...पुस्तकांना काही सांगायचंय!

...पुस्तकांना काही सांगायचंय!

जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा! ग्रंथसंस्कृतीचे कृतज्ञ स्मरण देणारा हा दिवस आपली वाटचाल उत्कर्षाच्या दिशेने सुरू ठेवण्यासाठी वर्षानुवर्षे सहाय्यभूत ठरलेला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने (युनेस्को) १९९५ पासून २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. ही तारीख निवडण्याचे कारण यादिवशी अनेक दिग्गज लेखकांची जयंती अथवा पुण्यतिथी आहे. जगप्रसिद्ध नाटककार व कवी विल्यम शेक्‍सपिअरचा यांचा या तारखेशी फार मोठा योगायोग जुळलेला आहे. त्यांचा जन्म आणि मृत्यू दोन्हींची तारीख २३ एप्रिलच. जगद्विख्यात पत्रकार जोसेफ प्ला आणि पेरू देशाचे महान लेखक व इतिहासकार इंका गारसीलासो डी ला वेगा यांची पुण्यतिथीही याच दिवशी येते. 

प्रकाशन व्यवहार हा इतर उद्योग व्यवसायासारखा भाग नाही. ते एक सांस्कृतिक जबाबदारीचे काम आहे. जगामध्ये जी राष्ट्रे साहित्य, कला आणि संस्कृती क्षेत्रात समृद्ध आहेत, तिथे साहित्य व्यवहाराचा खूप आदर केला जातो; मात्र दुर्दैवाने आपल्याकडे याबद्दल दुर्लक्षच होत आले आहे. खरेतर राष्ट्राच्या संपत्तीचा भाग म्हणून ज्ञानाला प्रबोधन प्रगती अन्‌ परिवर्तनाचे प्रमुख साधन ग्रंथ आहेत. ते निर्माण करणारे ग्रंथकार, लेखक हे महत्त्वाचे घटक आहेत. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. देशाच्या प्रगतीत संशोधन, उद्योग-धंदे, उत्तम प्रशासन या गोष्टींसोबत समृद्ध साहित्यनिर्मिती व प्रकाशनही एक भाग आहे, हे आजच्या जागतिक पुस्तकदिनी सर्वांनी समजून घेतले पाहिजे.

प्रकाशन व्यवसाय बदलतोय...
काळ बदलला. समाजव्यवस्थेत बदल झाले. विद्यार्थिदशा बदलली; तसेच पालकनीतीतही बदल झाले. बदलती नीतिमूल्ये, स्त्री-पुरुष सहजीवन, करिअर ओरिएंटेड शिक्षणव्यवस्था व त्यानुसार समाजजीवन बदलले. वेगवान जीवनशैली, त्यातून येणारे ताणतणाव, वाढती स्पर्धा, स्वतःला सिद्ध करण्याचा अट्टहास यांमुळे एकंदरीत बाजारातील सर्व उत्पादनांच्या मागणीत बदल झाला; पर्यायाने पुस्तक जगतातही या बदलाचे पडसाद न उमटले तरच नवल! फेसबुक, व्हॉट्‌सॲप यासारख्या समाजमाध्यमांमुळे आज पुस्तकाबद्दलची माहिती सर्वदूर पोचवणे खूप सुलभ झाले आहे. वाचकांजवळ पूर्वीइतका पुस्तक वाचनासाठी वेळ उपलब्ध नसला, तरीही प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलवरून ब्लॉग्ज, सोशल मीडियावरचे लेखन, तसेच ई-बुक्‍सच्या वाचनाचे प्रमाणही लक्षणीय वाढले. ई-बुक्‍सची वाढती मागणी लक्षात घेऊन आम्ही मागच्या वर्षभरापासून ॲमेझॉनवर पुस्तक उपलब्ध करून दिली. यामध्ये ज्या पुस्तकांची आवृत्ती संपलेली आहे, अशी पुस्तकंही जगभरातील वाचकांना वाचता येतात. मोबाईल फोनचा वाढलेला वापर, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर उपलब्ध असणारे कार्यक्रम यांमुळे पुस्तकांची मागणी तुलनेने कमी झाली असली, तरी एकंदरीत साक्षरतेच्या वाढत्या टक्केवारीमुळे पुस्तकांच्या मागणीत वाढ होईल, अशीच अपेक्षा आहे.

