क्षण ‘युरेका’चा

क्षण ‘युरेका’चा

माझं खास कॅलेंडर
मो  बाईल युग सुरू होण्यापूर्वीचा काळ होता तो. मी, मनोहर रानडे आणि बबन जोशी- आम्ही तिघं खास दोस्त. एका पहाटे मन्याला फोन केला- पहाटे सहा वाजता. ‘‘अभिनंदन. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त.’’ मन्या उडालाच. ‘‘अरे, मी तर पार विसरून गेलो होतो. लक्षात कसं राहिलं तुझ्या?’’
‘‘अरे, नुसता दिवसच नाही तर कार्यालय, मुहूर्त, सासऱ्यांच्या पत्त्यासकट त्याचं नाव, पत्ता - सारं सारं मी सांगतो बघ!’’ मी माझं बोलणं चालू केलं. ‘‘कार्यालय सुवर्णस्मृती, सकाळचा मुहूर्त ९.४० चा, वहिनींचं माहेरचं नाव...’’
‘‘अरे, काय ही मेमरी! मानलं राव मानलं!’’ त्याचे आश्‍चर्यवाचक उद्‌गार.
‘‘दैवी देणगी आहे यार आपल्याला!’’ मन्याला पुन्हा उडवण्यासाठी बढाई. ‘‘अरे, हो मध्या, बबन्या आला आहे. प्रॉब्लेममध्ये आहे म्हणतोय! थांब, बबन्यालाच तुझ्याशी बोलायला सांगतो.’’
‘‘हे बघ मध्या,’’ बबन्या बोलायला लागला. ‘‘बाबाचं अचानक मेजर ऑपरेशन आहे महिनाअखेरला. दहा हजार रुपये पंचवीस तारखेला भरायचे आहेत- तेही कॅश! मन्याला शक्‍यच नाही म्हणाला, तुलाच फोन करणार होतो. आहेत तुझ्याकडं मला देण्यासाठी?’’ त्याचा प्रश्‍न.
‘‘दहा हजाराचं काय, पंधराही देईन. म्हणजे पंधरा हजार,’’ माझं उत्तर.
‘‘काय बोलतोयस! शक्‍य आहे तुला? कसं काय बुवा?’’ त्याची विचारणा. ‘‘तुला काय करायचंय? देणार म्हणजे देणार. फिक्र मत करना दोस्त. हर फिक्रको धुएमें उडातो चलो यार,’’ मी देवानंदी भाषा फेकली.
‘‘बाबा, एवढं लक्षात कसं ठेवता बुवा?’’ एक दिवस मुलाची चौकशी. ‘‘त्याचं असं आहे बच्चू,’’ मी स्पष्टीकरण दिलं. ‘‘नवीन वर्षाची कॅलेंडर्स आली, की माझं स्वतःचं एक खास कॅलेंडर काढून घेतो. वर्षभराच्या लक्षात ठेवण्याच्या तारखांच्या चौकटीत महत्त्वाचा मजकूर थोडक्‍यात लिहून ठेवतो. अगदी जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत! विमा हप्ते, विविध कर, कर्जाचे हप्ते, मुदतीच्या ठेवी आणि रिकरिंग डिपॉझिटच्या मॅच्युरिटीच्या तारखा, मॅच्युरिटी जून अगोदर व दिवाळीअगोदर येणार- कारण ते खर्चाचे महिने, वाढदिवस वगैरे वगैरे.’’
‘‘पण बाबा, एवढं सगळं बघता केव्हा?’’ त्याची शंका. ‘‘पहाटेचा पहिला चहा घेतो, तेव्हा तारखांवरून डोळे फिरवतो आणि मग आर्थिक व्यवहाराला लागतो. दंड नाही, पेनल्टी नाही, कोणाचं रिमाइंडरचं पत्र नाही. जरा तुझ्या मागचं ते कॅलेंडर बघ. सगळं त्याच्यावर लिहिलेलं आहे.’’
‘‘पण बाबा त्या लग्नाबद्दलचे बारकावे?’’ त्याची शंका. ‘‘अरे, काही लग्नपत्रिका जपून ठेवलेल्या असतात. त्यात सर्व छापील तर असतं, कळलं?’’
‘‘ग्रेट, बाबा, खरोखरच ग्रेट आहात बाबा तुम्ही!’’ चिरंजीवांच्या या शब्दांनी मी सुखावून जातो.

