जगण्याचं "संदेशीकरण' (विश्राम ढोले)

vishram dhole write article in saptarang
vishram dhole write article in saptarang

भारतीयांकडून पाठवल्या जाणाऱ्या "गुड मॉर्निंग' संदेशांच्या अतिरेकामुळं जगभरातल्या स्मार्ट फोन्सची वाहतूक मंदावते, असं एक निरीक्षण काही दिवसांपूर्वी समोर आलं आहे. "गुड मॉर्निंग'पासून "गुड नाइट'पर्यंत अनेक शुभेच्छा संदेशांचा महाप्रचंड कारखानाच सोशल मीडियावर सतत असतो, असा सगळ्यांनाच अनुभव आहे. असे संदेश पाठवण्याची आस नेमकी कशामुळं लागते? या संदेशांमागची आर्थिकता हे त्यामागचं कारण आहे का? त्याचे सामाजिक-सांस्कृतिक आयाम काय? "डिजिटल वया'तल्या भेदामुळं असं होतंय, की त्यांचा संबंध थेट नात्यांशी आहे?... या सर्व प्रश्‍नांचा वेध.

"गुड मॉर्निंग', "शुभ प्रभात', "नमस्कार', "रामराम' वगैरे खरं तर चांगले शब्द. संभाषणाची सुरवात करून देणारे. दुसऱ्यांप्रती शुभचिंतन करणारे. त्यांचा कोणाला त्रास का व्हावा? पण तुम्ही "गूगल'ला विचाराल तर त्यांना तो होतोय. इतकंच कशाला, व्हॉटऍपवर असणाऱ्या बऱ्याच जणांनाही तो होतोय. दोघांचंही कारण एकच आहे- शुभचिंतन असलं, तरी या "गुड मॉर्निंग' संदेशांचा अतिरेक होतोय. काही दिवसांपूर्वी "गूगल'च्या "हवाल्या'नं त्यासंबंधी बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. भारतातल्या सकाळी साडेपाच-सहा ते आठ-साडेआठ या वेळेदरम्यान जगभरातल्या स्मार्ट फोनवरची वाहतूक का मंदावते, या प्रश्नाचं उत्तर शोधताना गूगलला हे कारण सापडलं. दररोज सकाळी या दोनेक तासांच्या काळात दररोज लाखो भारतीय आपले नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिचितांना हे "गुड मॉर्निंग' संदेश पाठवतात आणि त्यातून हा मोबाईलवरचा "ट्रॅफिक जॅम' उद्‌भवतो, असं गूगलचं म्हणणं आहे. (... आणि नंतर थोड्याच वेळात हा जॅम शहरांमधल्या रस्त्यांवर प्रकटतो, हा आपला अनुभव आहे).

मुळात गूगलला या प्रश्नात पडायचं कारण म्हणजे त्यांची अँड्रॉईड प्रणाली. आज भारतातले जवळजवळ ऐंशी टक्के स्मार्ट फोन या अँड्रॉईडवर चालतात. त्याही दृष्टीनं भारत ही गूगलची फार मोठी बाजारपेठ. ही बाजारपेठ सकाळच्या वेळेस का सुस्तावते, हा प्रश्न म्हणूनच त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा होता. त्याचं उत्तर शोधण्याची एक गुरूकिल्लीही त्यांच्याकडंच होती. गेल्या पाच वर्षांमध्ये गूगल सर्च इंजिनवरून गुड मॉर्निंग इमेजेस शोधण्याचं प्रमाण तब्बल दहापटीनं वाढल्याचं त्यांना दिसून आलं. त्यामुळं अँड्रॉईडवरच्या आणि सर्च इंजिनवरच्या महामाहितीची सांगड घालत गूगलने सकाळी मोबाईलवरची इंटरनेट वाहतूक का मंदावते, स्मार्ट फोन का "गारठतात' याचं कारण शोधून काढलं.

