेनं ज्येष्ठ अनुवादकांना तो अनुवाद हार्ड कव्हर आकारात छापायला परवानगी दिली होती आणि माझ्या तरुण मित्राला पेपर बॅक आवृत्तीसाठी अनुवाद करून प्रकाशित करण्याची परवानगी दिली होती! आता या दोन्ही प्रकाशन संस्थांमधली एक प्रकाशनसंस्था बंद पडून अनेक वर्षं झाली आहेत. इंटरनेटवर शोध घेऊन सर्व गोष्टींची शहानिशा करणं शक्‍य झालं आहे; त्यामुळं या सगळ्याची मौज वाटते.

Web Title: vijay tarawade write article in saptarang