- मधुकर पानसरे, पुणे

कबुलीनं दिला प्रामाणिकपणाचा धडा
ब  रीच जुनी घटना. मी पुण्याच्या राजा धनराजगिरी हायस्कूलमध्ये नववीत शिकत होतो. वाघोलीकर सर मुख्याध्यापक आणि पटवर्धन सर पर्यवेक्षक होते. अध्यापकवर्ग देखील उत्तम होता. शाळेमध्ये अनेक चांगले उपक्रम राबवले जात होते. त्यापैकी सगळ्या मुलांना पौष्टिक खाद्य मिळावं म्हणून छोट्या सुटीमध्ये ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर खारे शेंगदाणे विक्रीचा उपक्रम नियमितपणे चालू होता. ऑफिससमोरच्या मोकळ्या जागेमध्ये एका स्टुलावर शेंगदाण्याच्या पुड्या असलेलं भांडं आणि शेजारी पैसे ठेवण्यासाठी भांडं ठेवलेलं असायचं. प्रत्येक विद्यार्थ्यानं पाच पैसे छोट्या भांड्यात टाकून एक पुडी घ्यायची. तीसुद्धा रांगेत उभं राहून.
मी रांगेत उभा राहून शेंगदाण्याची पुडी घ्यायला गेलो. पाच पैसे टाकून एक पुडी उचलली. मला अजून एक पुडी घेण्याचा मोह झाला आणि मी पाच पैसे न टाकता अजून एक पुडी उचलली आणि खेळण्यासाठी मैदानावर गेलो.


नेहमीच्या सवयीप्रमाणं शाळा सुटल्यानंतर शाळेचा नोटीस बोर्ड पाहिला. त्यावर लिहिलं होतं- ‘आज शाळेच्या दाणेविक्रीमध्ये एका पुडीचे पैसे कमी आल्यामुळे उद्यापासून दाणे विक्री बंद करण्यात येत आहे.’ तो मजकूर वाचल्यानंतर मला माझ्या चुकीची जाणीव झाली. माझ्या चुकीची शिक्षा इतरांनी का भोगावी, याविषयी वाईट वाटलं. अपराधी भावनेनं मी घरी आलो. नीट जेवू शकलो नाही. रात्रभर तळमळत राहिलो. सकाळी उठल्यावर चुकीबद्दल माफी मागू, या विचारानं शाळेत गेलो. सामुदायिक प्रार्थना झाल्यानंतर मी सरळ पटवर्धन सरांच्या खोलीसमोर जाऊन त्यांची परवानगी घेऊन आत गेलो. त्यांना आदल्या दिवशीची सर्व घटना सांगितली. हे ऐकून ते ताडकन्‌ जागेवरून उठले. रागानं त्यांनी माझा कान जोरानं पिरगळला. न मारता त्यांनी मला शाळा सुटल्यानंतर भेटायला सांगितलं. त्यांच्या सूचनेनुसार शाळा सुटल्यानंतर मी सरांना भेटलो.
त्यावेळी सरांनी एकशे वीस पानांची वही माझ्या हातात दिली आणि मला म्हणाले, ‘‘तू स्वतःहून प्रामाणिकपणे चूक कबूल केलीस, म्हणून मी तुला लिहिण्याची शिक्षा देत आहे.’’ मी या वहीत जे लिहिलं आहे, ती वाक्‍यं वही पूर्णपणे भरेपर्यंत लिहावं आणि मला वही आणून दाखवावी. तो मजकूर खालीलप्रमाणं होता- ‘शाळेचे ब्रीदवाक्‍य, सेवा व त्याग यांचे आयुष्यभर पालन करीन. मी अशी चूक पुन्हा करणार नाही. मोहाचा त्याग करून दुसऱ्यांना मदत करीन.’ सर म्हणाले, ‘‘तू चूक केल्यामुळं त्याची शिक्षा शाळेतल्या मुलांना देणार नाही. दाणेविक्री चालूच राहील. तुला दिलेली शिक्षा तू कोणाला सांगू नकोस. मी देखील कोणाला सांगणार नाही.’’


सरांनी दिलेली शिक्षा मी भोगली. जवळपास एक महिन्यानंतर मी त्यांना ती वही दाखवली. माझ्याकडं बघून सर हसले आणि ‘‘यापुढं चांगला अभ्यास कर. प्रगती कर. चांगला माणूस हो,’’ असा आशीर्वाद दिला. मीदेखील त्यांची आज्ञा पाळून शाळेमधली वर्तणूक चांगली ठेवली. चांगल्या मार्कांनी पास झालो.
मी केलेल्या चुकीची वाच्यता न करता; परंतु मला लिहिण्याची शिक्षा दिल्यामुळं मी परिपूर्ण झालो. उत्तम रितीनं शासकीय सेवा पूर्ण करून निवृत्त झालो. एका कबुलीनं आ युष्य बदललं.

