स्वागत नव्या पुस्तकांचे

स्वागत नव्या पुस्तकांचे

पॉप्युलरचं अंतरंग
पॉप्युलर प्रकाशनाच्या हीरक महोत्सवानिमित्त संस्थेच्या वाटचालीचा धांडोळा घेणारं हे पुस्तक. नवेपणाचा शोध घेणाऱ्या या प्रकाशन संस्थेचं संपादकीय धोरण कसं घडत गेलं याची कल्पना या पुस्तकामुळं येतेच, शिवाय अनेक साहित्यविषयक घडामोडींचा मागोवाही घेता येतो. रामदास भटकळ यांनी स्वत- अनेक गोष्टी उलगडून दाखवल्या आहेत. ‘पॉप्युलर’मध्ये संपादक म्हणून काम बघणाऱ्या मृदुला जोशी, अंजली कीर्तने, शुभांगी पागे, अस्मिता मोहिते; तसंच रघुनाथ गोकर्ण यांनी अनुभव लिहिले आहेत. रंगनाथ पठारे, अरुणा दुभाषी, सुधा जोशी, रत्नाकर मतकरी, वसंत पाटणकर, अरुण टिकेकर, वसंत सरवटे यांनी वेगवेगळ्या साहित्य प्रकारांवर भटकळ यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यातून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. किशोर आरस यांनी संकलन केलं आहे.
प्रकाशक - ग्रंथाली (०२२- २४२१६०५०) / पृष्ठं - ३१६ / मूल्य - ४०० रुपये  

सण-वार व संस्कार

आपल्या संस्कृतीत वेगवेगळे सण-समारंभ कशा प्रकारे साजरे करायचे याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत. या सगळ्या पद्धती तपशीलवार उलगडून दाखवणारं हे पुस्तक डॉ. अंजली जोगळेकर यांनी लिहिलं आहे. विशेषत- परदेशांत गेलेल्यांना, किंवा ज्यांच्याजवळ मोठ्या व्यक्ती नसतात अशांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल. प्रत्येक सणाची ओळख, त्याचे अर्थ, पार्श्‍वभूमी या गोष्टी उलगडून दाखवलेल्या आहेत. त्या त्या वेळी करायच्या पूजा, पदार्थ, व्रतं, प्रथा यांचीही विस्तारानं माहिती दिली आहे. रांगोळीचं, वारांचं महत्त्व अशाही गोष्टी आहेत आणि पूरक छायाचित्रांची- माहितीची जोड देण्यात आली आहे. साखरपुडा, लग्न, मुंज, शांती, अंत्येष्टी अशा प्रसंगांशी संबंधित माहितीही देण्यात आली आहे.
प्रकाशन - प्रसाद प्रकाशन, पुणे (०२०- २४४७१४३७) / पृष्ठं - ३६६ / मूल्य - २७० रुपये

जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शक

समाजकल्याण विभागातले निवृत्त अधिकारी रामदास म्हात्रे यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी हा अतिशय संवेदनशील विषय आहे आणि अनेक जणांना त्यासाठी अडचणी सहन कराव्या लागतात. तो विषय सुकर करून सांगणारं हे मार्गदर्शन. जातिव्यवस्था आणि सामाजिक स्थितीच्या पार्श्‍वभूमीपासून सरकारच्या आरक्षण धोरणापर्यंत वेगवेगळ्या गोष्टीही म्हात्रे यांनी सांगितल्या आहेत. जात पडताळणी प्रमाणपत्र का द्यायचं, त्यासाठी अर्ज कसा करायचा अशा गोष्टींबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. वेगवेगळ्या अर्जांचे नमुने, मागासवर्गीयांची यादी, नावं सारखी असणाऱ्या जाती असे काही संदर्भही दिल्यामुळं पुस्तक उपयुक्त ठरेल.
प्रकाशन -  सुनिधी पब्लिशर्स, पुणे (०२०- २४४९७२२४) / पृष्ठं - ११२ / मूल्य - १५० रुपये.

