स्वागत नव्या पुस्तकांचे

स्वागत नव्या पुस्तकांचे

आज हे कराच
प्रकाशक - अनुश्री प्रकाशन, पुणे (९५२७३११५८५) /
पृष्ठं - १३६ / मूल्य - १५० रुपये

निरोगी, आनंदी आणि कार्यक्षम बनण्यासाठी वेगवेगळ्या कृती सुचवणारं, चिंतन करायला लावणारं हे पुस्तक. मुकुंद सबनीस यांनी त्याचं संकलन आणि संपादन केलं आहे. जवळजवळ १२१ चिंतनपत्रिकांचा समावेश पुस्तकात आहे. प्रत्येकानं त्या-त्या विचारानुसार चिंतन करायचं आणि त्यानुसार कृती करायची असं पुस्तकात अभिप्रेत आहे. ‘स्वयंप्रयोग’ असं नाव सबनीस यांनी या प्रयोगाला दिलं आहे. ‘तीव्र इच्छेचा प्रभाव’, ‘संशयाच्या बेड्या’, ‘मनाची वाईट सवय’, ‘निसर्गशरण व्हा’, ‘अहंकाराचा त्याग’ अशा छोट्या-छोट्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं आहे.  

रहस्य मंत्रशास्त्राचे
प्रकाशक - नवीन प्रकाशन, पुणे (०२०- २४४५७४६२) / पृष्ठं - १८० / मूल्य - ३०० रुपये

मंत्रांना धार्मिक महत्त्व असलं, तरी जयंत झरेकर यांनी त्यांच्यामागची ‘अक्षरऊर्जा’ उलगडून दाखवणारं हे पुस्तक लिहिलं आहे. अक्षरांच्या, शब्दांच्या उच्चारात विशिष्ट नाद असतो आणि त्यातून अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात, हे झरेकर यांनी या पुस्तकात मांडलं आहे. प्रत्येक अक्षराची माहिती, त्याचं वैशिष्ट्य, त्यांच्या उच्चारांचे शरीरावर होणारे परिणाम आदी गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. विशिष्ट मंत्रात विशिष्ट अक्षरं का गाळली असावीत, मंत्र आणि स्तोत्र यांच्यातील फरक काय, काही विशिष्ट बीजमंत्र आदी गोष्टींचाही ऊहापोह पुस्तकात आहे. पारंपरिक दृष्टीनं न पाहता वेगळ्या प्रकारे विचार करून त्यांनी विचार मांडले आहेत.

आठवणीतील प्रा. श्रीनिवास दीक्षित
प्रकाशक - दिलीप दीक्षित, पुणे (९८९०११७११७) / पृष्ठं - १३६/ मूल्य - ५० रुपये

तत्त्वज्ञान या विषयातले तज्ज्ञ प्रा. श्रीनिवास दीक्षित यांच्या आठवणी सांगणारं हे पुस्तक. प्रा. दीक्षित यांचे नातेवाईक, त्यांच्या जवळचे लोक, त्यांचे विद्यार्थी अशा अनेकांनी त्यांच्या आठवणी लिहिल्या आहेत. शिक्षक, तत्त्वचिंतक, स्नेही, ज्ञानोपासक, वडील, वेदांती, मानवी दृष्टिकोनातून काम करणारं व्यक्तिमत्त्व अशी प्रा. दीक्षित यांची वेगवेगळी वैशिष्ट्यं लेखांतून उलगडतात. गौतमीपुत्र कांबळे, डॉ. यशवंत थोरात, अविनाश बिनीवाले, दिलीप दीक्षित, डॉ. सुभाष के. देसाई, प्रा. दिलीप पंगू, अशोक चौसाळकर, प्रा. डॉ. प्रदीप गोखले अशा अनेकांनी लिहिलं आहे. डॉ. ज. रा. दाभोळे यांनी संपादन केलं आहे.

कुमारी माता-वैद्यकीय व कायदेशीर तरतुदी
प्रकाशक - स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे (०२०- २४४७२५४९) / पृष्ठं - ५८ / मूल्य - १०० रुपये

अविवाहित अल्पवयीन मुलींमधलं गरोदरपण ही अतिशय मोठी आणि गंभीर समस्या आहे. प्रसूतिशास्त्रीय, वैद्यकीय, सामाजिक, कायदेविषयक आणि मनोवैज्ञानिक परिणामांमुळं ही समस्या आणखी गंभीर रूप धारण करते. या समस्येशी संबंधित कायदे, कौटुंबिक- सामाजिक मानसिकता, अनुभव, सोयी- सुविधा, अडचणी अशा वेगवेगळ्या गोष्टींवर डॉ. संजयकुमार तांबे यांनी प्रकाश टाकला आहे. यासंबंधीचे वेगवेगळे अर्ज, माहिती यांचाही पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. डॉ. स्मिता पानसे आणि सुधीर गाडे यांनीही इतर काही मुद्द्यांचा ऊहापोह केला आहे.