शासनाच्या बदलत्या आर्थिक धोरणांमुळे (उदा. नोटबंदी, जीएसटी) गावोगावी होणाऱ्या पुस्तकविक्रीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. एका वर्षात पुस्तकांच्या दोन आवृत्त्या जिथे संपत, तिथे आता एकच आवृत्ती संपते, असे सध्याचे चित्र आहे. 

आमच्या प्रकाशन संस्थेने उभारणीच्या काळात परंपरागत अक्षर साहित्य प्रकाशित केले, तर आता नवीन पिढीची गरज आणि साहित्याबद्दलचा आजचा दृष्टिकोन जाणून साहित्यप्रकारात अनेक नवे बदल केले.

कोणत्याही उत्पादनाच्या निर्मितीप्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाला अनुसरून बदल करावेच लागतात, तरच तुमची निर्मिती कालसुसंगत व अद्ययावत राहते. पूर्वी ट्रेसिंग करून पुस्तक छपाई करत, त्यात बऱ्याचदा चित्रे काळवंडलेली व धूसर दिसणे, पानांचा क्रम मागेपुढे होणे, अशा त्रुटी असत. आता कॉम्प्युटर टू प्लेट (सीटीपी) ही नवीन पद्धत अवलंबली जाते. यामुळे छपाईची गुणवत्ता वाढली आणि दर्जेदार पुस्तकनिर्मिती शक्‍य झाली.

वाचकच केंद्रस्थानी
वितरण जगतात आपला पाया अधिक मजबूत करण्यासाठी साकेत प्रकाशनाने १२ वर्षांपूर्वी पुण्यासाठी शाखा उघडली. त्यामुळे मराठवाड्यासोबतच कोल्हापूर, मुंबई या भागासाठी पुस्तकांचे वितरण करणे सोपे झाले. 

वाचकांच्या बदलत्या अभिरुचीनुसार आज चरित्रे, आत्मचरित्रे, स्व-मदत पुस्तके (Self-help) आरोग्य, मन:स्वास्थ्य, स्व-प्रेरणादायी (Self-Motivational) पुस्तकांना भरपूर मागणी असते. असे असले तरीही अभिरुचीसंपन्न साहित्यकृतींच्या अनुवादासोबतच नवीन कसदार कादंबऱ्या, कथा, ललित साहित्य असे साहित्यप्रकार चवीने वाचायला वाचकांना आवडते. थोडक्‍यात, दरवर्षी हजारोंनी पुस्तके छापली जात असली, तरी चोखंदळ वाचक कसदार लिखाणाच्या शोधात असतातच. आज आम्ही चरित्रे, विज्ञानविषयक किंवा शेतीविषयक पुस्तके तयार करून घेताना तज्ज्ञ लेखक, अनुभवी संपादक, चित्रकार अशांचा एक उत्तम संघ बनवून ते काम करतो; कारण उत्तम पुस्तकनिर्मितीचा उद्देश त्यामुळे सफल होतो. उत्कृष्ट मुखपृष्ठ, दोषविरहित छपाई व आकर्षक मांडणी असणाऱ्या पुस्तकांना वाचकांची पसंती मिळते. काहीवेळा वाचकांच्या मागणीनुसार बदलत्या अभिरुचीचा विचार करून लेखकांना विशिष्ट विषयांवर पुस्तक लिहिण्याची विनंती केली जाते. ‘साकेत’ची परंपरा सांभाळताना प्रथितयश लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्याबरोबरच नवोदित लेखकांनाही प्राधान्य दिले जाते. वाचकांना वाजवी किमतीत परिपूर्ण पुस्तक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.

