माहिती ठेवा सुरक्षित (योगेश बनकर)

yogesh bankar
yogesh bankar

मोबाईलवरची वेगवेगळी ऍप्स, सोशल नेटवर्किंग वेबसाइट्‌स अशा अनेक मार्गांनी तुमची माहिती चोरीला जाऊ शकते आणि तिचे अनेक परिणाम होऊ शकतात. आपल्या खासगी माहितीची सुरक्षितता नेमकी कशी राखायची, कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायची, कोणत्या गोष्टी टाळायच्या आदींबाबत कानमंत्र.

गेल्या दोन दशकात भारतासह जगभरात इंटरनेटचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मोबाईल आणि इंटरनेट यांच्या कमी होत गेलेल्या किंमतींमुळं आज जवळपास प्रत्येकाच्या हाती हायस्पीड इंटरनेटशी जोडलेला स्मार्ट फोन पाहायला मिळतो; पण या स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळं आपली प्रायव्हसी धोक्‍यात आल्याचं आपल्या कधी लक्षात येतं का? आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतःची माहिती सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मोबाईलला; तसंच ई-मेल आणि इतर सोशल नेटवर्किंग अकाउंट्‌सना पासवर्डही आपण ठेवतो. अनेकदा तर घरातल्या व्यक्ती किंवा जवळच्या मित्र-मैत्रिणींनासुद्धा आपल्या फोनला हात लावू देत नाही; पण आपल्या परवानगीशिवाय कुणीतरी फोनमधली माहिती बघत असतं, संभाषण वाचतं असं कुणी सांगितलं, तर विश्वास बसेल? आपली माहिती कितीही सुरक्षित आहे असं वाटत असलं, तरी ही माहिती चोरीला जाऊ शकते हे माहीत आहे का? स्मार्ट फोनमध्ये आपण वापरतो ती वेगवेगळी ऍप्लिकेशन्स, ई-मेल; तसंच सोशल नेटवर्किंग साइट्‌स वापरताना घेतलेली अपुरी काळजी यामुळं आपली माहिती अनेकदा आपल्या नकळत, आपल्या परवानगीशिवाय दुसरीकडं शेअर केली जाते. आपण काय खातो, कुणाशी बोलतो, कुठं फिरतो, काय खरेदी करतो याची माहिती अनेकदा या ऍप्सच्या माध्यमातून किंवा इतर पद्धतीनं दुसऱ्याला पाठवली जाते आणि त्याचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. मात्र, ही माहिती नेमकी कशामुळं चोरीला जाते आणि ही "डेटा चोरी' थांबवायची कशी याबद्दल आपण जाणून घेऊ.

स्मार्ट फोनमधली ऍप्लिकेशन्स
प्ले-स्टोअर किंवा ऍप-स्टोअरवरून एखादं ऍप डाउनलोड करताना आपण त्या ऍपला फोनमधल्या कोणकोणत्या गोष्टींची परवानगी देतोय हे तुम्ही बघता का? आपल्यापैकी बरेच जण काहीही न वाचता अनेकदा सरळ ऍप्लिकेशन डाऊनलोड करतात. अनेकदा त्या ऍपला गरज नसलेल्या गोष्टीची परवानगी ते घेत असतं. उदाहरणार्थ, एखादं फोटो एडिटिंगसंबंधीचं एखादं ऍप तुमचे कॉल्स, मेसेजेस वाचण्याची परवानगी घेत असतं किंवा एखादा गेम तुमची फोटो गॅलरी बघण्याची परवानगी घेत असतो. अशा ऍप्सना आवश्‍यक नसलेल्या गोष्टींची परवानगी कशासाठी लागते, याचा विचार तरी आपण केलाय का कधी? या ऍप्सद्वारे ही माहिती फोनमधून गोळा करून त्यांच्या सर्व्हरला पाठवली जाते आणि नंतर ही माहिती जाहिरातदारांना दिली जाते किंवा इतर ठिकाणी तुमच्या परवानगीशिवाय तिचा वापर केला जातो. या ऍप्सच्या माध्यमातूनच आपण कुणीशी बोलतो, इंटरनेटवर काय सर्च करतो, काय खरेदी करतो ही सर्व माहिती गोळा केली जाते आणि तिचा आपल्या परवानगीशिवाय वापर केला जातो.

