..स्किलबरोबर विल महत्त्वाचं ! सुनंदन लेले

..स्किलबरोबर विल महत्त्वाचं ! सुनंदन लेले

झटपट क्रिकेटमध्ये पूर्वीपेक्षा जास्त पैसा मिळतोय; पण देशासाठी खेळणं केव्हाही महत्त्वाचं असं सागून सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स म्हणाले ः ‘देशाचं प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंना ‘ट्‌वेंटी-२०’ क्रिकेटमध्ये जास्त पैसे मिळायला हवेत. तुम्ही खेळाडू म्हणून देशाचं प्रतिनिधित्व केलेलं नसलं तर त्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या पैशावर बंधन असायला पाहिजे, जेणेकरून त्या खेळाडूला देशाकरिता खेळण्याचं महत्त्व कायम जाणवत राहील.’

वेस्ट इंडीजला जायची संधी मला पाच वेळा लाभली आहे. दरवेळी दौरा संपताना हायसं वाटायचं कारण वेस्ट इंडीजमध्ये फिरायला येणे जितकं आनंदाचं आहे तितकंच इथं जास्त दिवस राहणं कठीण आहे. एक तर इथं प्रत्येक गोष्ट अनावश्‍यक महाग आहे. अगदी साध्यातलं साधं हॉटेलही उगाच वाट्टेल तो दर सांगतात आणि टॅक्‍सीचालकही मनाला येईल ते भाडं आकारतात. दुसरी बाब म्हणजे इथली मंडळी फारच निवांत आहेत. कुणालाही कामाची घाई नसते. तिसरी बाब म्हणजे पत्रकार म्हणून काम करण्यासाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या बाबी इथं उपलब्ध नाहीत. आता परिस्थिती जरा सुधारली आहे, नाहीतर इंटरनेट वगैरे गोष्टी कमालीच्या अवघड होत्या. तरीही वेस्ट इंडीज दौरा जाहीर झाला की माझ्या मनात इकडं येण्याची उर्मी अनावर होते. इथं यावसं वाटतं. कारण काहीतरी जादू आहे या बेटांमध्ये आणि इथल्या लोकांच्यात जी तुम्हाला खेचून घेते. इथल्या आकर्षणाची गोष्ट म्हणजे इथला नयनरम्य निसर्ग आणि बऱ्याच वेळा मी इथं आल्यानं झालेले मित्र.


सर रिचर्ड्‌स यांच्या टिप्स ऐकताना भारतीय खेळाडू.

दौऱ्यावर जाणापूर्वी पुण्यात विराट कोहलीबरोबर भेट झाली असता त्यानं सर व्हिवियन रिचर्डस्‌ यांना भेटायची इच्छा व्यक्त केली होती. वेस्ट इंडीज दौरा नक्की झाल्यावर मी त्यादृष्टीनं तयारी करायला सुरवात केली. कारण पहिलाच कसोटी सामना सर रिचर्डस्‌ राहतात त्या अँटीग्वा देशात होणार होता. सरांना विनंती केल्यावर भेटायला नक्की आवडेल असा निरोप त्यांनी दिला. मग विराट आणि अजिंक्‍य रहाणेशी बोलून १८ जुलैला संध्याकाळी भेटता येईल का, असं त्यांना विचारलं. सर तयार झाले. जरा गडबड अशी होती की मी नेमका त्याच दिवशी अँटीग्वाला पोचणार होतो. दुपारी न्यूयॉर्कहून आमचं विमान वेळेवर पोचलं. बाकीवेळा मिळत नसलेला ‘ऑन अरायव्हल व्हिसा’ मला अँटीग्वाला क्रिकेटकरिता अगोदर बऱ्याच वेळा येऊन गेल्यानं मिळाला. भारतीय संघ राहात असलेल्या ‘शुगर रिज’ हॉटेलात सायंकाळी साडेसात वाजता सर व्हिवियन रिचर्डस्‌ भेटायला येणार हे पक्कं झालं. मग भेटीच्या आतुरतेनं मनात धाकधूक व्हायला लागली. 

