डावा आणि उजवा

डावा आणि उजवा

अडथळे, अडचणी, समस्या हे यशाकडे जाणाऱ्या मार्गावरचे हमखास भेटणारे सदस्य असतात. किंबहुना त्यांच्याशिवाय कुठलाच मार्ग शेवटपर्यंत जात नाही. म्हणूनच तर आपण आयुष्याचे वर्णन करताना त्याला बऱ्याचदा अडथळ्यांची शर्यत असेही म्हणतो. हे अडथळे मार्गावरचा आपला प्रवास अवघड बनवतात हे नक्‍की; पण या अडथळ्यांकडे आपण नेमके कसे पाहतो त्यावर आपल्या प्रवासाचे स्वरूप बदलत जाते. 

गेल्या महिन्यात एका छोट्याशा अपघातामध्ये माझ्या उजव्या हाताला थोडीशी इजा झाली. अंगठ्याच्या हाडाला दुखापत झाल्याने कोपरापर्यंत उजवा हात प्लास्टरमध्ये बंद करण्यात आला. अंगठ्याशिवाय चार बोटेदेखील त्यांचा पुढचा थोडा भाग वगळता प्लास्टरमध्ये बंदिस्त झाली. थोडक्‍यात काय तर एका महिन्यासाठी माझा उजवा हात जायबंदीच झाला. आजवर उजव्या हातानेच जवळपास सगळ्या गोष्टी करण्याची सवय झाली होती. आता तोच हात प्लास्टरमध्ये बंद झाल्याने माझ्यापुढे तशी मोठीच अडचण उभी राहिली. 

पहिले दोन-तीन दिवस घरातील सदस्यांनी विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. उजवा हात कार्यरत नसल्याने छोट्या-छोट्या कामासाठीदेखील मला इतरांची मदत घेणे भाग पडू लागले. जेवण, आंघोळ, कपडे बदलणे यांसारख्या नित्याच्या गोष्टीतही मी परावलंबी झालो. लेखन तर पूर्णच बंद झाले. ऑफिसमध्ये चेकवर सह्या करणे बंद झाल्याने अडचण निर्माण होऊ लागली. या सगळ्यांचा परिणाम म्हणून माझी थोडीफार चिडचिड व्हायला लागली. 

तीन-चार दिवसांनंतर मी शांतपणे विचार करू लागलो. माझा उजवा हात प्लास्टरमध्ये असल्यामुळे मला त्या हाताची कोणतीच कामे करता येत नव्हती, हे वास्तव होते; पण त्या वास्तवाचे मी स्वतःच मोठ्या संकटात रूपांतर केले होते. माझ्या आजूबाजूची माणसेदेखील सहानूभूती देऊन माझ्यावर खरेच मोठे संकट आले आहे, या माझ्या कल्पनेला बळच देत होती. खरे तर आजवर उजव्या हाताची प्रचंड सवय झाल्यामुळे तो हात काम करीत नसल्याने खोळंबा होत होता. पण हे खरेच मोठे संकट होते का?

लक्ष माझ्या डाव्या हाताकडे गेले. माझ्या लक्षात आले की, माझा हा डावा हात माझ्याच उजव्या हातासारखा हुबेहूब आहे. त्यालाही अंगठ्यासहित उजव्या हातासारखी पाच बोटे आहेत. डाव्या हातातही उजव्या हातासारखी ताकद आहे आणि विशेष म्हणजे हा माझा डावा हात माझ्या जन्मापासूनच माझ्या सोबत आहे. पण मग आजवर माझ्या डाव्या हाताच्या असण्याची जाणीव मला का झाली नाही? उजव्या हाताला संतुलित करण्यासाठी  अथवा शर्टाची एक बाही वाया जाऊ नये अशा क्षुल्लक हेतूसाठी हा डावा हात निसर्गाने मला नक्‍कीच दिलेला नाही.

हळूहळू मी माझे लक्ष डाव्या हातावर केंद्रित करायला सुरवात केली. एवढी वर्ष त्याच्याकडे लक्षच न दिल्यामुळे त्यालाही माझी सवय नव्हती. त्यामुळे माझा त्याच्याशी संवाद होतच नव्हता. आता मात्र संपूर्ण लक्ष त्याच्याकडेच असल्यामुळे संवाद वाढू लागला. मला हवा तसा प्रतिसाद डाव्या हाताकडून मिळू लागला. एका आठवड्यात डाव्या हाताने सराईतपणे जेवण करणे जमू लागले. दोन आठवड्यांनंतर जवळपास सगळीच दैनंदिन कामे डाव्या हाताच्या मदतीने करणे जमायला लागले. डाव्या हातात पेन घेऊन लिहायचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा तर थेट बालवाडीच्या स्तरापासूनच नव्याने सुरुवात करावी लागली. हळूहळू आकारबद्ध शब्द लिहायला जमू लागले. हे शब्द उजव्या हाताच्या लेखनासारखे संपूर्ण प्रमाणबद्ध नक्‍कीच नव्हते; पण काय लिहिले आहे हे वाचता येण्याइतपत सुवाच्य मात्र नक्‍कीच होते.

आता माझ्या उजव्या हाताचे प्लास्टर काढून टाकले आहे. तो पुन्हा पहिल्यासारखा कार्यरत झाला आहे. पण आता एक मोठा बदल झाला आहे. माझा केवळ उजवा हात आता कार्यरत असत नाही. अगदी जाणीवपूर्वक माझ्या डाव्या हाताकडेही माझे पूर्ण लक्ष असते. उजव्या हाताइतकाच डावा हातही माझाच हिस्सा आहे, याची पूर्ण जाणीव मला आहे. ही जाणीव यायला अपघात व्हावा लागला हे तसे दुर्दैव.

निसर्गाने आपल्याला सगळ्या गोष्टी भरभरून दिल्या आहेत. पण आपण स्वतःहूनच आपल्याला दिलेल्या अनेक क्षमतांकडे दुर्लक्ष करतो. त्यापेक्षा त्या क्षमता आपल्याला देऊ केलेल्या आहेत याची खरे तर आपल्याला जाणीवच नसते. एखादा अपघात होऊन मगच त्या क्षमतांची जाणीव व्हायची वाट कशाला पहायची? आपल्या सगळ्याच क्षमतांवर पूर्ण विश्‍वास ठेवून कार्य केले, तर यशाच्या दिशेने होणारी आपली वाटचाल वेगानेच होईल. मग मार्गात अडथळा, संकट अथवा अडचण आली तरी मार्ग चालणे सोपेच वाटेल.

vishvanath16@gmail.com 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com