साठ सेकंदांत मोबाईलवर 'वेबसाइट'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

'seemba' अॅपचे वैशिष्टे

  • किराणा दुकान, पार्लर, छोटे हॉटेल अशांचे मार्केटिंग होणार
  • छोट्या उद्योगांना ऑनलाइन व्यासपीठ मिळणार
  • उत्पादनाची विक्री वाढणार
  • व्यवसायाच्या योग्य व्यवस्थापनासाठी मदत
  • ग्राहकांशी संवाद साधता येणार
  • डॉक्‍टरांसारख्या सेवा क्षेत्रातील गटांनाही मोठी संधी

पुणे : स्वत:ची वेबसाइट आणि तीदेखील अवघ्या साठ सेकंदांत! कोणाचाही विश्‍वास बसणार नाही; परंतु 'सिम्बा' नावाच्या अॅपने मोबाईल फोनवर अशी 'वेबसाइट' बनवण्याची सुविधा निःशुल्क उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे हल्लीच्या ऑनलाइन जगतात आमचेही अस्तित्व आहे हे दाखवण्याची मोठी संधी डॉक्‍टर, व्यापारी, छोटे-मध्यम व्यावसायिक, उद्योजक, दुकानदार आदींसाठी चालून आली आहे. या 'ऑनलाइन ओळखी'चा उपयोग अर्थातच व्यवसायवाढीसाठी होऊ शकेल.

सध्याच्या डिजिटल युगात उद्योग-व्यवसायांचे स्वरूप वेगाने बदलत आहे. स्वत:चे 'ऑनलाइन अस्तित्व' असणे अत्यंत गरजेचे बनले आहे. ज्यांचे ऑनलाइन अस्तित्व (प्रेझेन्स) त्यांचा व्यवसाय वेगाने वाढल्याची असंख्य उदाहरणे आहेत. मोठ्या उद्योग-व्यवसायांसाठी हे सोपे आहे; परंतु छोट्या आणि मध्यम उद्योग-व्यवसाय किंवा सेवा उद्योगांना हे शक्‍य होत नाही. कारण त्यासाठी खर्च तर होतोच, शिवाय अधिक वेळ लागतो आणि पारंपरिक वेबसाईट चालवण्यासाठी प्रशिक्षित व्यक्तींची नेमणूक करावी लागते. 'सिम्बा'मुळे या अडचणींवर मात करता येणार आहे. 'सिम्बा'वर अगदी सहजपणे तुम्ही वेबविश्‍वात ऑनलाइन होऊ शकता. 'सिम्बा'चे सहसंस्थापक असफ किन्डलर आणि व्यवसायवृद्धी विभागाचे प्रमुख अल्बर्टो लोरे यांनी गुरुवारी (ता. 4) पत्रकार परिषदेत याविषयी सविस्तर माहिती दिली.
असफ म्हणाले, "गुगल कंपनीच्या पाहणीनुसार छोटे व्यवसाय ऑनलाइन आले, तर त्यांचा व्यवसाय ऑफलाइनपेक्षा दुप्पट होऊ शकतो. त्यामुळे सिम्बा कंपनी छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना, सेवा उद्योगांना यशस्वी होण्यासाठी मदत करणार आहे. सिम्बा अॅप सर्वांना मोफत डाऊनलोड करता येणार आहे.''
"हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर प्रत्येक छोटा व्यावसायिक गुगल मॅपवर दिसणार आहे. त्यामुळे छोटे उत्पादन शोधणाऱ्या ग्राहकांना त्या व्यावसायिकापर्यंत पोचण्यास मदत होणार आहे. याद्वारे त्या व्यावसायिकाचा मोबाईल क्रमांक आणि माहिती ग्राहकाला मिळू शकते. ग्राहकवाढीसाठी याद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत,'' असेही असफ यांनी सांगितले.
"कंपनीद्वारे फेसबुक आणि गुगलवर मायक्रोमार्केटिंग केले जाणार आहे. त्यामुळे व्यवसायात वाढ होईल,'' असे अल्बर्टो म्हणाले.

असे सर्च करा हे अॅप
अॅपची माहिती देणारे संकतेस्थळ आहे. 'seemba' असे गुगलवर किंवा प्लेस्टोरवर सर्च केल्यास आपल्यासमोर या अॅपची माहिती येते. हे अॅप डाऊनलोड करून तुमच्या व्यवसायासंबधित माहिती भरा. त्यानंतर तुमची प्रोफाईल तयार होईल. त्यावर तुम्ही फोटो, माहिती टाकून वेब परिपूर्ण करू शकता. फेसबुकवरही सर्च केल्यास या अॅपची माहिती मिळेल.
 

ब्रिंग महाराष्ट्र ऑनलाइन

राज्य सरकारने 'डिजिटल महाराष्ट्र'साठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला सक्रिय पाठिंबा म्हणून 'सिम्बा'ने www.bringmaharashtraonline.com च्या माध्यमातून मोहीम उघडली आहे. या अंतर्गत राज्यातील छोटे-मध्यम उद्योग, व्यवसाय आणि सेवांना ऑनलाइन स्थान निर्माण करून दिले जात आहे. 'सिम्बा' निःशुल्क अॅप खास त्यासाठी डिझाइन केले आहे. त्यामुळे ऑनलाइन विश्‍वात स्वत:च्या सेवांची, उत्पादनांची ओळख करून देणे, जाहिरात करणे अत्यंत सोपे होणार आहे.