क्षण ‘युरेका’चा

क्षण ‘युरेका’चा

‘चेक लिस्ट’ची सवय
आ  ठवणीत राहिलेला प्रसंग. अठरा वर्षं झाली या गोष्टीला. ‘माँटेसरी टीचर’ या पदासाठी मुलाखत होती. पुणे महापालिकेकडून मुलाखतीचं पत्र एक दिवस उशिरा मिळालं. पूर्वतयारी करणं गरजेचं होतं. शिक्षण मंडळातले सभासद काय प्रश्‍न विचारतील याची कल्पना नव्हती. ऐन वेळी पत्र हातात पडल्यामुळं सारीच गडबड झाली. दोन तास फक्त हातात होते. पूर्वतयारी एका तासाभरात उरकली आणि सर्व प्रमाणपत्रांची फाईल घेतली. रिक्षानं जाणं गरजेचं होतं. मुलाखत शनिवार पेठेत गाडगीळ शाळेत होती. पाचशेच्या जवळपास महिला उमेदवार मुलाखतीसाठी आलेल्या होत्या. मान्यवरांनी नावं पुकारून सुरवात केली. एकदाचा माझा नंबर आला. मी ‘हुश्‍श’ केलं. अधिकारी आणि मान्यवरांनी सर्व कागदपत्रं पाहिली आणि ‘ठीक आहे’ म्हणून सांगितलं; परंतु मुलाखतीचं मूळ पत्र घरीच विसरल्याचं लक्षात आलं. त्याची फोटोकॉपी काढून घेतली होती; पण मूळ पत्रं घरीच राहिलं होतं. फोटोकॉपी असल्यामुळं कुठं अडलं नाही; पण मूळ पत्र असतं, तर जास्त योग्य झालं असतं. मॅडमनी माझी फाईल तपासली आणि ‘खूप छान’ म्हणून शेरा दिला. ती नोकरीसंदर्भातली माझी पहिली मुलाखत होती. तेव्हापासून एक सवय लावून घेतली ती म्हणजे ‘चेक लिस्ट’ तयार करण्याची. कुठं, केव्हा जायचं, कामासाठीचं सगळं काही घेतलेलं आहे का, या सगळ्या गोष्टी तपासून मगच बाहेर पडते. ही चांगली सवय मग नंतर आयुष्यात खूपच उपयोगी पडली. माझ्यातला हा बदल, ही सारी किमया ते एक पत्र विसरल्यामुळं घडली. त्यामुळं तो क्षणच ‘युरेका’चा ठरला.
- मंगल सांगळे, पुणे

मंत्र ‘पीसीएम’, ‘पीएच’चा...
घ  रोघरी सकाळची वेळ म्हणजे नुसती धावपळीची, घड्याळाच्या काट्यावर पळण्याची. घरात लहान मुलं असतील, तर त्यांना शाळेच्या वेळेत तयार करणं म्हणजे मोठं दिव्यच. मुलांना आवरून शाळेच्या बसमध्ये सोडून आल्यावर खूप मोठी जबाबदारी पार पाडल्यासारखं वाटतं; पण पती-पत्नी दोघंही नोकरदार असतील, तर पुन्हा पळापळ. एक गड जिंकल्यावर दुसरा गड सर करण्याची तयारी. मुलांच्या आवरण्याच्या नादात आपणच केलेला पसारा आवरणं, डबा करणं, स्वतःची तयारी करणं, नाश्‍ता, आदल्या दिवशी कितीही तयारी केली तरी काही महत्त्वाच्या गोष्टी राहून जातात. डबा, पाण्याची बाटली, घराची किल्ली, मोबाईल सगळं घेऊन बाहेर पडल्यावर अगदी जिने उतरून गाडीजवळ आल्यावर लक्षात येतं. अरे...! गाडीची किल्ली घरातच. त्यात सकाळी घड्याळाचा काटा इतका पटापट पुढं सरकतो तेच कळत नाही. जिने चढून दार उघडून गाडीची किल्ली घेणं ही गोष्ट पण खूप मोठी होऊन बसते.