आता व्यक्ती म्हणून इतकी तांत्रिक माहिती आपल्याकडे नसली, तरी व्हॉट्‌सऍपधारी बहुतेक व्यक्तींना हा अनुभव मात्र नक्कीच आहे. सकाळी उठण्यापूर्वी आणि उठल्यानंतर काही काळ सतत व्हॉट्‌सऍपची नोटिफिकेशन्स सतत वाजत तरी राहतात किंवा दिसत तरी राहतात. त्यातले आपल्या व्यक्तिगत थेट कामाचे संदेश तसे कमीच. बहुतेक संदेश आपल्याला "गुड मॉर्निंग', "रामराम', "नमस्कार' वगैरे करणारे. सूर्योदय, पान-फुलं, पक्षी, लहान मुलं, धार्मिक स्थळं, गणपतीपासून ते स्वामी समर्थांपर्यंत अनेक देव-देवता व संत-महात्मे यांची चित्रे आणि आयुष्य, अध्यात्म, आनंद, कर्तव्य, नातेसंबंध वगैरे विषयावर लिहिलेले शब्दबंबाळ सुविचार यांचं मिश्रण म्हणजे हे "गुड मॉर्निंग'छाप संदेश. गुळगुळीत, गुळमुळीत, सबगोलंकार, प्रेडिक्‍टेबल वगैरे. इंग्रजी शब्द वापरायचा तर- क्‍लिशे! वाचला न वाचला तरी फार फरक न पडणारे, आपल्याला आले असले तरी फक्त आपल्यासाठी नसलेले संदेश. असे भरपूर संदेश दररोज आपल्या स्मार्ट फोनवर येऊन पडत असतील, तर त्याचा त्रास होणं साहजिक आहे. एक तर त्यांची नोटिफिकेशन्स उगाच आपल्याला खुणावत राहतात. दुसरं म्हणजे या गर्दीत एखाद्या कामाच्या संदेशाकडं दुर्लक्ष होण्याचा धोका वाढतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे फोनमधली मेमरी तुंबत जाते. मग एक दिवस शोधूनशोधून हे संदेश डिलिट करण्याची मोहीम हाती घ्यावी लागते. ते कष्ट वेगळे. दुसऱ्या दिवशी पुन्हा "गुड मॉर्निंग'चा रतीब सुरू. मध्यंतरी एका मित्रानं गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच व्हॉट्‌सऍपवरच्या आपल्या सर्व मित्रांना मेसेजेस करून उद्या "मांगल्याची गुढी, पावित्र्याचे तोरण'छाप संदेश पाठवले, तर ताबडतोब ब्लॉक केलं जाईल, अशी जाहीर धमकीच दिली होती. इतकं करूनही दुसऱ्या दिवशी त्याच्या व्हॉट्‌सऍपवर तीस-चाळीस गुढ्या उभ्या राहिल्याच होत्या.

शुभेच्छांचा महाप्रचंड "कारखाना'
तेव्हा "गुड मॉर्निंग' असो, "गुड नाइट' असो, सणासुदीचे मंगलमय संदेश असोत, की अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छा.. स्मार्ट फोन बाळगणाऱ्या आणि सोशल मीडियावर असणाऱ्या बहुतेकांसाठी शुभेच्छा संदेशांचा हा पूर आता नेहमीच्या अनुभवाचा भाग झाला आहे. या वर्षाच्या स्वागताला भारतीयांनी व्हॉटस्‌ऍपवरून तब्बल वीस अब्ज संदेशांची देवाणघेवाण केली होती. इतर कोणत्याही देशानं इतक्‍या उत्साहानं 2018चं स्वागत केलं नव्हतं. शुभेच्छा संदेशाच्या देवघेवीतला हा जागतिक विक्रम मानला जातो. तसं पाहिलं, तर शुभेच्छांचा एक महाप्रचंड कारखानाच सोशल मीडियावर सतत सुरू असतो.

