क्षण ‘युरेका’चा

क्षण ‘युरेका’चा

बचतीनं संसाराला हातभार
माझे वडील गणपतराव कोपर्डेकर यांनी मला एक कानमंत्र दिला होता ः ‘थेंबे थेंबे तळे साचे.’ माझी आई रुक्‍मिणी हिनंही मला एक मंत्र दिला होताः ‘पोटचे, पाठचे कुणी उपयोगी येत नाही. फक्त गाठचे उपयोगी येते.’ माझं १९८०मध्ये लग्न झालं. पत्नी उज्ज्वलानं लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोन्याचा हार करा म्हणून हट्ट केला. तेव्हा माझ्याकडे पैसेही नव्हते आणि सोनंही नव्हतं. तेव्हा ‘युरेका’सारखा शोध मला लागला आणि पगारातून उरलेल्या पैशाचं बॅंकेत ‘रिकरिंग’ सुरू केलं. उज्ज्वलानं पण संसारातून बचत केलेल्या पैशातून तिचं बॅंकेत ‘रिकरिंग’ सुरू केलं.

वर्ष संपल्यानंतर त्या पैशाची एफडी करून पुन्हा नव्यानं ‘रिकरिंग’ सुरू केलं आणि हे अव्याहतपणे सुरू ठेवलं. त्यामुळं दर वर्षी एफडीचा आकडा वाढत गेला. दरम्यान, प्रत्येक गुरुपुष्यामृत योग येत होता, त्या दिवशी जमेल तेवढी एक-दोन ग्रॅम सोन्याची वळी घेणं सुरू ठेवलं. वर्षं पुढं सरकत होती, तसं एफडी आणि सोनं या गोष्टी साठत गेल्या. साठलेल्या पैशांतून १९९४मध्ये बिबवेवाडीत स्वतःचा फ्लॅट घेतला आणि घराचं स्वप्न पूर्ण झालं; पण हप्ते भरता भरता पुन्हा सेव्हिंग सुरूच राहिलं.

बचतीचे आकडे वाढत होते. मग २००२मध्ये बाणेरला २२०० स्क्वेअर फुटांचं मोठं रो-हाउस घेतलं; पण या सर्वांमागं ‘युरेका’चा क्षण ठरला तो म्हणजे बचतीचा संस्कार. हे संस्कार आणि पत्नीची साथ या गोष्टी कामी आल्या. मात्र, एवढ्यावरच न थांबता मी ज्या ज्या कंपन्यांमध्ये काम केलं, तिथले सगळे सहकारी आणि जीवनात जोडलेले मित्र या सर्वांना त्याचं महत्त्व पटवून दिलं आणि त्यांना बचतीची सवयच लावली. त्यातला मुख्य उद्देश बचत करायला लावणं हाच होता. कुठं आणि कशी बचत करायची, हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं, हे पण सांगायला विसरलो नाही. माझे वडील त्या वेळी एलआयसीचे एजंट होते. या सर्वांचे विमे त्यांच्याकडून काढून घेतले. त्यामुळं त्यांची बचत हळूहळू वाढत गेली. आज जेव्हा ही मंडळी भेटतात, तेव्हा या बचतीच्या सवयीचा त्यांना फार मोठा फायदा झाला, हे ते कबूल करतात. त्यांच्या त्या सवयी अद्यापही कायम आहेत. खरंच हे कौतुक ऐकून धन्य वाटतं. यालाच संस्कार असं म्हणतात- जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जात राहतात. मी माझ्या सहकाऱ्यांना आणि मित्रांना सांगायचो, की दारू पार्टी केली, तर तुमचे पैसे वाया जातात. शिवाय तब्बेतीची पण हेळसांड होते. त्याऐवजी तेवढे पैसे बाजूला ठेवून त्याचं सोनं घ्या. ते उपयोगी पडेल.

अशा साठवलेल्या पैशांतूनच माझा संसार सुखाचा झाला. घर, गाडी वगैरेचं स्वप्न पूर्ण झालं. मुलांची शिक्षणं, लग्नं केली. सुनांना दागिने घालू शकलो आणि आता उतारवयात सुखी आहे.

- जयंत कोपर्डेकर, पुणे

‘सावध’पणे व्यवहारांची शिकवण
कॉ   लेजमध्ये जाऊ लागल्यावर ‘पॉकेट मनी’ म्हणून काही पैसे मिळत असत. त्या आधी शाळेत घरचाच डबा नेण्याची सवय होती. त्यामुळं कॉलेजला गेल्यावर कॅंटिनमध्ये काही विकत घेऊन खाण्याचं फार अप्रूप वाटत असे.

