प्रेरणादायी प्रयोगाचं उलगडलेलं ‘गणित’

प्रेरणादायी प्रयोगाचं उलगडलेलं ‘गणित’

‘तसे आपण सारेच गटारात असतो; पण आपल्यापैकी काही जणांना मात्र तारे खुणावत असतात.’...आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्यिक ऑस्कर वाईल्ड यांचे हे विधान बिहारमध्ये ‘सुपर-३०’ ही शैक्षणिक चळवळ उभी करणाऱ्या आनंदकुमार यांना अगदी चपखल लागू होतं. गौदिया मठसारख्या छोट्या खेड्यात गेलेलं बालपण, घरात अठराविश्‍व दारिद्य्र असल्यानं रोजच पोटाची खळगी भरण्यासाठी करावा लागणारा संघर्ष; शिवाय सभोवतालचं वातावरणही शिक्षणाच्या मुळावर उठलेलं... असे चारही बाजूंनी प्रश्‍नांचे डोंगर उभे असताना एक उच्चविद्याविभूषित तरुण पेटून उठतो, आयुष्यातल्या किमान सुविधांपासून वंचित असलेल्या; पण एका विशिष्ट ध्येयानं प्रेरित झालेल्या तीस विद्यार्थ्यांना हाताशी धरून ‘सुपर-३०’ची चळवळ उभारतो. जे स्वप्न आपल्याला पूर्ण करता आलं नाही, ते इतर गोरगरीब विद्यार्थ्यांना पूर्ण करता यावं म्हणून सर्वस्व अर्पण करतो. विशेष म्हणजे हे करताना तो थोड्याही पैशांची अभिलाषा बाळगत नाही. हा सगळा चमत्कार वाटत असला, तरी तो खरा आहे. बिहारसारख्या ‘बिमारू’ राज्यात तो आनंदकुमार यांनी घडवून आणला.
अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्चशिक्षणाला प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना ‘आयआयटी जेईई’च्या परीक्षेला सामोरं जावं लागतं. मुळातच विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेचं शिक्षण महागडं आणि या प्रवेश परीक्षेचं अवघड स्वरूप पाहता ते गरीब विद्यार्थ्यांसाठी एक अग्निदिव्यच ठरतं. बऱ्याचदा पात्रता असूनही केवळ परिस्थितीपोटी अनेक गरीब होतकरू विद्यार्थ्यांना ‘आयआयटी’सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेणं शक्‍य होत नाही. अशा वंचित घटकांतल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच आनंदकुमार यांनी ‘सुपर-३०’ चळवळ उभी केली. हे करताना त्यांना असंख्य समस्यांना सामोरं जावं लागलं. वडिलांच्या अचानक निधनामुळं उच्चशिक्षणासाठी केंब्रिजमध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्णच राहिलं, सर्वच बाजूंनी मदतीचे पर्याय बंद झाल्यानंतर त्यांनी परदेशात जाण्याचा निर्णय मागं घेतला. घरगाडा चालविण्यासाठी पापडाचाही व्यवसाय केला; पण आनंद यांच्यातला संशोधक काही केल्या गप्प बसत नव्हता. पापडाच्या व्यवसायातून अन्य लोकांची देणी फेडून चार पैसे हाती येताच त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्‍स’ची स्थापना केली. हीच ‘सुपर-३०’ची पायाभरणी होती. यात आनंदकुमार यांना त्यांच्या आई जयंतीदेवी आणि भाऊ प्रणवकुमार यांची मोलाची साथ लाभली. ‘सुपर-३०’च्या प्रकल्पातून आतापर्यंत ३९० विद्यार्थी बाहेर पडले असून, यातले ३३३ जणांनी ‘आयआयटी’मध्ये शिक्षण घेतलं. आनंदकुमार यांचा हा सगळा प्रवास या पुस्तकात अत्यंत तपशीलवार आणि ओघवत्या भाषेत मांडण्यात आला आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या मनोगतांचाही समावेश आहे. या छोटेखानी पुस्तकात आनंद यांच्या आयुष्यातल्या सन्मानाचे क्षण दर्शविणारी निवडक छायाचित्रंही असल्यानं ते वाचनीय आणि प्रेक्षणीयही ठरतं. गरीब विद्यार्थ्यांना ज्ञानमार्ग दाखवून त्यांचं आयुष्य चंदेरी करणारे आनंद कुमार हे आजमितीस बिहारमधले मोठे शिक्षणतज्ज्ञ ठरले आहेत. त्यांचा हा प्रवास विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीही प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे.

पुस्तकाचं नाव : सुपर-३० आनंदकुमार
लेखकाचं नाव : बिजू मॅथ्यू
अनुवाद :
डॉ. कमलेश सोमण
प्रकाशन : गोयल प्रकाशन, पुणे  (०२०-२४४५३२६७)
पृष्ठं : २२३ /
मूल्य - १९९ रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com