वेळ ठरली होती साडेसात. कोहली आणि रहाणे अगदी वेळेवर तयार होऊन लॉबीत आले, पण सरांचा आठ वाजेपर्यंत काहीच पत्ता नव्हता. मला काळजी वाटू लागली आणि आठ वाजता माझाही धीर सुटू लागला, त्याचवेळी निळ्या रंगाची रेंज रोव्हर गाडी हॉटेलच्या गेटमधून आत आलेली दिसली आणि मला हायसं वाटलं. गाडीतून निळी जीन्स आणि काळा टी शर्ट घातलेले सर खाली उतरले आणि त्यांच्या खास शैलीत चालत येऊ लागले. वातावरण एकदम बदलून गेलं. मी जाऊन सरांना भेटलो आणि त्यांचं स्वागत केलं. पाठोपाठ कोहली आणि रहाणे येऊन आमच्यात सहभागी झाले आणि मग गप्पा सुरू झाल्या. लॉबीत उगाचच रेंगाळणाऱ्या के. एल. राहुल, शिखर धवन, स्टुअर्ट बिन्नी, मुरली विजय यांना सर आलेले पाहून राहावेना आणि तेसुद्धा आमच्या गप्पा ऐकू लागले.  
‘‘मला विराटचा मैदानातला वावर जाम आवडतो...डोळ्याला डोळा भिडवून तो गोलंदाजांना आणि कठीण प्रतिस्पर्ध्याला सामोरा जातो ते मला भावतं...विराट तू ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली शतकं मी बघितली...मजा आली तुझी बॅटिंग बघताना... मोहंमद अलीचं ते वाक्‍य मला आठवतं तो म्हणतो, ‘स्किल तुम्हाला एका उंचीवर घेऊन जाईल, पण विल म्हणजे मनाचा निग्रह तुम्हाला फार उंची गाठायला मदत करेल...जे कौशल्यानं साध्य करता येत नाही ते मनोनिग्रह करून साध्य करता येतं’ सर बोलत होते आणि उपस्थित सगळे खेळाडू कान देऊन ऐकत होते.

सर व्हिवियन रिचर्ड्‌स यांच्याबरोबर सेल्फी काढायचा मोह विराट कोहलीलाही आवरला नाही.

‘मैदानात गोलंदाज सतत आक्रमकतेनं वावरत असतात. त्यांच्या गोलंदाजीत धार असते, तसाच त्यांच्या देहबोलीत एकप्रकारचा उर्मटपणा असतो. मला वाटतं फलंदाजानं खेळपट्टीवर खंबीरपणानं उभं राहून त्याला उत्तर द्यायचं असतं. विराटमध्ये मला माझंच काहीसं रूप दिसतं. आक्रमकपणानं खेळत राहणं सगळ्यांना जमत नाही. ते मुळात असायला लागतं. मनातली आग जागी ठेवून मोठी खेळी उभारणं हे साधं काम नाही. विराट ते करून दाखवतो याचं मला कौतुक आहे. पण मला याबाबतीत असं आवर्जून सांगावंसं वाटतं की हे स्वभावतः जमलं तर ठीक आहे. तसा स्वभाव नसला तर उगाच तसं दाखवणं चुकीचं ठरतं. आता अजिंक्‍यचं उदाहरणं घ्या, हा लहान चणीचा मुलगा फलंदाजी किती आक्रमक करतो, पण एक शब्द मगापासून तो बोललेला नाही, अजिंक्‍य मला वाटतं तुला बॅटनं बोलणं आवडतं...गुड मॅन गुड मॅन’’,’ असं म्हणत सरांनी रहाणेला जवळ घेतलं, तेव्हा रहाणे त्यांच्या मोकळेपणानं आणि त्यांनी केलेल्या कौतुकानं संकोचला होता.

भारतीय खेळाडू सरांना सांगत होते की, त्यांच्या आक्रमक खेळीमुळं त्या सगळ्यांना कसं प्रोत्साहन मिळालं आहे. त्यांच्यासारख्या अत्यंत आक्रमक खेळाडूनं यावेळी बोलताना जो मुद्दा सांगितला तो फार मोलाचा आहे. ते म्हणाले, ‘आक्रमकता म्हणजे दरवेळी फटकेबाजी नसते. वेगवान गोलंदाजानं जोरानं टाकलेल्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर शेवटपर्यंत नजर न हटवता सोडून देणं किंवा चांगल्या आउटस्विंग चेंडूला सोडणं यातूनही गोलंदाजाला संदेश जातो की कोण दादा आहे...आजचे फलंदाज बचाव करताना चेंडू काहीसा ढकलतात, कारण सगळ्यांनाच प्रत्येक चेंडूवर धाव हवी असते. मला वाटतं की जेव्हा तगड्या वेगवान गोलंदाजाला किंवा भन्नाट फिरकी गोलंदाजाला चांगला फलंदाज एकदम डेड डिफेन्स करतो ते बघूनसुद्धा तो गोलंदाज मनोमन घाबरतो...कारण ज्या फलंदाजाचं तंत्र चांगलं असतं आणि ज्याला बचाव करताना कुठलीच भीती वाटत नाही, तोच वेळ आल्यावर खरोखर आणि जोरदार आक्रमण करू शकतो.’’ ते पुढं म्हणाले, ‘कसोटी सामन्यात तुम्ही खेळपट्टीवर कसं उभं राहू शकता यावर सगळं अवलंबून असतं.

