वेळ वाचवणारे 'स्मार्ट' सहायक (योगेश बनकर)

yogesh bankar technodost article in saptarang
yogesh bankar technodost article in saptarang

सध्याच्या धावपळीच्या युगात वेळेचं व्यवस्थापन करणं हे सर्वांत मोठं आव्हान असतं. त्यासाठी मोबाईलमधली वेगवेगळी ऍप्स आपल्याला मदत करू शकतात. अशाच काही उपयुक्त ऍप्सची माहिती...

एखादं महत्त्वाचं काम, जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस, महत्त्वाची मीटिंग आपण रोजच्या कामाच्या गडबडीत बऱ्याचदा विसरून जातो. इतकंच काय; पण घरातली लहान-मोठी कामंही दिवसभराच्या धावपळीत लक्षात राहत नाहीत. वेळ कमी पडतो, अशी बऱ्याच लोकांची तक्रार असते; पण खरं कारण आपल्याकडं वेळेचं नियोजन नसणं हे असतं. आपल्या स्मार्ट फोनमधल्या काही ऍप्सच्या मदतीनं मात्र आपली ही अडचण दूर होऊ शकते. आपल्या कामांची यादी करून वेळेवर त्याची आठवण करून देणारी ही ऍप्स तुमची "पर्सनल असिस्टंट' बनू शकतात.

टाइमट्यून (Timetune)
एखाद्या गोष्टीची आठवण, एखादा कार्यक्रम, दैनंदिन काम हे सगळं आपण या ऍपच्या मदतीनं न विसरता करू शकतो. भविष्यातल्या कुठल्याही एखाद्या कामाबाबत रिमाइंडर या ऍपमध्ये सेव्ह करून ठेवता येतो. वापरायला एकदम सोपं आणि भरपूर फीचर्स असलेलं हे ऍप वेळेचं आणि कामाचं नियोजन करण्यास मदत करतं.

क्‍लिअर (Clear)
या ऍपमध्ये वेगवेगळ्या याद्यांच्या स्वरूपात आपण आपली कामं ऍड करू शकतो. ऑफिसमधली कामं, वैयक्तिक कामं अशांसाठी वेगळी यादी या ऍपमध्ये करता येते. हे ऍप फक्त "आयओएस'साठी उपलब्ध आहे. हे ऍप "आयक्‍लाउड' सोबत जोडलं, तर तुम्ही वापरत असलेल्या आयओएसवर चालणाऱ्या इतर उपकरणांवरही वेळ आणि कामं याचं नियोजन करता येतं.

वंडरलिस्ट (Wunderlist)
इतर ऍपप्रमाणंच हेसुद्धा कामाची यादी बनवण्याचं, त्याचे रिमाइंडर ठेवण्याचं काम करतं. ऑफिसमधलं एखादं काम किंवा सुटीच्या दिवशी बघायचा असलेला एखादा चित्रपट या सगळ्यांची आठवण हे ऍप करून देतं. या ऍपमध्ये आपण एखादी यादी मित्र, कुटुंबीय यांच्यासोबत शेअर करू शकतो. शेअर केलेल्या या कामांवर ते प्रतिक्रिया देऊ शकतात, त्यावर चर्चा करू शकतात. त्यामुळं एखाद्या कामाचं नियोजन करणाऱ्या "टीम'साठी हे ऍप उपयोगी ठरू शकतं. या ऍपमध्ये कामासोबतच त्याच्याशी संबंधित फोटो, पीडीएफ किंवा इतर फाइल जोडता येते. या ऍपमध्येसुद्धा कामाच्या वेगवेगळ्या याद्या बनवता येतात. अँड्रॉइड आणि आयओएसवर हे ऍप उपलब्ध आहे.

रेस्क्‍यू टाइम (RescueTime)
मोबईलमुळं वेळ खूप वाया जातो, असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. मोबाईल आणि इंटरनेटमुळं आपण त्यावर तासन्‌तास वेळ घालवत बसतो. अशा वेळी "रेस्क्‍यू टाइम' हे ऍप उपयोगी पडू शकतं. हे एक "टाइम ट्रॅकिंग' ऍप असून, तुम्ही किती वेळ ऑनलाइन होता आणि कुठं, किती वेळ घालवला ते ट्रॅक करतं. तुमचा दिवसभरातला वेळ कोणत्या गोष्टींमध्ये गेला, यावर हे ऍप देखरेख ठेवतं. बऱ्याच वेळा आपण एखाद्या कामासाठी फोन हातात घेतो; पण नंतर इंटरनेटवर दुसऱ्याच गोष्टीवर किती तरी वेळ घालवतो. या ऍपच्या मदतीनं त्या कोणत्या गोष्टीवर वेळ वाया जातोय, हे समजतं. त्यामुळं आपण स्वतःला त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. मोबाईलवर आपण कोणत्या ऍप्सवर किती वेळ घालवला, मोबाईल स्क्रीनचं टाइमिंग या सगळ्या गोष्टींची नोंद हे ऍप ठेवतं. इतकंच नाही, तर एखाद्या ऍपसाठी वेळेची मर्यादा ठरवता येते. त्या वेळेनुसार हे ऍप आपल्याला "ऍलर्ट' करेल आणि वेळ वाचवण्याचा प्रयत्न करेल.

ट्रेलो (Trello)
हे ऍप एखादा प्रोजेक्‍ट मॅनेज करताना महत्त्वाचं ठरू शकतं. आपल्या कामांची सोप्या पद्धतीनं यादी करणं आणि सहकाऱ्यांसोबत ऍपच्या मदतीनं त्यानुसार काम करणं यामुळं शक्‍य होतं. एखादं काम करताना आपल्या सहकाऱ्यांशी आपण ई-मेल किंवा मेसेजद्वारे संवाद साधतो. प्रोजेक्‍ट मोठं असेल, तर या प्रत्येक ई-मेल/मेसेजेसची नोंद ठेवणं कठीण ठरतं. त्यामुळं या ऍपद्वारे सगळ्या गोष्टी, त्याबाबतचे मेसेजेस एकाच ठिकाणी देणं शक्‍य होतं. "डिजिटल बुलेटिन बोर्ड'च्या स्वरूपात कामांची यादी यात करता येते. यामध्ये आपलं काम, एखादी कल्पना सेव्ह करता येते. आपले सहकारी त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतात, एखादी फाइल जोडू शकतात, ज्यामुळं सर्वांना त्या कामाची सद्यःस्थिती समजण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com