सार्थ
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे (०२० - २४४७६९२४) / पृष्ठं - १०० / मूल्य - १२० रुपये

ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांच्या ‘सार्थ’ याच नावाच्या कादंबरीचा हा अनुवाद. उमा कुलकर्णी यांनी तो केला आहे. या कादंबरीसाठी आठव्या शतकाची पार्श्‍वभूमी भैरप्पा यांनी निवडली आहे. तारावती या नगरातला नागभट्ट वैयक्तिक कारणांसाठी आपल्या गावाबाहेर पडतो आणि एका ‘सार्था’मध्ये म्हणजे व्यापारी तांड्यामध्ये सहभागी होऊन प्रवास करू लागतो. त्यानिमित्तानं त्याला पडलेले प्रश्‍न, झालेलं आकलन अशा अनेक गोष्टी कवेत घेत कथा पुढं सरकते. मध्ययुगातल्या अनेक सत्य आणि कल्पित घटनांद्वारे या कादंबरीचा पट घट्ट होत जातो.

परीक्षा - एक आनंददायी अनुभव
प्रकाशक - यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे (९४०४२३५१४५)/ पृष्ठं - १२०/ मूल्य - १५० रुपये

लहानपणापासूनच आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांना सामोरं जावं लागतं. परीक्षांचा हा अनुभव आनंददायी कसा करायचा, याच्याविषयी अनिल गुंजाळ यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या लेखांचं हे संकलन. परीक्षांशी संबंधित सगळ्या बाबींवर गुंजाळ यांनी प्रकाश टाकला आहे. गुणवत्ता विकासापासून करिअरपर्यंत सगळ्या गोष्टींबाबत त्यांनी चिंतन केलं आहे. प्रत्येक टप्प्यावरच्या परीक्षेचे संदर्भ वेगवेगळे असतात, ते सगळे गुंजाळ यांनी मांडले आहेत. परीक्षेतले ताण, त्यांची तयारी, अनुत्तीर्ण झाल्यास काय करायचं, फेरपरीक्षा, सावधगिरी, स्पर्धा परीक्षा, कॉपी टाळणं, पालकांशी संवाद, बहि-स्थ विद्यार्थी इत्यादी मुद्दे पुस्तकात मांडण्यात आले आहेत.

नाण्याची दुसरी बाजू
प्रकाशक - पुष्पक प्रकाशन, पुणे (०२० - २४४८३०६२) / पृष्ठं - ११२ / मूल्य - १२० रुपये

चीन, जपान आणि अमेरिका अशा देशांच्या उद्यमशीलतेची, त्या देशांतल्या कौशल्याची जगभर स्तुती होते. मात्र, या गोष्टीला दुसरीही बाजू आहे. डॉ. माणिक खेर यांनी ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वेगवेगळी पुस्तकं, संदर्भ ग्रंथ वाचून त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. चीनमधली कामगारांची पिळवणूक, निर्यातीसाठी भ्रष्टाचाराचा अवलंब, जपानमधली कामगारांवरची बंधनं, अमेरिकेतली कटकारस्थानं वगैरे गोष्टींवर त्यांनी लिहिलं आहे. काही संशोधनचौर्यांच्याही कथित गोष्टी त्यांनी मांडल्या आहेत.

बीजिंगचे गुपित
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे (०२० - २४४७६९२४) / पृष्ठं - ३२२ / मूल्य - ३५० रुपये

चीनमधल्या जुन्या आणि समकालीन व्यवस्थेचं चित्रण करणारी ही वेगळ्या प्रकारची कादंबरी. जेन वाँग ही पत्रकार बऱ्याच वर्षांनी चीनमध्ये परतते. चौतीस वर्षांपूर्वीच्या एका घटनेची सल तिच्या मनात आहे. कॅनडामधून बीजिंगमध्ये शिकायला गेली असताना यीन लुयी नावाच्या एका तरुणीनं अमेरिकेला जायची इच्छा तिच्याकडं व्यक्त केलेली असताना वाँगनं ती गोष्ट साम्यवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडं सांगितलेली असते. त्या घटनेचा नक्की काय परिणाम झाला, हे वाँगला आता जाणून घ्यायचं आहे. तिच्या या प्रवासात चीनमधली बदलत गेलेली संस्कृती, साम्यवादाकडून भांडवलशाहीकडं झालेला बदल अशा अनेक गोष्टी कादंबरीत उलगडत जातात. जेन वाँगनंच तटस्थपणे चित्रण केलं आहे. मोहन गोखले यांनी या कादंबरीचा अनुवाद केला आहे.

