‘युवी’ची ‘सेकंड इनिंग’ (सुनंदन लेले )

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 4 डिसेंबर 2016

युवराजसिंगनं आतापर्यंत अनेक चढ-उतार बघितले. त्याचे वडील योगिराजसिंग यांनी लहानपणी त्याच्याकडून खूप मेहनत करून घेतली. अनेकदा शिस्तीचा अतिरेकही केला. पुढं युवराज यशाच्या अनेक पायऱ्या चढत गेला. कर्करोगाचा वारही त्यानं हसत हसत झेलला. आता तो हेझल किशबरोबर लग्न करून स्थिरावायला बघतो आहे. त्याच्या या नव्या ‘इनिंग’निमित्तानं त्याच्या कारकिर्दीवर एक नजर.

युवराजसिंगनं त्याच्या लग्नाची पत्रिका पाठवली. ‘‘लेले साब शादी में जरूर आना है,’’ अशी आग्रही मागणीही केली आणि भूतकाळाचा पडदा डोळ्यांसमोरून सरकत गेला. पहिल्या चॅंपियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या वेळी म्हणजे २०००मध्ये युवराजसिंग भारतीय संघात आला. महंमद कैफ आणि युवराजसिंगनं भारतीय संघाला १९ वर्षांखालचा विश्‍वचषक जिंकायला मदत केली होती. तेव्हापासून निवड समितीचं युवराजसिंगवर बारीक लक्ष होतं. कारकिर्दीची सुरवात आयसीसीनं आयोजित केलेल्या स्पर्धेतून व्हायला नशीब लागतं. युवराजकडं ते जात्याच होतं. हा खेळाडू जणू काही आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकायलाच जन्माला आला होता. केनियातल्या नैरोबी जिमखान्यावर युवराजशी पहिली भेट झाली- तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे तब्बल १६ वर्षं आमची मैत्री फुलत गेली. युवराजसिंगच्या जीवनात आलेल्या सुख-दु:खाच्या अनेक घटनांना मी साक्षीदार होतो. म्हणून त्याच्या लग्नाची पत्रिका बघून जरा जास्त मजा वाटली.

वेगळं बालपण
युवराजसिंगचे वडील योगराजसिंग हाडाचे क्रिकेटर. १९७५च्या आसपास कपिल देव आणि योगराजसिंग यांची जोडी चांगलीच गाजली होती. दोघेही दमदार वेगवान गोलंदाज होते. कपिल देव यांची कारकीर्द जितकी बहरली, तितकी योगराज यांची बहरली नाही. म्हणून योगराज यांना आपल्या मोठ्या मुलाला कसंही करून सर्वोत्तम क्रिकेटर बनवायचं होतं. क्रिकेटजगत हलवून सोडेल, असा खेळाडू.  

ध्येयासक्तीनं पछाडलेल्या योगराज यांनी युवराजला अगदी लहान वयात क्रिकेटची बॅट पकडायला शिकवलं. लहान शाळेत जाताना युवराजला स्केटिंग जाम आवडायचं आणि मोठ्या शाळेत जायला लागल्यावर टेनिसची गोडी लागली होती. योगराज यांना युवराजनं क्रिकेट सोडून दुसरा कोणताही खेळ खेळू नये, असं वाटायचं. ध्यानी-मनी-स्वप्नी योगराज फक्त युवराज क्रिकेटर म्हणून कसा घडेल याकडं लक्ष देत होते. योगराजसिंग यांच्या क्रिकेट प्रशिक्षणात व्यायामावर खास भर असायचा. ऊन-वारा-पाऊस-थंडी काहीही हवामान असो- युवराजला ते व्यायाम करायला लावायचेच. कधी कधी या शिस्तीचा अतिरेक युवराजनं सहन केला. ऐन थंडीच्या दिवसांत चंडीगडला ४ अंश सेल्सिअस हवामान असताना योगराज युवराजला पहाटे पळायला जायला लावायचे. एकदा आदल्या दिवशीच्या सामन्यानंतर युवराज कमालीचा थकला आणि गाढ झोपी गेला होता. चंडीगडच्या थंडीत ब्लॅंकेटच्या मस्त उबेत युवराज झोपलेला असताना पहाटे साडेपाचला योगराज यांनी त्याला, ‘‘चल उठ लवकर... पळायला जायचं आहे,’’ असं सांगून उठवलं. दोन वेळा हाका मारून युवराज उठला नाही म्हटल्यावर योगराज यांनी रेफ्रिजरेटरमध्ये मुद्दामहून ठेवलेला पाण्याचा तांब्या आणून गाढ झोपेत असलेल्या युवराजच्या तोंडावर रिकामा केला होता. त्या भयानक प्रकारानं युवराजची नुसती झोप उडाली नाही, तर त्याला हळूहळू वडिलांच्या तऱ्हेवाईक वागण्याचा मनोमन राग यायला लागला. योगराज युवराजच्या कुरबुरींकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून त्याच्या व्यायामावर आणि सरावावर नजर ठेवत होते. घराच्या आवारातच क्रिकेट पिच बनवून घेतल्यानं योगराज रात्री-अपरात्री कधीही युवराजला पॅड बांधायला लावून फलंदाजीचा सराव करायला लावायचे. योगराज यांनी क्रिकेटचा इतका अतिरेक युवराजवर केला, की युवराजला क्रिकेटची तिडीक बसली. ‘‘क्रिकेटसे गुस्सा हुआ था मुझे... लेकिन क्रिकेट के सिवाय दुसरा कुछ आता भी तो नहीं था,’’ असं युवराज म्हणाला होता. 
युवराजचं म्हणणं ऐकल्यावर मला आंद्रे अगासीची कहाणी आठवली होती. युवराजप्रमाणंच आंद्रे अगासीचे वडील लहानग्या आंद्रेला बालकामगारासारखी वागणूक द्यायचे. युवराज असो, वा अगासी दोघांनाही वडिलांनी राबराब राबवलं...अगदी बालकामगाराप्रमाणे कष्ट करायला लावले. दोघांना दर्जेदार खेळाडू म्हणून घडवण्यात वडिलांचा हात असला, तरी युवराज आणि आंद्रे अगासीचं बालपण त्यांच्याच वडिलांनी हिरावून घेतलं, हे नाकारून चालणार नाही.

