अ‘सोशल’ मीडिया (सम्राट फडणीस)

zaira wasim: article by samrat phadnis in saptarang
zaira wasim: article by samrat phadnis in saptarang

‘दंगल’ चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली झायरा वसीम ही सध्या ‘सोशल नेटवर्किंग’च्या चक्रव्यूहात अडकली आहे. तिनं जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्यामुळं सोशल मीडियावर ‘दंगल’ झाली आणि झायरावर माफी मागण्याची वेळ आली. नंतर इतर अनेक धुरीणांनी झायराला ‘सोशल’ पाठिंबाही दिला. काय आहेत या प्रकरणाचे धागेदोरे?
जम्मू-काश्‍मीरमधल्या सामाजिक स्थितीचा त्याच्याशी काय संबंध आहे? ‘सोशल’ स्वातंत्र्य खरंच आहे, की तो केवळ दिखावा आहे? कुठपर्यंत जाणार हे प्रकरण?

‘लाल चौक से करीब है मेरा घर... जब से यादें रही है, तब से मैंने चौक में इंडियन आर्मी देखी हैं...। हाथ में एके-४७ लेके खडे रहे जवान देखें हैं... एके-४७ देखते देखते मैं बडी हुई हूँ... मुझे नहीं लगता बंदूकों से डर... मेरे जैसे कईं लडके-लडकियाँ हैं, जो बंदूकों से नहीं डरते...।’ गेल्या जुलैमध्ये दहशतवादी बुऱ्हाण वणी चकमकीत ठार झाल्यानंतर काश्‍मीर भीषण पेटलं असताना २२ वर्षांची झीनत (नाव बदललं आहे) सांगत होती. शिक्षणासाठी ती वर्षभर महाराष्ट्रात आली. मुंबईत आणि पुण्यात शिकली. काश्‍मीरला परत जाण्यासाठी धडपडणारी झीनत ‘इंडियन आर्मी’, ‘इंडियन फोर्स’, ’आप की सरकारें’ असे ’भारतीय’ कानांना खटकणारे शब्द वापरायची. तिचा भाऊ इम्तियाज दिल्लीत शिकतोय. ‘हमें वापस जाना है... खुदा करें हमें वापस जाने का मौका मिलें।’ असं म्हणणारी झीनत बहुतांश काश्‍मिरी तरुणाईच्या तुटलेपणाचं प्रतीक. सोशल मीडिया आणि काश्‍मिरातल्या वेबसाइटवर तासन्‌तास सर्फिंग करणारी.

तरुणाईचं तुटलेपण
काश्‍मीरमध्येच राहणारी ही तरुणाई भारतीयत्वापासून तुटते आहे. काश्‍मीरच्या परिघाबाहेरच्या प्रत्येक गोष्टीकडं संशयानं बघत आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, मनोरंजन, पर्यटन, सांस्कृतिक देवाण-घेवाण, व्यवहार, उद्योग असं कोणतंही क्षेत्र राहिलेलं नाही, ज्याकडं काश्‍मिरातील विशी-तिशीतली बहुतांश पिढी निखळ नजरेनं पाहत आहे. समान घटनांकडं पाहण्याच्या दोन टोकाच्या नजरा काश्‍मीरच्या तरुणाईमध्ये तयार होत आहेत. शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं काश्‍मीरच्या परिघातून बाहेर पडून स्थिरावू पाहणाऱ्यांची एखाद्या घटनेकडं पाहण्याची एक नजर आहे; तर काश्‍मीरच्या परिघात अडकलेल्यांची वेगळी नजर तयार होत आहे. काश्‍मीरच्या परिघातली नजर सोशल मीडिया, वेबसाइटवरून तयार होत आहे. परिघाबाहेरचे संख्येनं कमी आहेत आणि त्यांच्याकडंही झीनतसारखीच ‘दृष्टी’ आहे. हे का घडतं आहे, याच्या राजकीय तपशिलात जाण्यात अर्थ नाही. तथापि, किमान आज तरी फुटीरतावाद्यांचे सततचे प्रयत्न हाणून पाडण्याइतकी सरकारी यंत्रणा सक्षम नाही, हे झायरा वसीम या १६ वर्षांच्या गुणी अभिनेत्रीला आलेल्या अनुभवांवरून सगळ्या देशाच्या समोर आलं आहे.

