इंटरनेटवर भारतीय भाषांना 'अच्छे दिन'

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

सध्या भारतात 40 कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. त्यापैकी 24.3 कोटी लोक भारतीय भाषांचे वापरकर्ते आहेत. हा आकडा 2021 पर्यंत 53.6 कोटी इतका होईल.

- चेतन कृष्णास्वामी, विभाग प्रमुख, सार्वजनिक धोरण, गुगल इंडिया 

भारतीय भाषांवर प्रेम करणाऱयांसाठी ही चांगली बातमी आहे. येत्या काळात इंटरनेट भारतीय भाषांमध्ये सर्वाधिक वाढेल आणि तब्बल 65.77 हजार कोटी रूपयांच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत भारतीय भाषांचा वाटा सर्वाधिक असेल. 

हा अंदाज खुद्द गुगल इंडियाने बुधवारी व्यक्त केला आहे. 'आपण प्रादेशिक भाषांमध्ये इंटरनेट वाढवले नाही, तर भविष्यकाळ पूर्णपणे वेगळा असू शकेल. सध्या भारतात 40 कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. त्यापैकी 24.3 कोटी लोक भारतीय भाषांचे वापरकर्ते आहेत. हा आकडा 2021 पर्यंत 53.6 कोटी इतका होईल,' असे गुगल इंडियाच्या सार्वजनिक धोरण विभागाचे प्रमुख चेतन कृष्णास्वामी यांनी सांगितले. 

इंडियन मोबाईल काँग्रेस दिल्लीत सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कृष्णास्वामी पत्रकारांशी बोलत होते. 

'इंटरनेट उद्योगाने हे समजून घेतले पाहिजे. त्यांनी भारतीय भाषांमध्ये माहिती तयार करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. इंटरनेटवरील माहिती केवळ इंग्रजी भाषेत ठेवून चालणार नाही,' असे कृष्णास्वामी यांनी सांगितले.

गुगल इंडिया सातत्याने भारतातील डिजिटल इकॉनॉमीबद्दल आशावादी राहिलेली कंपनी आहे. कंपनीने अलिकडेच तेज (TEZ) नावाचे अॅप लाँच केले आहे. डिटिजल आर्थिक व्यवहारांसाठीचे हे अॅप आहे. केवळ भारतीय गरजा लक्षात घेऊन हे अॅप गुगलने बनवले आहे.

'येत्या आठ वर्षांत, 2025 पर्यंत डिजिटल अर्थव्यवस्था 65 हजार कोटी रूपयांचा टप्पा ओलांडेल. ही अशक्य बाब नाही. सध्या डिजिटल अर्थव्यवहारांचा देशाच्या सकल उत्पन्नात सात टक्के वाटा आहे. तो 2025 पर्यंत 17 टक्के असेल,' असा आशावादही कृष्णास्वामी यांनी व्यक्त केला.

Web Title: Marathi news Internet in Indian languages