यशाच्या पायऱ्या
महेंद्रसिंह धोनीच्या सिनेमात त्या काळात युवराजच्या फलंदाजीचा दबदबा काय होता, हे मस्त दाखवलं आहे. बाकी झारखंड संघानं जितक्‍या धावा केल्या होत्या, तितक्‍या एकट्या युवराजनं केल्या होत्या, असा उल्लेख युवराजच्या ‘दादागिरी’बद्दल दिला गेला आहे. वयोगटातल्या स्पर्धांत युवराजनं भरपूर मोठ्या खेळ्या रचल्यानं त्याला भारतीय १९ वर्षांखालच्या संघाचे दरवाजे उघडले. एव्हाना पटत नाही, म्हणून युवराजचे पालक वेगळे राहायला लागले होते. श्रीलंकेतल्या १९ वर्षांखालचा वर्ल्डकप जिंकण्यात युवराजचा सिंहाचा वाटा होता. प्रेमाला व्याकूळ झालेल्या युवराजनं ‘मी श्रीलंकेहून परत येईन तेव्हा विमानतळावर तुम्ही दोघे एकत्र मला न्यायला या,’ अशी एकच मागणी आपल्या आई-वडिलांकडे केली होती. आयसीसीनं २०००मध्ये भरवलेल्या पहिल्या चॅंपियन्स ट्रॉफी स्पर्धेकरता भारतीय संघाची निवड झाली. ज्यात युवराजसिंग आणि झहीर खानची वर्णी लागली. केनियात झालेल्या त्या स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम सामन्यात धडक मारली होती. युवराजच्या गुणवत्तेची चुणूक लगेच सगळ्या क्रिकेट जाणकारांना दिसली होती.

सुख-दु:खाच्या लहरी 
भारतीय संघ २००३मध्ये मुख्य विश्‍व करंडक स्पर्धेत अंतिम फेरीत धडकला होता. संघाच्या यशस्वी प्रवासात युवराजचा वाटा होताच. २००४ मध्ये लाहोरच्या गदाफी स्टेडियमवर बाकी भारतीय फलंदाजी कोलमडून पडली असताना युवराजनं केलेली शतकी खेळी संस्मरणीय होती. यशाच्या सुखद अनुभवांनंतर २००७मधल्या जीवघेण्या दु:खाचं विष युवराजला पचवायला लागलं होतं. २००७मधल्या विश्‍वकरंकडक स्पर्धेत भारतीय संघाला पराभवाचे झटके बसले. अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या भारतीय संघाचा खेळ इतका ढासळला, की बाद फेरी गाठणंही शक्‍य झालं नव्हतं. निराशा पचवता न आल्यानं भारतात जनक्षोभानं वेगळीच पातळी गाठली. सचिन तेंडुलकरच्या घरावर मोर्चा गेला, तर युवराजच्या चंडीगडच्या घरावर दगडफेक झाली. 

भारतीय क्रिकेट संघाला लागलेलं ग्रेग चॅपल नावाचं ग्रहण सुटलं. २००८मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली नव्या भारतीय संघाची बांधणी सुरू झाली. २००७मध्येच भारतीय संघानं कोणाच्या ध्यानीमनी नसताना पहिल्या टी-२० विश्‍वकरंकडावर नाव कोरलं. पाठोपाठ गॅरी कर्स्टन भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर भारतीय संघाच्या यशाची कमान फक्त वर-वर जात राहिली. २०११ विश्‍वकरंडक भारतीय उपखंडात होणार असल्यानं उत्सुकता जास्त होती.

