नेट बॅंकिंगबाबत अशी घ्या खबरदारी (योगेश बनकर)

yogesh bankar
yogesh bankar

एटीएम कार्ड, ऑनलाइन बॅंकिंग वगैरेचा वापर करून अनेक जण बॅंक व्यवहार करताना दिसतात. मात्र, अजूनही त्यांचा सुरक्षित वापर कसा करायचा, याची माहिती अनेकांना नसते. या सगळ्या गोष्टी वापरताना कशा प्रकारे काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आदींबाबत कानमंत्र.

पुण्यातल्या कॉसमॉस बॅंकेच्या मुख्यालयात असलेलं एटीएम स्विच (सर्व्हर) हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये हॅकर्सनी ट्रान्झॅक्‍शनद्वारे काढण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार या आठवड्यात समोर आला. खातेधारकांच्या नकळत कोट्यवधी रुपये परस्पर हॉंगकॉंग इथल्या एका बॅंकेत वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आणि पुन्हा एकदा इंटरनेट बॅंकिंगच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला. प्रत्येक बॅंक आपल्या खातेदाराचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घेतेच; पण त्यासोबतच आपणही ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे. इंटरनेट बॅंकिंग किंवा एटीएम कार्ड वा इतर मार्गे ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे; परंतु ऑनलाइन पेमेंट करताना आपल्या सोयीची असलेली ही सुविधा वापरताना काय काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात याची माहिती आजही अनेकांना नाही. त्यामुळे "बॅंक खात्यातून अमुक रक्कम चोरीला वगैरे,' अशा बातम्या अनेकदा ऐकायला मिळतात. ऑनलाइन व्यवहार करताना, एटीएम किंवा इंटरनेट बॅंकिंग वापरताना आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी नक्की काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊयात...

एटीएम कार्ड ः
आपल्या बॅंक खात्यामधली रक्कम बॅंकेत न जाता कोणत्याही शहरातल्या, कोणत्याही बॅंकेच्या एटीएम मशीनमधून पैसे काढता येत असल्यानं एटीएम कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. ऑनलाइन/ऑफलाइन शॉपिंगपासून आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यापर्यंत अनेक ठिकाणी एटीएम कार्ड वापरता येतात. एटीएमचा हा वापर ज्या प्रमाणात वाढला, त्याच प्रमाणात या सुविधेचा गैरवापर करून पैसे चोरीला जाण्याचा धोकाही वाढला आहे. त्यामुळं एटीएम कार्ड सुरक्षित ठेवणं अतिशय गरजेचं आहे.
खालील गोष्टींची काळजी घेतल्यास आपले एटीएम कार्ड आपण सुरक्षित ठेवू शकतो :
- बॅंकेतून नवीन एटीएम कार्ड मिळाल्यानंतर त्यासोबत आलेला पिन बदलावा.
- आपले एटीएम कार्ड दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवू नये, आपल्या एटीएम कार्डचा पिन कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सांगू नये.
- एटीएम कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही क्रमांक कोणालाही देऊ नये.
- एटीएम कार्डचा वापर करून ऑनलाइन व्यवहार करताना मोबाईलवर येणारा ओटीपी इतर कोणासोबत शेअर करू नये.

