हॅकिंगपासून सुरक्षित कसे राहाल?

Cyber Hacking
Cyber Hacking

एटीएमच्या पासवर्डपासून ते कुटुंबातल्या व्यक्तींच्या वाढदिवसापर्यंत...कदाचित तुमच्या इ मेलवर, कॉम्प्युटरवर असा महत्वाचा, खासगी आणि आर्थिकदृष्ट्या सेन्सिटिव्ह डेटा असू शकतो. तुमचा इ मेल किंवा कॉम्प्युटर हॅक झाला, तर हा सर्व डेटा चोरीला जाऊ शकतो. त्याचा कसाही गैरवापर होऊ शकतो. हॅकर्सपासून डेटा सुरक्षित कसा ठेवायचा...?

या आहेत काही सोप्या टिप्सः

1. संशयास्पद इ मेल्सपासून सावधान राहा. अनेक हॅकर्स तुम्हाला माहितीच्या वेबसाईटची लिंक पाठवून खासगी माहिती भरण्यास सांगू शकतात. आधी इ मेल बनावट आहे का तपासा. उदा. तुमच्या माहितीच्या बँकेचा इ मेल वाटत असेल, तर पूर्वीच्या इ मेल्सची तो पडताळून पाहा. पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर, एटीएम पीन अशी कोणतीही माहिती कधीही शेअर करू नका. मेलमध्ये दिलेल्या कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका. 

2. लिंक कुठून आली आहे हे तपासा. एखादा इ मेल तुम्हाला लिंकवर क्लिक करायला सांगत असेल, तर इ मेल मध्येच लिंकवर कधीही क्लिक करू नका. त्याएेवजी लिंक कॉपी-पेस्ट करून नवीन ब्राऊजरमध्ये ओपन करा. URL X-ray यासारख्या काही वेबसाईट लिंकची सत्यता पडताळून देतात. त्या वापरा. https साईटवरच शक्यतो भरवसा ठेवा. 

3. संशयास्पद अॅटॅचमेंट उघडू नका. खरेतर नियम असा आहे, की ज्या वेळी अॅटॅचमेंटबद्दल तुम्हाला 100 टक्के खात्री आहे, तेव्हाच ची डाऊनलोड करावी. अन्यथा अजिबात करू नये. एखादा व्हायरस अॅटॅचमेंटमधून तुमच्या कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये प्रचंड गोंधळ घालू शकतो. व्हायरसेस शक्यतो Word, PDF किंवा .EXE फाईल्समधून अॅटॅचमेंट म्हणून मेलवर पाठवले जातात, हे लक्षात ठेवा. 

4. दुहेरी ऑथेन्टिकेशन जरूर वापरा. तुमचा इ मेल वेगळ्या डिव्हाईसवरून किंवा कॉम्प्युटरवरून उघडायचा असेल, तर केवळ पासवर्ड देऊनच उघडता येणार नाही, तर त्यासाठी आणखी एका डिव्हाईसवर वेगळा पासवर्ड मागवावा लागेल, अशी व्यवस्था करा. गुगल ऑथेंटिकेटरची मदत त्यासाठी घेऊ शकता. अनेक कंपन्यांनी अशा प्रकारचे दुहेरी ऑथेन्टिकेशन सुरू केले आहे. 

5. पासवर्ड अत्यंत तकलादू ठेवू नका. म्हणजे तुमचे नाव, जन्मतारीख, कुटुंबातल्यांचे नाव वगैरे गोष्टी पासवर्ड्मध्ये अजिबातच आणू नका. सगळ्यात चांगला पासवर्ड म्हणजे ज्यामध्ये अप्परकेस, लोअरकेस, नंबर, पंक्च्युएशन आणि काही विचित्र शब्द असतील, जे कल्पनाशक्तीच्या पलिकडचे आहेत. एकच पासवर्ड जास्त अकाऊंटसाठी वापरू नका. पासवर्ड नियमित बदलत राहा. 

6. क्लाऊडपासून सावध राहा. सध्या जास्तीत जास्त डेटा क्लाऊडवर सेव्ह करून ठेवला जात आहे. अशा परिस्थितीत क्लाऊडवर कितपत सेन्सिटिव्ह डेटा ठेवायचा, याचा निर्णय आपणच करायचा आहे. भले गुगल, फेसबूकचे क्लाऊड असेल, मात्र वैयक्तिक डेटा क्लाऊडवर सेव्ह केल्याक्षणी दुसऱयाच्या ताब्यात जातो, हे लक्षात ठेवा. ज्या फाईल्स तुम्ही मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून डिलिट केल्या आहेत, त्या क्लाऊडवरूनही डिलिट झाल्या आहेत, हे तपासून घेत चला. 

7. फुकटचे वायफाय वापरत असाल, तर कोणताही खासगी डेटा शेअर करू नका. उदा. सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या वाय फाय वरून मुव्हीचे तिकीट बूक करण्यासाठी तुम्ही क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगचे पासवर्ड वापरायला जाल, तर ते चोरीला जाण्याची हमखास शक्यता असते. जगातील सर्वात मोठ्या हॉटेल्समधील सार्वजनिक वाय फाय देखील पूर्णपणे सुरक्षित नसते. त्यामुळे, फुकट मिळाले म्हणून वापरण्याच्या नादात खासगी माहिती शेअर होऊ देऊ नका. 

8. अपडेटस् वेळच्या वेळी घ्या. त्यामध्ये तुमच्या सिस्टिमची अपडेट असू शकतील किंवा एखाद्या अॅपची. ज्या ज्या वेळी सिस्टिम अपडेट केली जाते, त्या त्या वेळी तत्कालिन हॅकिंगला प्रतिबंध करणारी उपाययोजना जरूर केली जाते. त्यामुळे, तुम्ही वापरत असलेला प्रोग्रॅम अप टू डेट आहे, याची नेहमी खात्री करा. 

9. सोशल मीडियावर बागडताना प्रायव्हसी सेटिंग्ज आवर्जून तपासा. तुम्ही भेट देत असलेली प्रोफाईल्स, वाचत असलेली माहिती, करत असलेले संभाषण सार्वजनिक होतेय की प्रायव्हेट राहतेय याची वेळोवेळी खात्री करा. त्यासाठी प्रायव्हसी सेटिंग्ज वेळच्यावेळी तपासून घ्या.

10. सर्वात शेवटी आणि सर्वात आवश्यक म्हणजे दर्जेदार अॅन्टी व्हायरस वापरा. तुमचा डेटा अमूल्य असतो. तो सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही जरूर काळजी घ्याल, त्याशिवाय चांगल्या दर्जाचे अॅन्टी व्हायरस वापरले, तर दुहेरी संरक्षण मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com