कुणीही येऊन शेतकऱ्यांनाच टपल्या मारायच्या का?

Farmer
Farmer

शेतकरी म्हणून "अन्नदाता', "जगाचा पोशिंदा' यांसारखी बिरुदे बोगसच वाटतात. शेती हा इतर व्यवसायांसारखाच एक व्यवसाय; मात्र तो व्यवसाय करणारा व्यावसायिक मात्र इतर व्यावसायिकांच्या तुलनेत कायम तोट्याच्या खड्ड्यात घुटमळणारा...

स्मिता पटवर्धन यांनी शेतकरीच जणु काय देशाच्या सर्व समस्यांचे मूळ आहे, अशा अविर्भावात आपली लेखणी दवडली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आताशी कुठे रेल्वे आल्यामुळे वा प्रगत दळणवळणामुळे एका ठिकाणी पिकलेले धान्य दुसरीकडे पाठवता येते. मग हडप्पा व इतर ठिकाणी सापडलेल्या बाजारपेठा व रेशिम वाहतुकीवरुन रेशीम मार्ग अशी नावं पडलेले जुने व्यापाराचे मार्ग हे स्वप्नरंजन असावं, असा त्यांचा समज झालेला दिसतोय.

लोकसंख्या वाढीचा ठेकाही फक्त खेडेगावातील जनतेने घेतलेला आहे. या मताची महानता कोणत्या शब्दात वर्णावी? कुठल्याशा निनावी महाविद्यालयाचा सर्व्हे. नागरी भागातील जनता ही पुढील पिढीची वीण करण्यात उदासीन आहे व होणारं अपत्य लिंगभेद न करता स्विकारणारी आहे, असा ग्रह दिसतो. नागरी समाज हा इतक्‍या उच्च पातळीच्या विचारांचा आहे; की एकाच आपत्यावर कुटुंब नियोजन करतो व त्यामध्ये स्त्रीभृण हत्याचे प्रमाण शून्य आहे. भरपूर प्रमाणात अपत्ये असल्यामुळे शेतीचे अनेक तुकडे होतात, असं म्हणताना त्या इथे सोयीस्करपणे विसरतात की ग्रामीण संस्कृती ही एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत एकत्र कुटूंब पद्धतीची होती.

शेतकरी पिकवतो म्हणुन जग जगते, अशा भावनिक ब्लॅकमेलिंगमुळेच आजपर्यंत शेतकरी खितपत पडला आहे. अन्न, वस्त्र, निवारा या गरजांखेरीज कुठलीही गरज जीवनावश्‍यक नाही. बाकीच्या गरजा सेवा प्रकारात मोडतात. प्रत्येक व्यक्ती ही पोटासाठी राबते; तेव्हा शेतकरीही मुख्यत्वे पोटासाठीच पिकवतो. तो काही टीव्ही, फ्रिज, घड्याळ अशांचं उत्पादन घेत नाही. या जगात निसर्गाशिवाय कोणीही कोणावर उपकार करत नाही. कुणीतरी टीव्ही पाहतो म्हणुन कोणीतरी तो बनवतो. कुणी पाहण्यासाठी खरेदीच केला नाही तर तो बनवणारच नाही व बेरोजगारी होऊन भुकेने मरु शकतो. याप्रमाणे जर कोणी धान्य घेतलं नाही तर शेतकरी मरणार नक्कीच नाही. पण शेतकऱ्याव्यतिरीक्त किती जिवंत राहु शकतात? ही काही वल्गनांची घोडी नाही; हे सत्य आहे.