बंजारा समाज - गोरबोली आणि मौखिक वाङ्‌मय
प्रकाशक - राष्ट्रीय बंजारा परिषद, नवी मुंबई / पृष्ठं - १९२ / मूल्य - ३०० रुपये

बंजारा संस्कृती ही भारताच्या प्राचीन संस्कृतींपैकी एक. गोर वंशातल्या या लोकांच्या जीवनावर आणि त्यांच्या विविध सांस्कृतिक पैलूंवर डॉ. सुभाष राठोड (९७६४२०००८०) यांनी लिहिलेलं हे पुस्तक. या समाजाशी संबंधित इतिहास, परंपरा, लोकजीवन, प्रथा अशा अनेक गोष्टींचं दस्तावेजीकरण या निमित्तानं झालं आहे. या समाजाची वेगवेगळ्या राज्यांतली नावं, त्या त्या नावांच्या उत्पत्ती, समाजाची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी, तांडा संघटन, गोरपंचायत, न्यायदान अशा गोष्टी डॉ. राठोड यांनी लिहिल्या आहेत. गोर बोलीचं व्याकरण, त्यातले नियम, शब्दांचे अर्थ, वेगवेगळ्या म्हणी, उखाणे, वाक्‌प्रचार या गोष्टीही त्यांनी उलगडून दाखवल्या आहेत. बंजारा लोकगीतांविषयीही त्यांनी सविस्तर लिहिलं आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील महिलांचे पारंपरिक
देशी खेळ - प्राचीनत्व व महत्त्व
प्रकाशक - भारतीय इतिहास संकलन समिती, पुणे (९४२२०८०८६५) / पृष्ठं - २८८ / मूल्य - २२५ रुपये

पश्‍चिम महाराष्ट्रात एकेकाळी अनेक पारंपरिक खेळांनी महिलांचं जीवन समृद्ध केलं. या सगळ्या खेळांबाबत चर्चा घडवणारं, त्यांची माहिती देणारं हे पुस्तक. बाहुली, भातुकली, हादगा, सागरगोट्या, मल्लखांब, गंजिफा आणि इतर अनेक खेळांवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘खेळसंस्कृती आणि स्त्रिया’, ‘स्त्रियांचे पारंपरिक खेळ आणि पुनरुज्जीवनाच्या संधी’, ‘मंगळागौर आणि महिलांचे आरोग्य’, ‘व्रतांचे सांस्कृतिक महत्त्व’ आदी लेखांतून वैचारिक मंथनही करण्यात आलं आहे. आदिवासी स्त्रियांशी संबंधित खेळ, मैदानी खेळ, महिलांच्या खेळांशी संबंधित वेगवेगळ्या क्रीडा संस्था आदींबाबतही पुस्तकात माहिती आहे. डॉ. शुभांगना अत्रे यांनी संपादन केलं आहे. प्रतिभा धडफळे आणि शिल्पा वाडेकर कार्यकारी संपादक आहेत.

--------------------------------------------------------
महात्मा जोतिराव फुलेकृत सार्वजनिक सत्य धर्म (पुस्तकसार)
प्रकाशक - रमेश चव्हाण, पुणे (०२०- २५४३४९०७) / पृष्ठं - ६४ / मूल्य - १०० रुपये

महात्मा जोतिराव फुले यांनी आयुष्यभर सत्य, समता, स्वातंत्र्य, स्वावलंबन यांच्यासहित विविध विषयांवर सडेतोडपणे लिहिलं. त्यांचे प्रातिनिधिक विचार ‘सार्वजनिक सत्य धर्म’ या पुस्तकात एकत्रित करण्यात आले. ‘सत्यवर्तन करणारे’ असं कोणाला म्हणावं, याबाबतचे काही नियम महात्मा फुले यांनी या पुस्तकात दिले होते. रा. ना. चव्हाण यांनी याच पुस्तकातले मुद्दे ठळक करणारं, ते समजावून सांगणारं पुस्तकसार लिहिलं. काही ठिकाणी त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांची स्पष्टता, मूल्यात्मकताही वाचकांना नजरेस आणून दिली. त्या पुस्तकाबरोबर इतरही काही लेखांचा समावेश करून संपादक रमेश चव्हाण यांनी हे पुस्तक नव्यानं आणलं आहे. ‘एकेश्‍वरी फुले’, ‘एकेश्‍वरी समाजवाद’, ‘महात्मा फुले आणि ब्राह्मधर्म’ असे काही लेखही समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘सत्यशोधक व ब्राह्मसमाज’ हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा लेखही पुस्तकात समाविष्ट आहे.
--------------------------------------------------------
साभार पोच

  •  आधुनिक हिंदू धर्म का व कसा? / तत्त्वज्ञानविषयक / लेखक - अशोक गर्दे / अनुवाद - रवींद्र काळे / उत्कर्ष प्रकाशन, पुणे (०२० - २५५३७९५८) / पृष्ठं - ७६ / मूल्य - १०० रुपये
  •  गोष्ट पावसाची / पर्यावरण, विज्ञान / लेखक - विलास गोगटे / ऊर्जा प्रकाशन, पुणे (०२० - २५४३२३७४) / पृष्ठं - ३० / मूल्य - ४० रुपये
  •  शब्दब्रह्म / ओवीसंग्रह / कवी - जयंत दिवाण (९६०४९४५७२५) / अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर (९४२३०४१९६५) / पृष्ठं - ४० / मूल्य - ६० रुपये
  •  शेतीबाडी / खंडकाव्य / कवी - माधव गीर (८९७५८७८८०३) / चपराक प्रकाशन, पुणे (७०५७२९२०९२) / पृष्ठं - ६४ / मूल्य - ६० रुपये

--------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com