अ मिलियन ब्रोकन विंडोज

मुंबई आणि क्रिकेट यांचं अतूट असं नातं आहे. या ‘मुंबई क्रिकेट’शी संबंधित वेगवेगळे किस्से, विश्‍लेषण यांचा समावेश असलेलं हे पुस्तक. वेगवेगळ्या लीग, स्पर्धा, खेळाडू आणि चाहते यांच्याशी निगडित चर्चेचाही समावेश आहे. प्रसिद्ध स्तंभलेखक डॉ. मकरंद वायंगणकर यांनी हे शब्दचित्र उभं केलं आहे. मुंबईच्या फलंदाजीचं घराणं, मुंबईची गोलंदाजी, मुंबईतले चित्तवेधक सामने, मुंबईचा सर्वोत्तम संघ अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांच्याविषयीही चर्चा आहे. निमिष पाटगावकर यांनी अनुवाद केला आहे.
प्रकाशक - विश्‍वकर्मा पब्लिकेशन्स (०२०- २४४४८९८९) / पृष्ठं - २५८ / मूल्य - २५० रुपये

क्रांतिकुंड

भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतले क्रांतिकारक बाबाराव सावरकर यांचं हे चरित्र. डॉ. वि. वा. देशपांडे आणि चंद्रकांत शहासने यांनी ते लिहिलं आहे. त्यांचं बालपण, वंदेमातरमचा खटला, त्यांना झालेली जन्मठेपेची शिक्षा, अंदमानच्या तुरुंगातला छळ, साबरमतीच्या तुरुंगातला एकांतवास अशा गोष्टी पुस्तकात मांडल्या आहेत. बाबारावांचं हिंदुत्वासाठीचं कार्य, त्यांच्या आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती, त्यांचं वाचन, लेखन यांच्याबाबतही लेखकद्वयानं लिहिलं आहे. त्यांचं सांगलीशी असलेलं नातंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
प्रकाशन - बहुजन साहित्यधारा, पुणे (९८८१३७३५८५) / पृष्ठं - १२० / मूल्य - १४० रुपये

टेलिकॉम-क्रांतीचं महास्वप्न-माझा प्रवास

भारतात दूरसंचार क्रांतीचा पाया रचण्याचं श्रेय ज्यांना दिलं जातं त्या सॅम पित्रोदा यांचं हे आत्मकथन. ओडिशा गावातल्या तितिलगड या छोट्याशा गावापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास भारतात दूरसंचार क्रांती निर्माण करण्यापर्यंत कसा पोचला, ते पित्रोदा यांनी मांडलं लिहिलं आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबर त्यांनी केलेलं काम आणि राजीवजींची हत्या झाल्यानंतर बदललेली स्थिती, नंतर राष्ट्रीय सल्लागार समिती, ज्ञान आयोगातलं त्यांचं काम यांच्याबद्दलही त्यांनी मोकळेपणानं लिहिलं आहे. वरिष्ठ स्तरावरचं काम कसं चालतं, निर्णयप्रक्रिया कशा असतात, अशा अनेक गोष्टी हे पुस्तक वाचताना समजतात. डेव्हिड चनॉफ यांनी पित्रोदा यांच्याबरोबर सहलेखन केलं आहे. शारदा साठे यांनी अनुवाद केला आहे.
प्रकाशक - रोहन प्रकाशन, पुणे (०२०-२४४८०६८६) / पृष्ठं - ४०८ / मूल्य - ३७५ रुपये

द ब्लड टेलिग्राम

बांगलादेशच्या फाळणीच्या काळात घडलेल्या वेगवेगळ्या घडामोडींचा वेध घेणारं हे पुस्तक. त्या काळात पाकिस्तानी लष्करानं केलेले अनन्वित अत्याचार, निर्वासितांची दैना, आंतरराष्ट्रीय संबंध, राजकारण, वैयक्तिक हितसंबंध अशा गोष्टींवर हे पुस्तक प्रकाश टाकतं. त्याचा मुख्य भर आहे तो अमेरिकेनं त्या काळात दाखवलेल्या दुटप्पीपणाचा. शीतयुद्धातल्या डावपेचांचा भाग म्हणून आणि भारत आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दलच्या वैयक्तिक आकसापोटी अमेरिकेनं काय काय केलं, त्यावर हे पुस्तक प्रकाश टाकतं. भारत, पाकिस्तान, अमेरिका, चीन, बांगलादेश या देशांमधल्या संबंधांचं वेगळ्या प्रकारे विश्‍लेषण करण्याचा प्रयत्न गॅरी बास यांनी केला आहे. दिलीप चावरे यांनी पुस्तकाचा अनुवाद केला आहे.
प्रकाशक - डायमंड पब्लिकेशन्स, पुणे (०२०-२४४५२३८७) / पृष्ठं - ४८२ / मूल्य - ४९५ रुपये.