शुभेच्छा संदेश पाठवणं ही वरकरणी तशी साधी बाब वाटेल. संदेशातल्या आशयाच्या पातळीवर ती तशी आहेही. कृतीच्या पातळीवर ही तशी औपचारिक बाब आहे. कदाचित "इनोसंट'ही. मात्र, या शुभेच्छा महापुराच्या तळाशी असलेला सामाजिक-सांस्कृतिक वास्तवाचा प्रवाह मात्र किरकोळ, साधा किंवा औपचारिक असा नाही. एका मोठ्या स्थित्यंतराचं ते प्रतीक आहे; पण ते समजून घेण्यासाठी लोक इतक्‍या प्रमाणावर असे शुभेच्छा संदेश का पाठवत आहेत, हा प्रश्न आधी विचारला पाहिजे.
त्याचं एक सोपं आणि व्यावहारिक उत्तर सापडतं या संदेशांच्या आर्थिकतेत. सोप्या शब्दात सांगायचं, तर असे संदेश तयार करणं आणि पाठवणं अतिशय कमी कष्टाचं आणि खर्चाचं आहे. बहुतेक वेळा तर आपण हे संदेश स्वतःहून तयारही करत नाही. "इधरका माल उधर' अशा पद्धतीनं आपण ते फक्त फॉरवर्ड करतो आणि स्वतः तयार करायचं ठरवलं, तरी ते फार कष्टाचं काम नाही. चित्रांसाठी एक गूगल सर्च किंवा आपल्याच फोटो गॅलरीतला एखादा फोटो, एखादा रेडिमेड सुविचार किंवा शुभेच्छा आणि एखाद्या ऍपच्या साह्यानं या दोन्हीवर थोडीफार प्रक्रिया केली की झाला संदेश तयार. होलसेलमध्ये असे संदेश पाठवायचे असलं, तरी ते जवळजवळ चकटफूच पडतं. म्हणूनच स्वस्ताई आणि सुलभता यामुळं हे प्रमाण प्रचंड वाढलं, हे सहज मान्य होण्यासारखं आहे.

सामाजिक-सांस्कृतिक आयाम
मात्र, वास्तव तेवढ्यापुरतंच मर्यादित नाही. त्याला सामाजिक-सांस्कृतिक आयामही आहेत. वरकरणी पाहता अशा "गुड मार्निंग'वजा शुभेच्छांचे व्यावहारिक उपयोग काय, असा प्रश्न पडू शकतो; पण संवादव्यवहारांमध्ये अशा उपचारांचं अतिशय महत्त्व असतं. "नमस्कार', "रामराम', "शुभ प्रभात', "कसं काय.. बरं आहे ना', "सलाम वालेकूम', "हाऊ आर यू' यांसारखे शब्द किंवा वाक्‍यं ही त्यातल्या अर्थाच्या दृष्टीनं महत्त्वाची नसतातच. कोणी आपल्याला "कसं काय.. बरं चाललंय ना?' अस विचारलं तर आपण "नाही हो... घरी भांडण झालंय' किंवा "सध्या बद्धकोष्ठानं बेजार आहे' असं काही (खरं असलं तरी) उत्तर देत नाही. उलट आपण "मस्त', "छान', "बढिया', "फाइन' वगैरे म्हणतो. ना विचारणाऱ्यांच्या दृष्टीनं तो प्रश्न असतो, ना उत्तर देणाऱ्याच्या दृष्टीनं. ती दोघांनी एकमेकांच्या अस्तित्वाची आणि नात्याची संवादाच्या पातळीवर घेतलेली दखल असते. एकमेकांकडं बघून ओळखीचं स्मित देणं, हात उंचावणं ही त्याचीच उदाहरणं. फक्त निःशब्द पातळीवर. "फेसबुक मेसेंजर'वर तर "वेव्ह हॅंड' ही चक्क रेडीमेड सोयच आहे. माहिती, मत किंवा भावना व्यक्त करणं हे अशा संवादाचं उद्दिष्ट नसतं. संवाद सुरू करणं, आपलं अस्तित्व दाखवणं किंवा दुसऱ्याच्या अस्तित्वाची दखल घेणं आणि मुख्य म्हणजे संवादातून प्रकटणाऱ्या नात्याला अधोरेखित करणं इतकाच अशा संवादव्यवहाराचा उद्देश असतो. सोपी उपमा वापरायची, तर असं संवाद म्हणजे "नात्यांचं वंगण.' ते नात्याला ऊर्जा देत नसतीलही कदाचित; पण नात्यांच्या आणि संवादाच्या प्रवासातलं घर्षण कमी होण्यासाठी त्यांची निदान सुरवातीला तरी गरज असते. हे असे औपचारिक संवाद झाल्यानं हाती काही लागतही नसेल कदाचित; पण ते झालं नाही तर मात्र बेदखल झाल्याची, दुर्लक्षित झाल्याची भावना निर्माण होण्याची भीती असते. म्हणूनच वर्षानुवर्षांपासून जगभरात सर्वत्र संवादव्यवहारातली ही औपचारिकता नेहमी पाळली जाते. सोशल मीडियावरचे "गुड मॉर्निंग'चे हे संदेश त्याच आदिम संवादप्रक्रियेचं नवं रूप.

