प्रवाह

 प्रवाह

भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अशा तीन टप्प्यांत आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची विभागणी होते. जिथे वर्तमानकाळ अस्तित्वात आहे, तिथे भूतकाळ न चुकता तयार होत जातो. वर्तमान आणि भूत यांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी भविष्यकाळाला यावेच लागते. या तिन्हींच्या चक्रामध्ये फिरणाऱ्या माणसाला नेमके कुठे असावे याविषयी स्पष्टताच येत नाही. 

पर्वतांमध्ये उगम पावलेल्या नद्या एकसलग वाहत शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. नद्यांचे हे वाहणे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यासारखेच आहे. उगमापासून समुद्रापर्यंत चाललेला हा प्रवास अविरतपणे सुरू असतो. पण मग या प्रवासाच्या कोणत्या भागाला जगणे म्हणायचे, असा प्रश्‍न आपल्याला वारंवार पडत राहतो. भूतकाळात रममाण होऊन तसे काहीच हाती लागत नाही. भविष्यकाळ हातातच नसल्याने त्यात गुंग होऊनही हाती काहीच येत नाही. हे सगळे सिद्धांताच्या पातळीवर कळूनही प्रत्यक्ष जगताना मात्र नेमकेपणाने वळत नाही. 

कुठल्याही नदीच्या प्रवाहात जेव्हा जेव्हा आपण उतरतो, तेव्हा तेव्हा ती नदी पूर्णत: नवीनच असते. कालचीच नदी आज वाहत आहे किंवा गेल्या वर्षीचीच नदी यावर्षीही वाहते आहे, असे म्हणणे हा आपला केवळ एक भ्रम असतो. प्रत्येक क्षणाला नदीतला पाण्याचा प्रवाह बदलत राहतो. नदीच्या पाण्यात आपण जिथे कुठे उतरू, तिथे आपल्याला स्पर्श करून पुढे जाणारा प्रवाह कायमचाच निघून जातो. त्या क्षणाला आपल्याला स्पर्श करणाऱ्या पाण्याचे थेंब हाच त्यावेळचा आपला प्रवाह असतो. आपण जिथे उभे आहोत, त्याच्या वरच्या बाजूला असणारे पाणी अजून आपल्याकडे यायचे आहे आणि खालच्या बाजूला असणारे पाणी आपल्यापासून कायमचे निसटून गेलेले असते. 

वाहत्या नदीच्या प्रवाहाची ही तऱ्हा अगदी तंतोतंत आपल्या आयुष्यात आढळते. माझे माझे म्हणून आपण मिरवत असलेले आयुष्य क्षणाक्षणाच्या रूपाने अखंडपणे वाहत असते. आपला आत्ताचा श्‍वास सुरू असतानाचा क्षण तेवढा आपला असतो. बाकी आधीच्या श्‍वासासोबत आलेले क्षण आपल्याला सोडून कायमचे निघून गेलेले असतात. आपल्या आत्ताच्या श्‍वासानंतर पुढे येऊ घातलेल्या श्‍वासाबरोबर येणारे क्षण आपले आहेत की नाही हे आताच सांगता येत नाही. आतापुरता आपल्या हाती असणारा, ज्याला आपला म्हणता येईल असा एकच क्षण असतो.

निसटून गेलेले क्षण आठवणीत जरूर राहतात. पण आताचे जगणे जिवंत ठेवण्यासाठी त्या आठवणी पुरेशा ठरत नाही. जे क्षण अजून आपल्याला मिळालेलेच नाहीत. त्यांच्याविषयी मनात आडाखे बांधण्यापलीकडे आपण फारसे काही करू शकत नाही. जे काही करायचे आहे ते आताच्या क्षणातच करू शकतो. एकदा का तो क्षण संपला की त्याच्यासोबतचे आपले जगणेही संपून जाते. 

आयुष्याचा हा प्रवाहीपणा वेळीच ओळखून त्यात जिवंतपणा आणायला हवा. प्रवाही असणे हाच आपल्या आयुष्याचा मूलधर्म आहे. प्रवाहामुळेच त्यात नित्याने नावीन्य येत राहते. प्रवाही असल्यामुळेच आयुष्य कुंठत नाही, साचत नाही. प्रवाहाचे वास्तविक रूप जाणून घेऊन त्याच्यासोबत वाहता येणे, ही जिवंतपणे जगण्याची खरी कला आहे. ती कला जितक्‍या लवकर आपण आत्मसात करू, तितका आपला जिवंतपणा वाढत राहील.

vishvanath१६@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com