लोककल्याणकारी सरकारी योजना - विकासाचे नवे पर्व

सर्वसामान्य जनतेसाठी सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जातात. अशा वेगवेगळ्या विभागांमधल्या योजना विठ्ठल चव्हाण यांनी या पुस्तकात एकत्रितपणे मांडल्या आहेत. शैक्षणिक, सामाजिक हिताच्या, महिला सबलीकरणाच्या अशा अनेक योजनांची नेमकेपणानं आणि मुद्देसूदपणे माहिती चव्हाण यांनी दिली आहे. सुमारे २५० योजनांची माहिती त्यांनी दिली आहे. गरजूंसाठी, स्वयंसेवी संस्थांसाठी किंवा स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
प्रकाशक - सुकृत प्रकाशन, पुणे (०२०-२४४५१५८४) / पृष्ठं - २१६ / मूल्य - २०० रुपये  

शेक्‍सपिअरचे विचारधन

कालातीत साहित्याचा निर्माता विल्यम शेक्‍सपिअर याच्या साहित्यातल्या सुभाषितांचं, विचारांचं हे संकलन. परशुराम देशपांडे यांना वेळोवेळी आवडलेली आणि महत्त्वाची मांडलेली वाक्‍यं, सुभाषितं त्यांनी नोंदवून ठेवली होती. वेगवेगळ्या शब्दांची किंवा भावनांची विभागवारी करून त्यांनी हे विचारधन मांडलं आहे आणि त्याचं सुरस भाषांतरही केलं आहे. मृत्यू, भीती, नृत्य, मन असे सुमारे १०२ वेगवेगळे विभाग त्यांनी केले आहेत. त्यामुळे साहित्याच्या अभ्यासकांना आणि सर्वसामान्यांनाही अगदी रोचक वाटेल असा हा खटाटोप आहे.
प्रकाशक - काँटिनेंटल प्रकाशन, पुणे (०२०-२४३३६९८२) / पृष्ठं - २९२ / मूल्य - २८० रुपये.

राज्यजिज्ञासा

राज्यशास्त्र या विषयातले तज्ज्ञ डॉ. विजय देव यांनी या विषयातल्या निरनिराळ्या संज्ञा, संकल्पना आणि सिद्धांत यांच्याबाबतचं सविस्तर विवेचन या पुस्तकात केलं आहे. राज्यशास्त्र या विषयाची व्याप्ती प्रचंड असून, त्यातल्या सगळ्याच संकल्पनांचा विचार या पुस्तकात करण्यात आला आहे. एकूण २२५ संज्ञा, संकल्पना आणि सिद्धांतांचा परामर्श डॉ. देव यांनी घेतला आहे. राजकीय विचार, सिद्धांत, इतिहास यांच्याबरोबरच तौलनिक राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि लोकधोरण, राजकीय अर्थकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, राजकीय समाजशास्त्र अशा वेगवेगळ्या उपशाखांच्या अनुषंगानं त्यांनी विवेचन केलं आहे. या विषयातल्या अभ्यासकांना, स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना आणि अगदी सर्वसामान्यांनाही वेगवेगळ्या गोष्टींबाबत ज्ञानसंपन्न होण्यासाठी पुस्तकाचा उपयोग होईल.
प्रकाशक - काँटिनेंटल प्रकाशन, पुणे (०२०-२४३३७९८२)/ पृष्ठं - ९३६/ मूल्य - ७५० रुपये

आज आत्ता इथे - पर्मनंट प्रेझेंट टेन्स

हेन्री मोलेसन या रुग्णाची, त्याच्या जगावेगळ्या प्रकरणाची, त्याच्यावरच्या संशोधनाची ही कहाणी. तो २७ वर्षांचा असताना अपस्मारावर उपचार करण्यासाठी म्हणून त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याच्या मेंदूचा अर्धा भाग निकामी झाला. त्यामुळं स्मृती तयार करण्याची त्याची क्षमताच संपली आणि त्याचं उर्वरित आयुष्य फक्त वर्तमान क्षणांत कोंडलं गेलं. मज्जाशास्त्रज्ञ सुझन कॉर्किन जवळजवळ पन्नास वर्षं हेन्रीच्या मेंदूचा, मनाचा, वर्तनाचा अभ्यास करत होत्या. त्यांनीच हेन्रीची, त्याच्यावरच्या संशोधनाची ही सगळी खिळवून ठेवणारी कहाणी लिहिली आहे. डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे यांनी अनुवाद केला आहे.
प्रकाशक - सायन पब्लिकेशन्स, पुणे (०२०-२४४७६९५४) / पृष्ठं - ३६० / मूल्य - ३८० रुपये.