भारतातच इतकी आस का?
... पण मग आपल्याकडंच ते इतक्‍या मोठ्या प्रमाणावर का व्हावं? पुन्हा त्याचं एक साधं आणि व्यावहारिक उत्तर आहे. आपल्याकडं मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या कोट्यवधींची म्हणून अशा संदेशांची संख्याही साहजिकच जास्त. बरोबर असलं, तरी हेही उत्तर पुरेसं नाही. मुळात आपल्याला असा औपचारिक संवादप्रवाह सतत सुरू ठेवण्याची इतकी गरज का वाटावी, हा प्रश्नही विचारावा लागतो. त्याचं उत्तर आपल्या समूहवादी (कलेक्‍टिव्ह) संस्कृतीत शोधता येतं. अशा संस्कृतींमध्ये व्यक्तीचं एक खोलवरचं मूल्यमापन तिनं जपलेल्या नात्यांमधून होत असते. नाती निर्माण करणं, वाढवणं आणि (प्रसंगी स्वतःची इच्छा आणि आनंद बाजूला ठेवूनही) ती टिकवणं याचं दडपण समूहवादी संस्कृतीतल्या व्यक्तींवर जास्तच असतं. अर्थात त्याच्या बदल्यात अशी संस्कृती व्यक्तीला ओळख, स्वीकृती, सुरक्षा, प्रतिष्ठा असे काही परतावेही देते. त्यामुळं नाती जपणारे संवाद सतत करत राहणं, किंवा संवादातून नातं सतत अधोरेखित करत राहणं ही अशा संस्कृतीतल्या व्यक्तींची गरजही असते. सकाळ, सण, समारंभ, सत्कार, सालगिरह वगैरे तर ती भागवण्याचं सोपं निमित्त. मोबाईल आणि सोशल मीडियाने ते फार अधिक सोपं आणि सोयीचं करून टाकलंय. अशा समूहवादी संस्कृतीमध्ये सार्वजनिक जीवनात बोलघेवडेपणाही तुलनेनं जास्तच असतो. अनोळखी किंवा अल्पओळखी व्यक्तींशीही संवाद साधण्याची बऱ्यापैकी मोकळीक अशा संस्कृतीत मिळत असते. त्यामुळं मग संवादाचं प्रमाणही वाढतं आणि परीघही. अर्थातच "गुड मॉर्निंग'छाप संदेशांचंही प्रमाण आणि परीघ वाढतो.

"डिजिटल वया'चा वर्गभेद
शुभेच्छांच्या या सांस्कृतिक व्यवहाराकडं अजून जरा बारकाईनं पाहिलं, तर तिथं एक सूक्ष्म वर्गभेद दिसतो. हा वर्गभेद अर्थातच जातपात, धर्म, शिक्षण किंवा आर्थिक परिस्थिती यांवर आधारीत नाही. तो वयावर, खरं तर "डिजिटल वया'वर अवलंबून आहे. म्हणजे असं, की शुभेच्छा-शुभेच्छा खेळणाऱ्यांमध्ये शहरी-निमशहरी तरुण पिढी तितक्‍या उत्साहानं सहभागी झालेली नाही. तिथं दांडग्या उत्साहानं सहभागी झाली आहे ती त्यांच्या आई-वडिलांची किंवा त्याआसपासची पिढी. हे नवं शतक सुरू होण्याआधी ज्यांची निदान तिशी तरी उलटली आहे अशी पिढी. या पिढीच्या खोलवरच्या धारणांवर जागतिकीकरणाच्या आधीचे, वस्तूंच्या दुर्भिक्षांचे आणि नात्यांच्या सुकाळाचे संस्कार झालेले. एका अर्थानं त्यांचं बालपण आणि तारुण्याचं पहिलं दशक मोबाईलच्या, संगणकाच्या आणि इंटरनेटच्या आधी गेलेलं. आता ते इंटरनेटवर आले ते "स्थलांतरीत' म्हणून. मात्र, नव्वदीच्या आसपास किंवा नंतर जन्माला आलेल्या पिढीसाठी केबल टीव्ही, रिमोट, मोबाईल, संगणक, व्हिडिओ गेम, हॉलिवूडचे चित्रपट, पीसी, लॅपटॉप, मोबाईल, स्मार्ट फोन आणि सोशल मीडिया म्हणजे बालपणापासूनचे सवंगडी. त्या अर्थानं ते "डिजिटल प्रदेशा'तले एतद्देशीय. "डिजिटल मायग्रंट' अशी पालकांची पिढी आणि "डिजिटल नेटिव' अशी आजच्या तरुणांची पिढी यांच्यात काही खूप खोलवरचे फरक आहेत. शुभेच्छांच्या या संवादखेळाकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा त्यातलाच एक. "डिजिटल नेटिवां'ना हे असं सकाळी उठून शुभेच्छा-शुभेच्छा खेळणं किंवा एकूणच अशा औपचारिकता पाळणं, त्यासाठी गुळगुळीत-गुलछबू-गुळमुळीत संदेश वगैरे तयार करणं "चीप', "क्‍लिशेड' किंवा "क्रीपी' वाटतं. एकूणच अशा औपचारिक भक्तिभावाचं त्यांना वावडंच. त्यांचा भर खिल्ली, उपहास, श्‍लेष आणि वक्रोक्तीनं भरलेल्या "मीम्स' आणि "ट्रोल'वर किंवा "कूल मेसेजेस'वर. असे औपचारिक नातेसंबंध बनवणं, वाढवणं आणि टिकवणं याबाबत ते थोडे उदासीन किंवा थंड. म्हणूनच जुन्या सांस्कृतिक- आणि तांत्रिक वातावरणात वाढलेल्या आणि तिथले संस्कार घेऊन इंटरनेटवर स्थलांतरीत झालेल्या पालकांच्या पिढीशी त्यांची संवादाची आणि संस्काराची नाळ काही फार जुळत नाही. घरोघरी त्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. जिज्ञासू किंवा "नॉट सो' जिज्ञासूंनीही त्यासाठी "टीव्हीएफ' या वेब सिरीजकर्त्यांनी सादर केलेली "टेक कॉन्व्हर्सेशन्स वुईथ डॅड' ही मालिका अवश्‍य बघावी.