यशाचं शिखर आणि कॅन्सरचा वार
‘‘२०११ विश्‍वकरंडक युवराज तूच भारतीय संघाला जिंकून देणार आहेस...क्रिकेट देव तुला भरभरून देणार आहे...तू फक्त सतर्क राहा,’’ सचिन तेंडुलकरनं युवराजला स्पर्धेपूर्वीच सांगितलं होतं. पहिल्या काही सामन्यांत युवराज चमकला, तर तो संपूर्ण स्पर्धा दणाणून सोडतो, हे कर्णधार धोनीचं निरीक्षण होतं. युवराजनं नुसती बॅटनं नव्हे, तर गोलंदाजी करताना चमक दाखवली. सामना निर्णायक वळणावर गेला, की युवराज सर्वोत्तम कामगिरी करून भारतीय संघाला विजयी करू लागला. उपांत्यपूर्व सामन्यात त्यानं माजी विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करताना केलेली नाबाद खेळी सगळ्यांच्या मनात कोरली गेली.

सगळं सुरळीत चालू असताना युवराजला अचानक चालताना-पळताना धाप लागायला लागली. सुरवातीला साधा सर्दी-खोकला वाटला; मात्र तो भयानक आजार निघाला. विश्‍वकरंकडक स्पर्धेदरम्यान खोलात जाऊन तपासणी केल्यावर युवराजच्या छातीत मोठा ट्यूमर असल्याचं समजलं. हा ट्यूमर साधा नव्हता. एकदा विराट कोहली युवराजला भेटून ‘‘युवी पाजी क्‍या हुआ है आपको,’’ असं विचारून बसला. ‘‘चिकू शायद मेरे सिनेमें कॅन्सर है,’’ असं युवराज सहज बोलून गेला. ‘‘ये कैसा मजाक है पाजी... बहोत गलत- बहोत गलत...फिरसे कभी ऐसा मजाक न करना,’’ युवराजला घट्ट मिठी मारत डोळ्यांतलं पाणी पुसत कोहली म्हणाला होता. विराटला जी चेष्टा वाटत होती ती सत्य परिस्थिती होती.

कर्करोगासारखा भयानक आजारही युवराजला विश्‍वकरंकडक विजयाच्या ध्येयापासून लांब ठेवू शकला नाही. भारतीय संघानं विश्‍वकरंडकावर नाव कोरलं आणि युवराज स्पर्धेचा मानकरी ठरला. 

समाजकार्य
नंतरच्या काळात युवराजनं अमेरिकेत उपचारांना सामोरं जाऊन कर्करोगावर मात केली. युवराजनं कर्करोगाबाबत जागृतीसाठी काम करायला फाउंडेशन स्थापन केलं. कर्करोगाच्या आजाराची चाहूल लवकर लागावी, याकरिता त्यानं ‘कॅन्सर डिटेक्‍शन’ उपचार पद्धतीसाठी लाखो लोकांना मदत केली. कर्करोगानं पछाडलेल्या रुग्णांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी युवराज स्वत: काम करतो. रुग्णांना भेटून त्यांच्याशी बोलतो. त्यांच्या मनातलं नैराश्‍य घालवतो. 

आता स्थिरावायचं आहे
आंद्रे अगासी आणि युवराजमध्ये अजून एक साम्य आहे ते म्हणजे दोघांनाही भरपूर मैत्रिणी होत्या. अगासीनं तर ग्लॅमरस ब्रूक शिल्डबरोबर लग्न केलं होतं. युवराजचं किम शर्माबरोबरचं प्रेमप्रकरण चांगलंच गाजलं. बऱ्याच घोळांनंतर आंद्रे अगासी स्टेफी ग्राफबरोबर लग्न करून स्थिरावला, तसा युवराजसिंग आता हेझल किशबरोबर लग्न करून स्थिरावायला बघतो आहे. युवराजच्या या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा. 

सप्तरंग

महाराष्ट्राच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर काळात अतिविराट अशा अर्थाने जनसमुदाय एकत्रित झाला ते निमित्त म्हणजे "मराठा मोर्चा."...

03.18 AM

काँग्रेसवर केवळ भाजपला पर्याय देण्याची जबाबदारी नाही, तर या देशात बहुपक्षीय लोकशाही जिवंत ठेवण्याचे आव्हान या पक्षाला स्वीकारावे...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

डोकलममध्ये रस्ता बांधण्याच्या उद्देशाने 16 जून रोजी चीनने घुसखोरी केली व ती ध्यानात येताच भारतीय सेनेने तेथे जाऊन त्यांना रोखून...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017