चाहत्यांचे दोन किस्से (विजय तरवडे)

vijay tarawade
vijay tarawade

जन्माला आलेला माणूस नशिबानं किंवा कर्तृत्वानं कितीही श्रीमंत झाला तरी मरताना त्याला सगळं काही इथंच सोडून जायचं असतं. ही जाणीव त्याला उतारवयात केव्हातरी होते आणि हळूहळू आसक्ती सुटत जाते. काही लोक मरणापूर्वी इच्छापत्र वगैरे करून सगळी "जायदाद' प्रिय व्यक्तींच्या नावे ठेवून जातात. काही व्यक्ती आपल्या वारसांसाठी पुरेसं ठेवून उरलेलं संचित समाजासाठीदेखील ठेवून जातात. एक ज्येष्ठ लेखक-संपादक गर्भश्रीमंत होते. छानछोकीत जगणं शक्‍य असूनही हयातभर निरिच्छ वृत्तीनं जगले. लेखन-वाचनाखेरीज त्यांना कोणतंही - अगदी चहाचंही- व्यसन नव्हतं. आयुष्यभर त्यांनी विविध आंदोलनांत भाग घेतला. उदंड वैचारिक लेखन केलं. त्यातही त्यांना जाणकारांमध्ये लोकप्रियता लाभली; पण त्या पुण्याईचा वापर करून राजकारणात शिरण्याचा किंवा मोठं डबोलं मिळवण्याचा त्यांनी विचारही केला नाही. अमाप पैसा कमावणं त्यांना सहज शक्‍य असूनही त्यांनी तसं केलं नाही. "शेवटचा दिस' नजरेच्या टप्प्यात आला तेव्हा त्यांनी भारतातलं घर एका सेवाभावी संस्थेला दान दिलं आणि उरलेले दिवस युरोपात एकुलत्या मुलासमवेत काढण्याचा निर्णय घेतला. निघण्याची तारीख वर्तमानपत्रात आलेली नव्हती. त्या काळ सोशल मीडियाचाच काय, मोबाईल फोनचादेखील नव्हता. तरी निघण्याच्या आदल्या दिवशी त्यांना भेटायला अनेकजण आले. त्यांनी ज्या संस्थेला राहतं घर दिलं होतं, त्या संस्थेची माणसं आली. काही जण मुक्कामाला थांबले. सकाळी बंगल्यासमोर तोबा गर्दी झाली. बंगल्यात जाऊन लोक त्यांना भेटत होते. कुणी हस्तांदोलन करून, कुणी आलिंगन देऊन, तर कुणी पाया पडून आणि अनेक जण डोळे पुसत त्यांचा निरोप घेत होते. कार्यकर्ते आल्या-गेल्या प्रत्येकाला चहा-बिस्किटं देत होते. वातावरण अगदी दुःखाचं, उदास असं होतं.

सरतेशेवटी निघण्याची घटिका आली. त्यांना विमानतळावर नेण्यासाठी एक चाहता कार घेऊन आला. ते जिना उतरून खाली अंगणात आले व फाटकाबाहेर पडले. तेवढ्यात एक अजब प्रकार घडला. समोरच्या किराणा दुकानाचा मालक तीरासारखा धावत आला. गर्दीतून वाट काढत त्यांच्या जवळ पोचला आणि त्यांचा हात हातात घेत विचारलं ः ""निघालात का''?
""हो''.
""परत कधी येणार''?
""आता परत नाही. तिथंच''.
दुकानदार क्षणभर विचारमग्न झाला आणि त्यानं विनंती केलीः ""कालपासून तुमच्या नावावर बिस्किटांचे आणि टोस्टचे पुडे मागवले आहेत. कृपया त्यांचे पैसे द्यायला सांगा''.
त्यांनी आसपास पाहिलं. त्यांची पिशवी घेऊन एक कार्यकर्ती पुढं आली. त्यांनी पैसे देण्यासाठी पिशवीत हात घातल्यावर दोन कार्यकर्ते पुढं आले आणि त्यांनी बिस्किटांचे-टोस्टचे पैसे चुकते केले.
""उधारीवर काही आणायला नको होतं,'' सौम्य शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना फटकारलं आणि गाडीत बसले. स्वच्छ शुभ्र पायजमा आणि सदऱ्यातलं झालेलं त्यांचं पाठमोरं दर्शन - तेच शेवटचं.
मात्र, युरोपला गेल्यानंतरदेखील मराठीत आणि इंग्लिशमध्ये केलेल्या दर्जेदार लेखनातून काही वर्षं ते भेटत राहिले.
* * *