- मोहन साळवी, पुणे

बचतीचा ‘सुवर्ण’मंत्र
मी  सांगणार आहे ती गोष्ट सत्तरच्या दशकातली. माझं नुकतंच लग्न झालं होतं. त्या काळी भारीतलं मंगळसूत्र सतत घालून बसायची पद्धत नव्हती. साधारणपणे दोऱ्यांतच ओवलेलं असायचं. हातात आपल्या चार काचेच्याच बांगड्या. मी ऑफिसला जात असल्यानं मला आपलं वाटायचं, की निदान बेंटेक्‍सच्या बांगड्या तरी घेऊ! यात बोला-फुलाची गाठ पडली.
आमच्या सेक्‍शनला एक विक्रेता बेंटेक्‍स दागिन्यांचा खजिनाच घेऊन आला. मंगळसूत्र, बांगड्या, कानातलं वगैरे त्यानं आणलं होतं. मला मोह झाला. ‘चला आज आपण काही तरी घेऊया,’ असा मी विचार केला. जवळ जाऊन चौकशी करते, तेवढ्यात आमचे भावसारसाहेब आले. म्हणाले, ‘‘बाई, काय करता? अहो, पन्नास रुपयांच्या या बांगड्या तुम्ही घेणार? नंतर त्याचं मोल शून्य!’’ मला काही कळेना, हे असं काय म्हणतात? त्या वेळेस सोनं दोनशे रुपये तोळा होते. ‘‘तुम्ही असे पन्नास रुपये खर्च करण्यापेक्षा दोन ग्रॅम सोनं घेतलं, तर आयुष्याची बेगमी होईल,’’ असं त्यांनी सांगितलं. अर्थातच मी हात मागं घेतला अन्‌ माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणींना पण अगं भावसार साहेबांनी मला कसा कानमंत्र दिला हे सांगितलं. मग काय मैत्रिणींनाही गोष्ट पटली अन्‌ आम्ही भिशी सुरू केली. ती पण पन्नास रुपयांची. अट एकच, या भिशीचं प्रत्येकीनं सोनंच घ्यायचं! मग हीच पद्धत पुरुषांनाही आवडली. त्यांनी पण ‘गंगाजळी भिशी’ सुरू केली. या माध्यमातून संग्रह करून आपल्या गृहलक्ष्मीला खूश केलं. एवढंच नाही तर आमचा मग एक ग्रुपच तयार झाला.
साडेतीन मुहूर्त, गुरुपुष्यामृत वगैरे आलं, की काय बाई जायचं ना सराफांकडं? असं आम्ही विचारायचो आणि एक ग्रॅम- अर्धा ग्रॅम अशा खुणा करायचो. सर्व जण सोनं घेऊन घरी जायचो. ओव्हरटाइमचा पैसा, दिवाळी ॲडव्हान्स, बोनस हा पैसा आजतागायत मी घरखर्चासाठी वापरला नाही अन्‌ माझ्या सहकाऱ्यांनीसुद्धा! आजही सगळे माझे सहकारी आठवण काढतात. ‘‘बाईंनी आम्हाला चांगली सवय लावली!’’ म्हणतात. या छोट्या बचतीच्या मंत्रामुळं अनेकांच्या मुला-मुलींच्या लग्नांत सोय झाली. गोष्ट छोटीशी असते; पण ती आपलं आयुष्य बदलून टाकते

- रजनी पुराणिक, पुणे.

एक टाका सुखाचा
ह  ल्ली धुलाई मशीनचा वापर सर्रास होताना आढळतो. त्याचं कोणाला नावीन्यही वाटत नाही; पण जेव्हा हे मशीन एवढं कॉमन नव्हतं, तेव्हा आपल्याकडंही असं मशीन असावं, असं मला वाटत असे. कालांतरानं माझ्या घरी ‘फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन’ आलं. मात्र, बाकी सगळं ठीक असलं, तरी मशीनमुळं कपड्यांमधली नाडी स्वतःची जागा सोडू लागली. वाचायला जरा विचित्र वाटेल; पण ही वस्तुस्थिती असल्याचं अनेकांना समजेल. वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांची ‘घुसळण’ होत असल्यामुळं अनेकदा एका बाजूनं नाडीचं टोक भरपूर बाहेर येतं आणि दुसरं टोक अदृश्‍य होतं. बरं, नाडीची लांबी वाढवली, तर त्यात इतर बरेच कपडे गुंतून बसतात. मशीनमधून धुतलेले कपडे बाहेर काढून वाळत घालण्यापूर्वी हाताला भरपूर झटके देऊन कपडे एकमेकांपासून मोकळे करावे लागतात. माझ्या मनात विचार आला, की ही समस्या कशी सोडवायची? मग मीच एक शक्कल लढवली. कपड्यातली नाडी दोन्ही बाजूच्या टोकातून समान लांबीच्या कपड्याबाहेर राहील अशी केली. सुई-दोरा घेतला आणि नेफ्याला (ज्यामधून नाडी ओवलेली असते) मध्यभागी नाडीसकट दोन-तीन टाके घातले. वा मस्त आयडिया!! आता काय बिशाद नाडी आपली जागा सोडेल? अनावश्‍यक लांबीसुद्धा कमी केली. अर्थात तरीसुद्धा नाडीत इतर कपडे गुंतून राहतातच. मग काय? धुवायला टाकण्यापूर्वी दोन्ही टोकं ओढून त्यांची सूरगाठ मारायची. वाळत घालण्यापूर्वी सूरगाठ सोडायची. सगळं एकदम सोपं झाले.

- शोभा भिडे, मुलुंड (पश्‍चिम), मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com