‘गीता’चा हादरा
‘दंगल’ या ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपटात गीता फोगट या कुस्तीगीर खेळाडूच्या लहानपणीची भूमिका झायरानं निभावली आहे. ‘दंगल’ची लोकप्रियता काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि ज्या ज्या देशात भारतीय नागरिक संख्येनं लाखात आहेत, त्या प्रत्येक देशात अवघ्या आठ दिवसांत पसरली. आमीर खानच्या ‘दंगल’मधून घराघरांत पोचलेल्या गीता आणि बबिताकुमारी या फोगट भगिनी कोट्यवधी भारतीयांसमोर ‘आयकॉन’ म्हणून उभ्या राहिल्या. चित्रपटात लहानपणीच्या गीताची भूमिका साकारलेली झायराही तितकीच; किंबहुना अधिक लोकप्रिय झाली. ‘झायरा वसीम कोण?’ हे डिसेंबरपर्यंत फारसं कुणाला माहीतही नव्हतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर झायरा रातोरात ‘स्टार’ बनली आणि गेल्या जुलैपासून काश्‍मीरभोवती व्यापून राहिलेली नकारात्मकतेची सावली किंचितशी हटू लागली. गोड चेहऱ्याची, खुरटे केस राखलेली आणि पैलवान म्हणून मैदानात घट्ट उभी राहिलेली ‘गीता’ झायरानं ज्या ताकदीनं ‘दंगल’मध्ये उभी केली, ती ताकद काश्‍मीरमध्ये फुटीरतावादाचं राजकारण, अर्थकारण करणाऱ्यांना हादरा देणारी होती.

अस्वस्थ फुटीरतावादी
‘दंगल’च्या लोकप्रियता आणि झायराचं देशभर झालेलं नावं या बाबींनी जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनाही आकर्षित केलं. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी कधीतरी झायराला त्यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावून घेऊन तिचं कौतुक केलं. सोळा वर्षं वयाच्या मुलीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावून कौतुक केल्यावर जो गगनाला भिडणारा आनंद होऊ शकतो, तोच झायरालाही झाला. तिनं त्या भेटीचे फोटो ‘फेसबुक’ या सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड केले. ‘दंगल’पूर्वी झायराचं ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’ आदी सोशल नेटवर्किंगवरचं अस्तित्व १६ वर्षांच्या सर्वसामान्य मुलीइतकंच होतं. ‘स्टार’पणाचं वलय लाभताच झायराची सगळी सोशल मीडिया अकाउंट्‌स जगभरातून लाखो चाहत्यांसाठी तिला भेटण्याचं माध्यम बनली. महबूबा यांनी कौतुक करताना वापरलेले ‘झायरा ही काश्‍मिरी तरुणाईचा आयकॉन बनली आहे,’ हे शब्द तिच्या चाहत्यांसाठी जल्लोषाचं कारण ठरले आणि त्याच वेळी तिच्या लोकप्रियतेचा फटका बसू लागलेले फुटीरतावादी अस्वस्थही झाले.