नेटवर्कच्या आत-बाहेर...
मोबाईल इंटरनेटवरच्या या शुभेच्छुकांच्या महापुरामागं एक तांत्रिक किंवा गणिती आयामही आहे. इंटरनेट आणि मोबाईलचं जग म्हणजे एका अर्थानं नेटवर्कचं जग. हे नेटवर्क जसजसं वाढत जातं, तसतसं त्याचं वर्तन गुंतागुंतीचं होत जातं. ही गुंतागुंत समजून घेण्याच्या प्रयत्नात संशोधकांनी नेटवर्कच्या प्रवृत्ती दर्शवणारे सात नियम शोधले आहेत. त्यातला एक नियम असं सांगतो, की व्यक्तींच्या प्रत्यक्ष जगात ते वास्तव किंवा मूल्य असतं ते नेटवर्कवर अनेकपटीनं मोठं होऊन समोर येतं. याला ते नेटवर्कची कलवर्धन (ट्रेंड अँप्लिफिकेशन) प्रवृत्ती म्हणतात. दुसरा एक नियम आहे तो नेटवर्कबाह्य घटकांवर टाकत असलेल्या दबावाच्या प्रवृत्तीसंबंधी. म्हणजे असं, की नेटवर्क जसजसं वाढत जातं तसतसा नेटवर्कच्या बाहेर असलेल्या घटकांवर नेटवर्कमध्ये सहभागी होण्याबाबत दबाव वेगानं वाढत जातो. रस्त्यांवरच्या मोर्चांमध्ये ज्याप्रमाणं मोर्चेकरी अनेक वेळा "अरे बघता काय सामील व्हा' अशा घोषणा देतात त्यासारखंच हे. इथं अर्थातच सामील होण्याचा दबाव जास्त असतो. त्यातून मग 20-25 टक्के आणि 60-65 टक्के गर्दी अशा दोन उड्डाणबिंदूवर (टिपिंग पॉइंट) नेटवर्कबाह्य घटकांवर दबाव फारच वाढतो आणि ते या मोर्चात वेगानं आणि मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. याला ते "नेटवर्कबाह्यते'चा (नेटवर्क एक्‍स्टर्नेलिटी) नियम असं म्हणतात. शुभेच्छा-संदेशांचं पेव फुटणं इथपासून ते डोळा मारणाऱ्या प्रिया वॉरियरचा किंवा "ये बिक गयी है गोरमिन्ट' म्हणणाऱ्या आजीचा किंवा "ढिनचॅक' पूजाचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होण्यापर्यंतच्या अनेक नेटवर्क घटनांची तांत्रिक कारणमीमांसा या नियमांच्या आधारे करता येते. थोडक्‍यात काय तर नेटवर्कवर असताना आपण फक्त एक शुद्ध मानवी वा सामाजिक घटक म्हणून वावरत नसतो. आपल्या वर्तनावर नेटवर्कच्या अंगभूत प्रवृत्तींचाही प्रभाव पडत असतो.

