सध्या कोणतं पुस्तक ‘ऐकताय’

नितीन थोरात
सोमवार, 23 एप्रिल 2018

सध्या कोणतं पुस्तक ‘ऐकताय’, असा प्रश्‍न हल्ली ऐकायला मिळतो. आता पुस्तक ऐकण्याचं युग चालू झालंय. हातातली पुस्तकं कागदावरून लॅपटॉपमध्ये कधी गेली आणि मोबाईलमधून कधी ती आपल्या कानापर्यंत पोचली हे कळलंही नाही. ‘ऑडिओ’ पुस्तकांच्या प्रवासाविषयी...

मी सात- आठ वर्षांचा असेल. तेव्हा घराशेजारी राहणारे सुदामनाना रोज दुपारी माहेरची साडी पिक्‍चरची कॅसेट टेपमध्ये लावायचे. त्या वेळी माहेरची साडी पिक्‍चरची ऑडिओ कॅसेट आली होती. कॅसेट चालू झाल्यावर माझी आज्जी रोज दुपारी लिंबाच्या झाडाखाली बसून धान्य निवडताना ती कॅसेट ऐकत डोळे पुसायची.

मोठा झालो आणि कॉलेजला जाऊ लागलो. तेव्हा वेगवेगळ्या कथा, कादंबऱ्या वाचत त्यामध्ये गुंतून मीसुद्धा डोळे पुसू लागलो. पिक्‍चर पाहतानाही अशीच गत व्हायची. देवदास पिक्‍चर पाहताना आम्ही कॉलेजमधले चार मित्र रडल्याचं मला आजही आठवतं. आता काळ बदलला. माध्यमे बदलली, मात्र माणसांचे स्वभाव काही बदलले नाहीत. ऐकताना, वाचताना, पाहताना माणूस एखाद्या माध्यमामध्ये पूर्णपणे गुंतून जातो. त्याच्याशी एकरूप होतो. पण आजीचं कॅसेट ऐकणं, माझं पुस्तक वाचणं आणि मित्रांचं चित्रपट पाहणं या तीनही गोष्टींमध्ये मला एक गोष्ट वेगळी वाटत होती, ती म्हणजे आजी दुसरं काहीतरी काम करता करता त्या कॅसेटचा आनंद घेत होती. म्हणजे ती एकावेळी दोन कामं करत होती. पुस्तक पाहताना किंवा चित्रपट पाहताना मला तसा ऑप्शन नव्हता. या तिन्ही उदाहरणांत मला आजी सर्वांत जास्त लकी वाटली, कारण तिचा वेळ वाचत होता. 

सध्याच्या धावपळीच्या काळात वेळेइतकं दुसरं काहीच मौल्यवान नाही. अशावेळी पुस्तकातलं ज्ञान मिळावं आणि वेळही वाचावा यासाठी ‘ऑडिओ बुक’ हा पर्याय मला सर्वांत उत्तम वाटतोय. तुम्ही तुमचं काम करत राहा, पुस्तक तुमच्या कानात बोलत राहील. म्हणजे पुस्तकासाठी वेगळा वेळ देण्याची गरज आता राहिली नाही. वाचन केल्यानं शंभर टक्के ज्ञान मिळत असेल. पण ऐकून निदान सत्तर टक्के तरी मिळू शकतं. काहीच न मिळण्यापेक्षा सत्तर टक्के काय वाईट आहे? 

पूर्वी पुस्तकं तयार व्हायची आणि त्यांची जाहिरात, परीक्षणं वर्तमानपत्रात छापून यायची. अजूनही तो प्रकार आहे. पण त्यापुढं जाऊन आता पुस्तकं आवाजाच्या माध्यमातून रेकॉर्ड होताहेत आणि त्याचे व्हिडिओ ट्रेलर बनताहेत, हा केवढा मोठा बदल म्हणावा लागेल. ‘ऐकायच्या पुस्तकाचे व्हिडिओ ट्रेलर,’ ही पुस्तकांच्या क्षेत्रातली मोठी क्रांती म्हणावी लागेल. स्वीडनची सर्वांत मोठी ‘स्टोरीटेल’ ही ऑडिओ बुक कंपनी मागच्या वर्षी भारतात आली. त्यांनी सर्वप्रथम हा प्रयोग केला. आजवर पुस्तकांच्या जाहिराती आपण फक्त वर्तमानपत्रात पाहिल्या असतील. ‘स्टोरीटेल’नं अशा जाहिराती एलईडी बोर्डवर झळकवल्या. यातील अभिमानाची बाब म्हणजे ही कंपनी फक्त मराठी आणि हिंदी भाषेतील पुस्तकं डोळ्यांसमोर ठेवून भारतात आली. नवोदित लेखकांना चांगले पैसे देऊन त्यांनी लेखनाला प्रोत्साहन दिलं आणि प्रसिद्ध लोकांच्या आवाजात पुस्तकं रेकॉर्ड केली. 

‘स्नोवेल’ ही दुसरी ऑडिओ बुक कंपनी. त्यांची पुस्तकं कानात ‘जिवंत’ होतात. प्रत्येक प्रसंगानुसारचे आवाज ते रेकॉर्ड करतात. म्हणजे त्यांची पुस्तके ऐकताना कानात वीज कडाडते. वाघ डरकाळी फोडतो. त्यामुळं पुस्तकातील प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. ही झाली मराठीतल्या ऑडिओ बुक कंपन्यांची काही प्रमुख उदाहरणं. याशिवाय ऑडिओ बुकचे वेगवेगळ्या भाषांतील कितीतरी ॲप गुगल प्लेस्टोरवर उपलब्ध आहेत. सध्या ऑडिओ बुकचे महत्त्व इतके वाढले आहे, की लेखक म्हणून एखाद्याचं आत्मचरित्र लिहायला घेतल्यास त्यांना पुस्तक, ई-बुकसोबतच ऑडिओ बुकही अपेक्षित आहेत. म्हणजे लोकांकडे वाचनासाठी पुरेसा वेळ शिल्लक नाही, हे प्रत्येकाला कळून चुकलं आहे.

यातून लेखक म्हणूनही चांगले पैसे मिळतात. लेखक आणि चांगला पैसा, हे कधी न जमलेले सूत्र ऑडिओ बुकनं जमवून आणलं आहे. त्यामुळं ऐकणाऱ्याच्या दृष्टीनं आणि लिहिणाऱ्यांच्या दृष्टीनेही ऑडिओ बुक हा उत्तम पर्याय तयार झाला आहे.

Web Title: World Book Day nitin thorat audio book