क्षण ‘युरेका’चा

क्षण ‘युरेका’चा

‘पते’ की बात
गेल्या कित्येक वर्षांपासून मला एक सवय आहे. एखाद्या नव्या शहरात किंवा गावात गेलं, की त्या शहरात प्रवेश केल्याकेल्या रस्त्यावर आजूबाजूला असणाऱ्या निरनिराळ्या दुकानांच्या पाट्या म्हणजे दुकानातल्या नावाचे बोर्ड वाचायचे आणि लक्षात ठेवायचे. एखाद्या गावात किंवा शहरात आपल्या नातेवाईकांकडं चाललो असलो, तर पाट्यांची निरीक्षणं करायची, असं जणू ठरूनच गेलं. आपण ज्या रस्त्यानं चाललो आहोत, त्याच रस्त्यानं परत येणार असलो, तर जाताना या रस्त्यावरच्या ठराविक मोठ्या दुकानाचं नाव किंवा एखादं हॉटेल किंवा एखादा मॉल यांची नाव लक्षात ठेवायची, अशीही माझी एक सवय. उदाहरणार्थ, रस्त्यावर ‘बिग बझार’ असेल, एखादं ‘अमर हॉटेल’ असेल, किंवा एखादं प्रोव्हिजन स्टोअर असेल, तर ते नाव लक्षात ठेवायचं. नंतर  त्याच रस्त्यानं परत येताना आधी वाचलेलं नाव येईपर्यंत चालत राहायचं आणि वाचलेलं नाव आलं, की या दुकानाच्या किंवा हॉटेलच्या मागं किंवा गल्लीत बसस्थानक आहे, का रेल्वेस्थानक आहे वगैरे निरीक्षण करायचं, अशी सवयच लागून गेली. आपण कुठल्या नवीन गावातून जात असलो, तर रस्त्यावरून जाताना कुठलं गाव आलं आहे, हे समजत नाही. अशा वेळीही आजूबाजूच्या दुकानांवर लावलेल्या पाट्यांचं नीट निरीक्षण करायचं. बहुतेक पाट्यांवर खालच्या बाजूला गावाचं नाव लिहिलेलं असतंच. त्याच्यावरून गावाचं नाव बरोबर समजतं. ही कल्पना मी अजूनही सतत उपयोगात आणत असतो. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा पत्ता सारखासारखा कुणाला विचारत बसण्याची गरज पडत नाही. पाट्या नीट लक्षात ठेवल्या, नीट निरीक्षण केलं, की आपण योग्य ठिकाणी अचूकपणे पोचू शकतो. इतरही माहितीची भर पडते आणि त्याचा उपयोग होतो.
- नंदकुमार सुराणा, पुणे

‘पाकीटतपासणी’ची युक्ती
सा  धारण तीस वर्षांपूर्वीचा प्रसंग. आम्ही त्या वेळी वरळी मुंबईला ॲनी बेझंट रोडवर राहत होतो. माझा मुलगा जय चौथीपर्यंत केम्स कॉर्नरच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये जात होता. त्या शाळेची स्कूल बस होती; पण पाचवीला त्याला चर्चगेटच्या सेंट झेविअर्स बॉईज ॲकॅडमीमध्ये प्रवेश मिळाला. त्या शाळेला मात्र स्कूल बस नव्हती. शाळा सकाळी साडेसात वाजता भरत असे. बेस्ट बस ८६ आणि ८७ त्या काळी चर्चगेटमार्गे जात असत. बेस्टचा विद्यार्थी पास त्याला काढून दिलेला असे. अडचणीच्या वेळी कामी येतील, म्हणून वीस रुपये त्याच्या दप्तरामध्ये ठेवलेले असत. आम्ही दोघं सकाळी सव्वासहाला बसस्टॉपवर जाण्यासाठी घरातून निघत असू. माझ्याजवळ एक छोटं पाकीट असे. त्यात थोडे पैसे असत. जयला बस मिळाली, की येताना मी कधी दूध किंवा भाजी आणीत असे.

जयची वार्षिक परीक्षा सुरू झाली. नेहमीप्रमाणं सकाळी त्याला बसस्टॉपवर सोडायला गेले. त्या दिवशी काय झालं कुणास ठाऊक? पावणेसात वाजले, तरी दोनपैकी एकही बस आली नाही. परीक्षा असल्यामुळं जय अगदी रडवेला झाला होता. चटकन काही तरी करायला हवं होतं. मी माझं पाकीट उघडून पाहिलं, तर नेमकी त्या दिवशी फक्त पाच रुपयांची एक नोट होती. बरं घरी जाऊन पैसे आणावेत, तर पेपरला उशीर झाला असता. जयच्या दप्तरातले वीस रुपये धरून पंचवीस रुपये गृहीत धरले, तरी तेवढी रक्कम टॅक्‍सीसाठी पुरली नसती. तेवढ्यात माझं लक्ष बसस्टॉपच्या मागं असलेल्या उडपी हॉटेलकडं गेलं. मनाचा हिय्या करून त्या हॉटेलच्या काऊंटरपाशी गेले. हॉटेलमालक त्या वेळी देवाच्या फोटोची पूजा करीत होता. त्याला अगदी थोडक्‍यात माझी अडचण सांगून पन्नास रुपये उसने मागितले. त्या देवमाणसानं मला लगेच एक पन्नास रुपयांची नोट दिली. ताबडतोब आम्ही टॅक्‍सी केली आणि शाळेत अगदी वेळेत पोचलो. येताना मी बसनं घरी आले.