‘रोल मॉडेल’ कोण?
फुटीरतावाद्यांसाठी काश्‍मीर धगधगतं राहणं आवश्‍यक आहे. झायरानं दाखवलेली दिशा फुटीरतावाद्यांच्या बरोबर उलटी आहे. झायराची दिशा भारताच्या मुख्य प्रवाहाची आहे आणि फुटीरतावाद्यांना तीच दिशा नको आहे. फुटीरतावाद्यांची सारी भिस्त काश्‍मीरच्या तरुणाईवर आहे. सईद अली शाह गिलानी, मसर्रत आलम, यासिन मलिक, शब्बीर अहमद शाह, मिरवैज उमर फारूक आदी फुटीरतावादी नेत्यांनी चकमकीत ठार झालेला अतिरेकी बुऱ्हाण वाणी याला ‘हीरो’ बनवलं. त्या हीरोचे चाहते बनलेल्या शेकडो काश्‍मिरी तरुणांच्या हातात दहशतवादी संघटनांनी आणि फुटीरतावाद्यांनी दगड सोपवले. बुऱ्हाणच्या ‘एन्काउंटर’च्या निमित्तानं उफाळलेला हिंसाचार हा फुटीरतवाद्यांचा ऑक्‍सिजन आहे. अशा परिस्थितीत झायरानं ‘आयकॉन’ बनणं दहशतवादी संघटनांनाही परवडणारं नव्हतं आणि फुटीरतावाद्यांनाही. त्यामुळं, ज्या सोशल मीडियातून झायराचे चाहते देशभर, जगभर वाढत होते, त्यावर हल्ला करण्यात आला. मेहबूबांशी भेटीनंतर तारुण्यसुलभ उत्साहानं सळसळणाऱ्या झायराला तिची ‘काश्‍मीरमधली जागा’ दाखवून देण्यात आली. ‘बुऱ्हाण आणि हाती दगड घेतलेले, पेलेट गन्सनं जखमी झालेले तरुण हेच काश्‍मीरचे आयकॉन्स आहेत, तू नव्हेस...’ ही समज झायरा ज्या ज्या सोशल मीडिया नेटवर्कवर आहे, तिथं तिथं तिला द्यायला सुरवात झाली. झायराला जाहीरपणे शिवीगाळही झाली. धमक्‍याही देण्यात आल्या. ‘केस कापून आणि तोकडे कपडे घालून मुलांमध्ये कुस्ती खेळणारी आमची आयकॉन होऊ शकत नाही,’ हा मेसेज तिच्यापर्यंत पोचवण्यात फुटीरतावाद्यांना यश आलं. परिणामी, अवघ्या दोन दिवसांत झायरानं ’फेसबुक’वरूनच जाहीर माफी मागितली. चित्रपटात जिद्दीनं उभी राहिलेली झायरा आयुष्याच्या ‘दंगल’मध्ये माघारी फिरली. ‘मी रोल मॉडेल नाही. माझं अनुकरण कुणीही करू नका. मी जे काही केलं आहे, त्याची मलाच लाज वाटत आहे,’ अशा शब्दांत झायरा फुटीरतावाद्यांच्या हल्ल्यासमोर कोसळली. ‘आजच्या किंवा कालच्या इतिहासातले तरुण खरे रोल मॉडेल आहेत. मला रोल मॉडेल म्हणणं म्हणजे त्या खऱ्या रोल मॉडेलचा अवमान आहे,’ असं सांगताना नकळत झायरानं बुऱ्हाण वाणी आणि हाती दगड घेतलेल्या तरुणांकडं ‘रोल मॉडेल’ म्हणून निर्देश केला.