त्या कॉलेजच्या दिवसांत एक घटना फार मोठी शिकवण देऊन गेली. कॉलेजच्या सत्र परीक्षेत चांगले मार्क मिळाल्याबद्दल मैत्रिणींनी मला ‘ट्रीट’ मागितली आणि तीही पक्त वडापावची. त्या वेळी कॉलेजच्या कॅंटीनचा वडापाव फक्त दोन रुपयांत मिळत असे. मी हे घरी सांगितल्यावर मला मान्यता मिळाली आणि दहा रुपयेही मिळाले. त्या वेळी आजच्या सारखा भरमसाट पॉकेट मनी मिळत नसे. तर हे पैसे मिळाल्यावर आम्ही पाच मैत्रिणी दुसऱ्याच दिवशी कॅंटिनला गेलो. तिथं काऊंटरवर मी दहा रुपयांची नोट ठेवली आणि पाच वडापावची ऑर्डर दिली; पण कॅंटिनचालकानं ते पैसे घेतले की नाही, याकडं माझं लक्षच नव्हतं. आम्ही वडापाव खाऊन निघाल्यावर कॅंटिनचालकानं पैशांची मागणी केली. मी काऊंटरवर ते पैसे ठेवल्याचं सांगितलं; पण ते त्यानं साफ नाकारलं आणि पैसे मागू लागला. माझा चेहरा कसनुसा झाला- कारण माझ्याकडं तेवढेच पैसे होते. मग मैत्रिणीनं तिच्याकडचे दहा रुपये त्याला दिले. दुसऱ्या दिवशी मी तिचे पैसे परतही केले; पण झाल्या घटनेनं मला एक लाखमोलाची शिकवण मिळाली- ती म्हणजे पैसे देताना आणि घेतानाही अत्यंत सावधगिरीनं व्यवहार पार पाडायचा. हीच सवय आजपर्यंत मला जडली आणि त्याचा फायदाच झाला. ही अनुभवातून आलेली शिकवण माझ्यासाठी ‘युरेका’ ठरली.

- अनघा देसाई, पुणे
 

आजचं काम उद्यावर नकोच
जी   गोष्ट आता करायची आहे, ती रेंगाळत न ठेवता म्हणजे, ‘आता नको,’, ‘नंतर करू’, ‘नंतर पाहू’ अशी बहाणेबाजी करून लांबणीवर टाकू नका. यामुळं कित्येकदा आपणहून चालत आलेल्या सुवर्णसंधी आपण गमावून बसतो. तसंच कित्येकदा महाकठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. या मानसिकतेमुळं माझ्यावर एक कठीण प्रसंग ओढवला आणि त्यानंच मला आयुष्यभराची शिकवणही दिली.

काही दिवसांपूर्वी मी, पत्नी आणि माझा मुलगा न्यूयॉर्क ते लॉस एंजेलिस इथं विमानानं जात होतो. प्रवासादरम्यान माझ्या मुलानं एअर होस्टेसकडून एअरफोन घेण्यासाठी पर्समधून क्रेडिट कार्डनं बिलाचं पेमेंट केलं. त्यानंतर थोडा वेळ वॉलेट हातातच बाळगून होता. मात्र, परत खिशात ठेवण्याचा त्यानं कंटाळा केला आणि सीटच्या समोर मासिकं ठेवण्यासाठी असलेल्या जाळीच्या पिशवीच्या आतच ठेवला. पत्नीनं त्याला लगेच हटकलं, ‘‘अरे, वॉलेट तिथं ठेवू नकोस, खिशात ठेव. कदाचित घाईगडबडीत विसरून जाशील, त्यामुळं आता लगेचच खिशात ठेव,’’ असं सांगितलं. मुलानं ‘‘हो. ठेवतो,’’ म्हणत त्याकडं दुर्लक्ष केलं.

लॉस एंजेलिस विमानतळावर उतरून कार भाड्यानं घेण्यासाठी विमानतळाच्या शेजारी असलेल्या ‘शोरूम’मध्ये गेलो. तिथं वाहनचालकाच्या परवान्याची नोंद करायची असते. मुलगा काऊंटरवर गेल्यावर खिसा चाचपडून पाहतो तर काय? वॉलेट तर विमानातच राहून गेल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्या वॉलेटमध्ये दोन-तीन क्रेडिट कार्डस, ड्रायव्हिंग लायसेन्स आणि काही डॉलरची रोकड होती. आम्हा सर्वांचे तर धाबेच दणाणले. क्षणभर डोळ्यांसमोर काजवे चमकू लागले. ‘आता काय होणार,’ या विचारानं काहीच सुचेनासं झालं. देवाचं नामस्मरण करत ‘आम्हाला या संकटातून बाहेर काढ,’ म्हणत विनवण्या करू लागलो. पुढं या प्रसंगातून कसं निभावून गेलो, ही तर एक दिव्यकथाच म्हणावी लागेल.

असो! इथं थोडक्‍यात सांगायचं म्हणजे कंटाळा न करता मुलानं तत्परतेनं त्याच वेळी वॉलेट खिशात ठेवलं, असतं तर पुढचं रामायण घडलं नसतं. आता ‘जर-तर’मध्ये न पडता, त्यात गुरफटून न जाता प्रत्येकानं या प्रसंगावरून बोध घ्यायला पाहिजे. ‘कल करे सो आज कर और आज करे सो अब कर,’ ही म्हण योग्यच आहे.

- जसू पंजवानी, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com