क्षण ‘युरेका’चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

हस्ताक्षराला ‘टेकू’

हस्ताक्षराला ‘टेकू’
मी शिक्षिका असल्यानं मुलांचं हस्ताक्षर हा माझा जिव्हाळ्याचा विषय असणं स्वाभाविकच. लिहिताना हात दुखायला लागल्यानं पेपर लिहायचा कंटाळा आला, अशी पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची तक्रार असते. त्यामुळं उत्तरं येत असूनही मुलं लिहीत नाहीत आणि अक्षरही चांगलं येत नाही. या समस्येवर विचार करताना मला एक उपाय सुचला. लिहिताना टेबल किंवा डेस्कवर हात कोपरापासून टेकवावा आणि मग लिहावं. म्हणजे हात कोपरापासून टेकवल्यानं आधार मिळेल, ताण येणार नाही आणि अक्षरही चांगलं येईल. (एरवी आपण लिहितो, तेव्हा उजव्या पंजाच्या करंगळीच्या खालचा भाग फक्त टेकवत असतो.) याचा उपयोग ज्येष्ठ नागरिकांनाही होतो. वृद्धत्वात कंपवातानं किंवा काही वेळा लिहिण्याची सवय राहिली नसल्यानं हात थरथरतो आणि अक्षरही चांगलं येत नाही. अशांनीही लिहिताना टेबलावर कोपरापासून हात नीट टेकवून लिहिल्यानं काम सोपं होईल.

असाच आणखी एक ‘युरेका’चा क्षण. झालं असं, की माझ्या आत्ये सासूबाई ट्रॅव्हल कंपनीबरोबर सहलीला जाणार होत्या. आम्ही दोघं खाऊ घेऊन ‘शुभयात्रा’ शुभेच्छा देण्यासाठी भेटायला गेलो. सहज विषय निघाला, तशा त्या म्हणाल्या, ‘‘ट्रॅव्हल कंपनीची खाण्यापिण्याची व्यवस्था छानच असतं गं. जेवणात सर्वांना आवडेल असा भात असतो; पण आता या वयात आम्हाला तो मोकळा भात पोटात टोचतो. आम्हा मऊ भातवाल्यांना भात खाता न आल्यानं जेवणाचं समाधान होत नाही. तेवढी पंचाईत होते बघ!’’

माझ्या सासूबाईंचीही अशीच पंचाईत होती. त्यामुळं त्यांना पुलाव फारसा आवडत नसे. या सगळ्यावर विचार करता मला एकदम युक्ती सुचली. मी म्हटलं, ‘‘आत्याबाई, आपण चिवड्यासाठी पातळ पोहे वापरतो ना, ते पातळ पोहे जाताना घेऊन जा अन्‌ बरोबर एखादा छोटा कुंडा किंवा छोटं पातेलं ठेवा. जेवताना भात आवडला नाही, तर पातळ पोहे पातेल्यात घेऊन त्यात आमटी-भाजी-ताक घातलं, की छान मऊ होतील आणि खायलाही चांगलं लागेल.’’
त्यानंतर सहलीदरम्यान त्यांचा मला फोन आला ः ‘‘तुझी ‘आयडियाची कल्पना’ लय भारी आहे! आता इथल्या माझ्या दोन मैत्रिणींची हीच समस्या तू सोडवलीस गं!’’
- दीपन्विता साखरे, पुणे


दीप सारे तेजाळले आता...
आयुष्यात आपण अनेक मान्यवरांवर प्रेम करतो. त्यात लेखक, कवी, कलाकार, नेते, शास्त्रज्ञ, खेळाडू असे अनेक असतात. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून अनेकांना अशा व्यक्तींशी बोलावं, असं वाटत असतं. असं जेव्हा घडतं, त्या प्रसंगाची आठवण तो अगदी मोरपिसासारखी जपत राहतो. तशाच अनेकांच्या भेटीच्या आठवणी मी वयाच्या पंचाहत्तरीतही जपतो आहे. त्याच्याशीच संबंधित ही आठवण. बहुपैलू व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचा ८१वा वाढदिवस पुण्यात थाटात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या तयारीच्या बातम्या आधीपासूनच वर्तमानपत्रात येत होत्या. याच निमित्तानं पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंपर्यंत जाणं योग्य आणि सहज जमणार होतं. काय करता येईल, याचा मी सतत विचार करत होतो. विचार करता-करता मला एक कल्पना सुचली. मी मनातच ‘युरेका युरेका’ म्हणालो आणि कामाला लागलो. त्या काळात माझं स्वतःचं असं एक मोठा फॅब्रिकेशनचं वर्कशॉप सोमेश्‍वरवाडीत होतं. कलाकुसरीच्या अनेक कामांचा अनुभव पाठीशी होता. सुचलेल्या कल्पनेतून ८१ दीपज्योती उजळवता येतील, असा एक दिव्यांचा स्टॅंड तयार झाला. ने-आण करण्याच्या दृष्टीनं त्याचे वेगवेगळे भाग केले. लावण्याच्या वेळी फक्त पाच मिनिटांत जोडला जाईल, अशी रचना केली. तो पितळी वाटावा म्हणून त्याला सोनेरी रंग दिला.