सोशल मीडियाचा वाढता वापर
कट्टरपंथाकडं वळू पाहणाऱ्या काश्‍मीरमधल्या तरुणाईनं गेल्या जुलैपासून सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर सुरू केला आहे. बुऱ्हाण वाणीच्या ‘एन्काउंटर’नंतर काश्‍मीरमध्ये जरी इंटरनेट सेवा बंद राहिली, तरीही भारताच्या अन्य भागातल्या आणि परदेशातल्या काश्‍मिरी तरुणाईनं लष्कराबद्दल, पॅलेट गनच्या वापराबद्दल अत्यंत तीव्र प्रतिक्रिया सातत्यानं मांडल्या. पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर, तसंच इस्लामाबाद, कराची आणि लाहोरमधल्या भारतद्वेष्ट्यांनी सोशल मीडियाद्वारे शक्‍य तितका अपप्रचार सुरू ठेवला. काश्‍मीरमध्ये इंटरनेट सुरळीत सुरू होताच पॅलेट गनच्या विरोधात वेबसाइट सुरू झाल्या. पॅलेट गनमुळं अंधत्व आलेल्यांच्या कथा एरवी खूप कमी प्रमाणात राष्ट्रीय माध्यमांमधून आल्या; तथापि स्थानिक वेबसाइट, स्थानिक सोशल मीडिया यूजर्सनी शक्‍य तितक्‍या लोकांपर्यंत पोचून पॅलेट गन आणि एकूणच भारताच्या विरोधात वातावरण तयार केलं आहे. दिल्लीच्या राज्यकर्त्यांविषयीचा ‘काश्‍मिरी रोष’ नवा नाही; त्यात आता दिल्ली अथवा अन्य भागांतून प्रसारित/प्रकाशित होणाऱ्या माध्यमांविषयीच्या रोषाची भर पडली आहे. ट्विटर, फेसबुक आणि वेबसाइटवरून राष्ट्रीय माध्यमांचीही यथेच्छ बदनामी काश्‍मीरमधल्या कट्टरपंथीयांकडून आणि पाकिस्तानमधून रोजच्या रोज सुरू असते. ‘हातात दगड घेतलेले’, ‘पॅलेट गनमुळं जखमी झालेले’ आणि ‘बुऱ्हाण वाणी’ हे तीनच ‘रोल मॉडेल’ आहेत,’ हा एकमेव अजेंडा कट्टरपंथीय आणि फुटीरतावादी सोशल मीडिया आणि वेबसाइटवरून रेटत आहेत. बुऱ्हाण वाणी याला काश्‍मिरींचा ‘रोल मॉडेल’ सोशल मीडियावरूनच बनवण्यात आलं आहे. बुऱ्हाणचे व्हिडिओ यूट्यूब आणि फेसबुकवरून पद्धतशीरपणे पसरवले गेले. तो ठार झाल्यानंतर व्हॉट्‌स ॲपमधली कॉलिंगची सेवा वापरून दफनस्थळी हजारो लोक जमवले गेले. मुद्रित माध्यमांवरचे निर्बंध, राष्ट्रीय माध्यमांची देशभक्तीची दृष्टी यामुळं काश्‍मिरी तरुणाई माहितीसाठी आणि मत व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर अवलंबून आहे.

वरवरचं समर्थन, मौन
या सगळ्या पार्श्वभूमीवर झायरा ही मेहबूबा मुफ्तींना भेटली आणि त्याच्या बातम्या झाल्या. स्थानिक वेबसाइट्‌सवर त्या तातडीनं प्रसिद्ध झाल्या आणि कट्टरपंथीयांचा त्यावर तत्काळ हल्लाही झाला. झायराच्या माघारीनंतर देशभर तिच्या समर्थनार्थ हजारो लोक पुढं आले. आमीर खानपासून ते बॉलिवूडमधल्या अनेक नामवंतांनी ‘आपण तिच्या पाठीशी उभे आहोत,’ अशी ग्वाही दिली. जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी झायराचं समर्थन केलं आणि त्याच वेळी मेहबूबा यांच्यावर टीका केली. काश्‍मीरमधले विरोधी पक्ष मेहबूबा यांच्याकडं ‘भाजपसमर्थक’ या नजरेतूनच पाहत आहेत. सत्ताधारी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला (पीडीपी) एकाच वेळी फुटीरतावाद्यांनाही चुचकारायचंय आणि दुसरीकडं केंद्रातल्या सत्तेशीही सलोखा ठेवायचा आहे. त्यामुळं सामान्य भारतीयांमधून झायराच्या पाठिंब्याची जी लाट उसळली, ती स्थानिक राज्यकर्त्यांमधून तत्काळ उमटली नाही. त्यांनी एकतर वरवरचं समर्थन दिलं किंवा मौन बाळगलं. त्याचा परिणाम झायरावर, तिच्या कारकिर्दीवर तर होईलच; मात्र त्याहून अधिक परिणाम काश्‍मीरमध्ये आधीच एकट्या पडलेल्या तरुणाईवरही होणार आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती
बरोबर तीन वर्षांपूर्वी फरहा दीबा, अनिका खलीद आणि नोमा नजीर ही तीन नावं माध्यमांमधून गाजली होती. श्रीनगर स्टेडियममध्ये ‘प्रगश’ (प्रकाश) बॅंडमध्ये फरहा ड्रमर म्हणून, अनिका गिटारवादक म्हणून, तर नोमा ही गायिका आणि गिटारवादक म्हणून स्टेजवर होती. काश्‍मीरमध्ये अनेक वर्षांनी सादर झालेला हा बॅंड परफॉर्मन्स होता. त्याला अफाट प्रसिद्धी मिळाली. त्यातही फरहा, अनिका, नोमा यांच्यावर फोकस राहिला. काश्‍मिरी कलाकार तरुणी बॅंडमध्ये सहभागी होत आहेत, हा सकारात्मक बदल होता. साहजिकच फुटीरतावाद्यांना तो मानवला नाही. फरहा, अनिका आणि नोमा यांच्याविरुद्ध फतवे निघाले. दहावीत शिकणाऱ्या या तिन्ही मुलींची नावं काही काळातच अदृश्‍य झाली. आज त्या तिघी कुठं आहेत, याची कुणालाच काही माहिती असण्याचं कारण नाही. त्या तिघींनी जाहीर माफी वगैरे मागितली नव्हती; पण त्या बॅंडमधून गायब झाल्या. त्यांच्याबद्दलची चर्चाही थांबली. बॅंडही थांबला. झायराची जाहीर माफी तिला फरहा, अनिका आणि नोमाच्या वाटेवर नेणारी आहे.

