महिलांना डिजिटल व्यवहाराचे धडे !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

तंत्रज्ञान साक्षरता ही काळाची गरज बनत असून, त्याबद्दल नागरिकांना विशेषत: महिलांना साक्षर करणे आवश्‍यक आहे.

पुणे : मोबाईलच्या 'प्ले स्टोअर'मधे जाऊन भीम ऍप कसा ओपन करायचा... त्यामध्ये आवश्‍यक ती माहिती कशाप्रकारे भरायची...त्याद्वारे डिजिटल व्यवहार कसा करायचा, याचे प्रात्यक्षिक महिलांनी जाणून घेतले. निमित्त होते 'तंत्रज्ञान साक्षरता' विज्ञान कट्टा उपक्रमाचे. यामध्ये महिलांनी सूचनांनुसार प्रयोग केले आणि तंत्रज्ञानाचे धडे गिरविले.

शारदा शक्तीतर्फे आयोजित या कार्यक्रमात ग्रीन एनर्जीच्या संचालिका शर्मिला ओसवाल यांनी 'डिजिटल तंत्रज्ञान- सक्षमीकरणासाठी' या विषयावर मार्गदर्शन केले. सोबतच नम्रता हिंगे यांनी आर्थिक व्यवहारांसाठी भीम ऍपचा उपयोग आणि त्याच्या वापराचे प्रात्यक्षिक सादर केले. संपदा बॅंकेच्या संचालिका संगीता मावळे, संस्थेच्या अध्यक्षा राजश्री कशाळकर उपस्थित होत्या.
तंत्रज्ञान साक्षरता ही काळाची गरज बनत असून, त्याबद्दल नागरिकांना विशेषत: महिलांना साक्षर करणे आवश्‍यक आहे. ही बाब लक्षात घेऊन या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी ओसवाल म्हणाल्या, ''सध्या देशात तंत्रज्ञान क्रांतीचे वारे वाहू लागले आहे. आर्थिक व्यवहारांचे मॉडेल वेगाने बदलत आहे. प्रत्येक गोष्टीत तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यामुले महिलांनीदेखील तंत्रज्ञानसाक्षर झालेच पाहिजे. महिलांनी 'आपण काहीतरी चुकीचे करू' ही भीती न बाळगता मोकळेपणाने तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही पुढील पिढीसोबत अधिक चांगल्याप्रकारे जोडले जाऊ शकाल.''