याच सगळ्या गोष्टींचा विचार करून मी पैसे, किल्ली, मोबाईल या गोष्टी पर्समध्ये आठवणीनं ठेवल्या आहेत का, याची खात्री करू लागले आणि एक शॉर्टफॉर्म तयार केला. सायन्सची विद्यार्थिनी असल्यामुळे ‘पीसीएम’ हा मंत्र तयार झाला. पीसीएम म्हणजे पैसे, चावी (किल्ली), मोबाईल. फक्त मनातल्या मनात घराच्या उंबऱ्यापर्यंत आल्यावर बाहेर पडताना ‘ओम पीसीएम नमः’ असा जप करत राहायचं. फक्त ऑफिसमध्येच नव्हे, तर परगावी जाताना, संध्याकाळी फिरायला जातानाही या वस्तू सोबत येऊ लागल्या. त्यानंतर अगदी शेजाऱ्यांशी बोलण्याच्या नादात स्वतःच्या हातानं दाराची लॅच ओढून घराबाहेर थांबण्याची वेळ आली नाही. ‘ओम पीसीएम नमः’ मंत्राचा फार फार उपयोग होऊ लागला; पण पैसे, घराची, गाडीची किल्ली, मोबाईल या सगळ्या गोष्टी एका दमात घेऊन बाहेर पडल्यावर घड्याळाकडं पाहिल्यावर समजतं आता १५-२० मिनिटं ऑफिसला उशीर होणार. लेट मस्टरवर सही आणि साहेबांचा रागीट चेहरा आठवून गाडी स्टार्ट केली जाते. साहेबांनी विचारल्यावर काय- काय थापा मारायच्या, याचा विचार डोक्‍यात सुरू होतो. ‘मुलाला बरं नव्हतं’, ‘खूप ट्रॅफिक होतं’, ‘पेट्रोल संपलं’ असा विचार करता-करता गाडी का जास्त पळत नाही म्हणून कधी नव्हे ते गाडीकडं पाहिल्यावर समजतं- आता खरंच पेट्रोल संपणार...

पंधरा-वीस मिनिटांच्या उशिरानं मन धास्तावलं असताना एक- दीड तास नक्कीच उशीर होणार, याची खात्री पटते. माझीही अशी सारखीच त्रेधातिरपीट उडायला लागल्यावर पुन्हा एक नवीन मंत्र तयार केला-‘पीएच.’ पीएच म्हणजे पेट्रोल, हवा. गाडीजवळ आल्यावर आपोआप या मंत्राची आठवण येते. हा मंत्र जपण्याची सवय झाल्यावर गाडीत वेळेवर पेट्रोल टाकलं जाऊ लागलं, हवा भरली जाऊ लागली. या मंत्राचा जप सुरू केल्यापासून सकाळच्या प्रहरी गाडी ढकलण्याची, मनस्ताप करून घेण्याची आणि आपली झालेली फजिती पाहण्याची वेळ नक्कीच आली नाही. तरी सर्व भक्तांनी ‘ओम पीसीएम - पीएच नमः’ या मंत्राचा जप जरूर करावा. याचा फायदा नक्कीच होईल.
- विजया नलावडे, पुणे.

एक कल्पना...संकटातून वाचवणारी
ती  स वर्षांपूर्वीची एक अविस्मरणीय आठवण. मी त्या वेळी विदर्भात अमरावतीमध्ये राहत होतो. अमरावतीपासून तीस किलोमीटर अंतरावर एका खेडेगावात नातलगाच्या घरी जवळच्याच नातलगांच्या तेराव्याचा कार्यक्रम होता. बावीस किलोमीटर अंतराचा रस्ता डांबरी होता आणि नंतर वळण घेऊन असलेला आडरस्ता आठ किलोमीटर थोडा गिट्टीचा होता. मध्ये लहानसा नालाच आहे. मी आणि माझा मित्र तेराव्याच्या कार्यक्रमाला दुपारी तीन वाजता पोचलो. गाव जवळच असल्यामुळं आणि पावसाळ्याचे दिवस नसल्यामुळं स्कूटरनं त्या ठिकाणी गेलो. जेवणाचा कार्यक्रम आटोपला आणि आता परत निघणार, तोच ढगांचा गडगडाट ऐकू यायला लागला आणि मुसळधार पावसाला अचानक सुरवात झाली. गारांचा वर्षावही होत होता. सायंकाळी पाच वाजता पाऊस थांबला आणि आम्ही मोठ्या हिंमतीनं स्कूटरनं परत जाण्यास निघालो. नाला पार होईपर्यंत आणि कच्च्या रस्त्यापर्यंत नातलगांनी एक कामावरचा गडी आमच्यासोबत दिला. नाल्यास फार पाणी नव्हतं; परंतु चिखलामुळं आम्हाला स्कूटर बाहेर काढायला फार वेळ लागला. कसेबसे कच्च्या गिट्टीच्या रस्त्यावर पोचलो.