ट्रोल्सचा वाढता धोका
सोशल मीडियाच नव्हे; तर इंटरनेट हे माध्यमच दुस्वास करणाऱ्यांना बळी पडतंय की काय, असाही एक धोका झायराच्या प्रकरणातून समोर आला आहे. गेल्या वर्षी प्यू रिसर्च सेंटर या अमेरिकास्थित संशोधन संस्थेनं म्हटलं की ः ‘दोन वर्षांत १८ ते २४ वर्षं वयाच्या ७० टक्के इंटरनेट यूजर्सना झुंडीनं येणाऱ्या छळवादी यूजर्सचा सामना करावा लागला.’ असा हा ‘ट्रोल्स’चा अवतार राजकारणातही शिरलाय. बदनामी, शिवीगाळ, धमक्‍यांचा वापर करत ट्रोल इंटरनेटवर धुडगूस घालतात. त्यांना प्रतिसाद देता देता नाकीनऊ येतात आणि अनेकदा ट्रोलच्या त्रासानं यूजर एखादं सोशल मीडिया अकाउंट डिलिट करून विषय थांबवतात. काश्‍मीरसारख्या धगधगत्या विषयात ‘ट्रोल’ निर्माण होणं आणि कट्टरपंथीयांनी ट्रोलिंग करून एखाद्याला बेजार करणं येत्या काळात दहशतवादाविरुद्धची लढाई कोणत्या स्तराला जाणार आहे, याची झलक दाखवणारं आहे. काश्‍मीरमधून बाहेर पडलेल्या आणि मुंबईत शिकणाऱ्या फरहीन शोरा या तरुणीनं एका वेबसाइटवर लिहिलंय ः ‘नव्वदच्या दशकात जन्मलेल्या माझ्या पिढीनं काश्‍मीरमध्ये बंद थिएटर फक्त पाहिलीत. कॉलेज चुकवून आम्ही कसे सिनेमा बघायला जायचो, हे आई-वडिलांकडून फक्त ऐकलंय. मला कधीही थिएटरमध्ये सिनेमा पाहायला मिळाला नाही. याच समाजातून मी आलेय. त्यामुळं हा निर्णय (चित्रपटात काम करणं आणि नंतर माफी मागण्याचा) घेणं तिला (झायरा) सोपं गेलं नसणार, हे मी खात्रीनं सांगू शकते.’ फरहीन पुढं म्हणते ः ‘काही मोजक्‍या नतद्रष्ट लोकांमुळं काश्‍मीरमधल्या जनतेची मान खाली जात आहे. ‘मी आत्ता लिहितेय खरी; पण झायराला शिवीगाळ करणारे, धमकावणारे लोक माझ्या लेखावर काय प्रतिक्रिया देतील, या विचारानं मलाही घाम फुटतोय...’