थोडा काळ असा असतो, ज्यावेळी गोलंदाज भरात असतात त्यावेळी काहीसं नमतं घेतलं की मग गोलंदाज थकल्यावर आणि चेंडू जुना व्हायला लागला की जम बसलेला फलंदाज राज्य करू शकतो. सुनील गावसकरच्या फलंदाजीत हे सगळे गुण दिसून यायचे. म्हणूनच गावसकर मोठमोठ्या गोलंदाजांसमोर सुंदर फलंदाजी करू शकला’’, सरांनी कसोटी क्रिकेटच्या फलंदाजीचा मूलमंत्रच दिला होता.

झटपट क्रिकेटमधून खेळाडूंना मिळणाऱ्या वारेमाप पैशांची सरांना चिंता आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘आजच्या खेळाडूंना क्रिकेट खेळून चांगले पैसे मिळतात याची मला चिंता यासाठी वाटते की झटपट क्रिकेट खेळून इतके पैसे मिळाले तर मग त्यांच्या मनात देशाकरिता खेळण्याची आग राहील का? बरेच खेळाडू फक्त ‘ट्‌वेंटी-२०’ क्रिकेट खेळून समाधानी होण्याची शक्‍यता मला जाणवत आहे. भरपूर कसोटी क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंनाही चांगले पैसे मिळत नाहीत इतके पैसे ‘ट्‌वेंटी-२०’ क्रिकेट खेळून मिळू लागलेत. मग खेळाडूंना देशासाठी खेळण्याचं महत्त्व वाटणार कसं? मला वाटतं की देशाचं प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंना ‘ट्‌वेंटी-२०’ क्रिकेटमध्ये जास्त पैसे मिळायला हवेत. तुम्ही खेळाडू म्हणून देशाचं प्रतिनिधित्व केलेलं नसलं तर त्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या पैशावर एक विशिष्ट बंधन ठेवायला हवं जेणेकरून त्या खेळाडूला देशाकरिता खेळण्याचं महत्त्व कायम जाणवत राहील. मला सर्वात चिंता गोलंदाजांची आहे. चार षटकं टाकून इतका पैसा आणि प्रसिद्धी मिळायला लागली तर कसोटी क्रिकेटमध्ये मोठे मोठे स्पेल टाकायची मेहनत कोण करेल?’’, सरांच्या यांच्या या वक्तव्याला कोहलीनं सहमती दर्शवली.

गप्पा रंगल्या होत्या तसेच खेळाडूंना सर रिचर्डस्‌ यांच्याबरोबर फोटो, त्याचबरोबर सेल्फी काढायचा होता. कुठलाही भाव न खाता सरांनी हजर असलेल्या सगळ्या खेळाडूंसोबत फोटो आणि सेल्फी काढले. सर रिचर्डस्‌ यांच्यासारख्या महान व्यक्तीला भेटवस्तू काय द्यायची हासुद्धा मोठा प्रश्‍न पडतो. कारण क्रिकेटदेवानं त्यांना सगळंच दिलं आहे, मग आपण काय देणार? त्यामुळं मी पुण्याहून ‘चिंटूकार’ चारुहास पंडित यांनी तयार केलेली लाकडातून साकारलेली चार्ली चॅप्लीन यांची फ्रेम आणली होती. सरांना ती फ्रेम देताना कोहली आणि रहाणेला सोबत घेतलं. ‘मॅन, चार्ली चॅप्लीन इज माय ऑल टाइम फेव्हरिट... धीस इज सो ब्युटीफूल’’, असं म्हणत सरांनी तोंडभरून दाद दिली. मी म्हणालो ‘सर तुम्ही तुमच्या खेळानं आम्हा सगळ्यांना इतका आनंद दिला आहे की त्याची तोड नाही. तुमच्या खेळातून आम्हाला इतका आनंद मिळाला की आम्ही मनापासून हसलो रडलो...जे नेमकं चार्ली चॅप्लीन यांनी केलं, म्हणून तुम्हाला ही फ्रेम दिलीय.’’  

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी प्रवासाला निघालो तेव्हा विमान लंडनमार्गे होतं. लंडनमधे रविवारी सचिन तेंडुलकरला भेटायची संधी मिळाली. सोमवारी अँटीग्वामधे पाऊल ठेवल्यावर सर व्हिवियन रिचर्डस्‌ यांच्यासोबत बराच वेळ घालवता आला. दौऱ्याच्या सुरवातीलाच दोन मोठ्या ‘ब्रेकिंग न्यूज’ मिळाल्यानं माझ्यातल्या पत्रकाराला मिळालेलं सुख अवर्णनीय होतं. त्यामुळं सुरवातीलाच मी सांगितलं ना, की हेच सर्वात मोठं कारणं आहे की कितीही असुविधा असू देत मी वेस्ट इंडीज दौऱ्याची घोषणा झाल्यावर लगेच बॅगच भरायला घेतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com