पुढे बाईंनी नव्या आयटी क्षेत्राशी तुलना करत जणु काही शेतकरी गलेलठ्ठ पगारदारांवर जळतोय, असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या म्हणतात, आयटीवाल्यांना त्यांच्या कामामुळे टीबी, ब्लडप्रेशर इ. त्रास होतात. ते क्षेत्र त्यांनी आनंदाने व येणाऱ्या पैशाच्या नोटांकडं बघुन निवडलं आहे. माझ्यासारख्या शेतकऱ्याला तरी ऊन,वारा आणि पावसाचा काही त्रास होत नाही. हे मी स्वतः निवडलेलं क्षेत्र आहे. होणारा फायदा तर लाटायचा, वर कुणकुण करायची, अशी सवय आम्हाला नाही. वातानुकुलन हे कंप्युटरसाठी असते या शोधावरुन आता समस्त घरातील वातानुकुलित यंत्रणा काढायला हरकत नसावी. महत्वाचं म्हणजे असं केल्यास ओझोनच्या थराला जी हानी पोहचत आहे यामुळे तीही कमी होईल नाही का? आणि आयटी क्षेत्रातल्या किती टक्के कुटुंबात एक आणि एकच अपत्य आहे? तेही मुलगा व मुलगी असा भेदभाव न करता...

शेतकऱ्यांनी आम्ही अन्नदान करतो, असा डांगोरा पिटल्याचा कधी आठवत नाही. विदेशात सिलिंग लावुन जमिनी सरकारात जमा करण्याची पद्धत आहे व पिकाऊ जमिन औद्योगिक क्षेत्राखाली व इतर विकासकामांमधे गुंतवली जात नाही. त्यामुळे तिथे मुबलक जमिन आहे. उदाहरणादाखल माझ्या स्वतःच्या शेतजमीनीमधून प्रस्तावित रिंग रोड प्रकल्प आहे. तो जमिनीवरुनच जाणार आहे, हवेतून नाही. बाकी बाईंनी लेखात पोरवड्याची इतकी री ओढली आहे, की सगळी 130 कोटी लोकसंख्या शेतकऱ्याचीच आपत्ये आहेत काय, अशी शंका वाटू लागली आहे. अर्ध्या एकराची द्राक्षंबाग, अजून तरी माझ्या पाहणीत नाही. आणि राहता राहिला सरकारी मदतीचा प्रश्न... तर बारा रुपये असे मोठ्या रकमेचे चेक येतात अधून-मधून. मग मोठ्ठ पोतं घेऊन जावं लागतं... शेतीसाठी कोणतंही स्वतंत्र बजेट नाही. मग कुठला समुद्र शेतकऱ्यांनी आटवला आहे?

शेतकरी इतर उत्पादकांप्रमाणे आपल्या उत्पादनाची उत्पादन खर्चा आधारीत किंमत ठरवू शकत नाही. यावर उत्तर काय तर म्हणे वस्तु विकण्याची निकड नसते. एकीकडं म्हणायचं की प्रत्येकजण पोटासाठी राबतो व विकतो; मग विकण्याची निकड नेमकी शेतकऱ्यांनाच का नाही वाटत? गरज तर आहे. जर बाजारात मागणीच नसती; तर पोटापुरतच पिकवलं गेलं असतं. जास्त उत्पादन घेण्याची हौस कोणत्याही उत्पादकाला. तेव्हा निकड निर्माणच करायची झाली तर एक-दोन वर्षे शेतकऱ्यांनी जर पोटापुरतच उत्पादन घेतलं व उरलेलं कुठल्याही स्वरुपात बाजारात आणलं नाही; तर उद्भवणाऱ्या परिस्थितीस शेतकऱ्याला जबाबदार धरणार का? अर्थात शेतकऱ्यांना जबाबदार धरणार असाल तर कुठल्या आधिकाराने?

पर्यावरणाचा सर्वात जास्त ऱ्हास शेतकरी करतो. कारण सर्व विकास हा फक्त अन फक्त शेतकऱ्यासाठीच केला जातो बरं का.. ओझोनचा थर शेतात गेल्यागेल्या थोडा गट्टम करुनच इतर कामे केली जातात... आणि ते विशेष म्हणजे रासायनिक शेतीनं वाट लावली वगैरे. तर विदेशात विना मातीची शेती तंत्रज्ञानानाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर केली जाते, ती काय सेंद्रीय पद्धतीने का? असो, पोरवडांची लांबड मोठी आहे. प्रत्येक पॅराग्राफ मध्ये...पण 130 कोटी जनता शेतकरी नाही हेही तितकच खरं..!

शेवटी अभ्यासोनि प्रगटावे.....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com