सोशल मीडियावरची ऑनलाइन ऍप्स
फेसबुकवर अनेकदा आपण "अमुक वर्षानंतर तुम्ही कसे दिसणार आहात?', "तुमचा चेहरा कोणत्या अभिनेत्यासारखा आहे?' वगैरे असे प्रश्न असलेल्या लिंक्‍सवर क्‍लिक करतो. आपल्यासाठीचं उत्तर तयार करताना फेसबुकवरची आपली वैयक्तिक माहिती बघण्याची परवानगी हे "ऑनलाइन ऍप' घेत असतं. कधीकधी तर फेसबुकवर आपण काय पोस्ट करतो, कोणाशी चॅटिंग करतो ही माहितीदेखील गोळा केली जाते आणि तिचा वापर जाहिराती किंवा इतर गोष्टींसाठी केला जातो. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या मित्राशी बाजारात नवीन आलेल्या एखाद्या मोबाईलबद्दल चॅट करत असता आणि नंतर त्याच मोबाईलची जाहिरात तुम्हाला मोबाईलवर दिसते. हा केवळ योगायोग नसतो, तर आपल्या नकळत आपलं संभाषण दुसरं कुणीतरी परवानगीशिवाय वाचतं आणि त्यानुसार ती जाहिराती दाखवली जात असते.

अनोळखी ई-मेल
अनेक जणांना ई-मेलवर रोज बऱ्याच "ऑफर्स' किंवा इतर अपडेट्‌स येत असतात. आपण एखाद्या ठिकाणी "साइन इन' करताना आपला मेल आयडी देतो किंवा वर सांगितल्याप्रमाणं दुसऱ्या एखाद्या ऍपद्वारे आपला ई-मेल आयडी शेअर केला जातो. या ऑफर्स किंवा बातम्या अनेकदा खऱ्या वाटाव्या अशा प्रकारे तयार केलेल्या असतात आणि अधिक माहितीसाठी मेलमध्ये एखादी लिंकही दिलेली असते. या अशा लिंक्‍सवर क्‍लिक केल्यावरही आपल्या मोबाईल किंवा कॉंप्युटरमधला डेटा, ई-मेल यांची चोरी होऊ शकते आणि त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. आपल्या ई-मेलवरील वैयक्तिक माहितीचा गैरवापरही केला जाऊ शकतो.

माहिती सुरक्षित कशी ठेवाल?
- आवश्‍यकता नसताना मोबाईलचं इंटरनेट कनेक्‍शन बंद ठेवावं.
- ज्या ऍप्सना "बॅकग्राऊंड डेटा' वापरण्याची गरज नसते, अशा ऍप्ससाठी सेटिंगमध्ये जाऊन बॅकग्राऊंड डेटा बंद करावा.
- सोशल मीडिया साईट्‌स वापरताना "टू फॅक्‍टर ऑथेंटिकेशन' वापरावे. ज्यामुळं आपले अकाउंट अधिक सुरक्षित राहील.
- ब्लूटूथ किंवा वायफाय गरज नसताना बंद ठेवा.
- एखाद्या ऍपसोबत जीपीएस लोकेशन आवश्‍यकतेशिवाय शेअर करू नका. आवश्‍यकता नसेल, तर मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन जीपीएस बंद करा.
- एखादं ऍप डाऊनलोड करताना काळजी घ्या. त्या ऍपला गरज नसणाऱ्या गोष्टींची परवानगी देणं टाळा.
- फेसबुक किंवा इतर ठिकाणी शेअर केलेल्या "ऑनलाइन ऍप्स'च्या लिंक्‍सवर क्‍लिक करताना ते ऍप कोणत्या गोष्टींची परवानगी घेत आहे हे तपासून बघा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com