ताणतणावामुळे 'पीसीओएस'ची समस्या 

योगिराज प्रभुणे
रविवार, 3 सप्टेंबर 2017

जागतिक आरोग्य संघटनेतर्फे (डब्ल्यूएचओ) सप्टेंबर हा 'पीसीओएस' (पॉलोसिस्टिक ओव्हॅरिअन सिन्ड्रोम) जाणीव जागृती महिना म्हणून पाळला जातो. महिलांमध्ये विशेषतः किशोर वयीन मुलींमध्ये या आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्या निमित्ताने स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. तृप्ती काळे यांच्याशी साधलेला संवाद. 

शरीरात चयापचयासाठी इन्शुलिन हा महत्त्वाचा संप्रेरक असतो. 'पीसीओएस'मध्ये शरीरातील पेशी इन्शुलिनला दाद देत नाही. त्यातून शरीरात इन्शुलिनचे प्रमाण वाढते. त्यातून भूक वाढते आणि त्याचा परिणाम रुग्णाचे वजन वाढण्यात होतो. स्त्री संप्रेरकांपेक्षा (इस्ट्रोजेन) पुरुष संप्रेरकांचे (ऍन्ड्रोजेन) प्रमाण वाढल्याने मानेवरील त्वचा काळी होते. त्याला वैद्यकीय परिभाषेत 'एक्‍यानथोसिस नायग्रन्स' म्हणतात. तसेच याचा थेट परिणाम बीजग्रंथींवर होतो व मासिक पाळी अनियमित होते. 

स्पर्धेच्या युगात सध्याच्या ताणतणाव वाढले आहेत. जीवनशैलीमध्ये वेगाने बदल झाले आहेत. व्यायामाचा अभाव, जेवण्याच्या अनियमित वेळा या सर्वांचा परिणाम हा आजार वाढण्यात होत आहे. त्यामुळे या आजाराने गंभीर स्वरूप धारण केले आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील मुलींमध्ये या आजाराचे प्रमाण वेगाने वाढत असले, तरीही त्याची कारणे मात्र वेगवेगळी आहेत. व्यायामाचा अभाव, अन्नधान्यांमधील रासायनिक द्रव्ये, कीटकनाशके, प्रदूषण, धूम्रपान, मद्याचे सेवन, कामाच्या बदलत्या वेळांमुळे शहरातील मुलींमध्ये 'पीसीओएस'चे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण मुलींमध्ये योग्य पोषणाचा अभाव हे मुख्य कारण आहे. किशोरवयीन मुलींमध्ये जंकफूड, शीतपेय, मानसिक ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन न होणे, आनुवंशिकता हे देखील यामागची प्रमुख कारणे असल्याचे आता सिद्ध होत आहे. 

या आजाराच्या वाढत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुर्वेद शास्त्रातील वात आणि कफ बिघडल्याने होणाऱ्या आजारांची लक्षणे 'पीसीओएस'शी मिळती-जुळती आहेत. शरीरातील दोषांना नियमित ठेवण्यासाठी योग्य व चौरस आहार, व्यायाम, नियमित पंचकर्म यातून चयापचयाची प्रक्रिया सुधारते. तसेच ऍलोपॅथीमध्येही संप्रेरकांचा वापर, लेझर थेरपी, वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेली औषधे, यातून 'पीसीओएस' विरुद्धची लढाई लढती जात आहे.