ढगांचा गडगडाट चालू होता. अंधार पडत चालला होता. रातकिड्यांचे आवाज येत होते. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हतं. पाऊस पुन्हा आला, तर बचावासाठी उभे राहायला जागाही नव्हती, झाडंही नव्हती. सोबतच्या माणसाला परत जाण्यास सांगणार आणि स्कूटर चालू करणार, तेवढ्यात आम्हाला ज्या रस्त्यापर्यंत जायचं होतं, त्याच बाजूनं बैलगाडी येताना दिसली. आम्ही थोडा वेळ थांबलो. बैलगाडी आमच्याजवळ येऊन उभी राहिली. त्याला आम्ही मुख्य रस्त्यापर्यंत जायचं असल्याचं सांगितलं. तो माणूस जे बोलला ते ऐकून अंगावर काटेच आले. त्या दिशेनं जोराचा पाऊस गारपिटीसह आमच्या दिशेनं सरकत होता. त्यानं आम्हाला पुढं जाऊ नका, असं सांगितलं. परिस्थिती बिकट होती.

त्या वेळी मी गावच्या दिशेनं पाहिलं. जीपचे दोन लाइट लांबूनच चमकत होते. ती आमच्या नातलगाची जीप होती. त्यांनीच आम्हाला परत न जाण्याचा आग्रह केला होता. मी ताबडतोब परत जाणाऱ्या माणसाला थांबवलं. बैलगाडीसुद्धा थांबून ठेवली आणि क्षणात जोरानं आणि आनंदानं सुटकेचा श्वास टाकत ओरडलो- ‘‘आयडिया सापडली.’’ मी का ओरडलो, म्हणून ते तिघंही जण माझ्याकडं पाहत राहिले. तेवढ्यात जीप येऊन आमच्याजवळ थांबली. त्यांनी आमची विचारपूस केली. जीपमध्ये आठ-दहा व्यक्ती असतील. मी जीपमधल्या आमच्या नातलगाला जीप थांबवायला सांगितलं. क्षणाचाही विलंब न करता माझी स्कूटर आम्ही बैलगाडीत चढवणं सुरू केलं. तेवढ्यात पाऊस आमच्या बाजूनं धावत आला. आमच्या पाठीवर, शरीरावर गारांचा वर्षाव होत होता. अंधार तर पडलाच होता. माझी स्कूटर बैलगाडीत चढवून त्या माणसासोबत त्या गावात पाठवली. तेवढ्याच वेळात गारांच्या मारानं मी कुडकुडायला लागलो. माझा मित्र जीपमध्ये बसला आणि ताबडतोब मीसुद्धा जीपमध्ये बसलो. आमच्या नातलगाचं गाव विरुद्ध बाजूला होतं. त्यांनी आम्हास मेनरोडवर चौफुलीवर सोडलं आणि आम्ही एसटीनं अमरावतीस परत आलो. थंडीनं कुडकुडत होतो. योगायोगच आहे. बैलगाडी आणि जीप एकाच वेळी येण्यामुळं आणि त्यांचा नेमका वापर करण्याची कल्पना सुचल्यामुळं संकटातून वाचलो.
- प्रा. रमेश पवार, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com