आज सर्वांकडेच वेळेची कमतरता असतानाही चांगल्या पुस्तकांना, प्रकाशन सोहळे वा व्याख्यानांना वाचक उत्तम प्रतिसाद देतात. ग्रंथ प्रदर्शने व पुस्तकांच्या दुकानांना आवर्जून भेट देतात. वाचकांच्या संपर्कात राहण्यासाठी आम्ही पुस्तकांच्या वेगवेगळ्या योजना, घरपोच पुस्तकसेवा व ई-बुक्‍सच्या माध्यमांतून कायम जोडलेले असतो. सोशल मीडियाची मदत घ्यायची झाली, तर समजा एखाद्या पुस्तकाचे मार्केटिंग करण्यासाठी त्याची ओळख करून देणारा छोटासा व्हिडिओ आपण केला, तो फेसबुक, यू ट्यूब, व्हॉट्‌सॲप द्वारे व्हायरल केला, तर नेटिझन्सना आपल्या पुस्तकांची चांगली ओळख होईल. आज कथा, कादंबऱ्या वाचल्या जात नाहीत वगैरे गोष्टी मला पटत नाहीत. आजही ऑनलाइन खरेदीत फिक्‍शन्स जास्त विकली जातात.

लेखकांचे मार्केटिंग व्हावे
मी काही वर्षांपासून जर्मनीतील फ्रॅंकफर्ट बुकफेअर, लंडन बुकफेअरला आवर्जून जातो. तिथे लिटररी एजंट्‌स असतात. वेगवेगळ्या देशांची दालने असतात. ते आपल्या लेखकाला प्रमोट करण्यासाठी फार मेहनत घेतात. त्याचे कॅटलॉग्ज्‌ तयार करतात, सिनॉप्सिस बनवतात. एखादा छोटासाच देश असतो; पण तो आपल्या लेखकाला विशेष उंचीवर नेऊन त्याचे प्रमोशन करतो. तसेच आपल्या प्रकाशकांनी आपल्याकडच्या लेखकांचे मार्केटिंग केले पाहिजे. तिथे भारताने आपले इंग्लिश कॅटलॉग तयार करून ‘क्‍लासिक वर्क’ मांडले पाहिजे. दिल्ली वर्ल्ड बुक फेअरला दरवर्षी एका अतिथी देशाला विशेष मान दिला जातो. गेल्या वर्षी यात पाकिस्तानातले मोठे लेखक, त्यांची पुस्तके यांची ओळख करून देण्यात आली. असे प्रयोग वाढले पाहिजेत.

माझे वडील बाबा भांड नेहमी म्हणतात, की पुस्तक प्रकाशनाचा उद्योग हा काही इतर उद्योगांसारखा केवळ नफा कमावण्याचा उद्योग नसतो. ते एक सामाजिक, सांस्कृतिक उत्तरदायित्व असलेले जबाबदारीचे काम आहे. पुष्कळदा पुस्तकाच्या जाहिरातीचा खर्च हा निर्मितीच्या खर्चापेक्षा कमी असतो. त्यामुळे वृत्तपत्रे, इतर मीडियाने प्रकाशन व्यवसायाला मनोरंजनाच्या वर्गातच जाहिरात दरआकारणी केली पाहिजे, अशी वाजवी अपेक्षा आहे.

मुले ही आमची खरेतर राष्ट्राची संपत्ती असतात. मुलांवर संस्कार करण्याचे काम मुख्यतः पालक, शिक्षक, मित्र, परिवार आणि पुस्तक वाचनातून होत असते. आपला मुलगा विशिष्ट क्षेत्रात पारंगत व्हावा, असे पालकांना वाटणे योग्यच आहे. त्याकरिता आपल्या मुलांवर वाचन संस्कार करणे ही आपलीच जबाबदारी आहे. या संस्कारातून मुले आपले स्वप्न पाहून आपल्या उद्दिष्टांपर्यंत उंच झेप घेतील; पण त्यासाठी त्या मुलांवर वाचन व लेखन संस्कार वाढविण्याचे राष्ट्रीय कार्य पालक, शिक्षक, प्रशासक या सर्वांनी प्रामाणिकपणे करण्याची आज नितांत गरज आहे आणि कोणत्याही चांगल्या कामाची सुरवात स्वत:पासूनच होत असते, हे लक्षात ठेवून आजच्या जागतिक पुस्तकदिनी हा संकल्प करूया. पुस्तकांना काही सांगायचे आहे, ते ऐकूयात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com