इंटरनेट बॅंकिंग ः
इंटरनेट बॅंकिंग वापरताना बऱ्याचदा आपण ऑनलाइन पेमेंटच्या सुरक्षिततेचा विचार करत नाही. इंटरनेट बॅंकिंगची सुरक्षितता कशी तपासावी किंवा आपला व्यवहार कसा सुरक्षित ठेवावा याची माहिती असणं गरजेचं आहे. पुरेशी काळजी न घेतल्यास ऑनलाइन व्यवहार करताना आर्थिक फटकाही आपल्याला बसू शकतो.
इंटरनेट बॅंकिंग वापरताना खालील गोष्टींची काळजी घेतल्यास आपला व्यवहार आपण सुरक्षित ठेवू शकतो :
- आपण वापरत असलेला वेब ब्राऊझर सुरक्षित आहे का ते तपासावं.
- शक्‍यतो वेब ब्राऊझरचं अपडेटेड व्हर्जन वापरावं- ते अधिक सुरक्षित असतं.
- आपला इंटरनेट बॅंकिंगचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहावा.
- आपलं स्वतःचं नाव, जन्मतारीख, प्रिय व्यक्तीचं नाव यांनी बनलेला पासवर्ड वापरणं टाळावं.
- आपल्या कॉंप्युटर/लॅपटॉपमध्ये चांगला अँटीव्हायरस वापरावा.
- इंटरनेट बॅंकिंग लॉगिन केल्यानंतर यापूर्वी लॉगिन कधी करण्यात आलं होतं त्याची माहिती दाखवण्यात येते. पूर्वीचं लॉगिन आपल्याद्वारेच करण्यात आलं होतं याची खात्री करून घ्यावी.
- इंटरनेट कॅफे, पब्लिक वायफायवरून इंटरनेट बॅंकिंग अकौंट लॉगिन करू नये.
- "टू फॅक्‍टर ऑथेंटिकेशन'चा वापर करावा.
- आपलं काम झाल्यानंतर इंटरनेट बॅंकिंग अकौंट लॉगआऊट करावं.
- कोणत्याही वेब ब्राऊझरला आपल्या इंटरनेट बॅंकिंगचं युजरनेम किंवा पासवर्ड सेव्ह करण्याची परवानगी देऊ नये.

मोबाईल बॅंकिंग ः
सध्या जवळपास प्रत्येक बॅंकेचं मोबाईल बॅंकिंग ऍप आहे. आपल्या खात्यातली शिल्लक रक्कम तपासणं, एखाद्याला पैसे पाठवणं यांसारख्या गोष्टी या ऍपद्वारे करता येतात. त्यामुळं मोबाईल बॅंकिंगचा वापर करताना जे आपल्या बॅंकेचं अधिकृत ऍप आहे तेच फक्त वापरावं. आपण वापरत असलेलं ऍप अधिकृत आहे का, हे बॅंकेकडून तपासून घ्यावं.

या गोष्टींसोबतच इतर प्रकारेदेखील ऑनलाइन व्यवहार करताना पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे. आजकाल मोबाईलवरूनदेखील अनेक जण इंटरनेट बॅंकिंग वापरतात. ऑनलाइन शॉपिंग, सिनेमा यांच्यासाठी खर्च करण्यापासून बस, रेल्वे, विमान यांची तिकिटंदेखील मोबाईल ऍप्सद्वारे काढण्यास अनेक जण पसंत करतात. ही ऍप्स वापरतानादेखील काळजी घेतली पाहिजे. योग्य काळजी न घेतल्यास आपण वापरत असलेला स्मार्टफोन, त्यामध्ये असलेली ऍप्लिकेशन्स यांच्याद्वारेदेखील आपल्या बॅंक खात्याबद्दलची महत्त्वाची माहिती दुसऱ्याला मिळवता येऊ शकते. आपल्या एटीएम कार्डची माहिती सेव्ह करण्याची परवानगी शक्‍यतो कोणत्याही ऍपला देऊ नये. तसंच एसएमएस किंवा ई-मेलद्वारे येणाऱ्या अनोळखी मेसेजमधील लिंकवर क्‍लिक करण्याचा मोह टाळावा. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे "आपल्या बॅंकेमधून बोलतोय, आपल्या खात्याबाबत; तसंच डेबिट क्रेडिट कार्डची माहिती द्या,' असं सांगणारा फोन आल्यास माहिती देऊ नये. कोणतीही बॅंक फोनवर अशा प्रकारे आपल्याकडून माहिती घेत नाही. अशा प्रकारे पुरेशी काळजी घेतली तर नक्कीच आपले ऑनलाइन व्यवहार आपण सुरक्षित ठेवू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com