उद्या कुणाचा चेहरा...?
फरहीन असो किंवा झायरा अथवा ‘प्रगश’ची कलाकार-त्रिमूर्ती, काश्‍मीर पडद्यावर दिसतं तितकं सोपं आणि छान छान नक्कीच नाही. एकामध्ये एक असे अनेक धागे काश्‍मीरप्रश्नाच्या गुंत्याभोवती आहेत. हा गुंता झायरासारखी एक ‘रोल मॉडेल’ सोडवू शकत नाही; पण तिच्या रूपानं गुंता सुटायची शक्‍यता निर्माण होते, तेव्हा फुटीरतावादी आणि राज्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकते. गुंता राहू देण्यातच ज्यांचा वर्तमान आणि भविष्य आहे, त्यांना धोका दिसू लागतो. मग कधी बॅंडचा बळी दिला जातो, तर कधी झायराला माफी मागावी लागते. एकाच वेळी बंदूकांशी आणि सोशल मीडियावरच्या प्रचारकी मजकुराला सामोरं जाण्याची गरज निर्माण होते. आपण बंदुकांशी सामना करायला सक्षम आहोत, हे लष्करानं वेळोवेळी दाखवून दिलंय; पण सोशल मीडियावरच्या प्रचारकी मजकुराशी सामना कसा करायचा, ट्रोलना कसं रोखायचं याचं शिक्षण सामान्य नागरिक म्हणून आपलं आपणच घेतलं पाहिजे. अन्यथा, आज झायराला माफी मागावी लागते; उद्या झायराच्या जागी नवा चेहरा असेल...

-------------------------------------------------------------------
नेमकं काय घडलं?

  •   झायरा वसीम जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना भेटली.
  •   झायरानं मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो फेसबुकवर आणि अन्यत्र शेअर केले.
  •   मुख्यमंत्र्यांनी झायराला ‘काश्‍मीरची रोल मॉडेल’ असं संबोधलं.
  •   सोशल मीडियावर स्थानिक काश्‍मिरींनी, फुटीरतावाद्यांनी झायराला धमकावलं.
  •   चित्रपटात काम केल्याबद्दल झायरानं सोशल मीडियावर माफी मागितली.
  •   काही तासांतच माफीची पोस्ट सोशल मीडियावरून झायरानं डिलिट केली.
  •   झायराची माफीची पोस्ट व्हायरल झाली. सर्व क्षेत्रांतून झायराला पाठिंबा दिला गेला.
  •   झायरानं फेसबुकवर पुन्हा नवीन पोस्ट लिहिली. ‘आधीच्या पोस्टमधून काही चुकीचा संदेश जातोय,’ असं म्हटलं.
  •   ‘मी कुणाच्या बाजूनं किंवा विरुद्ध नाही. माझ्या पोस्टचे चुकीचे अर्थ काढू नका,’ असंही तिनं म्हटलं.
  •   फेसबुकवरून दुसरी पोस्टही झायरानं नंतर डिलिट केली.

-------------------------------------------------------------------
नवा वाद?
झायराच्या माफीच्या मुद्द्याचं राजकारण करण्याचा आणि त्याद्वारे ध्रुवीकरणाचा प्रयत्नही होऊ लागला आहे. भाजपचे नेते विजय गोयल यांनी १९ जानेवारीला एका चित्रप्रदर्शनाचं उद्‌घाटन केलं. त्यातल्या एका चित्राचा निर्देश करून गोयल यांनी ट्विट केलं ः ‘झायरा वसीमची कथाच या चित्रातून सांगितली गेली आहे जणू...‘पिंजरा तोड कर हमारी बेटियां बढ़ने लगी हैं आगे’ असं गोयल यांचं ट्विट होतं. ते चित्र होतं हिजाब वापरणाऱ्या मुलीचं आणि हिजाबच्या पिंजऱ्यात मुलगी अडकलीय असं दाखवणारं. झायरानं त्या ट्विटला तातडीनं उत्तर दिलं आहे ः ‘मला या चित्राशी जोडण्याचा प्रयत्न कृपया करू नका... हिजाबमधल्या महिला सुंदर आणि स्वतंत्र असतात...’. आता, या ट्विटवरून भाजपसमर्थक, झायरासमर्थक आणि काश्‍मिरी अशी तिहेरी जुंपलीय सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर.
-------------------------------------------------------------------
कोण काय म्हणालं?