पोत... नात्यांचा, संवादाचा
मात्र, हे सगळं होत असताना आपल्या नात्यांचाही पोत बदलत जातो का? नेटवर्क आणि त्यावरच्या संवादव्यवहारांबाबत होत असलेलं संशोधन या प्रश्नाचं उत्तर अगदी ठामपणे नसलं, तरी बहुतांशानं होकारार्थी देत आहे. संवाद, सहवास आणि सहभाग यातून व्यक्तींमधलं नातं घडत किंवा बिघडत जातं. त्यातला सहवास आणि सहभाग या दोन गोष्टींवर सध्या फार मर्यादा पडल्या आहेत. विभक्त कुटुंबपद्धती, शिक्षण, नोकरी-धंदा, शहरी अंतर आणि कामाचे वाढते ताण, धकाधकीचं जीवनमान अशा अनेकानेक कारणांमुळं इच्छा असो वा नसो- नात्यांमधला सहवास कमी होत चालला आहे आणि इतरांच्या जगण्यातला आपला सहभागही. त्यामुळं नातं टिकवण्याचा जादाचा भार येऊन पडलाय तो संवादावर. नातं अनुभवण्याचं अवकाश आक्रसतआक्रसत संवादपरिघापर्यंतच मर्यादित राहतो की काय असं होऊ लागलंय. आता काही जण असं उलटही म्हणू शकतात, की खरं तर मोबाईल, सोशल मीडिया यांसारख्या माध्यमांमधून होणारा नियंत्रित, अप्रत्यक्ष संवादव्यवहार वाढल्यामुळं आणि सोपा झाल्यामुळंच कष्टीक व कठीण अशा सहवास आणि सहभागाचेंअवकाश आक्रसत चाललं आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचं, तर प्रत्यक्ष सहवास आणि सहभाग टाळण्यासाठी पर्याय म्हणून आपण व्हर्च्युअल संवादाला अधिक करू लागलो आहोत. हे थोडं कोंबडी आधी की अंड याच्यासारखं आहे.

तर्काची दिशा कोणतीही असो, नातेसंबंध आणि अर्थातच जगण्याचा अनुभव यांमध्ये या नेटवर्क-संवादाला मिळत असलेलं मध्यवर्ती स्थान हे आजचं खरं खोलवरचं स्थित्यंतर आहे. म्हणूनच नेटवर्क जॅम करत असलं तरी, फोनमधली मेमरी खात असलं तरी, नोटिफिकेशन्सनी त्रस्त करत असलं तरी आणि आशयातल्या सरधोपटपणामुळं "इरिटेट' करत असलं, तरी या "गुड मॉर्निंग'छाप संदेशांकडं फक्त नकारात्मक दृष्टीनं बघता येत नाही. परिस्थितीचा गुंता आणि तंत्रज्ञानाची भुरळ यांच्यात अडकलेल्या एका पिढीची ही नातेसंबंध जगण्याची आणि टिकवण्याची (जरा केविलवाणी) धडपड आहे. "प्रभाते करदर्शनम्‌' म्हणत, चेहऱ्यावर आपल्याच हाताचा स्पर्श अनुभवत कृतज्ञ भावनेनं जमिनीवर दिवसाचं पहिलं पाऊल टाकण्याचे संस्कार झालेली एक पिढी आता "प्रभाते स्क्रीनदर्शनम्‌' म्हणत, उधारीच्या शुभेच्छा-संदेशांचा वापर करत, नातेसंबध टिकवण्यासाठी काहीशा भयभावनेनं दिवसाचा पहिला अंगठा स्क्रीनवर उमटवत आहे. आभासी शुभेच्छुकांच्या प्रवाहात सहभागी होत आहे. ही कृती रूटिन असली, औपचारिक असली तरी उथळ नाही. त्यात एक स्थित्यंतरकालीन धडपड लपलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com