एखाद्या लेखकाची सुरवातीची कलाकृती पसंत पडली की वाचक ती डोक्‍यावर घेतात. मग लेखकाकडून पुनःपुन्हा त्याच साच्यातल्या कलाकृतीची अपेक्षा धरतात. लेखक त्या साच्यात अडकतो किंवा त्या साच्यातल्या लेखनाचा "मिस्टर परफेक्‍शनिस्ट' बनतो. त्यानं काही वेगळं लिहिलं तर ते कितीही चांगलं असलं तरी स्वीकारलं जात नाही. नारायण धारप यांचं नाव "भयकथाकार' म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. त्यांनी निर्मिलेली "समर्थ', "अप्पा' आणि "भगत' ही पात्रं अजरामर आहेतच. शिवाय त्यांच्या कथांमधले पुनःपुन्हा भेटणारे "चंद्रमणी', "खानविलकर', "मार्तंड', "नाडगौडा' हेही वाचकांच्या मनात घर करून आहेत; पण धारपांनी सुंदर विज्ञानकथाही लिहिल्या आहेत. काही आंग्ल भयकथांचे स्वैर अनुवाद केले आहेत. वाचक ते स्वीकारतात; पण त्यांचं विशेष स्वागत करत नाहीत. भयकथा वाचण्याचा मूड असेल त्या दिवशी वाचनालयातून धारपांचं दिसेल ते पुस्तक आणण्याची मला सवय होती. ती एका प्रसंगानं मोडली. मी प्रवासाला एकटाच जाणार होतो. चार तासांचा प्रवास होता आणि आरक्षण केल्यामुळं खिडकीजवळचं आसन मिळालं होतं. म्हणून निघण्याच्या दिवशी वाचनालयात जाऊन धारपांचं पुस्तक मागितलं. सेविकेनं एक गठ्ठा समोर ठेवला. त्यातलं जे पुस्तक पूर्वी न वाचलेलं दिसलं ते पुस्तक उचललं.
गाडी सुटल्यावर वाचायला सुरवात केली. नेहमीच्या सराईत शैलीत धारपांनी नायकाच्या बायकोचा मृत्यू रंगवला होता. दोलायमान स्थितीत नायक पुन्हा मुली बघायला लागतो. पसंत केलेली मुलगी त्याच्या घरी आल्यावर दिवंगत बायकोचा फोटो बघते. अंतर्मुख होते. श्वास रोखून मी वाचत राहिलो. बघता बघता प्रवास आणि कादंबरी संपत आली; पण कादंबरीत काहीच घडलं नाही. नायकाचं आणि त्या मुलीचं लग्न झालं, संसार सुरळीतपणे सुरू झाला आणि कादंबरी संपली.
धारपांनी एक ललितरम्य प्रेमकथा रचली होती; पण त्यात भूत नव्हतं; त्यामुळं खवळलेल्या त्यांच्या चाहत्यांनी कादंबरीच्या शेवटच्या पानावर कडक आणि नको त्या भाषेत निषेधपर शेरे लिहून ठेवले होते. तेव्हापासून धारपांची कादंबरी घेताना मी आधी ती चाळून बघतो.
* * *

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com