शिवसेनेला पवारांची काळजी जास्त वाटते!

representational image
representational image

पुण्यात राज ठाकरे यांनी घेतलेल्या महामुलाखतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. ही मुलाखत अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण होती. एक तर दोन पिढ्यांमधील आणि दोन विचारांमधील तो संवाद होता. हि मुलाखत संपली आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. त्याच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून पवारांची काळजी वाटते या शीर्षकाखाली अग्रलेख लिहून टीका केली आहे. 

काय म्हटले आहे अग्रलेखात?
नुकत्याच पुण्यात झालेल्या मुलाखतीत शरद पवारांनी एक ऐतिहासिक भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, जातीपातीचे राजकारण मान्य नाही. जाती पातीवर आधारीत आरक्षण नीती मोडून काढली पाहिजे. आज विविध समाज घटकांकडून आरक्षणासाठी आंदोलने होत असली तरीही जातीच्या निकषावर नव्हे तर आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवे. पवार यांनी मांडलेली भूमिका फक्त टाळ्या मिळवण्यासाठी असावी. या भूमिकेवर त्यांना टाळ्या मिळण्याची शक्यता नाही. टाळी देण्यासाठी जो दुसरा हात लागतो तो त्यांच्या आसपासही दिसला नाही. कारण स्वतः शरद पवार हे देशातले ज्येष्ठ नेते असले तरीही राजकारणातील त्यांच्या भूमिकांना स्थैर्य मिळालेले नाही.

जातीच्या राजकारणास पाठबळ देणारी भूमिका शरद पवार कायम घेत राहिले. मंडल राजकारणाचा जोर सुरु असताना जातीय आधारावरच शरद पवारांनी शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न कसा केला, हे फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र विसरलेला नाही. मराठा क्रांती मोर्चाचा जोर सुरु झाला व मराठा समाजाचे लाखाचे मोर्चे निघू लागले तेव्हा मराठा समाजास आरक्षण मिळायला हवे अशी त्यांची भूमिका होती. एवढेच काय या मोर्चात अजित पवारांपासून सगळे नेते सहभागी झाले होते.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विचार केला तर आत्महत्येचा मार्ग स्वीकारणारे बहुसंख्य जीव हे मराठा समाजतील आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्रात त्यांच्यावर अशी वेळ का आली? काल पर्यंत देणाऱ्या समाजावर मागण्याची वेळ कुणी आणली? व अस्तित्त्वाच्या लढाईसाठी हा समाज रस्त्यावर का उतरला याचे उत्तर शरद पवारांसारख्या नेत्यांना द्यावे लागेल. कोरेगाव भीमाच्या दंगलीने महाराष्ट्राचे नुकसान झाले. ही दंगल नक्की कोणी घडवली याचा थांगपत्ता लागण्याआधीच पेटलेल्या महाराष्ट्राची चिंता म्हणून शरद पवार मीडियासमोर अवतीर्ण झाले व दंगलीमागे हिंदुत्त्ववादी संघटनांचा हात असल्याचे सांगून अदृश्य झाले. दंगली मागे फक्त हिंदुत्त्ववाद्यांचाच हात असल्याचे कोणते पुरावे शरद पवार यांच्या अदृश्य हातात होते? सुकलेल्या गवतावर काडी फेकडण्याचाच हा प्रयत्न होता.

महाराष्ट्रापासून मुंबई कोणाला तोडता येणार नाही. विदर्भाचा तुकडा केकसारखा कापता येणार नाही या शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेचीच उजळणी शरद पवार यांनी त्यांच्या मुलाखतीतून केली. जातीपातीवर नको तर आर्थिक निकषांवर आरक्षण हवे ही देखील बाळासाहेब ठाकरेंचीच भूमिका होती. तीच भूमिका शरद पवारांनी मांडली. गेली काही वर्षे बेरजेच्या राजकारणात तरबेज असलेल्या शरद पवारांचे गणित चुकते आहे. ऐतिहासिक मुलाखतीमुळे पवार तर इतिहास जमा होणार नाहीत ना? याची आम्हाला काळजी वाटते.

शिवसेना सांगते कि आर्थिक निकषानुसार आरक्षण ही बाळासाहेबांची भूमिका स्वीकारली असती, तर जातीपातीच्या भिंती उभ्याच राहिल्या नसत्या. आर्थिक निकषानुसार आरक्षणाविषयी तरी शिवसेनेची ठाम भूमिका आहे? तशी असते तर सुरुवातीला विरोध आणि मोर्चांची भव्यता लक्षात आल्यावर पाठिंबा का जाहीर केला?  कालच्या मुलाखतीत पवारांनी आपल्या भविष्यातील राजकारणाविषयी दिशा काय असेल याचे सूतोवाच केले. तसे सद्या शिवसेना सरकारमध्ये आहे कि विरोधी पक्षात हे कळत नाही. उगीच पवारांची काळजी करण्यापेक्षा आपली नेमकी भूमिका काय आहे हे ठरवावे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com