त्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता पत्नीला सोबत घेऊन भांडारकर रस्त्यावरच्या ‘मालती-माधव’ अपार्टमेंटमध्ये गेलो. वर जाऊन भाईंना शुभेच्छा देण्याची माझी कल्पना सुनीताबाईंना सांगितली. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो भाव आजही माझ्या आठवणीत आहे. वेळ न दवडता खाली येऊन सगळं साहित्य वर घेऊन गेलो. काही क्षणांतच स्टॅंड जोडून काही ज्योती लावून झाल्या. बाईंनी व्हीलचेअरवर बसलेल्या ‘पुलं’ना स्टॅंडजवळ आणलं. म्हणाल्या ः ‘‘हे बघ भाई, तुला शुभेच्छा देण्यासाठी शाळीग्राम यांनी काय आणलंय.’’ पुढच्या सगळ्या ज्योती बाईंनी लावल्या. एक अविस्मरणीय आनंदसोहळा क्षणात पार पडला. गप्पा झाल्या. बाईंनी हातावर पेढे ठेवले. सकाळपासून अनेकांनी दिलेल्या शुभेच्छांच्या बुकेंनी सारं घर भरून गेलं होतं. तो गंध घरभर दरवळत होता. त्या सर्व आनंदाच्या कल्पनेतच ‘मालती-माधव’मधून बाहेर पडलो. पुढं याच कल्पनेतून मी अनेक मान्यवरांना शुभेच्छा दिल्या. माझी ही कल्पना आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक ठरली. याची नोंद माझ्या अभिप्रायवहीत अनेकांनी केली. पंडित भीमसेन जोशी, शरद पवार, डॉ. रघुनाथ माशेलकर अशा अनेक नामवंतांची ही यादी खूप मोठी आहे. या कल्पनेची माहिती पुढं अनेकांना समजली. त्यांनीही आपल्या आई-वडिलांच्या पंचाहत्तरीला स्टॅंड नेला. नेताना भाडे विचारले, ते मी नाकारलं. तेव्हा माझी आवड समजून त्यांनी मला पुस्तकं भेट दिली. पुस्तकभेटीच्या या कल्पनेतून जवळजवळ शंभर पुस्तकं जमा झाली. माझं वाचन समृद्ध झालं. एका कल्पनेतून पुन्हा एका कल्पनेचा
जन्म झाला.
- श्रीकृष्ण शाळीग्राम, पुणे


‘सहवास’ हा सुखाचा
माझा भाऊ तीन-चार महिने अमेरिकेला जाणार, म्हणून आई माझ्याकडे येणार होती. आता आईचं वय १०० आणि माझं ८१. आम्ही दोघी परस्वाधीन नव्हतो; पण काही समस्या होत्याच. घर म्हटलं, की काय लागतं नाही हो! अगदी सगळ्या कामांना नोकर ठेवले, तरी आठ-पंधरा दिवसांनी त्यांची चार दिवस रजा, म्हणजे आपण करा. त्याशिवाय लाईट, पाणी, फोन यांची बिलं, सामान आणा, भाजी आणा... वगैरे वगैरे! पन्नास-साठ वर्षं संसार करून, मुलांची शिक्षणं, कार्यं, आले-गेले वगैरे सगळं करून शरीर आणि मन थकलं होतं. दोन-तीन वर्षांपूर्वी सहज म्हणून मी शाश्‍वत फाऊंडेशनच्या ‘सहवास’ (दुबे बाग, हेंद्रे पाडा, बदलापूर-पश्‍चिम) या वृद्धाश्रमास भेट दिली होती. म्हणून मी भावाला म्हटलं,  ‘‘आम्ही दोघी ‘सहवास’मध्ये राहून पाहू का? तीन-चार महिन्यांचाच प्रश्‍न आहे.’’ नाखुशीनं भावानं सगळी चौकशी केली आणि आम्ही ‘सहवास’मध्ये आलो. मी स्वतःभोवतीच हात उंच करून एक गिरकी घेतली आणि आनंदानं ‘युरेका युरेका!’ असं म्हणत शांतपणे खुर्चीत बसले. मनावर कसलाही ताण नव्हता. सकाळी चहा आपल्या खोलीत, नऊ वाजता नाश्‍ता, एक वाजता जेवण, दुपारी चार वाजता चहा-बिस्किटं, रात्री आठ वाजता भोजन. ज्यांना हवं असेल, त्यांना दूध, पाहायचा असेल, तर टीव्ही, खेळायचं असेल तर पत्ते, कॅरम, बुद्धिबळ, फिरायचं असेल तर सुंदर बाग. आणखी काय हवं?

खोलीत दोन कॉट, खुर्ची, टेबल, बाहेर कॉरिडॉर. मला खूप भावलं. मला जो एकांत हवा होता, तो पण इथं मिळत होता. त्यामुळं सरत्या आयुष्यात मनातलं राहून गेलेलं ध्यान- जप- वाचन मला करता आलं आणि म्हणून मनाशी ठरवलं, आईबरोबर सहवासमध्ये राहायचं. कर्ता-करविता तो परमेश्‍वर आहे. त्याच्या मनात जसं असेल तसं तो करणार. माझी मावशी आठ-दहा दिवस आली होती तिथं. तिने एक कविता पण केली. ‘सहवास’चं सुख चारच दिवस अनुभवलं अन्‌ मन आनंदानं भरून आलं.
- उषा काळे, निगडी

Web Title: yureka article in saptarang