झायरावर दबाव आणून तिला माफी मागायला लावणं चुकीचं आहे. मात्र, आज जे झायराबद्दल सहानुभूती दाखवत आहेत, ते काश्‍मीरमधले शेकडो तरुण पॅलेट गननं अंध होत असताना कुठं होते? हा दुटप्पीपणा का?
- असाउद्दीन ओवेसी, एमआयएम पक्षाचे प्रमुख

काश्‍मीरमधील कोणत्याही प्रगतीची फुटीरतावाद्यांना भीती वाटते. त्यामुळंच त्यांना झायरा वसीमच्या ‘दंगल’मधल्या अभिनयाबद्दलही प्रॉब्लेम वाटतोय.
- शाहनवाज हुसैन, राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप

देव या जगाला शहाणं करो आणि धर्म-देशभक्ती यांच्यापलीकडंचा मानवतेचा विशाल पैलू देवो...
- सोनू निगम, गायक

झायराप्रकरण म्हणजे सेक्‍शुअल बायस आहे. आमीर खान, सलमान खान, शाहरूख खान यांच्याबाबत असंच कुणी बोलू शकतं का?
- गौतम गंभीर, क्रिकेटपटू

‘दंगल’ची सुपरकिड झायरा वसीम हिला माफी मागायला लागणं ही लज्जास्पद गोष्ट आहे. तिनं काय चूक केलीय?
- मोहंमद कैफ, क्रिकेटपटू

झायरा वसीम, तू जिद्दीनं उभी राहा. अख्खा भारत आणि ‘धाकड गर्ल्स’ तुझ्या सोबत आहेत. तू माफी मागायची काहीच गरज नाही.
- रितू फोगट, कुस्तीपटू

घरांच्या टेरेसवरून ‘स्वातंत्र्याच्या घोषणा’ देणारे इतरांना मात्र स्वातंत्र्य देत नाहीत. यशाबद्दल झायराला माफी मागायला लावणं लज्जास्पदच.
- जावेद अख्तर, गीतकार

-------------------------------------------------------------------
दहावीत ९२ टक्के
झायरा वसीम ही श्रीनगरमधल्या मध्यमवर्गीय कुटुंबातली. काश्‍मीरच्या दंगलींमध्ये होरपळत असताना गेल्या वर्षी ज्या मुला-मुलींनी शिक्षण कायम ठेवलं, परीक्षा दिल्या, त्यात झायराही आहे. सेंट पॉल्स इंटरनॅशनल स्कूलची ती विद्यार्थिनी. ‘दंगल’नंतरच्या आठवड्यात तिचा दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यात तिला ९२ टक्के गुण मिळाले आहेत. झायराचे वडील जम्मू-काश्‍मीर बॅंकेत काम करतात. झायरानं ‘दंगल’ सिनेमात काम करण्याच्या विरोधात तिचे आई-वडील होते. मात्र, शाळेच्या प्राचार्यांनी त्यांना समजावलं, मगच तिनं आमीर खानला होकार कळवला. झायराच्या खूप कमी मुलाखती आतापर्यंत झाल्या आहेत. एका मुलाखतीत तिनं प्रांजळपणानं म्हटलंय ः ‘मी फारशी बोलकी मुलगी नाहीय... मला भरपूर मित्र-मैत्रिणी नाहीत. मी अंतर्मुख स्वभावाची आहे. कुणाला दुखवायला मला आवडत नाही...’ आतापर्यंत फेसबुकवर छान छान प्रतिक्रिया पाहिलेल्या झायराला सोशल मीडियावरच्या झुंडगिरीचा (ट्रोल) सामना पहिल्यांदाच करावा लागला.
-------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com