ओळख नृत्योपचाराची

नृत्य ही एक कला असली, तरी तिचा शारीरिक, मानसिक उपचारांसाठीही वापर कसा करता येऊ शकतो, हे सांगणारं हे पुस्तक डॉ. निखिल शासने यांनी लिहिलं आहे. योग्य आणि व्यायाम यांच्यातला फरक, श्‍वासोच्छ्वास, अध्यात्म, चेहऱ्याचं सौंदर्य अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह डॉ. शासने यांनी केला आहे. कलरी पयत्तू या नृत्य प्रकाराची विशेष ओळख त्यांनी करून दिली आहे. नृत्य वर्ग आणि नृत्योपचार यांच्यातला फरकही त्यांनी समजावून सांगितला आहे.
प्रकाशक - हरेंद्र शासने, डोंबिवली (०२५१-२४०१५२६) / पृष्ठं - ४० / मूल्य - ५० रुपये

स्वस्तिश्री

स्मिता दोशी यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह. स्वत-चे वैयक्तिक अनुभव आणि विचार त्यांनी या लेखांत मांडले आहेत. सौंदर्य स्पर्धा हव्यातच का, विवाहाचं वय, वृद्धाश्रम-काळाची गरज, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी सहज, सोप्या शब्दांत लिहिलं आहे.
प्रकाशक - साई प्रकाशन, सांगली (९२२६३८५६२०) / पृष्ठं - ७४ / मूल्य - ७० रुपये

नॉनफ्लिक्‍ट

अनेकांना वैयक्तिक, कार्यालयीन, कौटुंबिक स्तरावर संघर्षाला सामोरं जावं लागतं, त्यातून समस्या वाढत जातात आणि माणूस त्या चक्रात सापडतो. हा संघर्ष टाळण्यासाठी नॉनफ्लिक्‍ट (समन्वय) ही पद्धती समजावून सांगणारं हे पुस्तक. विरोध, संघर्ष, भांडण असे आपली मन-शांती बिघडवणारे सगळे घटक कसे टाळायचे आणि विरोधाचं समन्वयात रूपांतर कसं करायचं, हे डॉ. आमीर कफीर आणि स्टिफन हॅचेट यांनी या पुस्तकात सांगितलं आहे. फक्त वैयक्तिक पातळीवरचीच भांडणं नव्हे, तर मनातलं द्वंद्वही कशा प्रकारे मिटवता येतं हे सोदाहरण समजावून सांगण्यात आलं आहे. वस्तुस्थिती समजावून घ्या, दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन विचार करा, जोडीदाराला समजून घ्या, कृती योजना निर्माण करा, चर्चेची तयारी ठेवा, अशा वेगवेगळ्या तंत्रांचा त्यासाठी वापर करण्यात आला आहे. सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी समन्वय पद्धतीचा कशा प्रकारे उपयोग करून घेता येईल, हे विशद करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या पुढाकारानं सुरू झालेल्या तनिष्का, यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क, पुणे बस डे या उपक्रमांची उदाहरणं या पुस्तकात आहेत. माधुरी तळवलकर यांनी अनुवाद केला आहे.
प्रकाशन - सकाळ प्रकाशन, पुणे (०२०- २४४०५६७८) / पृष्ठं - १५८ / मूल्य - १६० रुपये.

साभार पोच

  •  तुझ्याशिवाय / (कवितासंग्रह) / कवी आणि प्रकाशक - अभिजित गायकवाड (९८२२०२२४५७) / पृष्ठं - ५६ / मूल्य - ७० रुपये
  •  मनुस्मृती आहे तरी काय? / (चर्चात्मक) / लेखक - वा. ना. उत्पात / प्रकाशक - काँटिनेंटल प्रकाशन, पुणे (०२०-२४३३९८२) / पृष्ठं - १८६/ मूल्य - २०० रुपये
  •  आई / (कवितासंग्रह) / कवी - अनिल दीक्षित / प्रकाशक - सुयश प्रकाशन, पुणे (९८२२३२०२५५) / पृष्ठं - ७६ / मूल्य - ८० रुपये
  •  रंग मनाचे / (कवितासंग्रह) / कवी - अनिल गुंजाळ / प्रकाशक - यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे (०२०-२४४१२१५३) / पृष्ठं - ८० मूल्य - १०० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com