नंतर दहा वाजता ऑफिसला जाताना आधी त्या हॉटेलमालकाचे पैसे परत केले आणि खूप आभार मानले. या प्रसंगानंतर मला आणि घरातल्या सर्वांना एक चांगली सवय लागली- ती म्हणजे नेहमी घराबाहेर पडताना पाकीट उघडून पुरेसे पैसे आहेत ना, याची खात्री करून घेण्याची. त्या काळी व. पु. काळे यांचं ‘पेरुचा पापा’ घ्यायला विसरायचं नाही, हे वाक्‍य ऑफिसला निघणाऱ्या सर्वांसाठी फारच उपयुक्त होतं. (म्हणजे पेन, रुमाल, किल्ल्या, पाकीट आणि पास)
बऱ्याच वेळा आपण पैसे खर्च केलेले असतात आणि आपल्या लक्षात नसतं. आपण पाकिटात पैसे आहेत म्हणून गृहीत धरून चालतो. त्यामुळं आधी खात्री करून घेणं उत्तम. नंतर खूप कष्ट होण्यापेक्षा आधीपासूनच तयारीत असलेलं बरं.
- अपर्णा सावंत, पुणे

‘सेफ’ डबा
एखादा दिवस मनस्तापाचा म्हणून उगवतो की काय, कोण जाणे! एके दिवशी माझी सोन्याची अंगठी कुठं काढून ठेवली, तेच आठवेना आणि ती कुठं सापडेना! मग काय संशोधनमोहीम सुरू झाली. मागं एकदा कपाटाच्या किल्ल्याच हरवल्या. असं काही झालं, की माझी सटकतेच. काही म्हणता काही सुचत नाही. एखादे वेळी दोन-तीन दिवसही यात जातात. ना कुठं लक्ष लागतं- ना शांत झोप. कपाटं उचकटून- सरकवून पाहिलं, तरी सापडण्याचं नाव नाही. शोधूनशोधून डोकं असं ठणकू लागतं, की काही विचारू नका. असंच त्या दिवशी मला वैतागलेला पाहून चिरंजीवांनी विचारलं, ‘‘काय झालं, बाबा?’’ त्याला सांगताच तो हात पुढं करत म्हणाला, ‘‘सॉरी बाबा, तुम्हाला फोन करणार होतो; पण राहूनच गेलं. सकाळी बेसिनपाशी तुमची अंगठी दिसली. तुम्ही बाहेर गेला होतात. इकडंतिकडं ठेवायला नको, म्हणून मीच बोटात घालून घेतली. गडबडीत आईलाही सांगायला विसरलो अन्‌ ऑफिसला गेलो.’’

असो! वस्तू सापडल्याचा आनंदक्षण अनुभवला खरा; पण ही शोधाशोध असह्य होते हो! मग मात्र मी आणि माझ्या पत्नीनं ठरवूनच टाकलं, की काय वाटेल ते होवो- कोणतीही वस्तू हरवता कामा नये. कितीही घाईगडबड असली, तरी कुठलीही वस्तू, पैसे, पावती इकडंतिकडं न ठेवता आणि न चुकता एका विशिष्ट डब्यातच ठेवायची, असा आम्ही एक ‘करार’च केला. नंतर सवड झाली, की मग ती वस्तू व्यवस्थित जागेवर ठेवायची. त्या डब्याला आम्ही ‘सेफ’ असंच नाव दिलं. अर्थात आमचा हा वर्तनबदल आम्हाला शांती देणारा ठरला आहे. आणखी एक कल्पना. काही वेळा असं होतं, की एखाद्या कल्पनेत-विषयात मन वाहत राहतं. मुलं आजारी पडली किंवा त्यांना बाहेरून यायला उशीर झाला, की मनात नको ते विचार येऊ लागतात. म्हणतात ना- ‘मन चिंती ते वैरी न चिंती!’ अशा वेळी मन आणि मस्तक ठणकू लागतं. खरं तर आपण पटकन भानावर येणं आवश्‍यक असतं. यासाठी मी हा उपाय करतोः देवाला मनःपूर्वक नमस्कार करून अकरा वेळा ‘श्रीराम’ म्हणतो आणि अक्षरशः ‘लाइट ऑफ’ केल्याप्रमाणं तो विचारप्रवाह बंद होतो आणि मनाचं औदासिन्य निघून जातं. अर्थात हा श्रद्धेचा भाग आहे; पण अशा वेळी प्रत्येकानं आपल्या आवडत्या देवाचं किंवा श्रद्धा असलेल्या व्यक्तीचं स्मरण केल्यास नक्कीच चांगला अनुभव येईल, असं मला वाटतं.
- हेमंत श्रोत्री, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com